January 21, 2026
बिहारनंतर भाजपने बंगालमध्ये ‘जंगलराज’ मुद्दा आक्रमकपणे पुढे केला आहे. २०२६ च्या निवडणुकीत ममता बॅनर्जींना रोखण्यासाठी भाजपची नवीन रणनिती जोर धरत आहे.
Home » बिहारनंतर आता पश्चिम बंगाल…
सत्ता संघर्ष

बिहारनंतर आता पश्चिम बंगाल…

स्टेटलाइन –

बिहारप्रमाणे बंगालमधे जंगलराज थोपवायचे असेल तर कोलकत्याच्या सिंहासनावर भाजपची सत्ता येणे गरजेचे आहे असे भाजप सांगत आहे. बिहारप्रमाणे बंगालमधेही जंगलराजचा मुद्दा आक्रमकपणे मांडण्याची भाजपने रणनिती आखली आहे. जंगलराजचा मुद्दा निवडणुकीत केंद्रस्थानी आणला जात असताना ममता यांना अँटीइन्कबन्सीचा मोठा तडाखा येत्या निवडणुकीत बसला तर भाजपचा राज्यात सत्ता काबीज करण्याचा मार्ग सुकर होऊ शकतो अशी समिकरणे मांडली जात आहेत.

डॉ. सुकृत खांडेकर

एक निवडणूक जिंकल्यावर भारतीय जनता पक्ष पुढच्या निवडणुकीच्या तयारीला सुरूवात करतो. निवडणूक लढविण्यासाठी पक्षाची यंत्रणा आणि त्या त्या क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे जाळे सतत कार्यरत राहील याची पक्ष काळजी घेत असतो. प्रत्येक निवडणूक जिद्दीने लढवायची व जिंकण्यासाठीच लढायची हा मोदी- शहा याचा मंत्र आहे. पुढील निवडणुकीचा बिगुल निवडणूक आयोगाच्या अगोदर भाजपमधे फुंकला जातो. बिहार निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर पाटणा आणि दिल्लीत भाजपचा जल्लोष चालू होता, मुंबई- महाराष्ट्रासह देशातील प्रत्येक लहान मोठ्या शहरात भाजपच्या कार्यालयांसमोर गुलाल उधळला गेला व मिठाई वाटली गेली पण त्याच वेळी पक्षाच्या बिहार हँडलवर वाचायला मिळाले, अब पश्चिम बंगाल की बारी है…. जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून दावा करणाऱ्या भाजपचा अजेंडा काय आहे, याचा शोध घेतला तर देशातील सर्व राज्यात सत्ता काबीज करायची हेच उत्तर मिळेल. एका राज्यात सरकार स्थापन केल्यानंतर दुसऱ्या राज्यात सत्ता कशी स्थापन करता येईल याकडे भाजपची सर्व यंत्रणा जुंपली जाते. एके ठिकाणी यश मिळाले म्हणून या पक्षात कोणी समाधानी नसते. शतप्रतिशत हेच पक्षाचे ध्येय आहे याचा पुनरूच्चार मोदी –शहा- नड्डांनी अनेकदा केला आहे. एका राज्यात सरकार स्थापन केल्यावर पक्षाची यंत्रणा निवांत बसत नाही, हीच या पक्षाची मोठी ताकद आहे.

बिहार निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात पक्ष कार्यकर्त्यांचा विजयी मेळावा झाला. आपल्या गळ्यातील गमचा बाहेर काढून तो हाताने उंच फडकवत मोदी पक्षाच्या मुख्यालयात आले. देशाचा पंतप्रधान पक्षाच्या मेळाव्यात भाजपचा एक कार्यकर्ता म्हणून विजयोत्सव कसा साजरा करतो हे सर्व देशाने बघितले. या मेळाव्यात आपल्या भाषणात मोदी म्हणाले- गंगा जी ( नदी ) , यहां बिहार से बहते हुए बंगाल तक पहुँचती है. बिहार ने बंगाल मे बीजीपी की विजय का रास्ता भी बना दिया है. मैं बंगाल के भाई और बहनोंको आश्वस्त करना चाहता हूँ कि अब बीजेपी आप के साथ मिलकर, पश्चिम बंगाल से भी जंगलराज को उखाड फेकेंगी….

