November 22, 2025
निवडणुकीतील पराभव, नाराज नेते आणि संघटनात्मक कमकुवतपणामुळे काँग्रेसमध्ये आणखी फूट पडणार का? पक्षाच्या राजकीय संकटाचे सविस्तर विश्लेषण व बदलत्या परिस्थितीचा आढावा.
Home » काँग्रेसचे आणखी एक विभाजन होईल का ?
सत्ता संघर्ष

काँग्रेसचे आणखी एक विभाजन होईल का ?

स्टेटलाइन

राज्या- राज्यात पराभव झाल्यावर पक्ष संघटना बांधणीसाठी कुठे प्रयत्न होताना दिसत नाही. भाजपप्रमाणे कार्यकर्त्यांना सतत काम दिले जात नाही. निवडणुकांखेरीज पक्ष लोकांना दिसतच नाही. यापुर्वीही काँग्रेस पक्षात फूट पडली होती. १९६९ मधे पक्षात मोठी फूट पडली. सिंडिकेट व इंडिकेट काँग्रेस असे विभाजन झाले. काँग्रेस ( आर ) व काँग्रेस ( आय ) अशा दोन बॅनर्स खाली दोन पक्ष बरेच काळ वावरत होते. नंतर शरद पवार, ममता बॅनर्जी, असे अनेक बडे नेते काँग्रेसमधून बाहेर पडले व त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केले. पण बाहेर पडलेल्या नेत्यांना सन्मानाने पक्षात परत आणण्याचे काम झाले नाही.

डॉ. सुकृत खांडेकर

बिहारच्या निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांचा सुपडा साफ होईल अशी भविष्यवाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवडणूक काळात केली होती. निकालानंतर काँग्रेस, राजद अशा महाआघाडीची दाणादाण उडाली त्यामुळे अमितभाईंचे भविष्य खरे ठरले. निकालानंतर दिल्लीत भाजपच्या मुख्यालयात पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विजयी मेळावा झाला त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच काँग्रेसचे आणखी एक विभाजन होणार असल्याचे सुचित केले. पंतप्रधानच जेव्हा असे सांगतात तेव्हा त्यांच्याकडे काँग्रेसमधे फूट पडणार याची पक्की माहिती असावी. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात झालेल्या विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकांमधे काँग्रेस पक्षाचा पाठोपाठ दारूण पराभव झाला आहे.

काँग्रेसच्या पराभवाची मालिका तशी २०१४ पासूनच सुरू झाली आहे. २०१४ मधे केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार स्थापन झाले तेव्हापासून काँग्रेसमुक्त भारत अशी घोषणा भाजपने दिली होती. तरीही चार राज्यात काँग्रेसची सत्ता आली. नुकत्याच झालेल्या बिहारच्या निवडणुकीत काँग्रेसचे अवघे सहा आमदार निवडून आले, काँग्रेसचा एवढा दारूण पराभव या राज्यात यापुर्वी कधी झाला नव्हता. या निकालानंतर देशभरात काँग्रेस खचली आहे किंवा नैराश्यात आहे हे उघड आहे. पण काँग्रेस आणखी एका विभाजनाच्या मार्गावर आहे, असे पंतप्रधानांनी जाहीर सभेत सांगितल्यामुळे सर्वच विरोधी पक्षांना धक्का बसला आहे.

बिहार निकालानंतर भाजपच्या विजयी मेळाव्यात पंतप्रधान काँग्रेसबद्दल बरेच बोलले. निवडणुकीच्या प्रचारातही ते काँग्रेस व राजदला झोडून काढत होतेच. ज्या पक्षाचे केवळ सहा आमदार निवडून आले आहेत, त्या पक्षाची भाजपला अजून भिती का वाटावी हे समजत नाही. काँग्रेस व राजदला बिहारच्या यंदाच्या निवडणुकीत अनपेक्षित मोठा पराभव पत्करावा लागला. कोणत्याही ओपिनिअन किंवा एक्झिटपोलमधे महाआघाडीचा एवढा दारूण परभव होईल किंवा एनडीएला २०० पेक्षा जास्त जागा मिळतील असे म्हटलेले नव्हते. तेजस्वी यादव यांच्या सभांना लोकांची अफाट गर्दी लोटत होती, सर्वाधिक म्हणजे भाजपपेक्षा किती तरी जास्त मतदान हे राजदला झालेले आहे, तरीही या पक्षाला तीस जागाही मिळाल्या नाहीत याचे काय कारण असू शकते ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या दिल्लीतील मेळाव्यात म्हणाले – काँग्रेस अब मुस्लिम लिगी माओवादी काँग्रेस यांनी एमएमसी बन गई है.. मुझे लगता है काँग्रेस मे एक और बडा विभाजन हो सकता है…
पंतप्रधानांनी अशी भविष्यवाणी कशाच्या आधारावर केली ? २०१४, २०१९ आणि २०२४ अशा तीन सलग लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. २०२४ निवडणुकीत पक्षाचे शंभर खासदार निवडून आले म्हणून निदान राहुल गांधींना लोकसभेतील विरोधी पक्षनेते पद तरी मिळाले, त्यापुर्वी काँग्रेसला पन्नास जागा मिळवतानाही नाकी नऊ आले होते व विरोधी पक्षनेतेपदही मिळाले नव्हते. बिहारच्या निकालानंतर काँग्रेसचे भवितव्य काय ? अशी चर्चा पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. पंतप्रधानांच्या भविष्यवाणीने काँग्रेसचे विभाजन झाले तर कोण कोण नेते बाहेर पडतील असे अंदाज व्यक्त केले जात आहेत.

गांधी परिवाराच्या मक्तेदारीवरून काँग्रेसमधील जुणे जाणते अनेक नेते नाराज आहेत. मध्यंतरी पक्षात जी २३ ग्रुप स्थापन झाला होता. राहुल गांधी काँग्रेसला यश मिळवून देऊ शकत नाहीत अशी पक्षात अनेकांची खात्री पटली आहे. पण राहुल यांना पक्षात पर्याय कोण हे मात्र सांगितले जात नाही. सलमान खुर्शीद, शशि थरूर, कपिल सिब्बल, पी. चिदंबरम अशी अनेक नावे सांगता येईल की सध्याच्या नेतृत्वाविषयी समाधानी नाहीत. पण अखिल भारतीय पातळीवर पक्षाचे नेतृत्व करण्याची कुवत व धमक अन्य कुणातही नाही. बिहार विधानसभेत भाजपचे ८९ आमदार निवडून आले आहेत. काँग्रेसचे निवडून आलेले ६ आमदार तरी यापुढे पक्षात कायम राहतील याची तेथे शाश्वती नाही.

काँग्रेसमधे जे कोणी गांधी परिवारावर नाराज आहेत, त्यांना उत्तेजन देण्यासाठी पंतप्रधान मोदी हे काँग्रेसमधे विभाजन होईल अशी भिती घालत आहेत का ? जी २३ मधे असलेले गुलाम नबी आजाद यांनी स्वत:चा वेग‌ळा पक्ष स्थापन केला. कपिल सिबल हे सपाची मदत घेऊन राज्यसभेवर खासदार झाले. अशोक गेहलोट, आनंद शर्मा हे कुठे निर्णय प्रक्रीयेत नसतात. राहुल गांधीच्या भोवती जी चौकडी आहे, ती पक्षाच्या अन्य नेत्यांना त्यांच्यापर्यंत पोचू देत नाही. जनाधार नसलेल्या व संघटनात्मक अनुभव नसलेल्या निकटवर्तीयांना निवडणूक काळात महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या जातात त्यामुळे पक्षाची नेमकी अवस्था काय आहे हे श्रेष्ठींपर्यंत पोचतच नाही.

युवक काँग्रेसच्या दिल्लीतील कार्यालयातील एका कर्मचाऱ्यावर बिहार निवडणुकीत प्रभारी म्हणून पक्षाने जबाबदारी सोपवली होती त्याचा अन्य नेत्यांच्या मानसिकतेवर परिणाम होणारच. मध्य प्रदेशात पंचमढी येथे पक्षाचे नुकतेच शिबिर झाले, त्या शिबिराला राहुल गांधी यांना पोचायला दहा मिनिटे उशीर झाला म्हणून शिबिर प्रमुखाने दहा जोर काढण्याची त्यांना शिक्षा सुनावली. पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात जाऊन काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते मोदी सरकारच्या ऑपरेशन सिंदुरची माहिती आंतरराष्ट्रीय पातळीवर समजावून सांगण्यासाठी शिष्टमंडळात सहभागी झाले होते, त्यानेही पक्षात सामंजस्य व एकवाक्यता नसल्याचे चित्र दिसले.

राजस्थानात अशोक गेहलोट व सचिन पायलट यांच्यात शीत संघर्ष कित्येक वर्षे चालला आहे, त्याने पक्षाला सत्ता गमवावी लागली , आता दोन्ही नेते हात चोळत बसले आहेत. भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने सत्ता गमावली तेव्हा पक्ष संघटनेकडे लक्ष द्यायला खूप उशीर झाला हे लक्षात आले. मध्य प्रदेशात कमलनाथ हे मोठे नेते पक्षाशी निष्ठावान आहे. पण मध्य प्रदेशात भाजपने पाया भक्कम केला आहे. पक्ष संघटनेकडे हायकमांडला लक्ष द्यायला वेळ नाही, त्यातूनच एकापाठोपाठ एक राज्यात काँग्रेसचा आलेख घसरत आहे. काँग्रेसमधील खदखद भाजपने हेरली आहे. काँग्रेसचे अनेक दिग्गज गेल्या दहा वर्षात भाजपच्या वळचणीला गेले. भाजपनेही त्यांना सत्तेत मान सन्मानाची पदे दिली. पण त्या सर्वांना आपल्या धाकात व शिस्तित ठेवले. भाजपची विचारधारा पटली म्हणून काँग्रेसमधून कोणीही भाजपमध्ये गेलेले नाही, एक म्हणजे सत्तेच्या लोभाने गेले व दुसरे म्हणजे नोटीसा व चौकशीतून सुटका व्हावी म्हणून त्यांनी कमळ हाती धरले.

राज्या- राज्यात पराभव झाल्यावर पक्ष संघटना बांधणीसाठी कुठे प्रयत्न होताना दिसत नाही. भाजपप्रमाणे कार्यकर्त्यांना सतत काम दिले जात नाही. निवडणुकांखेरीज पक्ष लोकांना दिसतच नाही. यापुर्वीही काँग्रेस पक्षात फूट पडली होती. १९६९ मधे पक्षात मोठी फूट पडली. सिंडिकेट व इंडिकेट काँग्रेस असे विभाजन झाले. काँग्रेस ( आर ) व काँग्रेस ( आय ) अशा दोन बॅनर्स खाली दोन पक्ष बरेच काळ वावरत होते. नंतर शरद पवार, ममता बॅनर्जी, असे अनेक बडे नेते काँग्रेसमधून बाहेर पडले व त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केले. पण बाहेर पडलेल्या नेत्यांना सन्मानाने पक्षात परत आणण्याचे काम झाले नाही. केंद्रात गेल्या अकरा वर्षापासून काँग्रेसची सत्ता नाही पण पक्ष संघटना बांधणीसाठी पक्षाचा कोणी नेते देशभर फिरतोय असे दिसत नाही. काँग्रेसची सर्व मदार आजही गांधी परिवारावर आहे.

काँग्रेसच्या भविष्याविषयी बोलताना शरद पवार यांनी म्हटले आहे की, राजकारणात चढ- उतार असले तरी काँग्रेस पक्ष कधीही संपणार नाही. महाराष्ट्रात काँग्रेसचा १९५७ साली पराभव झाला होता. संयुक्त महाराष्ट्र समितीचा विजय झाला होता. तेव्हाही महाराष्ट्रात काँग्रेस संपली असे म्हटले गेले. पण पक्ष असे संपत नसतात.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading