कवी हबीब भंडारे यांचं सांस्कृतिक आकलन सूक्ष्म आणि तेवढंच सामर्थ्यशाली आहे. ग्रामजीवनाची आणि नागर जीवनाची त्यांची आकलन क्षमता नेमकी आणि नेटकी असल्यामुळं त्यांची कविता आशयघन आणि आशयगर्भ होत जाते. जीवनाचा आणि जगण्याचा पोत मांडताना त्यांची कविता अधिकाधिक भावात्म होत जाते. कवी भंडारेंची कविता माणसाचं जगणं जसं मांडते, तसं ती मानवी संबंधांचाही तेवढ्याच गांभीर्याने विचार करते.
डॉ. ऋषीकेश कांबळे
मराठी काव्य प्रांतात हबीब भंडारे हे नाव आता स्थिर झालेले आहे. भंडारे यांची कविता जीवनानुभवाचा जसा पीळ व्यक्त करते तसं ती सांस्कृतिक संचितालाही कवेत घेऊन अभिव्यक्त होते. वस्तुतः संघर्षाशिवाय आयुष्याची वाटचालच करता येत नाही. माणसाचं आयुष्य सरळसोट असं कधीच नसतं. नदीचं वाहणं जसं वळणावळणाचं असतं अगदी तसंच आयुष्याचंही क्रमण असतं. संघर्ष हा अटळ असतो. हा संघर्ष दुःख निरस्त करण्यासाठी करावा लागतो. त्यात सुखाची कामना दडलेली असते. संघर्षाची अटळता नाकारता येत नाही आणि मनुष्य नाकारूही शकत नाही. ज्याला जीवनाचा अर्थ कळलेला असतो, जीवनातील यथार्थता कळलेली असते. ती व्यक्ती संघर्षापासून पळ काढू शकत नाही. आयुष्याच्या तळाशी संघर्षाची बीजं तळ ठोकूनच असतात. संघर्षाच्या दाहकतेचा तप्त दाखला देताना कवी हबीब भंडारे नोंदवतात,
“संघर्षाच्या दाहक उन्हाळसरींत, तप्त खडकाळ विहिरीत
असतो एखादा स्वतःचा
तळ शाबूत ठेवून
पाझरत राहणारा
नितळ पाण्याचा झरा,
धुगधुग्या हृदयात ओततो
सुखाच्या कित्येक मौलिक संवेदना,
असतो माणूस तोच खरा.”
(जखमांवरील वेदनेचा टॅक्स)
ही सगळी धडपड मनुष्य त्याच्या सुख-संपन्नतेच्या प्राप्तीसाठी करत असतो. हा संघर्ष कवीला जखमांवरील वेदनांचा टॅक्स वाटतो. दुःख आणि प्राक्तन याचं अतूट असं नातं असतं. मनुष्य सुखासाठी अविरत धडपडत असतो. काबाडकष्ट करूनही त्याच्या आयुष्यात सुखाचा शिडकावा येतोच असं नाही. त्याचं कष्टणं जरी सुखनैवतेसाठी असलं तरी दारिद्र्याचे भोग काही त्याचे सुटले जात नाही. दारिद्र्याचा, कष्टाचा आणि भुकेचा संबंध आपल्याला बाजूला सारता येत नाही. रात्रंदिवस जरी राबत असलो तरी भुकेचं रूपांतर सुखात करता येत नाही, हे दरिद्रीपणाचं लक्षण आहे. या भयग्रस्त ग्रहणाचा संदर्भ देताना कवी भंडारे लिहितात,
“कुपोषित रात्रीला कुशीत घेऊन सांत्वन करणाऱ्या
कामगार दिवसाला
भक्कम सूर्यप्रकाशात
सतावत राहते
भूकमोर्चाच्या दंगलीचे
भयवादी ग्रहण
बेलगामी सरधोपट शब्दांच्या रहदारीतून”
( हटवादी संवेदनांचे खोटे बुजगावणे )
या भयग्रस्ततेतून आणि दारिद्र्याच्या अस्तित्वामुळे मनुष्य सुखाची कल्पना करत जातो. या सुखकल्पनेतून काही स्वप्नं आकाराला येतात. स्वप्नाच्या सहचर्याशिवाय मनुष्य जगूच शकत नाही. आपली कर्तृत्वशून्यता वाढत गेली की, त्यात स्वप्नांच्या निर्मितीचीही भर पडत जाते. जगण्याची वाटचाल सुकर करण्यासाठी ही स्वप्नं पाहिली जातात. ही स्वप्नं परिपूर्ण होतातच असे नाही पण ही स्वप्नंही आपला पाठलाग सोडत नाहीत. काही सुखस्वप्नं असतात, काही दुःस्वप्नं असतात. काही स्वप्नांनी आपण सुखावून जातो तर काही स्वप्नांनी आपण व्यथित होतो. आयुष्य आणि स्वप्नं याचा लपंडाव सतत सुरू असतो. याचा दाखला देताना भंडारे म्हणतात,
“उपाशी कुत्र्यांनी लुचावे
एखाद्या निर्जीव निरस्त
मृत जनावराच्या ताठर शरीराला
तसे लुचतात
वांझोटे स्वप्न रोज आता मनाला,
आर्थिक कणा नसलेल्या
फिरत्या डोळ्यांच्या
ब्लॅक ॲण्ड व्हाईट रंगमंचावर,
मृत्यूच्या अनलिमिटेड
भयप्रावरणाचं प्रसारण
होत राहतं
जीवनाच्या सुखासीन जाहिरातीविना
मेंदूच्या डिजिटल मंचावर”
( तगमगीचे दिवस )
भारतीय समाज संमिश्र संस्कृतींनी व्यापलेला आहे. भिन्नभिन्न धर्म, भिन्नभिन्न जाती आणि त्या प्रत्येक धर्माची आणि जातीची जगण्याची स्वतंत्र पद्धत आपण अनुभवतो. विशेषतः ग्रामसंस्कृतीत हा सांस्कृतिक परीघ आपल्याला अधिक प्रछन्नपणे जाणवतो. भिन्नभिन्न संस्कृतीचा अवलंब करणारी जी माणसं आहेत, ती दैनंदिन जीवन व्यवहारात परस्परांशी जोडली गेलेली असतात. त्यांच्या दैनंदिनीत पारस्परिक व्यावहारिक अनुबंध ठेवल्याशिवाय त्यांचा जीवन व्यवहारही सुरळीत करता येणं अशक्यप्राय असतं. ही सांस्कृतिकता पृथक जरी असली तरी त्यांचे आंतरिक घट्ट असे अनुबंध असतातच. प्रसंगोपात हे अनुबंध कधी-कधी तुटतात, विस्कळीत होतात. ज्याचं तळहातावर पोट असतं त्यांना अनुबंध जोडून घ्यावेच लागतात. काबाडकष्ट करणारा जो समुदाय आहे, तो कोणत्याही संस्कृतीशी जोडला गेलेला असला तरी त्याला जात आणि धर्म याच्या भिंतीत बांधून ठेवता येऊ शकत नाहीत. समाजातील उचापतखोर असलेली टाळकी समाजामध्ये दुहीच बीजं पेरते आणि समाज विघटीत होत जातो. आपल्या आजूबाजूला पहुडलेलं हे वास्तव आहे. पण तरीही श्रमजीवी समाज, कष्टणारी व्यक्ती या अविवेकी दुहीला घट्ट आवळून बसत नाही, हेही वास्तव आपल्याला बाजूला सारता येत नाही. या दुहीच्या भावनेमुळं विघटीत मन आपला समुदाय आणि दुसरा समुदाय असं विषमतेचं विभाजन करून जातो आणि समाजात ताणतणावाची भावना उगम पावते. या कडवट वास्तवाचा दाखला देताना कवी भंडारे लिहितात,
“फकीरमोहल्ल्यातील
साठीतला जिलानी,
उच्चभ्रू कॉलनीजवळ
पालं ठोकून राहणारा
सत्तरीतला राणूबा
करताहेत बऱ्याच वर्षांपासून
एकत्रित दैनंदिन
कष्टाची कामं,
खातात सलोख्यानं भाकरतुकडा
आनंदतो सुखात एक दुसऱ्याचा
एकसारखाच ठेवणीचा मुखडा,
येत नाही आड कधी
धर्म, जातीच्या भिंती,
दमतात, थकतात
कालांतराने थांबतात
अविवेकी काळाच्या
ताटातुटीय उचापती
दररोज मोजून थकतंय
मनाचं महानगर
माणसं आपली
आणि बाहेरची किती.”
( चिंतातुर मनाच्या ठिचलेल्या काचा)
अपार कष्टानंतरही मनुष्याच्या वाट्याला सुखाचे क्षण अभावाने मिळतात. मनुष्या-मनुष्यातले संबंध हे आंतरिक आस्थेनं जोडलेली असतातच असे धाडसाने म्हणवत नाही. आपण हे अनुभवतो की, माणसा-माणसांमधली जिव्हाळ्याची ओल पांगत गेलेली आहे. माणसातलं माणूसपण दुर्मुखलं की, माणसांच्या संबंधात दुरावा निर्माण होणं स्वाभाविक आहे. अशावेळी माणूसपण जसं पांगत तसे संबंध सुद्धा दुराव्यात परावर्तित होत जातात. हाच दुरावा परकेपणाची भावना अधिक गडद करत जातो. माणसातलं माणूसपण निसटत चालल्याचं शल्य कवी भंडारे अभिव्यक्त करतात. ते म्हणतात,
“दीर्घ कष्टानंतर प्राप्त होणाऱ्या मेहनती भाकरीचे मोल,
इतकी दुर्मुखली मनं की
महाग झाले
माणसाचे प्रेमळ बोल,
ह्या हृदयातून त्या हृदयापर्यंत
बिनदिक्कतपणे पाझरत नाही
आताशा माणुसकीची ओल”
( साध्यासरळ मानेभोवती बेईमानीचे फासे )
माणसाचं जगणं मोठं दुष्कर आहे. आजूबाजूला जशी सुष्टता आहे तशी दुष्टताही आहे. मानवी संबंध कधीकधी आकलनाच्या पलीकडचे होऊन जातात. ज्यांच्याकडून आपल्याला आपलेपणाची आस असते, ती आपली भावना परिपूर्ण होतेच असेही नाही ज्यांच्याकडून आपण काही अपेक्षितो तिथून अनेकदा आपल्या वाट्याला परात्मतेचीच भावना प्रत्ययाला येत जाते. माणसाच्या मनामध्ये मृत्युविषयीचं भय आपसूकपणे असतं. मृत्यू अटळ असतो, तो टाळता येत नाही. हे वास्तव माहीत असून सुद्धा आपण मृत्यूचं भय टाळत नाहीत. हे अगदी उघड आहे. ज्याला जन्म आहे, त्याला मृत्यू आहेच. जीवसृष्टीतला कोणताही जीव अमर्त्य नाही. पशुपक्षी असो, प्राणी असो किंवा मनुष्य असो ह्या प्रत्येकाला मृत्यू असतोच. माणसं मृत्यूचं सावट घेऊन जगत असतात. जीवनातल्या या सत्याला कवी भंडारे उजागर करतात. ते म्हणतात,
“माणसं अशी मुलखावेगळी सोडून आताशा पळताही येत नाही
आणि माणसांना अशा
टाळताही येत नाही,
जगण्याच्या दुनियेतील
भयाण वास्तव बघून
आतल्याआत दीर्घकाळ
जळताही येत नाही,
मृत्यूच्या अनिश्चित सावटाखाली
जगणं सोडून माणसाला
मरताही येत नाही”
( मृत्यूच्या अनिश्चित सावटाखाली )
समाज जीवनातले नातेसंबंध हे जसे अतर्क्य आहेत, तसे कुटुंबातले नाते संबंध सुद्धा आकलनाच्या पलीकडचे होऊन बसतात. व्यवस्था ही समाजजीवनातली असो की कुटुंबसंस्थेतली असो ती अंतर्गत मायेपेक्षा सुद्धा अधिक व्यवहारी होऊन जाते. व्यवहार वर्तनात आला की, नातेसंबंधातली भावनेची ओल आपसूकपणे पांगायला लागते आणि व्यावहारिक भावना ही अधिक बलिष्ठ होते, बळकट होते. हा वर्तनव्यवहार जीवघेणा असतो. अशा वर्तनव्यवहारात भावनांची कुचंबणा अधिकाधिक गलितगात्र होत जाते. पारस्परिक नातेसंबंध एकदा का व्यवहारात रूपांतरित झाले की, तिथे आपलेपणाची ओढच संपून जाते. कवी हबीब भंडारे हे या भावनांचा मोठ्या उत्कटतेने परामर्श घेतात. ते म्हणतात,
“अनिर्बंध झाली व्यवस्था की
गिळत राहतो
एक साप दुसऱ्या सापाला,
होतो ठारवेडा कुणी
जो की समजू न शकला
आयुष्यभर स्वतःच्या बापाला
( मनाच्या नकाशावरून हद्दपार न झालेल्या आठवणी)
दारिद्र्य आणि अभावग्रस्तता मोठी जीवघेणी असते. समाजजीवनामध्ये विषम स्तरीकरणामुळे गरिबी आणि श्रीमंती असा ठळक भेद आपल्याला जाणवतो. कष्टकऱ्यांच्या वाट्याला कायम अभावग्रस्ततेचेच भोग आलेले असतात. जगण्याची धडपड करताना विलक्षण कुतरओढ करत काही माणसं जगतात तर दुसरीकडे अत्यंत विलासी जीवन जगणारी माणसंही आपण अनुभवतो. या विलासी जगण्यात काही अभिलाषा दडलेल्या असतात, काही आकांक्षा सामावलेल्या असतात. ऐश्वर्यसंपन्नतेची एक मानसिकता असते. ज्यांना जगण्यासाठी आटापिटा करावा लागतो, त्यांच्याकडेही स्वप्नं असतात. ती स्वप्नं जेव्हा फलद्रूप होत नाहीत, तेव्हा स्वप्नभंग ठरलेला असतो. पण तरीही माणसं चिवटपणाने जगतातच. विलासी जीवनामध्ये भोगवृत्ती सामावलेली असते. हालअपेष्टेत जगणारी माणसं एकीकडे आणि भोगविलासात जगणारी माणसं दुसरीकडे अशी विषमग्रस्त आर्थिक संरचना असल्याचं आपल्या लक्षात येतं. या विषमताग्रस्त जगण्याचा कवी भंडारे मागोवा घेताना म्हणतात,
“पन्नास रुपयांच्या औषधाविना वारला बँडबाजा वाजविणारा
झोपडपट्टीतला रफीक फकीर
आणि इकडे काहींनी देवाला
वाहिली नवस म्हणून
सोन्याची अंगठी भारीभक्कम”
(वेदनेचं मायाळू झाड)
कष्टणाऱ्या व्यक्ती किंवा समुदायाकडे कणवेची भावनाही समाजामध्ये दिसते. जिथे माणूसपणाची ओल आहे तिथे माणुसकी किंवा मानवतेचा अधिवास असतोच. मानवतेची भावना ही जात-धर्मातीत असते. तिथे भेदभावाला जागा नसते. मानवता जातही मानत नाही आणि धर्मही मानत नाही. जात-धर्माची भावना ही मानवतेच्या भावनेचं स्खलनच करत जाते. भेदाभेद, उच्च-नीचता असलेली भावना विषमताग्रस्ततेचं प्रतीक असते. जिथं उच्च-नीचता येते तिथे शोषणही येते. मानवतेच्या भावनेमध्ये कणव आणि करुणा दडलेली असते. करुणा असणं हे मनुष्यत्वाचं लक्षण मानलं जातं. समाजामध्ये जातीपातीच्या आणि धर्माच्या पलीकडे जाऊन अशी करुणेची पेरणी करणारी असंख्य माणसं आपण अनुभवतो. अशा करुणामय जगण्याकडे कवी भंडारे मोठ्या आस्थेने पाहतात. अशा करुणासंपन्न माणसांचा कवी भंडारे यांना अभिमानही वाटतो, म्हणून समाजातल्या विषमतेचा जसा प्रतिरोध करतात तसा ते कणवं असलेल्या माणसांचाही गौरव करतात. ते म्हणतात,
“होतात सैल
चेहऱ्यावरील परंपरागत
निर्धन तंगीच्या आठ्या,
ठेवतात साहेब हजार-पाचशे रुपये
गरीब कलीममियाँच्या हातात,
होते काही दिवसांपुरती का होईना
पोटापाण्याची तजवीज,
राहत नाही लवलेश
जराही जातिभेदाचा,
होत नाही विषय चर्चेतील
टिंगलटवाळी खेदाचा,
येतो कामी अडीनडीला
पवित्र माणुसकीचा धर्म,
शमतात भुकेच्या वेदनेचे
गहिरे वर्म.”
(पवित्र माणुसकीचा धर्म)
ओढग्रस्त जगतानाही माणूस त्याची जगण्याची आकांक्षा काही सोडत नाही. जगण्याची साधनं जरी नसली तरी आपण अभावग्रस्ततेतही अतिशय आशावादी पद्धतीनं जगत असतो. जीवनाकडे अनेकदा आपण सकारात्मक पद्धतीनं पाहतो आणि आजचं दुःखं उद्याला मिटेल असा आयुष्यावर भरवसा ठेवून जगत जातो.
मानवी जीवन सुखदुःखाच्या धाग्यांनी विणले गेलेले आहे. आयुष्य दुःखव्याप्त जसं आहे तसं ते अनेक खाचखळग्यांनी भरलेले आहे. आपण दुःखनाशासाठी आणि सुखाच्या प्राप्तीसाठी पुन्हा दुःखाच्याच मार्गाने वाटचाल करीत जातो. अभिलाषा असते सुखाची पण वाट्याला येतं दुःखं. हा ऊनसावलीचा खेळ आपल्या आयुष्याचा धर्म बनून जातो. या गतिविधीचा संदर्भ देताना कवी भंडारे म्हणतात,
कर्जाचा गाडा ओढता ओढता हिंमत हरलेल्या नवऱ्यालाही
बायको शमीम
स्वतःचे हळवेपण बाजूला ठेवून शिकवत राहते
टिकाऊ बाणेदारपणा
अन् म्हणत राहते,
‘पडत राहतो अधूनमधून सुखदुःखाचा पाऊस,
बदलत राहतो जमाना..’
( पावसाचं चलिंतर आणि जगणं)
आस्तिक मनाची रचना आशाळभूतपणाची असते. हे आस्तिक मन भांबावलेल्या मानसिकस्थितीला सतत दिलासा देत राहतं. जेव्हा आपली कर्तृत्वशक्ती संपते तेव्हा हे आस्तिक मन परमेश्वराच्या चमत्कारावर आणि परमेश्वराच्या कृपादृष्टीवर अगाध असा भरोसा ठेवायला लागतं. आपल्यावरच्या सगळ्या संकटाची उत्तर परमेश्वराजवळ आहेत, त्यामुळं तोच संकटं दूर करील अशी एक भाबडी आशा या आस्तिक मनाला असते. माणसाच्या ठायी सुष्ट आणि दुष्ट अशा सगळ्या प्रकारच्या भावना असतात. दुष्टतेनं मन व्यापलं तरी परमेश्वरच तारणहार होणार आहे, असा बलदंड विश्वास या आस्तिक मनाला असतो. परमेश्वरावरची श्रद्धा पक्की असली की, आपल्यावरच्या सगळ्याच संकटांची जबाबदारी परमेश्वरावर सोपवून हे मन निश्चिंत होतं. या आशावादी आस्तिक मनाचा कौल देताना कवी भंडारे लिहून जातात,
एकाच शब्दात गप्प करते मोमीना म्हणते नवऱ्याला,
‘बस्स झाला ना आता
हा जळतुकपणा,
वय झालं
तुमची सरणात गेली लाकडं, अल्लाह असला भल्यावर की,
कुणी करत नाही कुणाचं वाकडं.’
( संवेदनाहीन आर्थिक टोलनाका)
जगण्यावरची श्रद्धा बळकट असली की जगतानाचे मान-अपमान फारसे डंख देत नाहीत. आपण दुःखव्याप्त जगतो हे सत्य मान्य केलं की वाट्याला आलेले पराकाष्टेचे भोगही फारसे महत्त्वाचे मानत नाही. जगताना विविध प्रकारचे अनुभव घेत आपण जगत असतो. अशावेळी आपण फारसं भांबावून जात नाही. कुणी मान-अपमान केला काय, कुणी षड्यंत्राचा पेच निर्माण केला काय अशा वृत्तीच्या प्रसंगाचे फारसे सोयरसूतकही राहत नाही. जगणं महत्त्वाचं मानलं की कोणत्याच वृत्तीचा दंश आपल्या मनाला स्पर्श करीत नाही. जगण्याचं हे ताटस्थ्य जीवनावरच्या श्रद्धेतून आलेलं असतं. या विभिन्न वृत्तीच्या वर्तन व्यवहारातून आपण जगण्यावरची श्रद्धाच मजबूत करीत जातो. याचा सुरेख असा संदर्भ कवी भंडारे देताना लिहितात,
“काही चालती-बोलती माणसं थकलेल्या बुबुळांच्या हेडलाइट्समध्ये
घेतात खरडून-पुसून जगणं ओवून अन् मायभाकरीचा
मान-अपमान न करता
जसं पदरात पडेल तसं
घासकुटक्याचं दान
काबाडकष्टी तोंडं
घेतात निगुतीनं खाऊन
चेहऱ्याच्या कात्रणावर
बळजबरीचा चिकटवलेला राग,
शिव्यांचे भोगीष्ट
गलिच्छ षडयंत्री पेच
सबुरीचे शब्द टाकतात संपवून,
विचाराने टाकलेली साक्षर पावलं
जात नाही
अडचणींच्या वळणावर
कधीही भांबावून
(ग्लॅमरस वर्दळीतील सुनसान धग )
जिथं कारुण्य असतं तिथं करुणा असतेच. मनुष्य त्याचं मन सदैव निष्ठुरतेत ठेवूच शकत नाही. दुःखितांचा कळवळा येणं हे मनुष्यत्वाचं लक्षण असतं. म्हणूनच, आपण दुःखितांच्या दुःखाला सौम्य करण्यासाठी आपल्यातलं माणूसपण आपण जागवत जातो. दुःखितांना साह्य करणं हा परोपकाराचा भाग असतो. परोपकार हा आपलं दुःख बाजूला सारून समोरच्याच्या दुःखाला आपण कुरवाळतो, त्याचं दुःख आपलंसं करतो. अशी एकात्म भावना ईश्वररूपीच असते असा आस्तिक मनाचा उद्गार असतो. या एकात्म भावनेमुळे दुःख पांगतं, वेदना शमते असाही भाव त्यात अनुस्यूत असतो. कवी हबीब भंडारे या भावनेचा मागोवा घेताना म्हणतात,
“वारंवार फसत गेले
माणसांच्या डोळ्यांतील
स्वाभिमानी गटं-तटं की,
होतात फायद्याच्या झाडांच्याही शंकेखोर कत्तली,
दुःखितांची मदत केल्याने
उद्विग्न मनात
निर्माण झालेल्या
आनंददायी आरशात
वसतात ईश्वर-अली,
दृश्यआड होतात
वेदनेच्या पखाली
( आर्थिक तंगीची मनोदंगल)
कष्टमयता तुमच्यात स्वाभिमान पेरत असते, स्वत्व पेरत असते. त्यातून जगण्याच्या आशा सुद्धा पल्लवित होत जातात. दारिद्र्य आणि स्वाभिमानशून्यता याचं अतूट असंच नातं असतं. दारिद्र्याच्या अस्तित्वामुळं स्वत्व गमावून बसावं लागतं असा आपण अनुभव घेतो. त्यातून आपली परवशता ठळकपणे प्रतीत होते. हे जरी खरं असलं तरी जगण्याची उमेद आपल्याला धीर देते, आधार देते. या धीराच्या मानसिकतेमुळे जगण्यातही बळ येतं, जगण्याचं धैर्य येतं. फसगत झाल्याची भावना जरी दृढ झाली तरी त्यातून नव्या उमेदीची किरणं डोकावू लागतात. जगण्याच्या बलदंड अशा विश्वासाचं चित्रं रेखाटताना कवी भंडारे लिहून जातात,
“हातावरची लापट पोटं
लोटतात कसाबसा पुढं
उगवलेला रोजगार निर्मितीक्षम कसदार सूर्य,
पायाखालची थकलेली माती
सोडू पाहते साथ
अन् व्याही आभाळ
गांजलेल्या डोळ्यात
ओतत राहतंय धैर्य”
(हातावरची लापट पोटं)
गरिबीतल्या जगण्याचा तोल सावरताना आपली दारिद्र्याशी झुंजण्याची चिवट अशी मनोभूमी तयार होते. दारिद्र्याची अवस्था व स्थिती जरी शोचनीय असली तरी आपण आपल्या आयुष्याला आकार देण्यासाठी पराकाष्ठा करीतच असतो. जगण्याची साधनं असोत, नसोत किंबहुना साधनं नसतानाही तुटपुंज्या साधनांच्या आधारे आपण जगणं काही थांबवत नसतो. अनेकदा अवमानाचे प्रसंग येतात, मानखंडना होते. गलितगात्र झालेल्या मनालाही आपण साद घालतो आणि जगण्याची आसक्ती बलिष्ठ करीत जातो. दारिद्र्याचा विळखा जरी असला तरी त्या यातनामयतेतही आपण सुखाचा शोध घेतो. दारिद्र्याने दुभंगलेल्या मनातही जीवनाकडं आपण आशाळभूतपणे पाहत असतो. या विकल दारिद्र्याचा संदर्भ देत जीवनाच्या आसक्तीचा सुरेख असा गोफ आपल्याला हबीब भंडारे यांच्या कवितेतून ठसठशीतपणे अभिव्यक्त झाल्याचं लक्षात येतं. त्यांनी लिहिलंय,
“हादरतो घराचा तळ
प्रत्येक ढगविजेच्या गडगडाटात, प्रत्येक पावसाळ्यात मायीला घरातलं तुंबलेलं पाणी उपसायला मिळतं खंडोगणती बळ,
होतो भिजपावसाने
टम्म फुगलेल्या शोषिक भिंतीवरचा विश्वास डळमळीत,
दारावरून हाकलून दिलेल्या
आश्राप पीर-फकिराचा जीव सापडतो अपमानाच्या काचणीत, होतो डोळ्यातला सूर्य
शरमेनं बऱ्याचदा गर्भगळीत
( डोळ्यातला अस्वस्थ सूर्य)
आपलं सामाजिक पर्यावरण कलुषित आणि चिंताजनक आहे. समाजातील भेदभावाच्या भावनेमुळं समाजात असंतोषाचं वातावरण निर्माण होतं. आपल्याकडे जाती-जातीमध्ये जसे ताण-तणाव आहेत तसा धार्मिक विद्वेषही मोठ्या प्रमाणात आहे. याची परिणती अनेकदा दंगलीत होते. आपला अनुभव असा आहे की, राजकीय लाभासाठी किंवा धार्मिक-सांस्कृतिक वर्चस्वासाठी ज्या दंगली घडवून आणल्या जातात त्यात सामान्य माणसांचाच बळी जातो. ज्यांनी हे कृत्य घडवून आणलेलं असतं ते सुरक्षित असतात पण ज्यांचं तळहातावर पोट आहे तोच या दंगलींचा बळी ठरत जातो. दंगलीत मानवता काळवंडून जाते. अमानवीयता आणि अमानुषता हा दंगलीचा धर्म असतो. दंगलीत करुणा लोप पावते आणि हिंस्त्रता उगम पावते. ही हिंस्त्रता मानवतेचा विचार करू देत नाही. दंगलीची अमानुषता नोंदवताना कवी हबीब भंडारे लिहितात,
“पेटत्या हिंसक आगीच्या
बळी पडलेल्या
अहिंसावादी झाडांवरून
होतात पसार
काही संधीसाधू पाखरं,
बिळाबाहेर पडायला धजावत नाही, वैध बंड करणाऱ्या
विषारी नागिणीची
नावं ठेवून लज्जित केलेली सरपटणारी काही अपमानित लेकरं, शिव्यांची उबळ घेऊन
काहींच्या तोंडी प्रसवतात
जातिवादाची दुतोंडी ढेकरं”
(दंगलग्रस्त चौकाचौकात जगणं विकत घेणारी माणसं )
मानवी स्वभाव मोठे कल्पनातीत असतात. ज्यांच्याशी आपली आत्मिक ओढ असते तिथेही आपण मनस्वी व्यक्त होतोच असं नाही. आपलं दुःख आपण आपल्या मनाच्या तळव्यात ठेचून दाबून टाकतो. सलणारं दुःख प्रकट करता आलं पाहिजे. समाजात अशा काही व्यक्ती असतात की त्या भावनांना समजून घेतातच असं नाही. किंबहुना त्यांच्याकडून वेदनादायी वर्तनाचाच प्रत्यय येत जातो. तोंडदेखलेपणा असा अनेक व्यक्तींचा स्वभाव असतो, असा आपल्या सगळ्यांचाच अनुभव आहे. नितळ आणि पारदर्शक वागता आलं पाहिजे अशी कवीची भावना आहे. परंतु अनेकदा याच्या उलटच व्यवहार करणारी माणसं आपण अनुभवतो. दुटप्पी स्वभावाची माणसं समजून घेतली पाहिजेत अशी कवीची धारणा आहे. म्हणूनच, तो म्हणतो –
“अंगणात बसलेल्या पाखरांशी
थोडा वेळ का होईना
मनातलं सलणारं दुःखं
बोललं पाहिजे,
चुगलीखोर रस्त्यांना,
येता-जाता का होईना
आता हटकून टाळलं पाहिजे
आधी चटके देणे
आणि नंतर फुंकर घालणे
ही रीत काही बरी नाही,
समोर एक अन् मागे एक बोलणाऱ्यांची गोष्ट
काही खरी नाही
( सुख नजरंदाज करणारी झाडं)
कोणे एकेकाळी सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या माणसांकडं मांगल्य आणि पावित्र्याची भावना होती. सार्वजनिक क्षेत्रातली वस्तू असो, मालमत्ता असो त्याचा अपहार करणं हे पाप मानले जाई. लोकांना फसवणं किंवा त्यांची लूट करणं हे सुद्धा मनुष्यत्वाच्या विरोधी आहे असं मानलं जात असे. गेल्या काही काळापासून मांगल्य आणि पावित्र्याची जागा अपहार आणि व्यभिचाराने घेतली. त्यामुळे सदाचार आणि परोपकार या दोन्हीही भावना समाजातून परागंदा झाली आहे. त्यातून शोषणाचे नवे स्त्रोत निर्माण झाले आहेत. ज्यांच्यासाठी लाभ द्यायला हवा ते लाभार्थी कधीच होत नाहीत. कवी भंडारे यांना समाजातून सदाचार परागंदा झाल्याचं मोठं शल्य आहे. समाजात पुन्हा नव्याने मांगल्य आणि पावित्र्य प्रस्थापित व्हावे अशी अभिलाषा ते बाळगतात. त्यांनी म्हटलं आहे,
“दगडाळ पायवाटेनं
गाव न् गाव वणवण करत फिरणारा शिडीदार बांध्याचा रहीम फकीर थांबतो एखाद्या ठिकाणी,
गर्द झाडाच्या कुशीत विसावलेल्या थंडगार पाण्याच्या हौदाजवळ
घटकाभर,
मनातलं उकळतं दुःखं
हलकं करण्यासाठी”
किंवा
“ठरलेली असते गावात
संपत्तीनुसार घरांची मेरिट यादी वरपासून खालपर्यंत
घामाच्या प्राधान्यक्रमानुसार
झिरपत जाणारी
अन् लागत नाही जराही थांगपत्ता आमच्या पाचटाच्या झोपडीचा दारिद्र्यरेषेच्याही वेटिंग लिस्टमध्ये, स्वतःच्या अस्तित्वाच्या खाणाखुणा वारसाहक्काने दगडामातीच्या वळचणीत बारकाईनं शोधल्यानंतरही”
( व्यावहारिक तंगीतलं प्रापंचिक मौन)
दारिद्रयग्रस्त माणसं यातनामय आयुष्य कंठतील पण ते त्यांचा स्वाभिमान कधीच विसरत नाहीत. स्वत्वाची जपणूक मोठ्या कसोशीने ते करत असतात. आपलं दुःख किंवा आपले अश्रू कुणी पुसावे असं त्यांना कधीच वाटत नसतं. त्यांना करुणा हवी असते पण सहानुभूती नकोशी असते. आपलेपणाच्या भावनेनं कुणी वागत असेल तर ते त्याचं स्वागतच करतील, पण दयेची भावना ते स्पष्टपणे नाकारतात. त्याचं मुख्य कारण त्यांनी त्यांच्या स्वत्वाचा सांभाळ केलेला असतो. ती उपाशीपोटी राहतील परंतु याचना करणं हे त्यांच्या स्वभावात नसतं. या समुहाच्या अशा भावनेचा कवीला अभिमान वाटतो. कवी भंडारे यांनी दारिद्रयग्रस्त समुदायाच्या या स्वत्व भावनेचा सुरेख असा संदर्भ दिला आहे. ते म्हणतात,
“तिथलीच एक डोंगरावरची
एकुलती एक
कृश स्वाभिमानी झोपडी
चुकूनही कुणाला पुसू देत नाही आपल्या डोळ्यांतून गळणारे अश्रू”
( हरवलेल्या सुखाच्या शोधात )
किंवा
“मायीच्या अंगवळणी पडलेल्या वेदनेच्या भूगोलातून
टपकत राहतात
आसवांचे अक्षांश रेखांश सणासुदीला लेकरं
पायात खुरमुंडी घालून
उपाशी झोपल्यानंतर”
(हाडकुळ्या भिंतीचं घर)
परपीडा मुक्तीसाठी स्वतःच्या यातना बाजूला साराव्या लागतात. स्वतःचं दुःख निर्मुलित केल्याशिवाय परपीडा कवटाळता येत नाही. असा भाव माणुसकी अथवा मानवतेची साक्ष देत असतो. ही भावना सर्जनशीलतेचाही पुरावा देत असते. मानवतेची स्वतंत्र रचना निर्माण करायची असेल तर मनाचा तळवाही व्यापक करावा लागतो. कवी भंडारे या भावनेला अधिक महत्त्व देतात. त्यांनी म्हटलंय,
“दीर्घवेदनेचा सुस्कारा सोडून जखमांच्या तळांना नेस्तनाबूत करण्यासाठी धडपडणारे
करायचे नसतात कलम कधीही कलासक्त हातं सर्जनशीलतेचे माणुसकीचे बुरुजं धैर्याने बांधणारे कधीही केव्हाही”
( सुखदुःखाच्या शाईनं छापलेलं आयुष्य )
जीवनाच्या परिक्रमेची ऐश्वर्य आणि दारिद्र्य असे दोन स्तर असल्याचं आपल्या लक्षात येतं. ऐश्वर्यात उदारता अभावानेच प्रत्ययाला येत जाते. दारिद्र्यात जगणाऱ्या माणसांच्या ठायी औदार्याची भावना आपल्याला पदोपदी जाणवायला लागते. अभावग्रस्तताच औदार्याला निमंत्रित करीत जाते म्हणून आपल्या असे लक्षात येतं की, दारिद्र्यात जगणारी माणसं तसंच जीवन जगणाऱ्या अन्य माणसांच्या अभावग्रस्ततेला समजून घेतात आणि ती अभावग्रस्तता दूर सारण्यासाठी सिद्ध होतात. दारिद्र्याचे भोग भोगणाऱ्या माणसांच्या दुःख निवारण्यासाठी त्या माणसांची धडपड निरंतर सुरू असते. माणसांच्या मनात असलेल्या अशा व्यापकत्वाचा कवी भंडारे गौरव करतात. ते असं म्हणतात,
“दोम दोम करून आणलेलं
चार घरचं थोडं थोडं पीठ फकीरवाड्यातला महेबूब भाई किड्यामुंग्यांनाही न चुकता चारतो, मेहेरबान खुदा
नेकदिल माणसांना सहजच संकटातून तारतो”
( वेदनेनंतरचा आशयगर्भ टप्पा)
किंवा
“छोटं जिव्हाळ्याचं घर
एक आठवणीदार अंगण,
काही पाच-दहा पाठीराखे झाडं
अन् त्यावरील सारी तडजोडी पाखरं वागतात फक्त आपल्यासारखी, जवळची काही माणसं होतात मुद्दामहून तिन्हाईतपारखी
( मायीच्या बोंबिलावाणी हातात दिवसभराची कष्टाळू दैनंदिनी )
सुख प्राप्तीसाठी माणसाची कायम धडपड सुरू असते. हे तर उघड आहे की, दुःख हे जीवनाचं अमीट असं सत्य आहे. त्याचं अस्तित्व आपल्याला नाकारताच येत नाही. सुखाचा पसारा काही मोठा नसतो. ते असतं चिमूटभरच पण त्या चिमूटभर सुखासाठी आपण दुःखाचे पहाड पचवत जातो. आपली धडपड असते की, ते चिमूटभर सुख प्रत्येकाच्या आयुष्यात यावं. त्यासाठीच अपार कष्ट, दुःख झेलत सुख प्राप्तीसाठी आपला आटपिटा असतो. कवी भंडारे जगण्याच्या या प्रवासाचा सुरेख असा दाखला देतात. ते म्हणतात,
“जुनी एक गढी,
पडलेली ढासाळलेली
तसंच बरीच मोडकळीस आलेली घरं
लयाला जाणाऱ्या संस्कृतीचं
ओझं घेऊन बसलेली
तिथं एक घर फकिराचं
भर उन्हात
मोठ्यालाठ बाभळीखाली
करत राहतंय
औतफाट्याचं काम,
शेती-वावरात ईश्वराने
भक्तीसाठी निर्मिले
प्युअर हिरवे सजीव धाम”
(संकटाचे आडखुत्तेदार खांब आणि हितशत्रूचे करंटे चक्रव्यूह)
किंवा
“बच्चक-बच्चकभर
हिसकावून घ्यावे सुख
निसर्गाच्या कुशीतून
एवढ्या हिंमतीचे बळ
प्रेतावरच्या फुलांना
आणता येत नाही,
पक्क्या घरचा पाया
लबाड टिकाशीने
खणता येत नाही”
( वर्तमानात बेदखल झालेल्या गहिऱ्या वेदना)
दारिद्र्य आणि सुख याचा कधीकधी मेळ बसत नाही. दैनंदिन जगताना किमान सुखानं जगता यावं अशी अभिलाषा आपण बाळगून असतो. ही अभिलाषा परिपूर्ण होतेच असे काही जीवनाचे वास्तव नसते. दुखांकित जगत जाणं हे वास्तव आपल्याला दूर सारता येत नाही. तरीही चिवटपणानं आपण जगतच जातो. आपल्याला हे माहिती असतं की, सुखाचा वारा आपल्याला खरचटत नाही. तरीही आपलं जगणं निरंतर सुरू असतं. दारिद्र्यातही जगताना आपण काही सुख कल्पना उराशी बाळगून चालत राहतो, आयुष्याचा प्रवास करीत राहतो. सुख जरी परागंदा होत असलं तरी आपली जगण्याची आसक्ती आपण सोडलेली नसते. जीवनाच्या या प्रवासाचा कवी भंडारे मर्मज्ञपणे मागोवा घेतात. ते असं म्हणतात,
“कुडदार दारात लावलेल्या चिंताग्रस्त हादग्याच्या झाडाला दाटवाट भाकरी लगडल्याचे काल्पनिक स्वप्न
सुखावते वास्तववादी मायीला साखरझोपेत कैक वेळा,
डोळे उघडताच
अस्ताव्यस्त होतो
रातभर घरात जमलेला
आठवणींचा कनवाळू मेळा”
किंवा
( दारातून हाकलून दिलेलं सुख)
“सूर्याशी दोस्ती करणाऱ्यांचे स्वप्न तेजस्वी सूर्यप्रकाशासारखे
चंद्राशी दोस्ती करणाऱ्यांचे स्वप्न शीतल गारव्यासारखे
रात्रींशी दोस्ती करणाऱ्यांचे स्वप्न काळ्याकुट्ट अंधारासारखे
तरसतात अनाथ झुडपं गोतावळ्यासाठी
आणि आमराईतल्या गोतावळ्यातील
काही झाडं होतात
आपलेपणाला पोरकी”
(अनुभवाच्या तळाशी वास्तवाच्या डाहळ्या)
जगताना काही भाव आपण उराशी बाळगलेले असतात. सुख-दुःख, पापपुण्य या भावना आपल्या कर्माशी आपण जोडून घेत जातो. परोपकारात पुण्य दडलेलं असतं. इतरांच्या आयुष्याच्या नुकसानीचा विचार म्हणजेच पाप. इतरांच्या सुखाचा विचार म्हणजेच पुण्य. खरं तर दुःख सुद्धा जाळता आलं पाहिजे. स्वतःच्या सुखापेक्षा इतरांच्या दुःखाला गवसणी घालत गेलोत तरच सुखाची निर्मिती करता येऊ शकते. जीवनाकडे पाहण्याचा हा दृष्टिकोन आपल्यालाच सुखावून जातो. कवी भंडारे यांचा सांगावाच हा आहे की, जीवनाकडे आपल्याला सकारात्मक पाहता आलं पाहिजे. या भावनेला मंडित करताना कवी भंडारे म्हणतात,
“उडून आलेल्या
केरकचऱ्याला
परत त्यांच्या अंगणात
न फेकता
आपल्या अंगणातील केरकचऱ्यासोबत जाळलं,
‘चांगलं केलं की,
चांगलं होत राहतं’,
हे सुखाचं धन
आयुष्यभर पाळलं.”
(भांडणाचं तोंड काळं )
किंवा
“पाखरं दाणे सोडून
टिपू लागलीत
दुःखं सज्जन माणसाचं,
गाऊ लागलीत
हिरवीगार झाडं
आशयगर्भ गाणं
माळावरच्या होरपळलेल्या कणसाचं”
( तप्त उन्हाचे प्याले आणि नकारात्मक झळा)
जगण्यात आश्वासकता असली पाहिजे. ही आश्वासकता आपल्याला जगण्याची आणि प्रवासाची ऊर्जा देत जाते. आश्वासकताच आपल्या मनाला स्वप्नांची तोरणं बांधते. स्वप्नं बाळगणे हा आपल्या आयुष्याचाच धर्म असतो. स्वप्नांशिवाय जगणंही नसतं आणि आयुष्य सुद्धा. ही स्वप्नंच जगण्याची ओढ कायम ठेवत असतात. जगणं जसं अटळ असतं तसा मृत्यूही अटळ असतो. जगण्या-मरण्याच्या मधला अवकाश म्हणजे आयुष्य ! आयुष्याचा व्यास मांडताना कवी भंडारे समर्पकपणे नोंदवतात,
“जगणं म्हणजे
आळसावलेल्या मृत्यूच्या तोंडातलं काही वेळ लांबलेलं लांबलचक उधार श्वासाचं गाणं”
(जगणं म्हणजे उधार श्वासाचं गाणं)
कवी हबीब भंडारे यांचं सांस्कृतिक आकलन सूक्ष्म आणि तेवढंच सामर्थ्यशाली आहे. ग्रामजीवनाची आणि नागर जीवनाची त्यांची आकलन क्षमता नेमकी आणि नेटकी असल्यामुळं त्यांची कविता आशयघन आणि आशयगर्भ होत जाते. जीवनाचा आणि जगण्याचा पोत मांडताना त्यांची कविता अधिकाधिक भावात्म होत जाते. कवी भंडारेंची कविता माणसाचं जगणं जसं मांडते, तसं ती मानवी संबंधांचाही तेवढ्याच गांभीर्याने विचार करते. भौतिक वास्तव हा हबीब भंडारे यांच्या कवितेचा श्वास आहे म्हणूनच त्यांच्या कवितेत वास्तवाचे सगळे ताणतणाव ठसठशीतपणे अभिव्यक्त झालेले आहेत. मानवी मन आणि मानवी वर्तन त्यांच्या कवितेतून ओसंडून वाहत असल्याचं आपल्या लक्षात येतं. अनुभव संपन्नतेमुळं त्यांच्या कवितेत येणारी प्रतिमासृष्टी ही स्वतंत्र असल्याचंही आपल्या लक्षात येत जातं. भंडारे यांच्या कवितेला वगळून मराठी कवितेचा विचार करता येणार नाही, इतकी सशक्तता त्यांच्या कवितेत प्रकट झाल्याचं आपल्या लक्षात येतं. मराठीतील लक्षणीय अशा कवितेपैकी हबीब भंडारे यांची कविता आहे, हे आपल्याला कबूलच करावे लागते.
पुस्तकाचे नाव – मृत्यूच्या अनिश्चित सावटाखाली
कवी – हबीब भंडारे
प्रकाशक – गोदा प्रकाशन
किंमत – २५० रुपये
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.