जिजाऊ-सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकी-६
३ जानेवारी २०२६ ते १२ जानेवारी २०२६ दरम्यान सावित्री ते जिजाऊंच्या कर्तृत्ववान लेकी या अंतर्गत १० महिलांच्या यशोगाथा…यामध्ये आज नीलाक्षी काळे – सालके यांच्या कार्याचा परिचय…
ॲड. शैलजा मोळक
लेखक, कवी, संपादक, प्रकाशक
अध्यक्ष, शिवस्फूर्ती प्रतिष्ठान पुणे
मो. 9823627244
‘मातृभाषेला मित्रभाषा बनवा, मात्रभाषा बनवून मृतभाषा बनवू नका.’ असे सांगत मराठीचा प्रचार प्रसार करणाऱ्या नीलाक्षीताई यांनी ‘My मराठी’ ही इंग्रजी व मराठी माध्यमातील विद्यार्थी व पालकांसाठी उपयुक्त माहितीपूर्ण अशी पुस्तिका स्वखर्चाने काढून पोहोचवायचे काम सुरू केले आहे. मराठी भाषा वृध्दिंगत व्हावी व तिचा प्रचार प्रसार व्हावा यासाठीचा हा नीलाक्षीताईंचा हा प्रयत्न अभिनंदनीय व कौतुकास्पद आहे. यात राज्यगीत, छत्रपती शिवाजी महाराजांची अर्थासह गारद, अर्थासह शिवमुद्रा पासून ते मराठीचे महत्वाचे दिवस, धार्मिक स्थळे, महाराष्ट्रातील संत, राशी व नक्षत्र, चौदा विद्या व चौसष्ट कला, मराठी साहित्य प्रकार, नातेसंबंधाची ओळख, महाराष्ट्रातील जिल्हे व किल्ले, ग्रामीण कामांची माहिती अशी विविधांगी माहिती संकलित केली आहे.
मातृगंध या संस्थेच्या माध्यमातून मराठी भाषा संवर्धनासाठी नीलाक्षीताई या on line माध्यमाद्वारे बाल व किशोर गटासाठी नियमित वाचन कट्टा, पुस्तकमैत्री मोठ्यांसाठी वाचन कट्टा, मुलांसाठी सुट्टीत शिबिर, पत्रलेखन, निबंधलेखन, वक्तृत्व, चर्चा, लेखक आपल्या भेटीला, मराठी पुस्तक भिशी असे विविध उपक्रम चालवतात. वाचन कट्टा या माध्यमातून आजवर सुमारे ३०० विविध विषयांवरील पुस्तके ताईंनी वाचली आहेत. याविषयी सविस्तर माहिती द्यायला स्वतंत्र लेख करावा लागेल.
एका आय.टी. कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर पदावर कार्यरत असताना आपला शनिवार, रविवार मराठीसाठी देणं हीच कौतुकाची गोष्ट आहे. १८ वर्षापासून त्या आय.टी. कंपनीत काम करतात व सन २०२२ पासून त्यांनी मातृगंध ही संस्था स्वखर्चाने सुरु केली. MCS., MBA. करून मराठीसाठी काम करण्यासाठी ताईंनी डॅा. अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली म्हणून BA व MA मराठी हे सलग ५ वर्ष शिक्षण पूर्ण केले. माहेर व सासर दोन्हीकडे शैक्षणिक वारसा असल्याने घरातून पाठिंबा मिळाला.
‘आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव हे माझे माहेर पण शिक्षणासाठी आईवडीलांनी वसतिगृहात ठेवले. त्यामुळे काटकसर, सर्वांशी जुळवून घेणे, अन्नाला नावे न ठेवता समोर येईल ते आनंदाने खाणे ही शिकवण आईवडीलांनी दिली. आजोबांनी दिलेली शिकवण म्हणजे समाधान मानता आलं पाहिजे. नितीने वागावे. कोणालाही चांगला सल्ला द्यावा. पैशाच्या मागे न धावता माणसे कमवा. नाती जपा.’ याचा उपयोग आज आयुष्यात यशस्वी होताना होत आहे असे ताई सांगत होत्या.
ताईंचे लग्न २००७ साली झाले पण १० वर्ष मूल नव्हते. २०१७ साली मुलगी झाली. आय.टी. कंपनीत काम करत असल्याने बाळंतपणाच्या रजेनंतर मुलीला सांभाळून नोकरी कशी करायची हा प्रश्न भेडसावू लागला. पतीचा व्यवसाय असल्याने एकाने नोकरी करणे आवश्यक असल्याने ताईंनी नोकरी सोडायचा विचार केला नाही. सासू-सासरे व आईवडील दोघेही वयस्कर असल्याने शहरात यायला नाखूष होते. तरीही दोघांनीही ६ महिने मुलीला सांभाळले. नंतर मनावर दगड ठेवून ताईंनी १३ महिन्याची मुलगी माहेरी ठेवली व आठवड्याला ये- जा सुरु केले. मुलगी अडीच वर्षाची झाल्यावर ताईंना थोड्या दिवसांसाठी यू.के.ला जायची संधी मिळाली. ताई तिकडे गेल्या आणि कोरोनामुळे तिकडेच अडकल्या. पूर्ण वर्षाने मुलगी साडेतीन वर्षांची झाल्यावर त्यांना भारतात यायला मिळाले. मुलीचा वर्षभराचा माझ्या करियरसाठी केलेला त्याग त्या सतत सांगतात. आज नऊ वर्षांची ताईंची मुलगी मराठीचे प्रचंड वाचन करते. लेखकांशी बोलते. तिला ताईंना मराठी माध्यमातच शिकवायचे होते पण त्यांच्या रहात्या घराजवळ मराठी शाळाच न मिळाल्याने त्यांना तो विचार रद्द करावा लागला. पण ती आज उत्तम मराठी बोलते व वाचते हे ताई अभिमानाने सांगतात.
