January 21, 2026
Home » नांगरमुठीला हात घालण्यापूर्वी – पांडुरंग पाटील
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

नांगरमुठीला हात घालण्यापूर्वी – पांडुरंग पाटील

नांगरमुठीला हात घालण्यापूर्वी – पांडुरंग पाटील

प्रभा प्रकाशन कणकवलीचा ‘शालन कांबळे स्मृती माणगाव परिषद गौरव पुरस्कार’ पांडुरंग पाटील लिखित- दर्या प्रकाशन प्रकाशित ‘नांगरमुठी’ कादंबरीला जाहीर झाला. यानिमित्ताने या कादंबरीचे लेखक पांडुरंग पाटील यांनी व्यक्त केलेले हे मनोगत !…

कादंबरी लिहण्यापूर्वी मी कथेकडे वळलो. यासाठी काही गोष्टींचा उहापोह करावा लागेल.. घरचं वातावरण तसं पाहिलं तर कष्टकरी शेतकऱ्याचं आहे. वडील प्राथमिक शिक्षक होते. घरची दहा-बारा एकर जमीन होती. ती कसणारा भाऊ अचानक वारल्यामुळे शेतीसाठी वडिलांना नोकरी सोडावी लागली. ते पंढरीचे वारकरी होते. श्रावणात घरी पोथी लावली जाई. सत्तरच्या दशकात टि. व्ही. नव्हता. दिवसभर इरल्यावर पाऊस झेलत बाया चिखलात भात भांगलायच्या. थकलेल्या मनाला विरंगुळा आणि जमेल तेवढी श्रवणभक्ती घडावी म्हणून साऱ्या थरकाप उडवणाऱ्या भयकथा ऐकायला मिळत. त्याची खूप भीती वाटून मी सगळ्यांच्या मध्ये झोपी जाई.

ह्यातली फायद्याची गोष्ट म्हणजे कथा सांगणाऱ्याची खूबी, शब्दांची अचूक पेरणी, आवाजातील चढउतार माझ्या बालमनाला कुठेतरी स्पर्शत गेले. शालेय जीवनात पाठ्य पुस्तकातील शंकर पाटील, व्यंकटेश माडगुळकर, द. मा. मिरासदार यांचे पाठ तसेच शांता शेळके, इंदिरा संत, ग. दि. माडगुळकर, बालकवी, कुसुमाग्रज यांच्या कविता तोंडपाठ होवून गेल्या. पुढे कॉलेज जीवनात वाचनाचं वेड स्वस्थ बसू देत नव्हतं. त्या आवडीपोटी आम्ही तरुणांनी गावात एक वाचनालय काढलं. त्याला पुढे सरकारी अनुदान मिळू लागलं. बनगरवाडी, मृत्यूंजय, ययाती, फकिरा, श्यामची आई, तराळ अंतराळ, उपरा ह्या सारख्या अजरामर कलाकृती वाचायला मिळाल्या. आपणही असं लिहावं, असं वाटायला लागलं. सुरवातीला रानातल्या गोष्टी लिहिल्या. त्या ‘महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळा’कडून प्रकाशित झाल्या. त्याचवेळी गारगोटीहून राजन गवस सरांचे ‘मुराळी’ मासिक प्रसिध्द होवू लागले होते. ते आम्हा नवोदितांना हक्काचे व्यासपीठ बनले. त्यामध्ये मी कथा लिहू लागलो.

अशाच एका अंकात माझी ‘डंख’ नावाची कथा छापून आली आणि आप्पासाहेब खोत यांची ‘अनवाणी पाय’ ही कथा सुद्धा छापून आली. मला ती आवडली म्हणून सरांना फोन केला. कोण बोलत आहे, ते सांगितलं. तेव्हा ते म्हणाले ‘तुमची कथा खूप छान वाटली. शेवट खूपच परिणामकारक वाटला. पण एकूण ही कथा मला कादंबरीचा एखादा भाग आहे, अशी वाटली. त्यावेळेस मी जाणलं की आपण कादंबरीच्या जवळ कुठेतरी आलो आहोत. कादंबरी लिहावी म्हणून मी गंभीरपणे विचार करु लागलो. घाई गडबड करून संपवण्याचा तो विषय नव्हता. शेतकरी म्हणून मी माझ्या परीने जे जीवन जगत होतो, अनुभवत होतो तेवढ पुरेसं नव्हतं.

लेखकाला परकाया प्रवेश करावा लागतो. दुसऱ्याची सुखदुःखे जाणावी लागतात. अंतःकरणात करुणेचा झरा उमळून यावा लागतो. तसेच विचार मांडण्याची कलात्मक शैली त्याकरिता हवी. काळाच्या कसोटीला ते उतरायला हवे. तरच लेखकाच्या हातून एखादी अजरामर कलाकृती निर्माण होण्याची शक्यता असते. शेतकऱ्याला त्याचं स्वतःच जगणं नसतं. किडा-मुंगी, झाडझूडं, पशु-पक्षी ह्या सर्वांना घेऊन तो जगत असतो. भुकेजल्या जीवाला अन्न, तहानल्या जिवास पाणी देणं हा त्याचा धर्म ! ढोरं-गुरं नाहीत तो बावा बैरागी ! म्हणून तर पूर्वजानी गुरांची सांगड घालून दिलेली आहे ! असं नसतं तर बांधापेडावरचा शेतकऱ्याचा जागता धर्म उजाड झाला असता.

कोरोना महामारीत सगळ्या जगातील यंत्राची चाके बंद पडली होती. पण शेतकऱ्याच्या गाडीचे चाक थांबले नव्हते. शेतकऱ्याचे पीक ही त्याची मजबूरी असते. ते पीक शेतात ठेवून चालत नाही. मग तो व्यापारी वर्गाकडून वेठीला धरला जातो. राजकारणी त्याला अडवतात. सरकारी कर्मचारी त्याला हेलपाटे घालायला लावतात. पैसे उकळतात. शेतकरी, त्याची बायको, पोरं, जनावारं कुणालाच आजारी पडून चालत नाही. कारण दवा-पाण्यासाठी त्याच्या जवळ पैसा नसतो. हे विदारक सत्य खेड्यात आहे. मुलीचे लग्न, घर बांधणीसाठी तो कर्जात बुडून आत्महत्येपर्यंत घसरतो.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे कुणाचे पाप आहे ? शेतकऱ्याचा पिकाचा उत्पादन खर्च आणि मिळकत पहाता त्याच्या जमा-खर्चाच्या वहीची पाने अर्धवट लिहिलेली आहेत. कर्ज घेवूनच तो मरतो. असं असल तरी पिकावर त्याची माया असते. पोटच्या पोरागत तो पीक सांभाळतो. अंगावर धड वस्त्र नाही, पायात धड पायताण नाही. अशी कंगाल अवस्था असते त्याची. मानमरातब तर दूरच. हे सारं त्याचं जगणं लिहिता डोळ्यातून टिप पडून प्रसंगी मी थांबत होतो. आवेग ओसरला की पुन्हा लिहीत होतो. सात- आठ वर्षाच्या तपःश्चर्येच फळ म्हणजे ही कादंबरी ! जी मी कोरोना काळात लिहिली. राजन गवस यांनी दर्या प्रकाशनाकडून ती प्रकाशित केली. आसाराम लोमटे यांच्या सारख्या जाणकार लेखकाची पाठराखण ह्या कादंबरीला मिळाली. ह्या साऱ्या गोष्टींचा एकत्रित परिपाक म्हणजे अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार ह्या कादंबरीला मिळाले. माझ्यासारख्या बैलांचा नांगर हाकणाऱ्या शेतकऱ्याचा उचित सन्मान सर्वांनी केला. त्यासाठी मी सर्वांचा ऋणी आहे. धन्यवाद !

हंगामागणिक बदलणारे निसर्गाचे ऋतुचक्र, मातीचे उमाळे-उसासे आणि रानाचा आदिमगंध याचा जिवंत साक्षात्कार घडवणारी पांडुरंग पाटील यांची ही कादंबरी. विठ्ठलावर सारा भरवसा ठेवून कष्टणारी माणसं, इरल्यावर पाऊस झेलत रान भांगलणाऱ्या आयाबाया, या माणसांनी जीवाजतन मायेने सांभाळलेले जितराब आणि या सगळ्यांच्याच जगण्याला लाभलेला एक भूमिनिष्ठ तोल !

हरिपंताकडून औतेरावाकडे झिरपत आलेला वारकरी परंपरेचा वारसा हा औतेराव आणि साखरू या जोडप्याच्या जीवन संघर्षाच्या कहाणीचा चिवट असा धागा आहे. ही कहाणी त्या कुटुंबाची न राहता, पाहता पाहता समस्त कुळवाडींच्या आयुष्याचा नकाशा म्हणून आपल्यासमोर उभी राहते. इथल्या लोकजीवनाला लाभलेले बोलीभाषेचे अस्तर हे या कादंबरीचे बलस्थान आहे.

आशय आणि रूपबंधाच्याही दृष्टिकोनातून 'नांगरमुठी'ची पकड अद्वितीय आहे. वर्षानुवर्षे पडीक राहिलेल्या जमिनीत खोलवर नांगराचा फाळ घुसावा आणि त्याने कुंधा, हरळीला तळामुळातून उखडून टाकत मातीचे काळीज उघडे करावे तसा जोरकस परिणाम या कादंबरीने समर्थपणे साधला आहे.

☘️ आसाराम लोमटे
(साहित्य अकादेमी पुरस्कृत लेखक)

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

‘बोल अंतरीचे’ काव्यसंग्रहाचे १२ रोजी कणकवलीत प्रकाशन

अनुसया जाधव स्मृती पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन

कागदी फुल…

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading