कोल्हापूरला न्याय कधी मिळणार…?

कोल्हापूरच्या जनतेला न्यायालय मिळाले पण न्याय नाही मिळाला. तो न्याय मिळण्यासाठी कोल्हापूर गोलमेज परिषद हे व्यासपीठ निर्माण करून या मागण्या लावून झाल्या पाहिजेत. तरच एकविसाव्या शतकातील पुढचे पाऊल पडू शकेल.
वसंत भोसले
कदाचित शीर्षक वाचून आश्चर्य वाटू शकते. पण ही गोष्ट खरी आहे चाळीस वर्षाच्या लढ्यानंतर कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाची मागणी प्रत्यक्षात अवतरली. याचे सर्व श्रेय जसे आंदोलनकर्त्यांना आहे तसेच ते श्रेय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना जाते. त्यांनी ही मागणी उचलून धरली नसती आणि जेव्हा अधिकार मिळाले तेव्हा निर्णय घेतला नसता तर कोल्हापूरला उच्च न्यायालयाचे खंडपीठ कधी झाले असते याचा अंदाज बांधणे कठीण झाले असते.
खंडपीठाच्या मागणीची पूर्तता झाल्यानंतर अनेक बदल अपेक्षित आहेत. कारण न्यायालयीन कामकाजासाठी कोल्हापुरातील सहा जिल्ह्यातील पक्षकार, वकील आणि तत्सम कामकाजासाठी लागणारे कर्मचारी येत राहतील. त्याचा लाभ कोल्हापूरकरांना निश्चितच होणार आहे. खंडपीठाची मागणी जशी उशिरा मान्य झाली तशा कोल्हापूरच्या संदर्भात अनेक मागण्या अनेक वर्षे न सोडविता प्रतीक्षेत राहिलेल्या आहेत. त्यामुळे असा प्रश्न पडतो की, कोल्हापूरला न्यायालय मिळाले आहे खऱ्या अर्थाने आधुनिक शहर होण्यासाठी ज्या गोष्टी होणे आवश्यक आहे. त्या होऊन कोल्हापूरला न्याय कधी मिळणार….? हा अनुत्तरीत प्रश्न आहे. आपल्या मागण्या नेमकेपणाने मांडल्या तर त्या मान्य होऊ शकतात तसा प्रयत्न कोल्हापूरच्या जनतेने अनेक वर्षे केलेला आहे.
उदाहरणार्थ कोल्हापूरची ग्रामदैवता अंबाबाई मंदिराचा विकास, श्री क्षेत्र जोतिबा डोंगराचा विकास, पर्यटन केंद्र म्हणून आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांचा विकास, कोल्हापूरला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा योग्य पद्धतीने विस्तार, हवाई वाहतुकीद्वारे कोल्हापूर अनेक शहरांशी जोडले जाणे, कोल्हापूरला आलेली रेल्वे कोकणला जोडून घेणे, ज्यांच्या नावामुळे कोल्हापूरचा नावलौकिक कायम टिकून आहे त्या युगपुरुष समाज क्रांतिकारक अलौकिक राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे भव्य दिव्य स्मारक, कोल्हापूर ही कलानगरी असल्यामुळे या नगरीमध्ये एखादी आधुनिक आर्ट गॅलरी, केशवराव भोसले नाट्यगृह हे इतिहासकालीन असले तरी नव्या नाट्यगृहाची गरज ओळखून त्याची पूर्तता करणे, पंचगंगा नदीसह सर्वच नद्या बारमाही असल्या तरी या नद्यांचे प्रदूषण रोखणे, असे अनेक प्रश्न सातत्याने जनआंदोलनाचे भाग ठरलेले आहेत. जनतेने या प्रश्नावर अनेक वेळा आवाज उठवलेला आहे.
कोल्हापूरला मराठी चित्रपट व्यवसायाचे केंद्र मानले जात होते. मात्र चित्रनगरी पुरेपूर होऊन प्रत्यक्षात हा व्यवसाय पुन्हा बहरण्यासाठी अपुरे पडलेले प्रयत्न करणे आवश्यक देखील आहेत. चित्रनगरीला आता बाळसे आले असून ते नावारूपाला येण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. लोकप्रतिनिधींनी हे सर्व विषय लावून धरले नसले तरी या प्रश्नांची मागणी सतत करीत राहतात. पण ते सोडवण्यासाठी “शेंडी तुटो या पारंबी तुटो” अशा पद्धतीची भूमिका घेत नाहीत. त्यामुळे खुजा नेतृत्वाची सावली दूर होणे आवश्यक आहे.
कोल्हापूरसाठी या सर्व मागण्या मान्य कराव्या लागणार आहेत. कारण मुंबई, पुण्यानंतर महाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षण असलेले कोल्हापूर हे शहर आहे. कोल्हापूरचे भौगोलिक स्थान देखील खूप महत्त्वाचे आहे. कोल्हापूरहून कोकण, गोवा आणि कर्नाटक जोडला गेलेला आहे. उर्वरित महाराष्ट्रातील जो पर्यटक कोल्हापूरला येतो तो पुढे कोकणात जातो, गोव्याला जातो किंवा कर्नाटकातही जातो. त्यामुळे कोल्हापूरला सातत्याने येणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. त्यामानाने कोल्हापूरमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा तयार झालेल्या नाहीत. कोल्हापूरची हद्दवाढ हा एक विषय विनाकारण गुंतागुंतीचा करून ठेवलेला आहे. शहर वाढण्यासाठी शहराला लागून असलेल्या पाच सहा गावांसह हद्दवाढ करणे आवश्यक आहे. ही हद्दवाढ करीत असताना कोल्हापूर शहराच्या भौगोलिक आणि पर्यावरणीय रचनेचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून शहर नियोजनाची फेरमांडणी करणे गरजेचे आहे. यासाठी कोल्हापूर सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन सारखी संस्था स्थापन करून तिला स्वायत्तता देणे आवश्यक आहे.
कोल्हापूरला उद्योग व्यवसायाचा सुमारे दीड दोनशे वर्षांचा इतिहास आहे. कोल्हापूरचे उद्योजक हे कल्पक, मेहनती आणि धाडसी आहेत. त्यांचा नावलौकिक फार दूरपर्यंत पसरलेला आहे. मात्र या उद्योग क्षेत्राचा विस्तार होण्यासाठी त्याला आधुनिक रूप येण्यासाठी, इतर अनेक उद्योग येण्यासाठी जे प्रयत्न होणे आवश्यक आहे तसे प्रयत्न कोणी करताना दिसत नाहीत. परिणामी उच्च शिक्षण घेतलेला तरुण-तरुणींना कोल्हापुरात संधी मिळत नाही. विविध प्रकारच्या कामातून कष्टातून छोटे छोटे व्यवसाय करावे म्हटले तरी संधी मिळत नाही. कोल्हापूर शहरातील रस्त्यांची मर्यादा स्पष्ट झालेल्या आहेत. वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. कोल्हापूर शहरातील सार्वजनिक खुल्या जागांचा विकसित करण्याचे प्रश्न अनेक वर्षे रेंगाळलेले आहेत. श्री अंबाबाईला येणाऱ्या भाविकांसाठी पार्किंगची साधी सोय उपलब्ध नाही. यासाठी अंबाबाई विकास आराखडा जो उत्तम पद्धतीने तयार करण्यात आलेला आहे. तो राबवण्यासाठी मोठा निधी लागणार आहे. हिंदुत्वाचा गळा काढून सतत राजकीय संधी साधूपणा करणारे सत्तेवर आल्यानंतर देखील श्री अंबाबाई मंदिराचा विकास होत नाही हा एक विरोधाभासच आहे.
