लखुजी राजे माळसा पोटी
पाचवी कन्या चौघांच्या पाठी
जिजा जन्मली भाग्याची बेटी
जो बाळा जो रे जो
रेणुका मातेला नवस केला
बहु पुण्याचा संचय झाला
बाळाच्या रूपे फळाला आला
जो बाळा जो रे जो
रुक्मिणीचा वंश आलाय ओजा
यादव कुळात जन्मली जिजा
तिन्ही लोकात वाजल्या झांजा
जो बाळा जो रे जो
गोरगरीबाला वाटीती दान
सरदाराला सुपारी पान
सग्यासोयऱ्यांना वस्त्राचा मान
जो बाळा जो रे जो
गंगाधर शास्त्री पंचांग सांगे
भवानी माता बाळाच्या मागे
शिव कुशीत होतील जागे
जो बाळा जो रे जो
माळसा माईला आनंद होई
लखुजी राजा उचलून घेई
म्हणे पुन्हा घरी जन्मली आई
जो बाळा जो रे जो
सिंदखेडची इमानी माती
बुरुजानं दिली निधडी छाती
डोंगर देतो हिरवी नाती
जो बाळा जो रे जो
गाई दारात सांडीती धारा
बाळ खातसे चिऊचा चारा
वाहू लागला नवाच वारा
जो बाळा जो रे जो
दचकू लागला स्वप्नात काळ
दणानू लागले तीनही ताळ
रांगु लागले जिजाऊ बाळ
जो बाळा जो रे जो
इंद्रजित भालेराव
💐
गेल्या आठ दिवसापासून अनेकांनी मला जिजाऊंचा पाळणा मागितला. जिजाऊ जयंतीच्या निमित्तानं तो अनेकांना सादर करायचा होता, म्हणून इथं तो संपूर्ण पाळणा देत आहे. तो कसा म्हणायचा त्यासाठी सौ. गया इंद्रजीत भालेराव आणि सौ. गायत्री हर्षवर्धन भालेराव या दोघी सासासुनांनी हा पाळणा सादर केलेली ध्वनिचित्रफीत सोबत देत आहे. काव्य अर्थात माझेच असून, चित्रीकरण हर्षवर्धनने केलेले आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
