January 25, 2026
Clip art depicting mental stress and isolation among IIT students highlighting the issue of student suicides in India
Home » आयआयटी विद्यार्थ्यांची आत्महत्या- चिंतनीय बाब
मुक्त संवाद

आयआयटी विद्यार्थ्यांची आत्महत्या- चिंतनीय बाब

घटनेचे कलम २१ मध्ये असे म्हटले आहे की कायद्याने स्थापित केलेल्या प्रक्रियेशिवाय कोणत्याही व्यक्तीला त्यांचे जीवन हिरावून घेतले जाणार नाही . याचा अर्थ असा की प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा अधिकार आहे आणि विहित कायदेशीर प्रक्रियेशिवाय त्याचे जीवन हिरावून घेतले जाऊ शकत नाही. त्यामुळे मानसिक आरोग्य हा केवळ कल्याणकारी मुद्द्या नसून तर तो एक संवैधानिक मुद्दा आहे.

प्रा डॉ संजय छाया त्रिंबकराव खडक्कार,
माजी तज्ज्ञ सदस्य, विदर्भ वैधानिक विकास मंडळ.
मोबाईल क्रमांक: 7276614260

भारतात अभियांत्रिकी पदवी मिळविण्यासाठी आयआयटी ( इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) ही सर्वात प्रतिष्ठित संस्थांपैकी एक आहे. जागतिक दर्जाचे शिक्षक,सर्वोत्तम प्लेसमेंट आणि उत्कृष्ट संस्थात्मक सुविधा येथे उपलब्ध आहेत. आयआयटी टॅग ही एक अत्यंत प्रतिष्ठित गोष्ट आहे व याने विद्यार्थांसाठी विविध संधींचे प्रवेशद्वार उघडतात. यात प्रवेश मिळवण्यासाठी देशातील सर्वात कठीण परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. आज भारतातील २३ आयआयटीमधील पदवीपूर्व विज्ञान आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी (बीटेक/बीएस/इंटिग्रेटेड अभ्यासक्रम) जवळपास १८,००० जागांसाठी, प्रवेश परीक्षांमध्ये दरवर्षी जवळपास १५ लाखांहून अधिक विद्यार्थी बसतात. आयआयटीमध्ये प्रवेश हा अपवादात्मक शिक्षणाचा एक मार्ग आहे आणि ते बौद्धिक क्षमता आणि समर्पणाचे प्रतीक आहे.

पण याच देशभरातील आयआयटीमध्ये सन २०२१ ते २०२५ दरम्यान ६५ बुद्धिमान विद्यार्थांनी आत्महत्या केल्याचे दिसून आले. सन २०२१ मध्ये ९ आत्महत्यापासून सुरुवात झाली तर ती सन २०२५ मध्ये त्या वाढून १५ आत्महत्या झाल्यात. एकूण ६५ मध्ये ११ विद्यार्थिनी होत्या. देशातील हुशार व प्रतिभावान विद्यार्थी आत्महत्या करत असतील तर ही बाब निश्चितच चिंताजनक आहे.

घरातील तरुण प्रतिभावान विद्यार्थी आत्महत्या केल्याने काय दुर्दैवी प्रसंगातून ते कुटुंब जात असेल याची कल्पना पण करवत नाही. सर्वस्व गमाविल्याची भावना कुटुंबात निर्माण होत असेल. एवढ्या टोकाची भूमिका आपल्या पाल्याने का घेतली असेल, या विचाराने पालकांचे मन बधिर होत असेल. पण त्याचे उत्तर सापडणे तेवढेच जटील. विद्यार्थी आत्महत्येला शैक्षणिक संस्थेने विद्यार्थ्याकडे पुरेसे लक्ष न देऊन योग्य वेळी हस्तक्षेप केला नाही, प्रशासकीय उदासीनता,अहंकारी व बेफिकीर प्राध्यापक इत्यादी कारणे देऊन त्या शैक्षणिक संस्थेला दोष देणे सोपे आहे. परंतु काय खरंच यासाठी फक्त संस्था जबाबदार आहेत?

आत्महत्या करणारा प्रत्येक तरुण ही एक वैयक्तिक शोकांतिका आहे. या आत्महत्येचे कारणे आर्थिक, शैक्षणिक, मानसिक आणि सामाजिक समस्यांमध्ये पण असू शकतात. भारतात सतत तुलना करण्याची प्रवृत्ती व सामाजिक मान्यता यामुळे मुलांवर प्रचंड दबाव निर्माण होतो. पालक आपले अपूर्ण स्वप्न ही मुलांकडून पूर्ण होण्याची स्वप्न बघतात. नातेवाईक किंवा मित्रांकडून होणारी टीका पण मुलांच्या आत्मसन्मानाला बाधा पोहोचवते. मुलांची तुलना ही इतर मुलांची करण्यात येत असते, जसे अमूक वर्गात नेहमीच पहिला क्रमांक आणतो, तमूक मुलाचे घर हे आलिशान आहे. या तुलनात्मक विचारसरणीमुळे मुलांवर अप्रत्यक्ष रित्या दबाव वाढतो. तसेच आपण जे काही करतो त्यासाठी सामाजिक मान्यता मिळेल का याचे दडपण पण मुलांवर असते. पालकांनी पण मुलांवर सशर्त प्रेम दाखवू नये. पाल्याने चांगल्या क्रमांकाने उत्तीर्ण व्हावे, चांगली नोकरी मिळवावी, भौतिक सुविधा मुबलक प्रमाणात प्राप्त कराव्यात यासाठी दबाव आणू नये. त्याच्या यशाबरोबर अपयशामध्ये पण त्याला पाठिंबा दिला पाहिजे. पाल्याकडून अधिक वास्तववादी अपेक्षा असाव्यात.

काही विद्यार्थी फक्त घरच्यांच्या इच्छेखातर अभियांत्रिकीची निवड करतात. आयआयटीचा अभ्यासक्रम सोपा नसल्याने, जेव्हा आवडच नसते, तेव्हा परीक्षा उत्तीर्ण होणे कठीण होऊन बसते. काही विषयांमध्ये असे विद्यार्थी अनुत्तीर्ण होतात व नापास विषयांचा अनुशेष दिवसेंदिवस वाढत जातो. मुळात, रुचीच नसल्याने, कितीही प्रयत्न केले तरी आयआयटीतून अभियांत्रिकीची पदवी मिळवणे अशा परिस्थितीत कठीण होते.

आयआयटीमध्ये विद्यार्थी हे विविध सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभुमीतून येतात. काहीजण गरीब घरातून येतात. येथे काहींना प्रवेश घेण्यासाठी वडिलोपार्जित जमीन किंवा घर पण विकावे लागते. अशा वेळेस अपेक्षांचा भार हा विद्यार्थ्यांवर येणे स्वाभाविक आहे. प्रचंड मेहनत घेऊन प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन आयआयटीत दाखल झालेले काही विद्यार्थी हे प्रवेश घेण्याच्या वेळीच शारिरीक व मानसिकदृष्ट्या थकलेले आढळतात. येथे आल्यानंतर आपला निभाव लागेल की नाही याची चिंता त्यांना भेडसावत असते.

आपल्यापेक्षा अधिक बुद्धिमान व हुषार विद्यार्थी बघितल्यावर, विद्यार्थी अजून दडपणाखाली येतात. त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होऊ शकतो, प्रामुख्याने ही बाब ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये येण्याची शक्यता दाट असते. आयआयटीमध्ये तीव्र उच्च दाबाचे स्पर्धात्मक वातावरण असते. विद्यार्थ्यांमधील एकमेकांशी स्पर्धा पण काही विद्यार्थ्यांसाठी नैराश्य निर्माण करतात. मानसिक दबावात काही विद्यार्थी मादक पदार्थाच्या सेवनाकडे पण वळलेले आढळतात.

मग यातून मार्ग कसा काढायचा ? सर्वप्रथम विद्यार्थांच्या वाढत्या आत्महत्या ही बाब अत्यंत गांभीर्याने घेण्याची गरज आहे. विद्यार्थांची मानसिक व सामाजिक कल्याणाची जबाबदारी ही शैक्षणिक संस्थांनी घेणे आवश्यक ठरते. आत्महत्या ही निराशेची वैयक्तिक कृती म्हणून पाहण्याच्या पलीकडे जाऊन याचा विचार झाला पाहिजे. घटनेचे कलम २१ मध्ये असे म्हटले आहे की कायद्याने स्थापित केलेल्या प्रक्रियेशिवाय कोणत्याही व्यक्तीला त्यांचे जीवन हिरावून घेतले जाणार नाही . याचा अर्थ असा की प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा अधिकार आहे आणि विहित कायदेशीर प्रक्रियेशिवाय त्याचे जीवन हिरावून घेतले जाऊ शकत नाही. त्यामुळे मानसिक आरोग्य हा केवळ कल्याणकारी मुद्द्या नसून तर तो एक संवैधानिक मुद्दा आहे.

आयआयटीमध्ये अशा आर्थिक, शैक्षणिक, मानसिक आणि सामाजिक समस्यांमध्ये अडकलेल्या विद्यार्थांना ओळखणे कठीण नाही. चिंताग्रस्त विद्यार्थांचे मित्रमैत्रिणी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, वसतीगृहातील वॉर्डन व तेथील कर्मचारी यांना विद्यार्थांच्या वर्तणुकीवरून नैराश्य आलेले विद्यार्थी सहज ओळखता येऊ शकतात. आत्महत्या करणारा विद्यार्थी हा काही तडकाफडकी एखाद्या घटनेमुळे लगेच आत्महत्या करेल अशी शक्यता फार कमी असते. काही दिवस, काही महिने तो नैराश्याच्या आहारी जाऊन मगच असा आत्मघाती निर्णय घेतो.अश्या वेळेस त्यांना वेळेतच मार्गदर्शन करण्याची गरज असते.

आयआयटीमध्ये समुपदेशक केंद्र आहेत. परंतु ते कितपत प्रभावीपणे आपले काम बजावतात हे तपासणे जरूरीचे आहे. समुपदेशक केंद्रात मार्गदर्शक प्रशिक्षित असणे पण अत्यावश्यक आहे. अंतर्मुखी, संवादात कमकुवत, एकांकी वृत्तीचा, निराश, आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थांकडे अधिक लक्ष देण्याची गरज असते. त्यांच्याशी संवाद वाढवणे आवश्यक आहे. आत्महत्या करण्यापासून रोखण्यासाठी मानसिक तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्यांना रोखणे अशक्यप्राय बाब नाही. फक्त ही बाब प्रशासनाने डोळ्यात तेल घालून केली, तर आयआयटीसारख्या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थांच्या आत्महत्या थांबवता येतील. तसेच पालकांनी पण आपल्या पाल्यांच्या आवडीनुसार व योग्यतेनुसार त्याला जीवनात काय बनायचे हे ठरविले पाहिजे व तो निर्णय पाल्याशी चर्चा करूनच घेतला पाहिजे.

आपल्या स्वप्नांचे ओझे पाल्यावर टाकून कुठल्याही प्रकारच्या जोर जबरदस्ती‌ने निर्णय घेणे निश्चितच घातक ठरू शकते. शैक्षणिक संस्थेचे सुशासन आणि पाल्यांच्या कुटुंबाची सामंजस्य भुमिका ही आयआयटीच्या विद्यार्थांना आत्मघाती निर्णय घेण्यापासून परावृत्त करू शकते व त्यामुळे कुटुंबाचे वैयक्तिक नुकसान होणार नाही आणि देश भावी बुध्दीमान इंजिनियरपासून मुकणार नाही.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Scope Creep वर कोणते आहेत उपाय ?

मानसिक आरोग्य राखण्यासाठी…

मुलांच्या चौकसबुद्धीला संस्काररुपी बळ देणारी, मक्याची कणसं

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading