स्नेहल महादेव करपे यांनी कृषी पद्धतींचा पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम : कुंभी नदी खोऱ्याचा भौगोलिक अभ्यास या विषयावर शिवाजी विद्यापीठातून पी. एचडी मिळवली आहे. त्यांना या संशोधनात राजाराम महाविद्यालयाचे भूगोल विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. राजेखान शिकलगार यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या संशोधनाचा आढावा घेणारा हा लेख…
स्नेहल महादेव करपे
मोबाईल – 7741017566
पाणी, शेती आणि वाढते संकट
पाणी ही जीवनाची मूलभूत गरज आहे. अन्न, वस्त्र, निवारा या जीवनावश्यक गरजांपेक्षा पाण्याशिवाय जगणे अशक्य आहे. पृथ्वीवर ७० टक्के पाणी असले तरी त्यातील केवळ २.१८ टक्के गोडे पाणी वापरण्यासाठी उपलब्ध आहे. त्यातील मोठा भाग हिमनगांमध्ये साठलेला असल्याने माणसासाठी सहज उपलब्ध पाण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे पाण्याचे व्यवस्थापन व शाश्वत वापर ही आजची अत्यावश्यक गरज ठरली आहे.
भारत कृषिप्रधान देश आहे. येथील ९० टक्के पाणी शेती व पशुपालनासाठी वापरले जाते. हरितक्रांतीनंतर कृषी उत्पादनात प्रचंड वाढ झाली खरी; परंतु रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा अतिरेक यामुळे माती व पाण्याचे प्रदूषण वाढले. परिणामी ग्रामीण लोकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळणे अवघड झाले. याच पार्श्वभूमीवर कुंभी नदी खोऱ्यातील कृषी पद्धतींचा पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेवर होणारा परिणाम अभ्यासण्यात आला.
कुंभी नदी खोरे – भूगोल, समाज आणि शेती
कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात कुंभी नदी पंचगंगेची उपनदी आहे. या नदी खोऱ्याचे क्षेत्रफळ सुमारे ५११ चौ. कि.मी. आहे. पश्चिमेकडे सह्याद्री पर्वतरांग तर मध्यभागी सुपीक गाळमातीचे मैदान आहे. खोऱ्यात गगनबावडा, राधानगरी, करवीर व पन्हाळा या तालुक्यांतील १०३ गावे येतात.
येथील पश्चिम भाग डोंगराळ व जंगलांनी व्यापलेला असून शेतीसाठी प्रतिकूल आहे. तर पूर्व भागात सरळसोट मैदान असल्याने उसासारखी पाणी व खतखाऊ पिके घेतली जातात. भात, मका, भाजीपाला, टोमॅटो व तेलबिया हेदेखील मोठ्या प्रमाणावर घेतले जातात. या सर्व पिकांसाठी खतांचा व पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. लोकसंख्येच्या दृष्टीनेही हे क्षेत्र महत्त्वाचे आहे. अनेक गावे नदीकाठावर वसलेली असून, त्यांचा पाण्यासाठी थेट नदी व बोअरवेल यांवर अवलंब आहे.
कृषी पद्धतींचा पाण्यावर परिणाम – रासायनिक खते व कीटकनाशकांचे सावट
उत्पादनवाढीच्या स्पर्धेत शेतकरी आज भरमसाठ रासायनिक खते वापरतो. यूरिया, डीएपी, पोटॅश, फॉस्फेट्स, तसेच विविध कीटकनाशकांचा अतिरेक होत आहे. ही रसायने पिकांना तर लागतात, पण त्यातील मोठा भाग मातीद्वारे भूजलामध्ये मिसळतो.
- ऊस पिकासाठी प्रचंड प्रमाणात नायट्रोजनयुक्त खतांचा वापर केला जातो.
- भातशेतीत पाण्याचा अतिरेक व खते यामुळे नायट्रेट्स भूजलामध्ये उतरतात.
- भाजीपाला व बागायती पिकांमध्ये कीटकनाशकांचा जास्तीचा वापर केला जातो.
- या सर्वांचा परिणाम म्हणून विहिरी, बोअरवेल व अगदी नळपाण्यातही नायट्रेट्स, क्लोराइड्स, हार्डनेस व इतर रसायने आढळतात.
पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, गुणवत्ता आणि असमानता
कुंभी नदी खोऱ्यातील ५३ % गावे नळपाण्यावर अवलंबून आहेत. २२ % गावे बोअरवेल किंवा झऱ्यांवर, तर २५ % गावे अजूनही असुरक्षित विहिरींवर पिण्यासाठी अवलंबून आहेत. पाण्याची उपलब्धता ऋतूनुसार बदलते. पावसाळ्यात पाण्याचा मुबलक पुरवठा असतो; मात्र उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासते. काही कुटुंबांना पाणी आणण्यासाठी अजूनही लांब जावे लागते. महिलांवर पाण्याचे ओझे अधिक आहे. गुणवत्तेच्या बाबतीत मोठी असमानता आढळते. काही गावांना स्वच्छ नळपाणी मिळते, तर काही गावे अजूनही दूषित विहिरींवर अवलंबून आहेत.
संशोधनातील निष्कर्ष – पाणी प्रदूषणाची वास्तव स्थिती
- प्रयोगशाळेत तपासलेल्या नमुन्यांतून काही महत्त्वाचे निष्कर्ष पुढे आले :
- प्री-मान्सून काळात TDS सरासरी १९२ mg/L, तर पोस्ट-मान्सून काळात १६४ mg/L होते.
- पाण्याची कठोरता उन्हाळ्यात २०७ mg/L, पावसानंतर १५३ mg/L एवढी नोंदली गेली.
- चिंचवडे, बवेली, अडूर येथे नायट्रेट्स व क्लोराइड्सचे प्रमाण धोकादायक पातळीवर होते.
- वाघोबावाडी गावात पाण्याचा WQI ५,१८६ एवढा होता, जे अत्यंत प्रदूषणाचे निदर्शक आहे.
- यावरून दिसून येते की रासायनिक खतांचा अतिरेक पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता गंभीरपणे घसरवत आहे.
आरोग्यावर परिणाम – जलजन्य आजारांची वाढती जोखीम
- ग्रामीण भागात अजूनही पाणी थेट विहिरीतून किंवा बोअरवेलमधून पिण्यात येते. परिणामी दूषित पाण्यामुळे अनेक आजार उद्भवतात. संशोधनात आढळले –
- टायफॉईड, डायरिया, पिवळा कावीळ हे सर्वाधिक आढळलेले आजार.
- काही गावांत मलेरियाचे प्रमाणही जास्त आहे.
- जलजन्य आजारांची जास्तीची नोंद त्या गावांत झाली जिथे पाण्याचा WQI अत्यंत खराब होता.
- ग्रामीण आरोग्य सेवेची अपुरी साधने आणि तपासणीचा अभाव यामुळे अनेकदा आजाराचे निदान होत नाही.
- सस्टेनेबल उपाययोजना – शाश्वत शेती व जलव्यवस्थापनाची गरज
कुंभी नदी खोऱ्यात ArcGIS (Arc Geographic Information System) वापरून हे अभ्यासले…
- Watershed delineation (कुंभी नदी खोऱ्याची सीमा निश्चित करणे) केले गेले.
- Flow Direction आणि Flow Accumulation maps तयार करून कोणत्या गावातील शेतीचे रसायने नदीत मिसळतात ते ओळखले गेले.
- IDW interpolation maps द्वारे नायट्रेट्स, TDS, कडकपणा यांचे प्रदूषण हॉटस्पॉट्स दाखवले गेले.

पाण्याच्या समस्येवर तोडगा म्हणून या उपाययोजनांची गरज :
- संतुलित खत वापर : शेतकऱ्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण देऊन खतांचा अतिरेक टाळावा.
- सेंद्रिय शेती : कंपोस्ट, शेणखत, हरभरा, डाळी पिकवून जमिनीची सुपीकता वाढवावी.
- ठिबक व तुषार सिंचन : पाण्याचा कार्यक्षम वापर होईल.
- पिक विविधता : ऊसावर अवलंब कमी करून इतर पिके घ्यावीत.
- नळपाणी योजना विस्तार : विहिरीवरील अवलंब कमी करून सुरक्षित पाणी पुरवठा करावा.
- नियमित पाणी तपासणी : गावागावांत जलप्रदूषणाचे मोजमाप करणे बंधनकारक करावे.
धोरणात्मक शिफारशी व भविष्यातील दिशा-
- उच्च प्रदूषण असलेल्या गावांत विशेष जलशुद्धीकरण यंत्रणा बसवावी.
- कृषी खात्याने खतांचा संतुलित वापर करण्यासाठी अनुदाने व प्रोत्साहन योजना राबवाव्यात.
- ग्रामपंचायती स्तरावर पाणी समित्या स्थापन करून जलव्यवस्थापनाचा लोकसहभाग वाढवावा.
- जलग्रहण क्षेत्रांत कचरा व सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावावी.
- ArcGIS सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून प्रदूषण हॉटस्पॉट्स नकाशावर दाखवून धोरण आखावे.
जलसुरक्षेकडे वाटचाल
कुंभी नदी खोऱ्याचा अभ्यास दाखवतो की, कृषी पद्धतींचा पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेवर थेट परिणाम होतो. ऊस व भातशेतीत रासायनिक खतांचा अतिरेक, आधुनिक शेतीत यंत्रसामग्री व सिंचन पद्धतींचा वापर आणि असुरक्षित विहिरींवर अवलंब यामुळे पाण्याची गुणवत्ता दिवसेंदिवस घसरते आहे. ग्रामीण लोकांच्या आरोग्यासाठी ही परिस्थिती धोकादायक आहे. जलजन्य आजार वाढत आहेत. यावर तोडगा म्हणून शाश्वत शेती, संतुलित खत वापर, पाणी शुद्धीकरण, नळपाणी योजनांचा विस्तार आणि समाजाची सक्रिय भागीदारी यांची तातडीने गरज आहे. पाणी हीच खरी संपत्ती आहे. भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षित पाणी उपलब्ध राहावे यासाठी आजपासूनच ठोस पावले उचलणे अत्यावश्यक आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.