उद्योग, व्यापार – व्यवसाय, पर्यटन, कला, क्रीडा, चित्रपट, शिक्षण, आरोग्य सुविधा अशा अनेक क्षेत्रांमध्ये कोल्हापूर शहराला आघाडीवर घेऊन जाता येऊ शकते. त्यासाठी आवश्यक वातावरण आहे. या सर्व क्षेत्रांमध्ये विकास व्हावा अशी केवळ भावना असून चालत नाही त्यासाठी आवश्यक पाठपुरावा आणि लोकांचा दबाव निर्माण करणे आवश्यक आहे. जेव्हा एखादे सार्वजनिक काम उभे राहते तेव्हा त्यातून राजकीय लाभ उठवण्याची संधी शोधणे हे समजता येईल. मात्र त्यातून पैसा उकळण्याची प्रवृत्ती खूपच घातक आहे. या प्रवृत्तीमुळे कोल्हापूर शहरात चांगल्या पद्धतीची कामे होत नाहीत. हा खरंतर कोल्हापूरकरांच्यावर अन्याय आहे. असे कोणतेही क्षेत्र नाही की ज्याचा विस्तार आणि विकास कोल्हापूरला करता येऊ शकत नाही. शिक्षण क्षेत्रात अजूनही खूप काम करण्यासारखे आहे. विद्यापीठ किंवा वैद्यकीय महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये आणि विविध प्रकारच्या विद्याशाखांची महाविद्यालये असली तरी त्या सर्व संस्थांमधून आधुनिक ज्ञानाची जोड देण्याची गरज निर्माण झालेली आहे. यासाठी एखादे व्यासपीठ तयार करून कोल्हापूरचा शैक्षणिक आराखडा मांडला जावा.
कला, क्रीडा, चित्रपट
कोल्हापूरचे अनेक वेळा कलानगरी, चित्रनगरी, क्रीडानगरी असा अभिमानाने उल्लेख केला जातो. मात्र या सर्व क्षेत्रांचा इतिहास दैदिप्यमान असून चालत नाही. त्यामध्ये सातत्याने सुधारणा होण्याची गरज असते. आधुनिकतेची वाट धरून त्यात बदल करावे लागतात. कुस्ती सारखा क्रीडा प्रकार आता बंद पडतो आहे का ? अशी स्थिती आहे. कोल्हापूर परिसरातून कुस्ती क्षेत्रातून खेळाडू तयार होण्याच्या मर्यादा स्पष्ट झालेल्या आहेत. हॉकी किंवा फुटबॉल या क्रीडा प्रकारात देखील वेगळे प्रयोग करून तरुणांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षण देण्यामध्ये कमी पडतो आहोत. कोल्हापूरला जी दोन स्टेडियम आहेत, त्यापैकी शाहू स्टेडियम कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन सांभाळते आहे. म्हणून तेथे निदान फुटबॉलचा हंगाम तरी पार पडतो. शिवाजी स्टेडियम हे पूर्णपणे दुर्लक्षित राहिलेले आहे त्याचा विकास करण्याची जबाबदारी शासनाने घेतली पाहिजे. किंवा भारतीय क्रिकेट नियमक मंडळाशी बोलून कोल्हापूरला आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभे करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे.
या क्रीडा प्रकाराशिवाय स्विमिंग (पोहणे) आणि शूटिंग यामध्ये अनेक खेळाडूंनी घवघवीत यश मिळवून कोल्हापूरचा नावलौकिक केला आहे. पण या सर्व खेळाडूंना प्रशिक्षणासाठी, अधिक प्रगती करण्यासाठी बाहेरचा रस्ता धरावा लागतो. कारण राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील निकषानुसार आवश्यक असणारे प्रशिक्षण कोल्हापुरात मिळत नाही. फुटबॉल बद्दल देखील असेच म्हणता येईल. कुस्ती आणि क्रिकेट या खेळाचा जो दर्जा आता निर्माण झाला आहे ते गाठण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा आणि प्रशिक्षण कोल्हापुरात आता मिळणे दुरापास्त झाले आहे. या सर्व कारणांमुळे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होण्याची परंपरा कमी झाली आहे. एखादा खेळाडू यशस्वी होतो त्याला डोक्यावर घेऊन नाचण्यामध्येच येथील नेतृत्व धन्यता मानते. त्याच खेळाडूला आपला अधिक गुणवंत होण्यासाठी कोल्हापूर सोडावे लागते. हे कधी त्यांच्या लक्षात देखील येत नाही. स्विमिंग किंवा शूटिंगचे यशस्वी खेळाडू कोल्हापूर सोडून बाहेर गेले आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा पुढच्या पिढीला होत नाही. कारण ते येथे थांबून आपल्या खेळामध्ये सातत्य टिकवू शकत नाहीत
अभिनयाच्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी मोठी संधी आता निर्माण झालेली आहे. केवळ चित्रपट नाही तर टीव्हीसारखे माध्यम मोठ्या प्रमाणात विकसित झालेले आहे. टीव्ही मालिकांचे चित्रीकरण कोल्हापूरच्या परिसरात होते. पण त्याचे प्रमाण खूपच कमी आहे. कोल्हापुरात असंख्य कलाकार, तंत्रज्ञ आणि हौशी रंगकर्मी आहेत. पण त्यांना व्यासपीठ उपलब्ध होत नाही. नाटकांचा सराव करण्यासाठी पुरेशे दालन देखील नाही. केशवराव भोसले नाट्यगृह सुधारण्याच्या अनेक योजना राबवल्या पण त्या योजना पूर्ण करताना तेथील आसनक्षमता कमी कमी होत गेली. परिणामी व्यावसायिक नाटकांना हे नाट्यगृह उपयुक्त ठरत नाही. त्यांचे आर्थिक गणित बसत नाही. किमान बाराशे प्रेक्षकांची आसनक्षमता असलेल्या नाट्यगृहाची गरज आहे.
कोल्हापुरात व्यावसायिक तथा उद्योग क्षेत्रातील विविध प्रकारच्या प्रदर्शनासाठी कन्वेंशन सेंटर होणे गरजेचे आहे. त्याची केवळ अधून मधून घोषणाच होते. पण ते प्रत्यक्षात उभे राहत नाही. अनेक प्रकारच्या व्यावसायिक प्रदर्शनासाठी, छोट्या-मोठ्या हॉटेलवर अवलंबून राहावे लागते किंवा एखाद्या मंगल कार्यालयाचा आश्रय घ्यावा लागतो ही बाब खेदजनक आहे.
सुंदर कोल्हापूर
कोल्हापूर शहराच्या सुंदरतेसाठी अनेक खुल्या जागांचा नियोजनबद्ध पद्धतीने विकास करता येऊ शकतो.छोट्या-मोठ्या अनेक बागा या दुर्लक्षित राहिलेल्या आहेत. ते दारू पिण्याचे अड्डे झाले आहेत. अशा सर्व भागांच्या मध्ये विविध प्रकारांच्या फुलांच्या आणि फळांच्या वृक्षांची लागवड करणे गरजेचे आहे. सुदैवाने कोल्हापूरची माती सुपीक आणि पुरेपूर पाण्याची उपलब्धता आहे. त्याच्या आधारे गार्डन सिटी सारखे शहर सजवणे सहज शक्य आहे. शहराच्या तिन्ही बाजूला पंचगंगा नदी असल्यामुळे अनेक भाग सुंदर विकसित करता येऊ शकतात. अलीकडच्या काळामध्ये शिवाजी विद्यापीठात पाणी उपलब्ध करण्याचा आणि वृक्षसंपदा वाढवण्याचा केलेला यशस्वी प्रयोग हा कोल्हापूरच्या सौंदर्यात भर घालणारा ठरलेला आहे. रंकाळ्याचा परिसर आणि त्याला वेडा घातलेल्या अतिक्रमणांपासून सुटका करून तो विकसित करता येऊ शकतो.
कोल्हापूरला येणाऱ्या पर्यटकांच्या बरोबरच विविध समारंभ, मेळावे, सभा आणि इतर कार्यक्रम यांना सामावून घेण्याइतक्या पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत. कोल्हापूर शहरात प्रवेश करण्यासाठी पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गापासून पाच मार्ग असलेल्या या मार्गांचा विकास करायला हवा. कोल्हापूर शहरासाठी आवश्यक असणाऱ्या प्रत्येक बाबीवर अनेक प्रकारे चर्चा होते. वादंग निर्माण होते. आपण काय भांड कुदळ आहोत असे वातावरण तयार व्हावे इतकी रंगतदार चर्चा देखील होते. कोल्हापूरच्या लोकांमध्ये खूप इर्षा आहे असे म्हटले जाते. पण ते अर्धसत्य आहे.
एखादे काम उभं करण्यासाठी त्याचा सातत्याने पाठपुरावा करावा लागलं. ते पूर्णत्वास नेण्याची ईर्षा मात्र दिसत नाही. तावडे हॉटेल येथे बास्केट ब्रिज बनवण्याची चर्चा अनेक वेळा होऊन गेली. पण तो काही प्रत्यक्षात उभा राहिला नाही. एवढेच नव्हे तर कोल्हापूरच्या मुख्य बस स्थानकापासून राजारामपुरीत जाणाऱ्याना रेल्वे रूळ पार करण्यासाठी लोकांना रस्ता राहिलेला नाही. परीख पुला खालून जीव मुठीत धरून लोकांना जावे लागते. वास्तविक या रेल्वे मार्गाच्या मध्ये अंडरग्राउंड (भूमिगत) वॉकिंग पाथ तयार केला तर सहज ही समस्या सुटू शकते. राज्यात आणि केंद्रात एकाच पक्षाची सरकार अनेक वेळा होती. आता देखील आहेत. त्यामुळे राज्य शासन आणि केंद्र शासन मिळून रेल्वे खात्याला हे शहाणपण आपण येण्यासाठी चार शब्द ऐकवले पाहिजेत. ते करण्याची देखील कोणाची तयारी नाही.
कोल्हापूरच्या प्रश्नावरती सातत्याने लोक आवाज उठवतात त्याची चर्चा होते. लोकप्रतिनिधी आश्वासन देतात ते प्रश्न सोडवण्याची धडपड केल्याचे भासवतात पण प्रत्यक्षात अनेक वर्षे अनेक प्रश्न सुटत नाहीत. कोल्हापूर आणि कोल्हापूर जिल्हा हा विकसित आहे. तो जणू श्रीमंत लोकांचा” मलभार हिल” आहे. असाच समज राज्यातल्या नेत्यांनी करून घेतलेला दिसतो. त्यामुळे कोल्हापूरची मागणी आली तर अनेक राज्य पातळीवरील नेते नाक मुरडतात. पण कोल्हापुरात सामान्य माणसांची संख्या नव्वद टक्के आहे. इथल्या शेतकऱ्यांची सरासरी जमीनधारणा ही केवळ एक हेक्टर पेक्षा कमी आहे. अशा छोट्या शेतकऱ्यांचा, छोट्या उद्योजकांचा, व्यावसायिकांचा, सामान्य माणसांचा हा जिल्हा आहे. तरी देखील या जिल्ह्यातून राज्य आणि केंद्र सरकारला कर रूपाने मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो.
उद्योग, व्यापार, सहकार. नोकरदार आदींचे यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात योगदान आहे. साखर कारखानदारी, उद्योगधंदे किंवा दूध व्यवसाय, पर्यटन आणि वस्त्रोद्योग अधिक क्षेत्रामधून हा कर दिला जातो. त्या प्रमाणात कोल्हापूरला राज्य किंवा केंद्र शासनाकडून कोणतीही मोठी योजना येत नाही. कोल्हापूर सारख्या शहरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात संधी असून देखील स्मार्ट सिटीमध्ये या शहराचा समावेश करण्यात आला नाही. वास्तविक ऐतिहासिक शहर आणि या शहराचे सामाजिक, राजकीय, औद्योगिक क्षेत्रातील प्रगती पाहताना खास बाब म्हणून स्मार्ट सिटीमध्ये समावेश करून विकास केला पाहिजे. कोल्हापूरच्या लोकांनी खूप मोठ्या कष्टाने अनेक गोष्टी केल्या आहेत. त्यामुळेच खंडपीठ झाले याचा अर्थ कोल्हापूरला सर्व प्रकारचा न्याय मिळाला. असे नाही. खंडपिठाची इमारत देखील तातडीने उभी करण्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. जिल्हा न्यायालय ज्याप्रकारे कोल्हापूर शहराला शोभून दिसेल असे उभे करण्यात आले पाहिजे. त्याहून अधिक सुंदर खंडपीठाची इमारत कोल्हापूरसाठी तातडीने होणे गरजेचे आहे. त्याच परिसरामध्ये राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयाचे मोठे हॉस्पिटल उभे राहते आहे. तो परिसर मोठ्या प्रमाणात विकसित होणार आहे. त्या सर्व परिसराचा समावेश कोल्हापूर शहराची हद्द वाढवून शहरात केला पाहिजे, तरच कोल्हापूरला न्याय मिळाला असे म्हणता येईल.
गोलमेज परिषद
या संबंधाने कोल्हापुरात एखादी गोलमेज परिषद भरवून या विषयांना आणि मागण्यांना अंतिम रूप देऊन या कोल्हापूर गोलमेज परिषदेच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला पाहिजे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने शाहूनगरी म्हणून देखील कोल्हापूरचा नावलौकिक आहे. पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला शोभेल अशा स्वरूपाचे शाहू स्मारक कोल्हापुरात नाही. हे स्मारक केवळ पुतळा किंवा प्रतिमेच्या रूपात असू नये. उलट त्याची रूपरेषा खूप चांगली तयार करण्यात आलेली आहे. त्यासाठी दरवर्षी दीड दोनशे कोटी रुपये राज्य शासनाने निधी दिला तर काही वर्षात शाहू स्मारक उभे राहील आणि त्या स्मारकाच्या सुविधांचा वापर लोकांना करता येईल. तेथे उत्तम नाट्यगृह, कलादालन, सेंट्रल लायब्ररी, छोटी सभागृहे उभी करता येऊ शकतील. यासाठी “अमेरिकन मिशन”ची ५७ एकर जागा वापरात येऊ शकते किंवा स्मारकासाठी शाहू मिल परिसरात अनेक गोष्टी उभा करता येऊ शकतील. केशवराव भोसले नाट्यगृह आहे त्याच स्वरूपात उभा करण्याचा केलेला अट्टाहास देखील चुकीचा ठरला आहे. अशा अनेक चुकीच्या मागण्या आणि नको तेथे स्वाभिमान दाखवण्याची वृत्ती देखील कोल्हापूरकरांनी सोडली पाहिजे. केशवराव भोसले नाट्यगृहाच्या जागेवरच उत्तम मोठे नाट्य गृह उभे राहू शकले असते. पण त्यामध्ये देखील वाद निर्माण करण्यात आला.
आता वाद कमी करून किमान दहा मागण्यांचा पाठपुरावा करीत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी ज्या तत्परतेने खंडपीठाचा निर्णय घेऊन अमलात आणला. त्याच पद्धतीने किमान दहा गोष्टी तरी आपण येत्या पाच वर्षात पूर्ण केल्या पाहिजेत..तरच कोल्हापूर आधुनिक शहर म्हणून नावारूपाशी येऊ शकेल. कोल्हापूरच्या जनतेला न्यायालय मिळाले पण न्याय नाही मिळाला. तो न्याय मिळण्यासाठी कोल्हापूर गोलमेज परिषद हे व्यासपीठ निर्माण करून या मागण्या लावून झाल्या पाहिजेत. तरच एकविसाव्या शतकातील पुढचे पाऊल पडू शकेल.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.