स्टेटलाइन –
सम्राट चौधरींकडे गृह खाते याचा अर्थ राज्यातील कायदा सुव्यस्थेची सारी जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. पोलीस महासंचालकांपासून पोलीस उपायुक्तांपर्यंत सर्व अधिकारी हे त्यांच्याशी थेट संपर्क साधून अद्ययावत माहिती देतील. हिंसाचार, दंगली, मोठी गुन्हेगारी, अपहरण, अटक, स्थानबध्दता अशांवर त्यांचे पूर्ण नियंत्रण राहिल. राज्यातील नक्षलवाद, संघटीत गुन्हेगारी, ऑपरेशन ग्रीन हंट, सर्च ऑपरेशन, टोळी युध्द, गँगस्टर यावर लगाम घालण्याचे काम त्यांच्या मार्गदर्शनाखाली होईल.
डॉ. सुकृत खांडेकर
लालूप्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल ( राजद ) व नितीशकुमार यांचा जनता दल युनायटेड असा प्रवास करून भारतीय जनता पक्षात आलेल्या सम्राट चौधरी यांच्याकडे बिहारमधील एनडीए सरकारमधील सर्वात शक्तिशाली गृहखात्याचे मंत्री म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सम्राट चौधरी हे नितीशकुमार यांच्या सरकारमधे उपमुख्यमंत्री आहेत. गृहखाते मिळाल्याने त्यांचे महत्व वाढले आहे. नितीशकुमार यांनी दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन देशात विक्रम निर्माण केला आहे. त्यांनीही कधी काँग्रेस – राजद तर कधी भाजप अशा युती व आघाड्या बदलत सत्ता कायम राखली आहे.
मुख्यमंत्रीपदाच्या वीस वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी कधीच गृहखाते दुसऱ्या कोणाला दिले नव्हते. पण यावेळी राज्यात सर्वाधिक ८९ आमदार निवडून आलेल्या भाजपच्या दबावापुढे नितीशकुमार यांना झुकावे लागले आहे. कोणत्याही राज्यात मुख्यमंत्रीपद मित्र पक्षाला दिले की गृहखाते भाजप आपल्याकडे ठेवतो पण बिहार त्याला आजवर अपवाद होता, पण आता तेथेही हे मौल्यवान, संवेदनशील व ताकदवान खाते आता भाजपने आपल्याकडे ठेवले असून त्याची जबाबदारी सम्राट चौधरी यांच्याकडे सोपवली आहेत.
सम्राट चौधरी हे काही मुळचे भाजपचे नाहीत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही नाहीत. संघ परिवाराशी त्यांचा संबंधही नव्हता. पण राजद, जनता दल यु असे फिरत फिरत आठ वर्षापूर्वी पक्षात आलेले सम्राट हे भाजपचा चेहरा बनले आहेत. पक्षविस्तार व सरकार अशा दोन्ही पातळीवर सम्राट चौधऱी हे जास्त उपयुक्त आहेत अशी खात्री पटल्यामुळेच सम्राट यांना भाजपने बिहारमधील नंबर १ चा नेता बनवले आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप – जनता दल यु प्रणित एनडीएला आश्चर्यकारक प्रचंड जनादेश मिळाला. राजद आणि काँग्रेसचे पानीपत झालेच पण प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाला भोपळाही फोडता आला नाही. आता बिहारच्या मैदानात एनडीएची घोडदौड पाच वर्षे सुसाट असणार हे स्पष्ट झाले. बिहारमधे नितीशकुमार यांना बरोबर घेऊन सत्ता तर मिळवली पण उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरयाणा , दिल्ली, राजस्थान, आदी हिंदी भाषिक राज्यात भाजपाने आपले मुख्यमंत्री केले. बिहारमधे ही किमया भाजपला आजवर जमलेली नाही. पण यावेळी नितीशकमार यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाचा मान देऊन भाजपने गृहमंत्रीपद शिताफीने आपल्याकडे काढून घेतले.
बिहारमधे काही काळ अपवाद वगळता सन २००५ पासून एनडीएचे सरकार आहे. पण यापुर्वी भाजपला गृहमंत्रीपद कधीच मिळाले नव्हते किंवा नितीशकुमार यांनी ते आपल्याकडून सोडले नव्हते. बिहारमधे गेल्या त्रेपन्न वर्षात आजवर झालेल्या मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्रीपद प्रथमच दुसऱ्या पक्षाला दिले आहे. नितीशकुमार हे अतिशय धूर्त राजकारणी आहेत. गेली वीस वर्षे सलग ते मुख्यमंत्रीपदावर आहेत. त्यांनी गृहखाते भाजपला दिले ही त्यांची हतबलता असू शकते. भाजपाबरोबर सत्तावाटपाच्या झालेल्या सौदेबाजीत मुख्यमंत्रीपदाच्या बदल्यात त्यांना गृहमंत्रीपदाचा त्याग करावा लागला हेच वास्तव आहे. अगोदरच्या सरकारमधे सम्राट चौधरी हे अर्थ व व्यापारमंत्री होते. आता त्यांना एकप्रकारे भाजपने बढती दिली आहे. विशेष म्हणजे नव्या सरकारमधे दुसरे उपमुख्यमंत्री असलेल्या विजयकुमार सिन्हा यांच्याकडे महसूल खाते आहे पण गृहखाते सम्राट चौधरींकडे देण्यात आले आहे.
सम्राट चौधरींकडे गृह खाते याचा अर्थ राज्यातील कायदा सुव्यस्थेची सारी जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. पोलीस महासंचालकांपासून पोलीस उपायुक्तांपर्यंत सर्व अधिकारी हे त्यांच्याशी थेट संपर्क साधून अद्ययावत माहिती देतील. हिंसाचार, दंगली, मोठी गुन्हेगारी, अपहरण, अटक, स्थानबध्दता अशांवर त्यांचे पूर्ण नियंत्रण राहिल. राज्यातील नक्षलवाद, संघटीत गुन्हेगारी, ऑपरेशन ग्रीन हंट, सर्च ऑपरेशन, टोळी युध्द, गँगस्टर यावर लगाम घालण्याचे काम त्यांच्या मार्गदर्शनाखाली होईल. जेल सुरक्षा, व्हिआयपी सुरक्षा, आदी प्रक्रिया त्यांच्या अखत्यारीत येतील. धार्मिक उत्सव, सणवार, धार्मिक मिरवणुका, मंदिरांची सुरक्षा, गर्दीवर नियंत्रण यासाठी त्यांना चोवीस तास सतर्क राहावे लागेल. एनडीएला निवडून दिले नाहीत तर बिहारमधे पुन्हा जंगलराज येईल असा इशारा मोदी- शहा प्रत्येक प्रचार सभेतून देत होते. लालू- राबडी देवी कारकिर्दीतील बिहारची भयाण अवस्था सांगत होते. म्हणून सम्राट चौधरी यांना गृहमंत्री म्हणून डोळ्यात तेल घालून काम करावे लागेल.
बिहारमधे भाजपकडे प्रथमच गृहखाते आले, यामुळे राज्यातील सत्ता समिकरणे बदलली आहेत. सम्राट हे मुंगेर जिल्ह्यातील तारापूर जवळील लखनपूर गावचे. १९९० मधे त्यांनी लालूप्रसाद यादव यांच्या राजदमधे प्रवेश केला. त्यावेळी राज्यात राजद शक्तिशाली होता व राजदचीच चलती होती. त्यांचे वडिल शकुनी चौधरी हे तारापूरमधून अनेकदा निवडून आलेत. सम्राट चौधरी हे राबडी देवी यांच्या नेतृत्वाखालील राजद सरकारमधे कृषी मंत्री होते. ( भाजपच्या भाषेत जंगलराज ) तेव्हा ते आमदारही नव्हते. त्यांच्या वयावरून बराच वादंग निर्माण झाला होता. नंतर त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा देणे भाग पडले. यंदाच्या निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाने चौधरींवर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे आरोप केले. त्यांनी केलेल्या प्रतिज्ञापत्रातही विसंगती असल्याचे दाखवून दिले. प्रशांत किशोर यांनी केलेल्या आरोपांचा चौधरी यांनी इन्कार केला व आपल्यावर गंभीर गुन्हे नव्हते असेही म्हटले. १९९९ मधे सम्राट यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला पण सन २००० मधे ते राजदच्या तिकीटावर पुन्हा निवडून आले. राजदमधे त्यांचे महत्व वाढत गेले व सन २०१० मधे विधानसभेत ते पक्षाचे मुख्य प्रतोद बनले. पण २०१४ मधे राजदच्या पराभवानंतर पक्षाच्या तेरा आमदारांना घेऊन त्यांनी जनता दल यु मधे प्रवेश केला व लालू यादव यांना मोठा हादरा दिला. जतिराम मांझी फार कमी काळ मुख्यमंत्री होते, त्यांच्या सरकारमधे सम्राट चौधरी नगरविकास मंत्री होते. देशभरात असलेली भाजपची लाट पाहून चौधरी सन २०१७ मधे भाजपमध्ये आले. भाजपने त्यांचे लाल गालिचा अंथरून स्वागत केले व प्रदेश उपाध्यक्षपद दिले. सन २०२० ते विधान परिषदेवर निवडून आले व भाजपने त्यांना विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी दिली. सन २०२३ मधे भाजपने त्यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. भाजपचा ओबीसी चेहरा म्हणून त्यांना पक्षाने प्रकाशात ठेवले. सन २०२४ मधे नितीशकुमार यांनी राजद- काँग्रेसशी काडीमोड घेतला व एनडीएमधे परतले तेव्हा एनडीए सरकारमधे सम्राट चौधरी यांना उपमुख्यमंत्री म्हणून बढती मिळाली. सन २०२५ च्या निवडणुकीत चौधरी राजदचा पराभव करून मोठ्या मताधिक्याने निवडून आले व नवीन सरकारमधे उपमुख्यमंत्रीपद व गृहखाते त्यांना मिळाले.
बिहारच्या निवडणुकीत मोठ्या बहुमताने एनडीएचे सरकार येणार याची भाजपला पूर्ण खात्री होती. म्हणूनच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन महिने अगोदर नितीशकुमार यांच्याशी स्वतंत्र चर्चा करून विकासापेक्षा राज्यातील कायदा सुव्यवस्था किती महत्वाची आहे हे आकडेवारीनिशी पटवून दिले होते. बिहारमधे कठोर कायदा व सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी योगी पॅटर्न राबवला पाहिजे याचीही चर्चा झाली. नेपाळ-बिहार सरहद्द संवेदनशील आहे, नेपाळमधे राजकीय अस्थिरता आहे. बनावट नोटा, ड्रग्ज, शस्त्रास्त्रे, घुसखोरी , धार्मिक व दहशतवादी संघटना, बांगला देशातून रोहिंग्यो असे सर्व धोके बिहारच्या सरहद्दीवरून प्रवेश करतात. अशा वेळी गृहखाते भाजपच्या हाती असणे गरजेचे आहे हे शहा यांनी नितीशकुमार यांना पटूवन दिले. नितीशकमार यांना वयोमानाप्रमाणे कठोर राजकारणी म्हणून काम करायला मर्यादा आहेत. याची त्यांनाही जाणीव आहे. गुन्हेगार एक तर तुरूंगात असतील किंवा कबरीत असतील, असा योगी स्टाईल इशारा सम्राट चौधरी यांनी दिला आहे. म्हणूनच भाजप हायकमांडचा त्यांच्यावर विश्वास आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.

भाजप जिंकलीच कशी ? समजवण्याचा विश्लेषणात्मक प्रयत्न