‘लहानपणापासून घरापासून दूर राहिल्याने स्वावलंबन, निर्णयक्षमता, आत्मविश्वास या गोष्टी प्रगल्भ झाल्या. पतीनेही कायम विश्वास दाखवला. मी नोकरी व घर कायमच चांगल्या पध्दतीने सांभाळले. मित्र, मैत्रिणींची साथ चांगली मिळाली. पतीची व्यवसायामुळे अनेकदा फिरती असल्याने मी अधिक सक्षम बनत गेले.’ असे ताई आत्मविश्वासाने सांगतात.
आय.टी. तील लोक ऐटीत असतात असे म्हटलं जातं. परंतु ताईंचा साधेपणा, तत्वावर व विचारांवर ठाम राहून यशस्वी लीडर म्हणून ताई कार्यरत आहेत. कार्पोरेट जगात वावरतानाही ताई परप्रांतीय सहकाऱ्यांना मराठी बोलायला शिकवत आहेत. महाराष्ट्रीय लोकांनी मराठीतच बोलले पाहिजे याविषयी त्या आग्रही असतात.
मराठी शाळा बंद पडत आहेत. मराठी शिक्षक फक्त चर्चा व चिंता व्यक्त करतात पण ताई प्रत्यक्ष मराठीसाठी करत असलेले काम पाहाता अनेक शिक्षकही प्रेरित होत आहेत. ॲाफिसमधील त्यांचे मराठीविषयीचे अनुभव ऐकण्यासारखे आहेत. त्यातूनच अनेकांना प्रेरणा मिळते. पुण्यात आलेल्या बाहेरच्या लोकांना ताई नेहमीच मदतीचा हात देतात त्यामुळे HR च्या जोडीने PR खूप वाढला आहे असे त्या म्हणतात.
वाचनाची विशेष आवड असल्याने नोकरी व सामाजिक कार्याची प्रेरणा ही पुस्तकेच आहेत. ते आत्मचरित्रे वाचायला विशेष आवडतात त्यातूनच जगण्याची व संघर्षातून वाट काढायची प्रेरणा मिळते असे त्या ठामपणे सांगतात. सभोवती काही उल्लेखनीय काम केले किंवा कोणाला कोणत्याही निमित्ताने भेट द्यायला ताई आवर्जून पुस्तकेच खरेदी करतात व भेट देतात. मातृगंधमुळे साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांचा व रसिक वाचकांचा परिचय ही खूप मोठी भेट असल्याचे त्या मानतात. वेळ कमी मिळत असला तरीही ‘दिसामाजी काही तरी लिहावे । प्रसंगी अखंडित वाचीत जावे॥’ याप्रमाणे ताई प्रचंड वाचत असतात.
मातृगंधच्या माध्यमातून ताईंनी परदेशी मुलांच्या सुट्ट्या लक्षात घेऊन अमेरिका, कॅनडा, यु.के., युरोप, ॲास्ट्रेलिया, दुबई, अबुधाबी या देशातही मराठी भाषा शिबीराचे आयोजन करतात. तसेच त्यांनी आजवर पुणे जिल्ह्यात २२ शाळा व आश्रमशाळा येथे व बीड वाचतंय यासाठी ५०० पुस्तके भेट दिली आहेत. तसेच तळेगाव दाभाडे, भोर, श्रीगोंदा, अमरावती अशा ठिकाणी ५ मातृगंध वाचनालयांची निर्मिती केली आहे.
नीलाक्षी ताईंच्या या कामाची दखल जागतिक महिला दिनानिमित्त कॅासमॅास बॅंक व कनि महिला मंच, राजर्षी शाहू गौरव पुरस्कार, पारनेर तालुका मित्रमंडळ, मुक्ताई प्रतिष्ठान अशा अनेकांनी घेऊन त्यांचा सन्मान केला आहे.
आय. टी. कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर पदावर काम करताना ऐटीत न जगता ताई आपला सुट्टीचा वेळ हा आपल्या मुलीसाठी व इतरांच्या मुलांनी मराठी वाचावं व शिकावं यासाठी देत आहेत. आपण ही या उपक्रमात सहभागी होऊन ताईंचे बळ वाढवूयात. अशा या पुस्तक वेड्या, वाचनवेड्या मराठी प्रेमी अशा जिजाऊ – सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकीला मानाचा मुजरा..!!
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
