January 20, 2026
Political analysis of Mumbai municipal elections highlighting Mahayuti and Thackeray brothers rivalry
Home » महायुती की ठाकरे बंधू ?
सत्ता संघर्ष

महायुती की ठाकरे बंधू ?

मुंबई कॉलिंग –

केंद्रात भाजपाप्रणित एनडीएची सत्ता आहे. राज्यात भाजपाप्रणित महायुतीची सत्ता आहे. नुकत्याच झालेल्या नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीत भाजपाने धुव्वाधार यश मिळविले आहे. देशात मोदी पर्व सुरू झाल्यापासून राज्यात भाजपाचा झंजावात सुरू झाला आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत तसेच भाजपाचे राज्यातील सर्वोच्च नेते आहेत. प्रशासनात व पक्ष संघटनेतील अंतिम निर्णय त्यांचाच असतो.

डॉ. सुकृत खांडेकर

राज्यातील २९ महापालिकांसाठी गुरूवारी, १५ जानेवारीला मतदान झाले. मुंबईसह २६ महापालिकांमधे भाजपाची सत्ता येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मुंबई महापालिका जिंकण्याची भाजपाची महत्वाकांक्षा ठाकरे बंधू रोखू शकतील का ? पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपाची असलेली सत्ता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार काबीज करू शकतील का ? ठाणे महापालिकेवर विक्रमी बहुमताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपले वर्चस्व कायम ठेऊ शकतील का ? वसई –विरार महापालिकेतील हितेंद्र ठाकूर यांचे वर्चस्व भाजपा मोडून काढेल का ? राज्यातील अन्य महापालिकांमधे भाजपाचा झंझावात कायम राहील का ? या प्रश्नांची उत्तरे आज शुक्रवारी मतमोजणीनतंर मिळणार आहेत. महापालिकांचा निवडणूक निकाल ही देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, एकनाथ शिंदे, अजित पवार, गणेश नाईक, वर्षा गायकवाड आणि प्रकाश आंबेडकर आणि हितेंद्र ठाकूर यांची परीक्षा ठरणार आहे.

राज्यातील मुंबई, छत्रपती संभाजीनगर, सांगली- मिरज – कुपवाड, नवी मुंबई वसई- विरार, कल्याण- डोंबिवली, कोल्हापूर, नागपूर, सोलापूर, अमरावती, अकोला, नाशिक, पिंपरी- चिंचवड, पुणे, उल्हासनगर, ठाणे, चंद्रपूर, परभणी , लातूर, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल, मिरा भाईंदर, नांदेड, जळगाव, अहिल्यानगर , धुळे, जालना, इचलकरंजी या महापालिकांसाठी मतदान पार पडले. या २९ महापालिकेतील ८९३ प्रभागांतील २८०१ जागांवर पंधरा हजारापेक्षा जास्त उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आपले नशीब आजमावत आहेत. मुंबईतील २२७ वॉर्डातून सतराशे उमेदवार लढतीत आहेत. मुंबई वगळता अन्यत्र ६८ नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे,

केंद्रात भाजपाप्रणित एनडीएची सत्ता आहे. राज्यात भाजपाप्रणित महायुतीची सत्ता आहे. नुकत्याच झालेल्या नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीत भाजपाने धुव्वाधार यश मिळविले आहे. देशात मोदी पर्व सुरू झाल्यापासून राज्यात भाजपाचा झंजावात सुरू झाला आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत तसेच भाजपाचे राज्यातील सर्वोच्च नेते आहेत. प्रशासनात व पक्ष संघटनेतील अंतिम निर्णय त्यांचाच असतो. शिवसेनेची पंचवीस वर्षे असलेली युती त्यांच्याच काळात तुटली आणि ठाकरेंच्या शिवसेनेची तोडफोड त्यांच्याच रणनितीने झाली. अगोदर शिवसेना व नंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडून दोन प्रबळ प्रादेशिक पक्षांना कमजोर करण्याची किमया त्यांच्याच नेतृत्वाने महाराष्ट्रात करून दाखवली. सन २०१७ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत पक्षाचे ८२ नगरसेवक निवडून आल्यावर शिवसेनेबरोबर सत्तेत सहभागी न होण्याची खेळी त्यांचीच होती. देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबईवरील ठाकरे सेनेची मक्तेदारी संपविण्यात देवेंद्र फडणवीस हे यशस्वी होतील काय याचे उत्तर निकालानंतर मिळेल. भाजपाने मुंबईत विजय मिळवला तर फडणवीसांच्या वर्चस्वावर व नेतृत्वावर शिक्कामोर्तब होईल.

वीस वर्षांनी ठाकरे बंधू आपापसातील वाद विसरून एकत्र आले व त्यांनी महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने मुंबईकरांकडे कौल मागितला आहे. मुंबई आणि मराठीचा मुद्दा भाजपाच्या हिंदुत्वाच्या मुद्दयावर मात करणार का, हे निकालानंतर दिसून येईल. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीला भाजपाने उत्तेजन, संरक्षण व नंतर बक्षिसी दिली. जून २०२२ मधे उध्दव ठाकरे यांचे सरकार कोसळले. ठाकरेंची शिवसेना म्हणजे मुंबई महापालिका हे समिकरण कायम ठेवण्यासाठी मुंबईकरांची ठाकरेंना साथ मिळणार का ? राजे ठाकरे यांनी मनसे स्थापन केल्यावर अनेकदा राजकीय भूमिका बदलल्या आहेत. कधी मोदींना पाठिंबा तर कधी विरोध. कधी शरद पवारांशी सख्य तर कधी निवडणूक न लढविण्याचा निर्णय. त्यांच्या धरसोड वृत्तीने त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्मण झालेले आहे. निकालानंतर ठाकरे बधुंना अपयश आले तर राज ठाकरे हे उद्धव यांच्याबरोबर राहतील का ? मुंबई महापालिकेत मनसेचा एकही नगरसेवक नाही. जे निवडून आले ते सातही उध्दव यांच्या पक्षात निघून गेले. त्यामुळे मुंबई- ठाण्यात किंवा नाशिकमधे मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील तो त्यांचा लाभच असेल. राज ठाकरे यांच्या भाषणाने निवडणुकीच्या प्रचाराची दिशाच बदलली किंबहुना महामुंबईत एकतर्फी निवडणूक होणार असे जे वातावरण होते त्याला चाप बसला.

ठाणे, कल्याण, डोंबिवलीवर एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व आहे व ते कसे मोडून काढायचे याची चिंता भाजपाला आहे. अंबरनाथ पालिकेत शिंदे यांचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले असताना भाजपाने काँग्रेसच्या निवडून आलेल्या नगरसेवकांना पायघड्या घालून पक्षात घेतले व एकनाथ शिंदे यांना डावलून पालिकेवर कब्जा मिळविण्याचा प्रयत्न केला. पण खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मुत्सद्दीपणाने भाजपाचा डाव उधळला गेला. महायुतीत शिंदे व अजित पवार असले तरी त्यांची ताकद मर्यादीत ठेवण्याची भाजपाची सतत धडपड चालू असते हे मुंबई, ठाणे व पुण्यात दिसून आले.

मनसे नको म्हणून काँग्रेसने उबाठा सेनेबरोबर जाण्याचे टाळले व प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहजन बरोबर युती करून मुंबईत निवडणूक लढवली. या दोन्ही पक्षांकडे सर्व २२७ जागांवर लढण्यासाठी उमेदवारही मिळाले नाहीत यापेक्षा दुर्दैव कोणते ? आपल्याकडे उमेदवार नाहीत म्हणून अनेक जागा वंचितने काँग्रेसला परत केल्या. पराभवाच्या मानसिकतेत असलेल्या पक्षांकडून वेगळी तरी काय अपेक्षा करणार?

नवी मुंबईत वनमंत्री गणेश नाईक यांना मंदा म्हात्रे यांच्याशी स्पर्धक म्हणून लढावे लागले. दोघेही नेते भाजपामधे आायाराम आहेत. पण धनवान आहेत. नाईकांकडे मोठी कार्यकर्त्यांची फौज आहे. दोघांना संभाळताना फडणविसांना तारेवरची कसरत करावी लागते. शिंदेवर नियंत्रण ठेवण्यासाठी नाईकांना भाजपाकडून उत्तेजन मिळत असते. त्यामुळे नाईकांना शिंदे व मंदा म्हात्रे या दोघांशी लढून आपले वर्चस्व कायम राखावे लागत आहे. महायुतीतील पक्षच एकमेकांविरूध्द लढत आहेत, नेते एकमेकांवर आरोप करीत आहेत. पैसे वाटून आणि मतदारांना गृहित धरून निवडणूक लढवली गेली हे वास्तव आहे. मतदानाच्या अंतिम टप्प्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सल्लागार ऑफीसवर क्राइम ब्रँचची धा़ड पडली आणि शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक असताना त्यांना डावलून आपला नगराध्यक्ष करण्याचे कारस्थान भाजपाने रचले . केंद्रात एनडीएमधे, राज्यात महायुतीत एकत्र पण महापालिका निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात… लोकांना काहीच कळत नाही, असे सत्ताधारी नेत्यांना वाटते काय ?


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

सिंधुदुर्ग जिल्ह्यात युद्धनौकेचे पाण्याखालील संग्रहालय प्रकल्प उभारणीस प्रारंभ

विरोधी पक्षनेत्याचे वावडे का ?

शिवसेनेचा वाघ

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading