ऑपरेशन सिंदुरचा बदला घेण्यासाठी स्फोट घडवला का… पुलवामामधे सुरक्षा दलावर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानमधे घुसून भारतीय सैन्याने बदला घेतला होता, त्याचा विसर दहशतवाद्यांना अजून पडलेला नाही का … फरिदाबादच्या अल फलाह विद्यापीठातून डॉ. शहिन शहीदला पोलिसांना अटक केली आहे. जैशच्या भारतातील महिला विंगची ती प्रमुख होती. म्हणूनच दिल्ली स्फोटाचे धागेदोरे जैश ए मोहमंद या दहशतवादी संघटनेपर्यंत पोचत आहेत.
डॉ. सुकृत खांडेकर
सोमवारी, दहा नोव्हेंबर, २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजून ५२ मिनिटांनी राजधानी दिल्लीत लाल किल्ला परिसरात आय २० या महागड्या कारमधे भीषण स्फोट होऊन १२ जण ठार झाले व तीसपेक्षा जास्त जखमी झाले, या घटनेने सारा देश हादरला. लाल किल्ला परिसरात एकाच जागी तीन तासाहून अधिक वेळ पार्किंगमधे थांबलेली कार मेट्रो रेल्वे स्टेशनच्या दिशेने हळू हळू निघाली आणि सिग्नलला थांबली असताना प्रचंड आवाज होऊन मोठा स्फोट झाला. आगीचे उंच लोळ पसरले. आजुबाजुची वीस- पंचवीस वाहने, मोटारी व रिक्षा आगीत भस्मसात झाल्या. या स्फोटाने किमान बारा बळी घेतले व तीसपेक्षा जास्त जखमी झाले. लाल किल्ला मेट्रो स्टेशन बाहेर रक्ताचे सडे पडले. स्फोट एवढा भयानक होता की, ठार झालेल्या मृतदेहांचे हात, पाय, डोकी, आदी अवयव चौफेर फेकले गेले. नंतर हे अवयव गोळा करून मृतदेह पोस्टमार्टेमसाठी इस्पितळात नेण्यात आले.
दिल्लीतील भीषण स्फोटानंतर मुंबईसह देशातील सर्व मोठ्या शहरात व गर्दीच्या व मंदिरांच्या ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला. मुंबईतील सिध्दीविनायक मंदिर, शिर्डीतील साई मंदिर, तुळजापूर येथील तुळजाभवानीमाता मंदिर आदी ठिकाणी आलेल्या भक्तांची कडक सुरक्षा तपासणी करण्यात आली. देशातील विमानतळांवरही सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीतील स्फोटांतील दोषींना सोडणार नाही असा सज्जड दमही दिला. पण सर्वात हाय सिक्युरिटी झोन असलेल्या देशाच्या राजधानीत असा स्फोट कसा घडवला जाऊ शकतो… मागे संसदेचे अधिवेशन चालू असताना दोन तरूण प्रेक्षक गॅलरीत असेच घुसले होते व त्यांनी घोषणा देऊन सभागृहात उड्या मारल्या होत्या.
दिल्लीची सुरक्षा व्यवस्था ही केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत येते. लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ भीषण स्फोट झाल्यानंतर दिल्ली पोलीसांची मोठी कुमक तेथे गेलीच पण एनआयए ( नॅशनल इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी ) सह अनेक तपास यंत्रणा घटनास्थळी धावत गेल्या. एतिहासिक लाल किल्ला हा तर देशाचे प्रतिक म्हणून जगभर ओळखले जातो. लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्यदिनाला देशाचे पंतप्रधान देशाला उद्देशून भाषण करीत असतात. मग अशा संवेदनशील परिसरात एका कारमधे मोठा स्फोट होतो व त्यात डझनभर लोकांचे बळी पडतात, याचा सुगावा दिल्ली पोलिसांना किंवा गुप्तचर यंत्रणांना किंचितही कसा लागत नाही याचेच आश्चर्य वाटते.
हा दहशतवादी हल्ला होता की आत्मघातकी पथकाने स्फोट घडवला याचा पहिले दोन दिवस उलटले तरी खुलासा झाला नव्हता. लाल किल्ला परिसरात मोटारीत प्रचंड स्फोट घ़डविण्यामागे हल्लेखोरांचा हेतू काय होता हे स्पष्ट झाले नाही. या घटनेमागे जो मास्टर माईंड होता तो डॉक्टर उमर हा स्वतः आय २० ही मोटार चालवित होता का ..याच स्फोटात त्याचा मृत्यु झाला असे पुढे आले आहे. मास्टर माईंडच स्वतः स्फोट घडवून स्वतःच्या शरीराच्या चिंधडध्या करून घेत असेल तर त्यामागे कोणते मोठे कारण असू शकते… या घटनेमागे काहीतरी मोठे गूढ असू शकते.
स्फोटात जे ठार झाले त्यात मोठा नेता किंवा सेलेब्रेटी नव्हता. मग असा दहशतवादी स्फोट घडविण्यामागे त्यांचे टार्गेट काय होते.. ज्या ठिकाणी मोटारीत स्फोट झाला, त्या ठिकाणी चार सीसीटीव्ही आहेत. त्यांच्या फुटेजची कसून तपासणी चालू आहे. फॉरेनसिक लॅब, एटीएस आणि एनएसडीची टीमही बारकाईने तपासणी करीत आहे. उत्तर प्रदेश पोलिसांची एटीएस टीमही दिल्लीत दाखल झाली आहे. स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की, बाजुच्या दुकानातील वयस्कर लोक खाली पडले, आजुबाजुच्या इमारतींनाही हादरे बसले. लाल किल्ला परिसरात पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. मेट्रोमुळे हजारो प्रवाशांची सतत ये- जा असते. या परिसरात अगदी पूर्वीपासून मुस्लिम लोकसंख्या मोठी आहे. अशा संवेदनशील ठिकाणी सुरक्षा यंत्रणेचे दुर्लक्ष झाले की असे काही होऊ शकते याचा थांगपत्ताच कुणाला लागला नाही… देशाच्या राजधानीत नेहमीच सुरक्षा व्यवस्था कडक असते, नेहमीच हाय अलर्ट असतो. देश – विदेशातील अतिमहत्वाच्या व्यक्तींची दिल्लीत सतत ये- जा असते.
राष्ट्रपती भवन, पंतप्रधानांचे कार्यालय, साऊथ ब्लॉक व नॉर्थ ब्लॉक, सर्वोच्च न्यायालय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया , केंद्र सरकारची मुख्यालये, सर्व राजकीय पक्षांची व आर्थिक व व्यापार क्षेत्रातील उद्योग समुहांची मुख्यालये किंवा प्रधान कार्यालये, विविध देशांचे दूतावास देशाच्या राजधानीत आहेत. राजधानीतील सुरक्षा यंत्रणा नेहमीच सज्ज असली पाहिजे. सुरक्षा यंत्रणेकडे अत्याधुनिक व अद्ययावत शस्त्रास्त्रे हाती असतात. मग दहा नोव्हेंबरची स्फोटाची घटना घडली तेव्हा सुरक्षा यंत्रणा कमी पडली की गुप्तचर यंत्रणा अपयशी ठरली … नवी दिल्लीतील रस्त्यावरून कोणी व्हीआयपी नेता जाणार असेल तर पोलीस काही वेळ त्या रस्त्यावरील वाहतूक पूर्ण बंद करतात, मग सामान्य लोकांच्या सुरक्षिततेसाठी याच यंत्रणा किमान दक्षता का घेत नाहीत…
बिहार विधानसभेच्या दुसऱ्या व अंतिम टप्प्याच्या मतदानाच्या नेमके आदल्या दिवशी दिल्लीत संवेनशील विभागात मोठ्या स्फोटाची घटना घडते व मोठा रक्तपात होतो, हा काय योगायोग म्हणायचा का ..हाच दिवस व हीच वेळ स्फोटासाठी मास्टर माईंडने कशी निवडली…
दिल्लीत स्फोट घडण्यापुर्वी काही तास अगोदर जम्मू काश्मीर पोलिसांनी फरिदाबाद ( हरयाणा ) येथे संशयित दहशतवाद्यांवर कारवाई केली होती. चार डॉक्टरांसह आठ जणांना अटक केली होती. पोलिसांनी तेथे २९०० किलो विस्फोटक जप्त केले, एके ४७ रायफल्स ताब्यात घेतल्या. याचा अर्थ देशात फार मोठा धमाका करण्याचे कारस्थान योजले जात होते. पोलिसांच्या या कारवाईमुळे दहशतवादी व त्यांना पाठबळ देणारे बिथरले असावेत. फरिदाबादमधे बॉम्ब तयार करण्याची फॅक्टरी सापडली हे आणखी भयंकर आहे. दिल्लीत स्फोट घडवून कशाचा बदला घ्यायचा होता हे अजून उघड झालेले नाही.
ऑपरेशन सिंदुरचा बदला घेण्यासाठी स्फोट घडवला का… पुलवामामधे सुरक्षा दलावर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानमधे घुसून भारतीय सैन्याने बदला घेतला होता, त्याचा विसर दहशतवाद्यांना अजून पडलेला नाही का … फरिदाबादच्या अल फलाह विद्यापीठातून डॉ. शहिन शहीदला पोलिसांना अटक केली आहे. जैशच्या भारतातील महिला विंगची ती प्रमुख होती. म्हणूनच दिल्ली स्फोटाचे धागेदोरे जैश ए मोहमंद या दहशतवादी संघटनेपर्यंत पोचत आहेत.
लाल किल्ला मेट्रो स्टेशन समोरील मोटारीतील स्फोट हा दहशतवादी हल्ला होता की हा अपघात होता… मोटारीतील सीएनजीचा स्फोट झाला.. हा स्फोट नेमका कशामुळे झाला… स्फोट घडविण्यामागे दहशतवादी, आत्मघातकी की मानवी बॉम्ब … नेमके कोण आहे…
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
