‘आजी आणि तिची रानभाजी’ ही सध्याच्या जीवनापासून दूरदूर जाताना दिसत आहे. अनुभवाची गोष्ट सांगून नातवांचे जीवन समृध्द करणारी घरातली आजी, तिचा औषधी गुणकारी बटवा आणि मानवी आरोग्य समृध्द करणारी तिची रानभाजी या नव्या पिढीपासून काळाच्या ओघात हरवत जात आहे. अशा रानभाज्यांची ओळख करुन देणारी ‘आजीची भाजी रानभाजी’ ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा रत्नागिरी यांच्या सौजन्याने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत सुरु केलेल्या या मालिकेत आज जाणून घेऊया गोखरू रानभाजीविषयी…
प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते
जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी
शास्त्रीय नाव- Tribulus terrestris (ट्रायब्युलस टेरिस्ट्रिस)
कुळ – phyllaceae झायगोफायलेसी
स्थानिक नावे – गोखरू या वनस्पतीला ‘सराटा’, ‘काटे गोखरू’, ‘लहान गोखरु’, ‘गोक्षुर’ अशीही अन्य नावे आहेत.
इंग्रजी नाव – गोखरूला इंग्रजीत ‘स्मॉल कॅलट्रोप्स’ असे म्हणतात.
उष्ण, कोरड्या, कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशात गोखरू ही जमिनीवर पसरत वाढणारी रोपवर्गीय वनस्पती आहे. शेतात, ओसाड, पडीक जमिनीवर ही तण म्हणून सर्वत्र आढळते. गोखरू हे तण असले तरी, ती महत्त्वाची औषधी वनस्पती असून तिला वर्षभर फुले व फळे येतात.
गोखरूचे औषधी उपयोग
गोखरूचे मूळ व फळे औषधात वापरतात. मूळ बारीक चिवट, १० ते १२ सें.मी. लांब, गोलाकार, फिकट उदी रंगाचे असते. त्यास थोडासा सुगंध असून, रुची गोड तुरट असते. गोखरूचे मूळ दशमुळातील एक घटक आहे. गोखरू स्नेहन, वेदनास्थापन, मूत्रजनन, संग्राहक व बल्य आहे. गोखरू शीतल असून, मूत्रपिडांस उत्तेजक आहे.
गोखरुची फळे मूत्राच्या विकारांवर, लैंगिक आजारपणात अत्यंत उपयोगी आहेत. फळांचा काढा संधिवातावर आणि मूत्राशयाच्या विकारावर उपयोगी आहे. मूत्रपिंडाच्या दुबळेपणात पाण्यात धने, जिरे, गोखरू समप्रमाणात घेऊन कुटून, उकळवून गार करून घेतल्यास मूत्रप्रवृत्ती सुधारते, मूत्रपिंडास ताकददेखील येते. लघवी फार आम्लधर्मी असल्यास गोखरू फळांच्या काढ्यातून यवक्षार देतात. मूत्रपिंडाशोथात लघवी क्षारस्वभावी व गढूळ असल्यास फळांच्या काढ्यातून शिलाजित देतात. मूतखड्यावर फळांचे चूर्ण मधात खलून देतात.
गोखरू परमा आणि बस्तिशोधात वापरतात. वाजीकरणासाठीही गोखरूचा वापर करतात. लैंगिक दुर्बलतेत गोखरू व तिळाचे चूर्ण मध व बकरीच्या दुधातून देतात. धातूपुष्टतेसाठी गोखरू, गुळवेल आणि आवळे समभाग घेऊन त्याचे चूर्ण दुधातून द्यावे. आमवातात गोखरू व सुंठ यांचा काढा उपयुक्त आहे. पंडुरोगावर गोखरूचा काढा मध घालून देतात.
गर्भाशयाची शुद्धी होऊन वांझपणा नाहीसा होण्यासाठी गोखरू वापरतात. गर्भिणीच्या धुपणीस गोखरू चूर्ण खडीसाखर व तुपात कालवून देतात. धातुविकार व प्रदर या विकारांवर गोखरूची फळे तुपात तळून त्याचे चूर्ण करून गाईचे तूप व खडीसाखर घालून देतात.
गोखरूची भाजी
गोखरूची पाने व कोवळी खोडे भाजीसाठी वापरतात. यामुळे मूतखडा होण्याची प्रवृत्ती थांबते. कारण एकदा मूतखडा झाला, की वारंवार होत राहतो. हे होऊ नये म्हणून गोखरूची भाजी उपयोगी पडते. प्रमेहासारख्या व्याधीतही गोखरूची भाजी उपयुक्त ठरते. हृदयरोगांना मज्जाव करते. छाती भरली असल्यास ती कमी करण्यासाठी गोखरूची कोरडी भाजी देतात. कंबरदुखी, अंगदुखी यासाठीसुद्धा गोखरूची भाजी उपयोगी आहे.
पाककृती
साहित्य – कोवळी भाजी, भिजवलेली मूगडाळ किंवा तूरडाळ, बारीक चिरलेला कांदा, जिरे, मोहरी, हिंग, तिखट, मीठ इ.
कृती – भाजी स्वच्छ धुवून चिरून घ्यावी. कढईत तेल घेऊन त्यात जिरे, मोहरी, हिंग यांची फोडणी करून त्यात डाळ व कांदा परतून घ्यावा. नंतर चिरलेली भाजी घालावी. चांगले परतून घ्यावे. तिखट, मीठ घालावे. नंतर थोडे पाणी घालून भाजी शिजवून घ्यावी.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.