बिहारमधे जंगलराज पुन्हा येईल अशी भिती मोदी- शहांनी त्यांच्या प्रत्येक सभेत मतदारांना घातली होती. आता याच मुद्द्यावरून भाजप पश्चिम बंगालमधे विधानसभा निवडणूक लढवणार आहे. बिहारमधे जंगलराज निर्माण करणारे लालूप्रसाद यादव होते, लालू –राबडीदेवींच्या काळात बिहार जंगलराज बनले होते, सूर्यास्तानंतर कोणत्याही शहरात- गावात सामान्य माणसाला घराबाहेर पडणे मुष्किल होते, आया बहिणींना कुठेही सुरक्षा नव्हती. लुटमार, हत्या, खंडण्यांनी बिहार ग्रासले होते. कायदा सुव्यस्था ढासळली होती. थोडीशी जरी चूक केलीत तर पुन्हा जंगलराज येईल अशी भिती मोदी – शहांनी बिहारच्या मतदारांना निवडणूक प्रचारात घातली होती. बिहारमधे लालूप्रसाद यादव व त्यांचा पुत्र तेजस्वी यादव व त्यांचा पक्ष राजद यांना भाजपने खलनायक ठरवले होते आता पश्चिम बंगालमधे मुख्यमंत्री ममता ब’नर्जी व त्यांचा पक्ष तृणमूल काँग्रेस यांना खलनायक ठरवायला भाजपने सुरूवात केली आहे.

बिहारमधे जंगलराज विरोधात भाजपने रान पेटवले होते आता पश्चिम बंगालमधे जंगलराज म्हणून आतापासूनच रान पेटवायला सुरूवात झाली आहे. पश्चिम बंगालमधे पुढील वर्षी एप्रिल महिन्यात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे म्हणूनच बिहारमधे एनडीएचे सरकार स्थापन होताच भाजपने बंगालच्या निवडणूक प्रचाराचे फटाके फोडायला सुरूवात केली आहे.

पश्चिम बंगालमधे विधानसभेच्या २९४ जागा आहेत. महाराष्ट्र व बिहार विधानसभेपेक्षा बंगालमधे आमदारांची संख्या जास्त आहे. कोविडनंतर सन २०२१ मधे झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठ्या जिद्दीने बंगालमधे निवडणूक लढवली, भाजपने आपला पाया विस्तारला व भक्कम केला पण ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसचे सरकार या राज्यात सलग तिसऱ्यांदा स्थापन झाले. पाच वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत भाजपने तृणमूल काँग्रेसला मोठे आव्हान उभे केले होते. ममता बॅनर्जींनी तब्बल तीन दशकांची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची राजवट रस्त्यावर संघर्ष करून उधवस्त केली, डाव्या पक्षांना पश्चिम बंगालमधे आपला गाशा गुंडाळण्याची पाळी आणली आता भाजप ममता यांचे नेतृत्व व त्यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष यांना नेस्तनाबूत करण्याची तयारी करीत आहे.

गेल्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचे २१५ आमदार निवडून आले होते व भाजपचे ७७ आमदार विजयी झाले होते. ज्या राज्यात भाजपचा नामोनिशाणा नव्हता त्या राज्यात आता हजारो कार्यकर्ते भाजपचे झेंडे हाती घेऊन रस्त्यावर उतरताना दिसत आहेत. गेल्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला ४८ टक्के मते मिळाली होती तर भाजपला ३८ टक्के मते मिळाली होती. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या दोन पक्षातच जीवघेणी टक्कर होणार हे निश्चित आहे. बिहारमधे भाजपने नितीशकुमार यांना बरोबर घेऊन एनडीएची सत्ता पुन्हा काबीज केली आहे. पश्चिम बंगालमधे भाजपला कोणी मित्र पक्ष नाही, तिथे भाजपला स्वत:च्या बळावर निवडणूक लढवावी लागणार आहे. बिहारमधे नितीशकुमार सारखा प्रादेशिक नेता भाजपबरोबर होता, पश्चिम बंगालमधे कोणीही तगडा प्रादेशिक नेता भाजपबरोबर नाही. म्हणूनच भाजपला अचूक रणनिती आखून स्वत:च्या कार्यकर्त्यांची फौज घेऊन तृणमूल काँग्रेसशी लढावे लागणार आहे.

बिहारमधे भाजप सत्तेत होती, पश्चिम बंगालमधे सत्ता मिळविण्यासाठी भाजप गेली अकरा वर्षे ममता बॅनर्जींच्या विरोधात लढत आहे. पश्चिम बंगालमधे गुंडा राज आहे, कायदा सुव्यवस्था पार ढासळली आहे. सत्ताधारी व भाजप कार्यकर्त्यामधे सतत राडे चालू असतात. बांगलादेशातून मोठी घुसखोरी असून तृणमूल काँग्रेसचे त्यांना संरक्षण आहे, बांगला देशी व रोहिंग्यो मुस्लिमांनी बंगाल पोखरून निघाला आहे. बंगाली भाषिक नागरिकाला या राज्यात जीव मुठीत धरून जगावे लागत आहे, यामुद्द्यांभोवती भोवती भाजपने आपला प्रचार केंद्रीत केला आहे. बिहारप्रमाणे बंगालमधे जंगलराज थोपवायचे असेल तर कोलकत्याच्या सिंहासनावर भाजपची सत्ता येणे गरजेचे आहे असे भाजप सांगत आहे. बिहारप्रमाणे बंगालमधेही जंगलराजचा मुद्दा आक्रमकपणे मांडण्याची भाजपने रणनिती आखली आहे. जंगलराजचा मुद्दा निवडणुकीत केंद्रस्थानी आणला जात असताना ममता यांना अँटीइन्कबन्सीचा मोठा तडाखा येत्या निवडणुकीत बसला तर भाजपचा राज्यात सत्ता काबीज करण्याचा मार्ग सुकर होऊ शकतो अशी समिकरणे मांडली जात आहेत. महाराष्ट्र, हरयाणा, दिल्ली , बिहारमधे भाजपने मुसंडी मारल्यानंतर भाजपने आपले सारे लक्ष्य आता पश्चिम बंगालवर केंद्रीत केले आहे.

बिहारमधे नितीशकुमार यांच्यामुळे भाजपला मुस्लिम तसेच मागास व अतिमागास मतदारांनी मतदान केले होते. पश्चिम बंगालमधे मुस्लिम मतदान हे एक गठ्ठा तृणमूल काँग्रेसला मिळते हा आजवरचा अनुभव आहे. मुस्लिम मते भाजपकडे वळविण्यासाठी भाजपला या राज्यात एकही मित्र नाही. बिहारप्रमाणे बंगालमधे जातीय व धार्मिक समिकरण सारखे नाही म्हणूनच भाजपला तृणमूल विरोधात लढताना शिकस्त द्यावी लागणार आहे. एसआयआर ( मतदार यादी सुधारणा ) च्या विरोधात ममता सतत आवाज उठवत आहेत. बिहारमधे एसआयआरनंतर ६५ लाख मतदारांनी नावे वगळण्यात आली तसेच बंगालमधेही घडू शकते. पण तृणमूल काँग्रेसकडे मुस्लिम मतदारांची व्होट बँक व लढाऊ केडर ही दोन साधने मजबूत आहेत.

कुणाल घोष यांनी म्हटले आहे- बंगालचे राजकीय भविष्य हे पाटणा किंवा दिल्लीत लिहिले जात नाही. बंगालमधे भाजपचे बटेंगे तो कटेंगे धोरण स्वीकारले जाणार नाही. बंगालच्या मतदारांचा विश्वास ममतादीदींवरच आहे. हाच विश्वास २०२६ मधे दिसून येईल.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

मॅच सुरू झाली; ‘इंडिया’चा कर्णधार कोण ?

महायुती की ठाकरे बंधू ?

हरियाणा एक झांकी हैं…

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading