January 31, 2026
Progressivोe farmer Pramod Dhonde Patil practicing mung intercropping in sugarcane for soil health improvement
Home » उसात मूग, जमिनीत कर्ब : शाश्वत शेतीचा यशस्वी प्रयोग
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

उसात मूग, जमिनीत कर्ब : शाश्वत शेतीचा यशस्वी प्रयोग

प्रमोद धोंडे पाटील ( मोबाईल – 99705 39498) यांनी आपल्या शेतजमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी वेगवेगळ्या सेंद्रिय पद्धतींचा अवलंब केला आहे. कडधान्य पिकांची घन पद्धतीने लागवड करून त्यांनी मुख्य पीक असलेल्या उसाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे.

डॉ. एस. डी. रजपूत
मोबाईल – 94051 38269

Progressivोe farmer Pramod Dhonde Patil practicing mung intercropping in sugarcane for soil health improvement
Farmers Are the Real Researchers: Sustainable Sugarcane Farming with Mung Intercropping

शेतकरी हेच खरे मोठे संशोधक

सडे गाव (ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) येथील तरुण, प्रगतशील शेतकरी प्रमोद धोंडे पाटील हे शेतात नेहमीच नवनवीन प्रयोग राबवताना दिसतात. ऊस पिकामध्ये डाळवर्गीय मूग पिकाचे आंतरपीक घेऊन मुख्य ऊस पिकाची अधिकतम उत्पादकता कशी वाढवता येईल, याचा त्यांनी यशस्वी प्रयोग करून दाखवला आहे. त्याचबरोबर जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवून शेतजमिनीची दीर्घकालीन सुपीकता टिकवण्याची जबाबदारीही ते अत्यंत जागरूकपणे पार पाडत आहेत.

सध्या ऊस पिकामध्ये अती पाण्याचा आणि रासायनिक खतांचा बेसुमार वापर होत असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांतील जमिनी क्षारपड होत चालल्या आहेत. जमिनीचा सामू (pH) वाढत असल्याने जमिनीचा पोत बिघडतो आहे. महाराष्ट्रात जवळजवळ १९ लाख हेक्टर क्षेत्र ऊस पिकाखाली असून, यातील मोठे क्षेत्र नापिकीच्या उंबरठ्यावर आहे. ही परिस्थिती वेळीच रोखण्यासाठी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करणे अत्यंत गरजेचे आहे.

आपल्या शेतात स्वतःच्या हिंमतीवर वेगवेगळे प्रयोग करणारे शेतकरी हेच खरे अर्थाने मोठे संशोधक असतात. प्रयोगशाळेपेक्षा थेट शेतात, मोठ्या क्षेत्रावर प्रत्यक्ष प्रयोग करून ते शेती क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणत आहेत. ‘शेतमाऊली’ला आई मानून तिला नापिकीपासून वाचवण्याची मोलाची जबाबदारी शेतकरी राजा समर्थपणे सांभाळत आहे. शेतमाऊली जगली तरच आपण जगू, हे त्यांना चांगले ठाऊक आहे.

प्रमोद धोंडे पाटील यांनी आपल्या शेतजमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी वेगवेगळ्या सेंद्रिय पद्धतींचा अवलंब केला आहे. कडधान्य पिकांची घन पद्धतीने लागवड करून त्यांनी मुख्य पीक असलेल्या उसाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. पाण्याचा अतिरेक आणि रासायनिक खतांचा वारेमाप वापर यामुळे जमिनीची उत्पादकता कमी होत चालली असताना, जमिनीची सुपीकता वाढवणे आज काळाची गरज आहे. रासायनिक खतांचा वापर मर्यादित करणे, पिकांची फेरपालट करणे आणि डाळवर्गीय पिकांचा समावेश करणे या उपायांनी जमिनीचे आरोग्य सुधारते. कडधान्य पिकांमुळे प्रति हेक्टरी सुमारे १.५ क्विंटल सेंद्रिय कर्ब जमिनीत तयार होतो, जो जमिनीच्या सुपीकतेसाठी अत्यंत उपयुक्त ठरतो.

ऊस पिकामध्ये मूग पिकाचे आंतरपीक घेऊन प्रमोद धोंडे यांनी उसाची उत्पादकता वाढवून दाखवली असून, त्याचबरोबर जमिनीचा पोत सुधारल्याचे ठोस निष्कर्षही त्यांनी मांडले आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेली फुले चेतक आणि फुले सुवर्ण ही अधिक उत्पादन देणारी मूग पिकाची वाणे त्यांनी महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यात पोहोचवली आहेत. यावर्षीच्या उन्हाळी हंगामातही हाच प्रयोग ते पुन्हा राबवत आहेत.

ऊस कापणीनंतर शेतात राहिलेल्या उसाच्या पाचटाची त्यांनी कुट्टी केली. त्यानंतर ट्रॅक्टरच्या सहाय्याने उसाच्या दोन्ही बाजूंनी बगला फोडून उसाचे बुडखे कट केले. या प्रक्रियेनंतर कमी प्रमाणात सुपर फॉस्फेट खताचा वापर करून मूग पिकाच्या फुले सुवर्ण या जातीची पेरणी करण्यात आली. या ठिकाणी त्यांनी तुलनेने जास्त प्रमाणात, म्हणजे जवळजवळ एकरी आठ किलो बियाणे वापरले आहे.

१६ जानेवारी रोजी मूग पिकाची घन पद्धतीने पेरणी करण्यात आली. फुले सुवर्ण या जातीची निवड करण्यामागील त्यांचा उद्देश स्पष्ट आहे. ही जात अवघ्या ५५ दिवसांत काढणीस येते, एकाच वेळी पिकते, भुरी रोगास प्रतिकारक्षम आहे आणि विविध हवामान परिस्थितीत तग धरण्याची क्षमता या वाणात आहे. संपूर्ण भारतात ही जात न लोळणारी (lodging resistant) तसेच यांत्रिक काढणीस योग्य वाण म्हणून ओळखली जाते.

बियाणे पेरणीनंतर त्यांनी तुषार सिंचनाद्वारे पाणी देत ट्रायकोडर्मा या जैव बुरशीनाशकाची फवारणी केली. परिणामी मूग पिकाची उगवण अत्यंत चांगल्या पद्धतीने झाली असून, हा प्रयोग शाश्वत शेतीच्या दिशेने जाणारा एक आदर्श नमुना ठरत आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

स्वयंपूर्णतेच्या ध्येयाकडे : डाळींच्या वाढीला गती देण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रयत्न

नारायणगाव येथे १९ नोव्हेंबरला नैसर्गिक शेती प्रशिक्षण

मुलाखतः करडई लागवडीचे सुधारित तंत्र

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading