स्टेटलाइन

मोदी यांचा पक्षात व सरकारमधे कमालीचा दरारा व धाक आहे. त्यांना कोणी प्रश्न विचारू शकत नाही आणि त्यांना प्रश्न विचारलेले आवडतही नाहीत. आपले सरकार जे काम करीत आहे ते लोकांपर्यंत पोचवा एवढेच त्यांचे पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सांगणे असते. सरकारमधील मंत्र्यांनाही कामाचे मुक्त स्वातंत्र्य नाही, पंतप्रधानांना जे अभिप्रेत आहे, तेच काम मंत्र्यांना करावे लागते. सतरा सप्टेंबर हा मोदींचा वाढदिवस. मोदी वयाची पंचाहत्तरी झाल्यावर निवृत्त होणार का ? याची चर्चा गेले काही महिने माध्यमातून होत राहीली.
डॉ. सुकृत खांडेकर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच भारतीय जनता पक्षाला नवा चेहरा दिला. मोदी नावाच्या जादुने भाजपला सलग तीन वेळा केंद्रात सत्ता मिळवून दिली. स्वत: मोदींनी पंतप्रधानपदाची हॅटट्रीक संपादन केली. दोन कोटी सदस्य संख्या असलेला भाजप हा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केला असला तरी त्यामागे नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेचे वलय व पाठोपाठ निवडणुका जिंकण्याचे कौशल्य आहे. वयाची पंचाहत्तरी झाली म्हणून पक्षातील लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आदी दिग्गजांना सत्तेच्या पदावरून दूर ठेवले गेले व त्यांची मार्गदर्शक मंडळात रवानगी करण्यात आली. पण नरेंद्र मोदी यांनी वयाच्या पंचाहत्तरीत पदार्पण केले असले तरी पक्षातील कोणीही त्यांना आता निवृत्त व्हा, असे सांगत नाही. याचे एकच कारण म्हणजे भाजपला केंद्रात व राज्याराज्यांत सत्ता मिळवून देण्याचा मंत्र त्यांच्याकडे आहे.
मोदी यांचा पक्षात व सरकारमधे कमालीचा दरारा व धाक आहे. त्यांना कोणी प्रश्न विचारू शकत नाही आणि त्यांना प्रश्न विचारलेले आवडतही नाहीत. आपले सरकार जे काम करीत आहे ते लोकांपर्यंत पोचवा एवढेच त्यांचे पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सांगणे असते. सरकारमधील मंत्र्यांनाही कामाचे मुक्त स्वातंत्र्य नाही, पंतप्रधानांना जे अभिप्रेत आहे, तेच काम मंत्र्यांना करावे लागते. सतरा सप्टेंबर हा मोदींचा वाढदिवस. मोदी वयाची पंचाहत्तरी झाल्यावर निवृत्त होणार का ? याची चर्चा गेले काही महिने माध्यमातून होत राहीली. पण मोदी देशाच्या सर्वोच्च पदावरून हटणार नाहीत व त्यांची मातृसंस्था असले्ल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कोणीही त्यांना निवृत्त व्हा किंवा यापुढे मार्गदर्शक मंडळात जा असे सांगितलेले नाही. निवडणुकीच्या राजकारणात मोदी नावाची जादू आजही बऱ्यापैकी चालते. सलग अकरा वर्षे पंतप्रधानपदावर राहिलेल्या नरेंद्र मोदी यांना वयाच्या पंचाहत्तरीनंतरही देश पातळीवर पर्याय उभा राहिलेला नाही. संघ स्वयंसेवक ते पंतप्रधान असा मोदींचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांनी कधी ग्रामपंचायतीची निवडणुकही कधी लढवली नसताना ते २००१ मधे गुजरातचे मुख्यमंत्री झाले. चार वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ते कधिही खासदार किंवा केंद्रात मंत्री झाले नसताना २०१४ मधे त्यांनी थेट पंतप्रधानपदाची शपथ घेतली.
मोदी हे सातत्याने आपल्या भाषणातून काँग्रेसला टार्गेट करीत असतात. काँग्रेसपासून देशाला धोका आहे, काँग्रेस पक्ष पाकिस्तान धार्जिणा आहे, काँग्रेसच्या काळात दहशतवाद व भ्रष्टाचार वाढला वगैरे वगैरे ते सतत सांगत असतात. जवारलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी असे एका परिवाराने देशाला तीन पंतप्रधान दिले. सोनिया गांधी व राहुल गांधी आणि प्रियंका वड्रा या तिघांची नावे देशात घराघरात ठाऊक आहेत. काँग्रेस हा एकच राष्ट्रीय पक्ष असून तोच भाजपाला देश पातळीवर आव्हान देऊ शकतो यांची जाणीव मोदींना असल्याने ते काँग्रेस व गांधी परिवारावर नेहमीच नेम धरत असतात.
पक्षाच्या कार्यकर्त्यांना सतत कार्यक्रम देणे, वेगवेगळे उपक्रम व मोहीमा राबविणे, केवळ भाजपाच तुमच्यासाठी काम करीत असतो असे जनतेच्या मनात बिंबवणे, पक्षाचे बॅनर्स- होर्डिंग्ज मोदी- शहांच्या तसेच मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांच्या फोटोसह मोक्याच्या जागी बारा महिने झळकत ठेवणे या बाबतीत कोणताही पक्ष भाजपाशी बरोबर करू शकणार नाही. देशात एकच पक्ष व एकच नेता आहे हे ठसविण्याचा भाजपाचा सतत प्रयत्न असतो. मोदी हे सर्वसामान्य जनतेला आकर्षित करणारे नेतृत्व आहे तर संघटना बांधणी व कामाचे नियोजन याची सर्व जबाबदारी अमित शहांवर आहे. मोदी व शहा हे दोघे गुजरातचे आहेत. जनतेला आकर्षित करायचे व विरोधकांना पराभूत करायचे या दोन्ही गोष्टी ही जोडी एकाच वेळी करीत असते.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोदींनी देशभर एक मोठा उत्सव म्हणून साजरा करून दाखवला, या उत्सवात घर घर तिरंगा ही घोषणा दिली व जनतेने त्याला उदंड प्रतिसाद दिला. कोविड काळातही त्यांनी मेणबत्या लावा, घंटा वाजवा, थाळ्या वाजवा असे आवाहन केले त्यालाही जनतेले भरघोस प्रतिसाद दिला. त्यांच्या घंटा व थाळ्या वाजवा याची टिंगल टवाळी बरीच झाली. पण आपले विरोधक काय म्हणतात, याकडे मोदी कधिच लक्ष देत नाहीत,त्यांना जे पाहिजे तेच ते करीत असतात. बिहारमधील काँग्रेसच्या सभेत तिथल्या मंचावरून कोणी तरी मोदींच्या आईंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले, त्यावेळी कोणाही मंचावर जबाबदार नेता हजर नव्हता. पण काँग्रेसने पंतप्रधानांच्या आईचा अपमान केला, म्हणजे हा भारत मातेचा अपमान केला, असे सांगत भाजपने बिहार बंद पुकारला. यापुर्वी मोदींनी त्यांच्या भाषणात सोनिया गांधीबाबत काय भाषा वापरली होती, याचा पाढा नंतर काँग्रेसने वाचायला सुरूवात केली. पण आपल्या आईचा अपमान केला म्हणून राहुल किंवा प्रियंका यांना देशात कुठे बंद पुकारावा असे सुचले सुध्दा नव्हते…
यापुर्वी अटल बिहारी वाजपेयी तीन वेळा पंतप्रधान झाले. लालकृष्ण अडवाणी हे उपपंतप्रधान झाले. पण त्यांना जे जमले नाही ते मोदींनी करून दाखवले. अयोध्येत राम मंदिर उभारून दाखवले, जम्मू- काश्मीरला विशेषधिकार देणारे ३७० वे कलम रद्द केले, तिहेरी तलाक पध्दत रद्द केली, लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारा कायदा केला. समान नागरी कायदा आणि एक देश एक निवडणूक यासाठी वाटचाल चालू आहे. नवीन संसद भवन उभारले. देशभर एकच कर प्रणली असलेला जीएसटी लागू झाला, उज्ज्वला ग’स योजनेचा लाभ ११ कोटी घरात मिळाला, ८१ कोटी गरीबांना दरमहा ५ किलो धान्य मिळू लागले, स्वच्छ भारत, आयुष्यमान भारत, मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, कोविड काळात सर्व देशवासियांना मोफत लस, लखपती दीदी, वंदे भारत ट्रेन, इशान्येकडील राज्यात व काश्मीरच्या खो्ऱ्यात रेल्वेचा विस्तार, तेवीस शहरांत मेट्रोचे जाळे, ८ नवीन आयआयएम, ४९० नवीन विद्यापीठे रस्ते व महामार्गाची वेगवान बांधणी अशा कल्याणकारी व पायाभूत सुविधा निर्माण करणाऱ्या अनेक गोष्टी मोदींच्या कारकिर्दीतच कार्यान्वित झाल्या आहेत. डिजिटल क्रांतीने तर देशाच्या अर्थव्यवस्थेला विलक्षण गती मिळाली आहे.
पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नंतर सर्वाधिक काळ पंतप्रधानपदावर राहण्याचा मान मोदींनी मिळवला आहे. २६ मे २०१४ रोजी त्यांनी पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. ४८०० दिवसांपेक्षा जास्त दिवस ते या पदावर आहेत. पंडित नेहरू हे १९४७ ते १९६४ या काळात ६१२६ दिवस पंतप्रधान होते. इंदिरा गांधी १९६६ ते १९७७ या काळात ४०७७ दिवस पंतप्रधान होत्या. डॉ. मनमोहन सिंग हे २००४ ते २०१४ या काळात ३६५६ दिवस पंतप्रधान होते. अटल बिहारी वाजपेयी पहिल्यांदा तेरा दिवस, नंतर तेरा महिने व नंतर पाच वर्षे पंतप्रधान होते, राजीव गांधी १८५७ दिवस पंतप्रधानपदावर होते.
मोदी भाजपाचे राष्ट्रीय सचिव व प्रवक्ते असताना पत्रकारांना नेहमी भेटत असत. गुजरातचे मुख्ममंत्री झाल्यावरही ते पत्रकारांशी चर्चा करीत. पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी अकरा वर्षात एकदाही पत्रकार परिषद घेतली नाही, याचे कारण तेच सांगू शकतील. ते कधी तरी माध्यमांना मुलाखती देतात मग पत्रकार परिषद घेणे का टाळतात ? देशात त्यांना विश्वगुरू म्हटले जाते पण पहलगाम हल्याकांडानंतर भारताने पाकिस्तानात घुसून दहशतवादी तळ नष्ट केले तेव्हा भारताची बाजु जगातील एकाही देशाने उघडपणे घेतली नाही, याचे कारण काय ? ऑपरेशन सिंदूर संपलेले नाही असे सांगायचे, सिंधु नदीचे पाकिस्तानला वाहून जाणारे पाणी बंद केल्यावर रक्त व पाणी एकाच वेळी वाहू शकत नाही म्हणायचे, मग पाकिस्तानबरोबर भारतीय क्रीकेट संघाला टी टुवेंटी खेळायला पाठवायचे हा विरोधाभास कसा ? मणिपूरमधे असंतोष खदखदत असताना देशात व विदेशात अनेक ठिकाणी दौरे करणारे मोदी तब्बल दोन वर्षानंतर त्या राज्यात गेले, हा विलंब कशासाठी ? जगातील सर्वात मोठी संसदीय लोकशाही असलेल्या भारतावर रशिया व चीन या दोन हुकुमशाही देशांबरोबर सलगी करण्याची वेळ आली व अब की बार ट्रम्प सरकार अशी घोषणा देणारे मोदी आता त्यांना टाळू लागले आहेत.
२०१४ मधे केंद्रात भाजप सत्तेवर आल्यानंतर काँग्रेसमुक्त भारत अशी घोषणा दिली गेली, मोदींच्या वलयापुढे काँग्रेसला पाठापोठ पराभव पत्करावे लागले. पण आज लोकसभेत काँग्रेसचे शंभर खासदार आहेत व लोकसभा व राज्यसभेत विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे आहे, याकडे दुर्लक्ष कसे करता येईल ? सर्व स्तरावर भ्रष्टाचार कमालीचा वाढला आहे पण त्याविषयी सत्ताधारी कोणीच बोलत नाही. आज देशातील बहुसंख्य मिडिया मोदींचे गुणगान करतो, असा प्रमुख आक्षेप घेतला जातो. याचे कारण माध्यमांच्या समुहाचे मालक हे मोदीवादी आहेत व देशात विरोधी पक्ष तुल्यबळ नाही आणि प्रबळही नाही. ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत ( पंचायत ते पार्लमेंट ) सर्वस्तरावर सत्ता भाजपाची असली पाहिजे, हा भाजपाचा अजेंडा आहे. जिथे भाजपा कमी आहे तिथे मित्र पक्षांची मदत घेतो व भाजपा ताकदवान झाल्यावर नंतर त्याच मित्र पक्षांची कशी फरफट होते हे देशभर बघायला मिळते. मोदींचा करिष्मा हा भाजपाचा हुकमी एक्का आहे. वाजपेयी- अडवाणींपेक्षा मोदी-शहांचा भाजप वेगळा आहे. २०२९ ची लोकसभा निवडणूक मोदींच्या डोळ्यापुढे आहे. सत्तेच्या दिशेने नेणारे मोदी हेच भाजपाचे पॉवर हाऊस आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
