ओळख: वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..!..४
गेली २५ वर्ष अथकपणे विविध क्षेत्रात धाडसी, प्रामाणिक व निर्भिडपणे कार्यरत राहून आपल्या गावातील देवस्थानचा विकास करून त्या माध्यमातून धार्मिक कामांसोबत शैक्षणिक, सामाजिक अशा विविध क्षेत्रात म्हसोबा देवस्थानासोबत खारवडे गावचे नाव जगाच्या नकाशावर जाईल यासाठी अथकपणे कार्यरत राहाणाऱ्या या आधुनिक दुर्गेला मानाचा मुजरा..!!
ॲड. शैलजा मोळक
लेखक, कवी, संपादक, प्रकाशक
अध्यक्ष, शिवस्फूर्ती प्रतिष्ठान पुणे
मो. 9823627244
खारवडे, ता. मुळशी, जि. पुणे येथील म्हसोबा देवस्थान हे महाराष्ट्रात प्रसिध्द करण्यात मोठा वाटा आहे. तो मधुराताई भेलके यांचा..! वडिलांचा गुणांचा, कामाचा वारसा अनेक मुले- मुली चालवत असतात. परंतु आपले वडील कै. लक्ष्मणराव मारणे यांच्या गंभीर आजारामुळे त्यांनी राजीनामा दिल्याने खारवडे गावातील श्री म्हसोबा, काळूबाई, भैरवनाथ, श्री शंकर मंदिर ट्रस्ट यांच्या विश्वस्त सभेतच सर्व विश्वस्तांनी अतिशय विश्वासाने मधुराताईंना अध्यक्षपदाची धुरा सांभाळायचे आग्रह केला. आणि १९९३ पासून आज ३२ वर्ष त्या अध्यक्षपदाची जबाबदारी अतिशय समर्थपणे पेलत आहेत. अनेकदा देवस्थानच्या महिला अध्यक्ष म्हणून फार कमी महिलांना आजही संधी मिळते अशा परिस्थितीत मधुराताई ३२ वर्ष विविध सामाजिक व धार्मिक कामात सक्रिय आहेत. मुळशी तालुक्यात त्यांच्या या देवस्थानाने वेगळाच नावलौकिक कमावला आहे.
एम. कॅाम. झालेल्या मधुराताई या लग्नाआधी व लग्नानंतर सामाजिक व धार्मिक कामातच विशेष रमल्या. त्यांनी अतिशय महत्वाचे व क्रांतीकारी निर्णय या देवस्थानच्या माध्यमातून घेतले. म्हसोबा देवस्थानचे मंदिर वनजमीनीवर असल्याने सन १९९३ पासून सलग ७ वर्ष ताईंनी जिद्द व चिकाटीने पुणे, मुंबई, नागपूर व भोपाळ येथे स्वतः जाऊन शासकीय वनविभागाकडून देवाची जमीन सूट आणून ती मालकीची केली. पुणे जिल्ह्यातील वनविभागातून सूट मिळालेले हे पहिलेच देवस्थान आहे.
मंदिर जुने झाल्याने त्याचे जीर्णोध्दार करून त्यावर सुवर्णकलश बसवायचे हाती घेतलेले काम ताईंनी सन २०१२-१३ मधे पूर्ण केले. देवस्थानची वेबसाईट, लोगो इ. तंत्रज्ञान विकसित करायचे कामही त्यांनी केले. रूद्राभिषेक, अभिषेक, महाप्रसाद या धार्मिक गोष्टींबरोबरच ताईंनी गावकऱ्यांना विश्वासात घेऊन म्हसोबा देवस्थानात पूर्वापार चालू असलेली पशुबळीची प्रथा ही प्रबोधनाने बंद केली हा धाडसी निर्णय ताईंनी घेतला. विशेष म्हणजे याला कोणाचाही विरोध झाला नाही.
आपण अनेक देवस्थान काही अपवाद वगळता पहातो की, ती मंदिरातील धार्मिक गोष्टींव्यतिरिक्त गावांसाठी किंवा समाजासाठी काहीही करत नाहीत परंतु म्हसोबा हे गावपातळीवरील देवस्थान केवळ ताईंच्या दृष्टीकोनामुळे विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. देवस्थान पंचक्रोशीतील हुशार, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, काही आदिवासी कुटुंबाची शिक्षण- पालनपोषणाची जबाबदारी, रामकृष्ण मठ पुणे मार्फत एक्स रे व इतर आरोग्यसेवा पुरवणे, ग्रामस्थांसाठी नेत्रदान शिबीर इ. चे आयोजन केले जाते. रोटरी क्लब चतु:श्रृंगी कडून मिळालेली रूग्णवाहिका सेवा पुरवत आहे. क्षितिज संस्था पुणे मार्फत शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ग, संगणक प्रशिक्षण, वाचनालय, व्यायामशाळा इ. उपक्रम खारवडे भागातील शाळेसाठी वापरले जातात.
इतकेच नव्हे तर श्री. म्हसोबा देवस्थानच्या माध्यमातून मैत्र जीवांचे ही शैक्षणिक संस्था ताईंनी सुरू केली असून मुळशी तालुक्यातील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी ही संस्था कार्यरत आहे . ह्या संस्थेच्या ताई संस्थापक अध्यक्ष आहे. तसेच या गावात येणाऱ्या भक्तांसाठी पाण्याची टाकी, वाहनतळ, रस्ता इ., लग्न कमी खर्चाची व्हावीत यासाठी सामुदायिक विवाह गेली सुमारे १५ वर्षापासून सुरू आहेत. पर्यावरणीय दृष्टिकोनातून विचार करून देवस्थानचा विकास करत असताना दर्शनबारी, मंडप, सभामंडप, ध्यानमंडप, नक्षत्रबन, कृषी पर्यटन इ. वर भर देऊन विकासकामे ताईंनी सुरू केली आहेत.
ताईंनी आजवर केलेल्या अनेक धार्मिक, सामाजिक, पर्यावरण क्षेत्रातील कामांसाठी त्यांना कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट पुणे, आम्ही मुळशीकर प्रतिष्ठान, साईट एज्युकेशन ट्रस्ट पुणे, काव्यमित्र संघटना पिंपरी, राष्ट्रीय कला अकादमी पुणे, श्री जगदगुरू शंकराचार्य करवीरपीठ कोल्हापूर तर्फे समाजभूषण पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. ह्या सर्व प्रवासामध्ये पती मुकुंद भेलके, दोन्ही मुली, आई, बहिणी आणि संस्थेतील सर्व विश्वस्त सहकारी ह्यांच्या सहकार्यामुळे हे देवस्थानचे शिवधनुष्य पेलणे शक्य झाले आहे असे त्या नम्रपणे नमूद करतात व देवाकडे मागणे करतात-
सदा सर्वदा योग तुझा घडावा |
तुझे कारणी देह माझा पडावा |
उपेक्षु नको गुणवंता अनंता |
रघुनायका मागणे हेचि आतां |
ताई अतिशय हुशार, मुत्सद्दी, प्रामाणिक व विनम्रपणे वावरतात त्यामुळे त्यांची सरकार दरबारीसुध्दा काही कामे सोपी होतात.
गेली २५ वर्ष अथकपणे विविध क्षेत्रात धाडसी, प्रामाणिक व निर्भिडपणे कार्यरत राहून आपल्या गावातील देवस्थानचा विकास करून त्या माध्यमातून धार्मिक कामांसोबत शैक्षणिक, सामाजिक अशा विविध क्षेत्रात म्हसोबा देवस्थानासोबत खारवडे गावचे नाव जगाच्या नकाशावर जाईल यासाठी अथकपणे कार्यरत राहाणाऱ्या या आधुनिक दुर्गेला मानाचा मुजरा..!!
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
