घुबड हा पर्यावरणासाठी उपयुक्त आणि जैवसाखळीतील महत्त्वाचा घटक – डॉ. सतीश पांडे
विशेष मुलाखत ऐकण्यासाठी क्लिक करा…
वाल्हे : पिंगोरी (ता. पुरंदर) येथे इला फाउंडेशन आणि टाटा मोटर्स कमर्शिअल व्हेईकल यांच्या वतीने सहाव्या भारतीय घुबड ( उलूक ) महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. तीनदिवसीय या महोत्सवास परिसरातील शेकडो शाळांतील विद्यार्थी, देश-विदेशातील पक्षितज्ज्ञ, संशोधक, पर्यावरणप्रेमी तसेच ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
या महोत्सवासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विशेष सहकार्य लाभले. घुबडांविषयी समाजात अनेक चुकीच्या समजुती आणि अंधश्रद्धा आढळतात. प्रत्यक्षात घुबड हा पर्यावरणासाठी उपयुक्त आणि जैवसाखळीतील महत्त्वाचा घटक आहे. त्यांचे संवर्धन करण्यासाठी जनजागृती हा सर्वोत्तम मार्ग आहे,” असे इला फाउंडेशनचे संस्थापक डॉ. सतीश पांडे यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी घुबडांच्या मुखवट्यांची मिरवणूक काढून गावात पर्यावरण जागरूकतेचा संदेश दिला. नृत्य-गीते, भारूड, घुबडावरील मेहंदी व रंगावल्या, माती व कागदी कलाकृतींची प्रदर्शने, रेखाटन व पोस्टर स्पर्धा, ओरिगामी, कथा-कविता असे विविध उपक्रम यावेळी राबविण्यात आले. इला हॅबिटेट संशोधन केंद्रात घुबडांच्या विविध प्रजाती, त्यांचे निवासस्थान, आहार, पर्यावरणीय भूमिका यांची माहिती देणारे आकर्षक चित्रप्रदर्शन उभारण्यात आले होते. माती व कागदातून तयार केलेल्या कलाकृती, रांगोळ्या, माहितीपट, कार्टून व लघुपटांनी पर्यटकांचे विशेष लक्ष वेधले.
पिंगळा व वासुदेव या लोककलांवर आधारित विद्यार्थ्यांच्या सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली. महोत्सवाची सांगता प्रियांशू टकले या विद्यार्थ्याच्या मृदंगवादनाने झाली. महोत्सव यशस्वी करण्यासाठी माउली खोमणे, आविष्कार भुजबळ, आक्रम इनामदार, सचिन शिंदे आदींनी परिश्रम घेतले.
इला फाउंडेशन आणि टाटा मोटर्स कमर्शिअल व्हेईकल यांचे संयुक्त आयोजन हे या महोत्सवाचे विशेष वैशिष्ट्य आहे. पर्यावरण संवर्धन आणि समाजातील सकारात्मक बदलांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने टाटा मोटर्सने या उपक्रमाला हातभार लावला.
डॉ. सुरुची पांडे
पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारा उपक्रम
पिंगोरीतील सहावा भारतीय उलूक महोत्सव केवळ सांस्कृतिक सोहळा न ठरता, पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारा अर्थपूर्ण उपक्रम ठरला. घुबडांच्या संवर्धनासाठी गरजेची जनजागृती विद्यार्थ्यांपासून ते ग्रामस्थांपर्यंत पोहोचवून हा महोत्सव यशस्वीरीत्या पार पडला, असे सरपंच संदीप यादव, पोलिस पाटील राहुल शिंदे यांनी सांगितले.

इला फाउंडेशन आयोजित भारतीय घुबड ( उलुक ) महोत्सव 2025 मध्ये सहभागी होण्याचे भाग्य मिळाले, माझ्या सोबत माझे मित्र निलेश घारसे, सर्पमित्र डॉ शुभम करडे, वन्यजीव रक्षक अभिजित पाटील होते. खरंतर आम्ही दोन वर्षापासून प्रयत्न करत होतो पण योग्य वेळ येत नव्हती, पेठ वडगाव आणि परिसरातील शाळेतील विद्यार्थ्यांनी घुबड पक्ष्यांची काढलेली चित्रे मात्र नक्की पाठवत होतो. आमचे मित्र डॉ ओंकार सुमंत आणि राजकुमार यासाठी पाठपुरावा करत असायचे. मला नेहमीच पक्ष्यांबद्दल प्रेम आहेच, घुबड पक्ष्यांबद्दल सुद्धा जाणून घ्यायची इच्छेतून गेल्या दहा - बारा वर्षात डॉ अमोल पाटील, निलेश, संदीप पाटील, प्रकाश जगदाळे, विजय मुंदाळे आदी आपल्या भागातील घुबड पक्ष्यांच्या अधिवासाचा अभ्यास केला. काहीवेळा आमच्याकडे जखमी घुबड पक्षी यायचे त्यावेळी सुद्धा वाटायचे की या क्षेत्रात अभ्यासाची गरज आहे. यावर्षी पर्यावरण संवर्धनात अखंडित सेवा केलेल्या संस्था म्हणून आमच्या निसर्गप्रेमी मित्र मंडळ, पेठ वडगावला त्यांनी निसर्ग संवर्धन पुरस्कार दिला हे आमच्यासाठी आनंदाची गोष्ट होती. पुणे जिल्ह्यातील शेकडो शाळेतील मुलें अगदी सकाळपासून या कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी येत होती त्यांचे चेहरे, पोशाख उलुकमय होते, आख्या भारतातून आलेली घुबडाची चित्रे संपूर्ण मांडवाच्या पडद्यावर लावण्यात आलेली, आपल्या भागातील शाळेतील चित्रे पाहून आनंद झाला. विशेष करून पेठवडगावचे चित्रकलेचे शिक्षक संतोष कांबळे यांचे विशेष सहकार्य लाभले. बी. वाय. हायस्कुल, आदर्श विद्यानिकेतन मिणचे, आदर्श गुरुकुल विद्यालय, सायरस पुनावाला स्कुल पेठ वडगाव यांचे सुद्धा यामध्ये खूप मोलाचे योगदान मिळाले आहे. बाकी घुबड पक्ष्यांच्याविषयीची गाणी, खेळ, पथनाट्य, नाटक तसेच कलाकृती पाहून संपूर्ण परिसर उलुकमय झाला. नेपाळ मध्ये गेल्या 30 वर्षापासून घुबड संवर्धन करत असलेले राजू शर्मा, महाड चे वन्य जीव अभ्यासक प्रेमसागर मेस्त्री, स्वप्नील कुंभोजकर यांची भेट प्रेरणादायी ठरली. पक्षी प्रेमींनी, निसर्गप्रेमी, शिक्षकानी आयुष्यात एकदा तरी या उलुक महोत्सव पिंगोरी येथे भेट द्यावी. कारण घुबड पक्ष्यांच्या विषयी असणाऱ्या अंधश्रद्धा, गैर समजुती मधून होणारी तस्करी, शिकार , अधिवास संवर्धन, त्यांचे मानवी (शेतकऱ्यांचा मित्र) तसचं निसर्गात असणारे महत्व जाणून घेणे आवश्यक आहे. डॉ अमोल पाटील अध्यक्ष , निसर्गप्रेमी मित्र मंडळ, पेठ वडगाव 9823631818
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
