प्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरू
नवी दिल्ली – डाळींचे देशांतर्गत उत्पादन वाढविण्याकरिता शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी, सरकारने 2024-25 या खरेदी वर्षात मूल्य समर्थन योजनेअंतर्गत (पीएसएस) राज्याच्या उत्पादनाच्या 100% समतुल्य तूर, उडीद आणि मसूर खरेदी करण्यास मान्यता दिली आहे.
सरकारने 2025 च्या अर्थसंकल्पात अशी घोषणा देखील केली आहे की देशातील डाळींमध्ये स्वयंपूर्णता प्राप्त करण्यासाठी 2028-29 पर्यंत पुढील चार वर्षांसाठी राज्याच्या उत्पादनाच्या 100% तूर, उडीद आणि मसूर खरेदी नाफेड आणि एनसीसीएफ या केंद्रीय नोडल एजन्सींद्वारे केली जाईल.
त्यानुसार, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 2024-25 च्या खरीप हंगामात मूल्य समर्थन योजनेअंतर्गत आंध्र प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये एकूण 13.22 लाख मेट्रिक टन तूर (अरहर) खरेदी करण्यास मान्यता दिली. शेतकऱ्यांच्या हितासाठी आंध्र प्रदेशात 90 दिवसांचा खरेदीचा कालावधी आणखी 30 दिवसांनी वाढवून पुढील महिन्याच्या 22 तारखेपर्यंत खरेदी करण्यासही मंत्र्यांनी मान्यता दिली आहे.
आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत एमएसपीवर खरेदी सुरू आहे आणि या महिन्याच्या 22 तारखेपर्यंत या राज्यांमध्ये एकूण 3.92 लाख मेट्रिक टन तूर खरेदी करण्यात आली आहे ज्याचा फायदा या राज्यांतील 2,56,517 शेतकऱ्यांना झाला आहे. नाफेडच्या ई-समृद्धी पोर्टल आणि एनसीसीएफच्या ई-संयुक्ती पोर्टलवर पूर्व-नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून देखील तूर खरेदी केली जाते. भारत सरकार नाफेड आणि एनसीसीएफ या केंद्रीय नोडल एजन्सींद्वारे शेतकऱ्यांकडून दिल्या जाणाऱ्या किमान आधारभूत किमतीवर तुरीची 100 टक्के खरेदी करण्यास कटिबद्ध आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.