एक फेब्रुवारी रोजी लांजा रिंगणे येथे पुरस्काराचे वितरण
कणकवली – कवी अजय कांडर यांचे कोकणच्या साहित्य सांस्कृतिक चळवळीतील गेली 35 वर्षातील महत्त्वपूर्ण योगदान लक्षात घेऊन त्यांना राजापूर लांजा नागरिक संघामुंबईतर्फे देण्यात येणारा 2026 चा अक्षरमित्र पुरस्कार जाहीर झाला आहे. लांजा- रिंगणे येथे होणाऱ्या अकराव्या ग्रामीण साहित्य संमेलनात 1 फेब्रुवारी रोजी या पुरस्काराने कवी कांडर यांना गौरविण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे विद्यमान अध्यक्ष सुभाष लाड आणि सरचिटणीस प्रमोद पवार यांनी दिली.
राजापूर लांजा नागरिक संघ मुंबईतर्फे गेली काही वर्ष विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊ सन्मान केला जातो. यावर्षीच्या या वार्षिक पुरस्कार योजनेची घोषणा करण्यात आली असून यात कवी अजय कांडर यांना साहित्य चळवळीच्या योगदानासाठी अक्षरमित्र पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कवी अजय कांडर हे कोकणतील एक जबाबदार साहित्य – सांस्कृतिक कार्यकर्ते आहेत. 35 वर्षे त्यांनी तळकोकणात गांभीर्याने साहित्य चळवळ चालू ठेवली आहे.
साहित्य लेखन आणि वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले. त्यांच्या प्रभा प्रकाशनातर्फे मराठीतील मान्यवर लेखक कवींची पुस्तके प्रसिद्ध होत असतात मात्र ग्रामीण भागात नव्याने ग्रंथालय चळवळ सुरू करणाऱ्या संस्थांसाठी आपल्या प्रकाशनाची पुस्तके ते मोफत देत असतात. राजापूर डीएड कॉलेजच्या ग्रंथालयाला त्यांनी सातत्याने काही ग्रंथ भेट दिले आहेत.
त्याचबरोबर आवानओल प्रतिष्ठान कणकवली, समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, संस्कृती प्रतिष्ठान इचलकरंजी या साहित्य संस्थांची त्यांनी स्थापना केली असून या माध्यमातून कोकणसह महाराष्ट्राच्या विविध भागात अतिशय गांभीर्याने विविध उपक्रम राबविले जातात. त्याचबरोबर यावर्षीपासून अजय कांडर यांच्या संकल्पनेतून मुंबई येथे पंडित सत्यदेव दुबे नाट्य, चित्रपट पुरस्कार, कादंबरीकार भाऊ उपाध्ये साहित्य पुरस्कार आणि प्रा.गोपाळराव दुखंडे पुरस्कार सुरू करून कला साहित्य चळवळ क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींचा सन्मान करण्याचे काम करण्यास प्रारंभ केला आहे.
त्याचबरोबर सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्रातील कवींना मंच उपलब्ध व्हावा आणि त्यांची कविता अभिजात वाचकांपर्यंत पोहोचावी यासाठी त्यांच्या संकल्पनेतून ‘ सारेच पुरुष नसतात बदनाम’ सृजनरंग, सिंधुदुर्गातील आजची कविता, सिंधुदुर्गातील नवी कविता हे महत्त्वाचे ग्रंथही प्रकाशित करण्यात आले आहेत. त्याचबरोबर त्यांच्या प्रभा प्रकाशनातर्फे विविध साहित्य लेखनासाठी दोन पुरस्कार देऊन लेखक कवींचा दरवर्षी सन्मानही करण्यात येत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांना अक्षरमित्र पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
