पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,
निसर्ग आपल्या सर्वांची परीक्षा घेत आहे
शेतकऱ्यांच्या हितासाठी, राष्ट्राच्या हितासाठी सिंधु करार आम्हाला मान्य नाही.
संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेबाबत आम्ही मिशन म्हणून काम करत आहोत
महत्वपूर्ण खनिजांमध्ये देखील आत्मनिर्भर बनण्याच्या दिशेने वाटचाल
मिशन सुदर्शन चक्रासाठी काही प्राथमिक बाबीही निश्चित
दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेलं भाषण…
नवी दिल्ली, 15 ऑगस्ट 2025
माझ्या प्रिय देशवासियांनो,
स्वातंत्र्याचे हे महापर्व, 140 कोटी संकल्पाचे पर्व आहे. स्वातंत्र्याचे हे पर्व सामूहिक सिद्धींचे, गौरवाचे पर्व आहे. आणि हृदय अपेक्षांनी भरलेले आहे. देश एकतेच्या भावनेला सातत्याने बळकटी देत आहे. 140 कोटी देशवासीय आज तिरंग्याच्या रंगात रंगून गेले आहेत. हर घर तिरंगा… भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात, मग तो वाळवंटी भाग असो, किंवा हिमालयाची शिखरे असोत, सागर किनारे असोत, किंवा दाट लोकसंख्येचे भाग, प्रत्येक भागातून एकच आवाज घुमत आहे, एकच जयघोष आहे, आपल्या प्राणांपेक्षाही प्रिय मातृभूमीचे जयगान आहे …
माझ्या प्रिय देशवासियांनो,
1947 मध्ये अनंत संभावनांसह, कोटी कोटी बाहुंच्या सामर्थ्यासह, आपला देश स्वतंत्र झाला, देशाच्या आकांक्षा उड्डाण करत होत्या. पण आव्हाने त्यापेक्षाही कितीतरी जास्त होती. पूज्य बापूंच्या सिद्धांतांवर चालत संविधान सभेच्या सदस्यांनी, एका अतिशय महत्त्वपूर्ण दायित्वाचे पालन केले. भारताचे संविधान गेल्या 75 वर्षांपासून एक प्रकाशस्तंभ बनून आपल्याला मार्ग दाखवत राहिले आहे. भारताचे संविधान निर्माते, अनेकविध महापुरुष, डॉ. राजेंद्र प्रसाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जी, इतकेच नाही तर आपल्या नारीशक्तीचे देखील योगदान कमी नव्हते. हंसा मेहता जी, दाक्षायनी वेलायुधन यांच्यासारख्या विदुषींनी देखील भारताच्या संविधानाला सशक्त करण्यात आपली भूमिका बजावली आहे. आज लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून मी, देशाला मार्गदर्शन करणाऱ्या, देशाला दिशा दाखवणाऱ्या संविधानाच्या निर्मात्यांना आदराने नमन करत आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
आपण आज डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची 125 वी जयंती देखील साजरी करत आहोत. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी भारताच्या संविधानासाठी बलिदान देणारे देशाचे पहिले महापुरुष होते. संविधानासाठी बलिदान…. कलम 370 ची भिंत पाडून एक देश एक संविधान हा मंत्र आपण जेव्हा साकार केला त्यावेळी आपण खऱ्या अर्थाने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना श्रद्धांजली अर्पण केली. लाल किल्ल्यावर आज अनेक विशेष मान्यवर उपस्थित आहेत. दूरदूरच्या गावांच्या पंचायतींचे सदस्य आहेत. ड्रोन दीदींचे प्रतिनिधी आहेत. लखपती दीदींचे प्रतिनिधी आहेत. क्रीडा क्षेत्राशी संबंधित लोक आहेत. राष्ट्रजीवनात काही ना काही देणारे मान्यवर इथे उपस्थित आहेत. एका प्रकारे माझ्या डोळ्यासमोर या ठिकाणी मी लघु भारताचे दर्शन करत आहे. आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विशाल भारतासोबत देखील आज लाल किल्ला जोडला गेला आहे. मी स्वातंत्र्याच्या या महापर्वानिमित्त देशवासियांचे, जगभरात पसरलेल्या भारतप्रेमींचे, आपल्या मित्रांचे अंतःकरणापासून खूप खूप अभिनंदन करत आहे.
मित्रांनो,
निसर्ग आपल्या सर्वांची परीक्षा घेत आहे. गेल्या काही दिवसात नैसर्गिक आपत्ती, भूस्खलन, ढगफुटी अशा कित्येक आपत्तींना आपण तोंड देत आहोत. पीडितांसोबत आमच्या संवेदना आहेत. राज्य सरकारे आणि केंद्र सरकार एकत्रितपणे निवारणाची कामे, बचाव कार्ये, पुनर्वसन कार्यांमध्ये संपूर्ण ताकदीने गुंतलेली आहेत.
मित्रांनो,
आज 15 ऑगस्टचे आणखी एक विशेष महत्त्व देखील मला दिसत आहे. मला अतिशय अभिमान वाटत आहे की आज मला लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून ऑपरेशन सिंदूरच्या धाडसी वीरांना सॅल्यूट करण्याची संधी मिळाली आहे. आपल्या अतिशय धाडसी शूर सैनिकांनी शत्रूला त्यांच्या कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा दिली आहे. 22 एप्रिलला पहलगाममध्ये सीमेपलीकडून आलेल्या दहशतवाद्यांनी ज्या प्रकारचा नरसंहार केला, धर्म विचारून-विचारून लोकांची हत्या करण्यात आली. पत्नीच्या पुढ्यात पतीवर गोळ्या झाडल्या. मुलांच्या पुढ्यात त्यांच्या वडिलांना ठार केले. संपूर्ण भारत आक्रोशाने भरून गेला होता. संपूर्ण जग देखील अशा प्रकारच्या संहाराने चकित झाले होते.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
ऑपरेशन सिंदूर, याच आक्रोशाचा प्रतिसाद होते. 22 तारखेनंतर आम्ही आमच्या सैन्याला संपूर्ण मोकळीक दिली. डावपेच ते ठरवतील. लक्ष्य ते निर्धारित करतील, वेळ देखील त्यांनीच निवडावी आणि आपल्या सैन्याने ते करून दाखवले जे कित्येक दशकांपर्यंत कधीही घडले नव्हते. शत्रूच्या भूमीवर शेकडो किलोमीटर आतमध्ये घुसून दहशतवाद्यांची मुख्यालये पूर्णपणे उद्ध्वस्त केली. दहशतवाद्यांच्या इमारतींना भग्नावशेष बनवले. पाकिस्तानची झोप अजूनही उडालेली आहे. पाकिस्तानमध्ये झालेला विध्वंस इतका प्रचंड होता की रोज नवनवे खुलासे होत आहेत, नवी- नवी माहिती समोर येत आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
आपला देश कित्येक दशके दहशतवादाच्या समस्येला तोंड देत राहिलेला आहे. देशाच्या हृदयाची चाळण केली आहे. मात्र, आता आम्ही एक नवा मापदंड प्रस्थापित केला आहे. दहशतवाद आणि दहशतवाद्यांना पोसणाऱ्यांना आणि दहशतवाद्यांना बळ देणाऱ्यांना आता आम्ही वेगवेगळे समजणार नाही. ते मानवतेचे एकसमान शत्रू आहेत. त्यांच्यात कोणताही फरक नाही. आता भारताने हा निर्धार केला आहे की अणु हल्ल्याच्या धमक्यांना आता आम्ही सहन करणार नाही. अनेक काळापासून न्यूक्लिअर ब्लॅकमेल सुरू राहिले होते. आता ब्लॅकमेल सहन केले जाणार नाही. यापुढे देखील शत्रूने हे प्रयत्न सुरू ठेवले तर आमचे सैन्य हे निश्चित करेल, सैन्याच्या अटींवर, सैन्यदले जी वेळ निर्धारित करतील त्या वेळी, सैन्यदल जे डावपेच निश्चित करेल, त्या डावपेचांनी, सैन्यदल जे लक्ष्य निर्धारित करेल, ते लक्ष्य आम्ही सिद्ध करूनच दाखवू. आम्ही तोडीस तोड उत्तर देऊ,
माझ्या प्रिय देशवासियांनो,
भारताने आता हे ठामपणे ठरवले आहे की रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही. आता देशवासियांना चांगल्या प्रकारे कळून चुकले आहे की सिंधू करार किती अन्यायकारक आहे, किती एकतर्फी आहे. भारतात उगम पावणाऱ्या नद्यांचे पाणी शत्रूच्या शेतांचे सिंचन करत आहे. आणि माझ्या देशाचे शेतकरी, माझ्या देशाची भूमी पाण्याविना तहानलेली आहे. हा कोणत्या प्रकारचा करार होता, ज्याने गेली सात दशके माझ्या देशाच्या शेतकऱ्यांची अकल्पनीय हानी केली आहे. भारताच्या स्वतःच्या वाट्याचे जे पाणी आहे त्यावर जो अधिकार आहे, तो फक्त आणि फक्त भारताचा आहे, भारताच्या शेतकऱ्यांचा आहे. भारत कदापि सिंधू कराराला ज्या स्वरुपात अनेक दशकापर्यन्त सहन करत आला आहे, त्या स्वरुपात आता सहन केला जाणार नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी, राष्ट्राच्या हितासाठी हा करार आम्हाला मान्य नाही.
माझ्या प्रिय देश बांधवानो,
स्वातंत्र्यासाठी अगणित लोकांनी बलिदान दिले. आपला तारुण्याचा काळ यासाठी खर्ची घातला, तुरुंगात जीवन घालवले, फाशीच्या तख्तावर चढले, काही घेण्यासाठी, काही बनण्यासाठी नव्हे तर भारत मातेच्या स्वाभिमानासाठी. कोट्यवधी जनतेच्या स्वातंत्र्यासाठी, गुलामीच्या बेड्या तोडण्यासाठी, मनात केवळ एकच भावना होती, स्वाभिमान !
मित्रहो, गुलामीने, आपल्याला गरीब निर्धन केले. गुलामीने आपल्याला निर्भर म्हणजेच दुसऱ्यांवर अवलंबून राहणारे बनवले, दुसऱ्यांवर आपले अवलंबित्व वाढत चालले. आपण सर्वजण जाणतोच की स्वातंत्र्यानंतर कोट्यवधी लोकांसाठी अन्नधान्य पुरवठा हे मोठेच आव्हान होते. माझ्या देशाचे हेच शेतकरी आहेत ज्यांनी अपार कष्ट करून निढळाच्या घामाने, देशाची धान्याची कोठारे भरली, अन्नधान्याच्या बाबतीत देशाला आत्मनिर्भर केले. एका राष्ट्रासाठी आत्मसन्मानाचा सर्वात मोठा निकष म्हणजे आजही त्याची आत्मनिर्भरता आहे.
आणि माझ्या प्रिय देशवासियांनो,
विकसित भारताचा पायाही आहे आत्मनिर्भर भारत. जो दुसऱ्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहतो,त्याच्या स्वातंत्र्यावर तितकेच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होते, आणि दुर्भाग्य तिथेच सुरु होते जेव्हा तुम्हाला दुसऱ्यावर अवलंबून राहायची सवय लागते. लक्षातही येत नाही की आपण आत्मनिर्भरता केव्हा गमावून बसलो आहोत आणि केव्हा कोणावर अवलंबून राहू लागलो आहोत. ही सवय म्हणजे एक प्रकारचा धोकाच आहे, आणि म्हणूनच क्षणोक्षणी जागरूक राहावे लागते, आत्मनिर्भर राहण्यासाठी. आणि माझ्या प्रिय देशवासियांनो, आत्मनिर्भरतेचे नाते केवळ आयात आणि निर्यात, रुपये, पैसे, पाउंड, डॉलर्स इतकेच मर्यादित नाही. त्याचा अर्थ इतका मर्यादित नाही. आत्मनिर्भरतेचा संबंध आपल्या सामर्थ्याशी जोडलेला आहे. आणि जेव्हा आत्मनिर्भरता नष्ट होऊ लागते तेव्हा सामर्थ्यही सातत्याने क्षीण होऊ लागते. म्हणूनच आपले सामर्थ्य कायम राखण्यासाठी, आणि ते वृद्धिंगत करण्यासाठी आत्मनिर्भर होणे अत्यावश्यक आहे.
मित्रहो, आपण ऑपरेशन सिंदूर मध्ये मेड इन इंडियाचे सामर्थ्य काय आहे हे पाहिले आहे. कोणती शस्त्रास्त्र आहेत, कोणते सामर्थ्य आहे जे त्यांना क्षणभरात नष्ट करत आहे, हे शत्रूला कळलेही नाही. विचार करा जर आपण आत्मनिर्भर नसतो तर ऑपरेशन सिंदूर आपण या वेगाने करू शकलो असतो का ? माहित नाही कोण पुरवठा करेल की करणार नाही, सामग्री मिळेल की नाही मिळणार याचीच चिंता पडली असती, मात्र मेड इन इंडियाचे सामर्थ्य आपल्या मनगटात होते, आपल्या सैन्यदलांच्या हाती होती म्हणूनच कोणतीही चिंता न करता, कोणताही अडथळा न येता, जराही न कचरता आपली सैन्यदले पराक्रम गाजवत राहिली. आणि गेली दहा वर्षे सातत्याने आपण संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेबाबत आम्ही मिशन म्हणून काम करत आहोत. त्याचे परिणाम आज आपल्याला पाहायला मिळत आहेत.
मित्रहो,
मी आणखी एका क्षेत्राकडे आपले लक्ष वेधू इच्छितो ही बाब कोणी नाकारू शकत नाही की 21 वे शतक तंत्रज्ञान जीवन शतक आहे. आणि जेव्हा तंत्रज्ञान हे जीवन आहे तेव्हा इतिहासाकडे एक नजर टाकली तर इतिहास साक्षी आहे की ज्या-ज्या देशांनी तंत्रज्ञानात प्रगती साध्य केली ते-ते देश आज विकासाच्या शिखरावर पोहोचले आहेत. आर्थिक सामर्थ्य नव्या मापदंडावर पोहोचले आहे. आपण जेव्हा तंत्रज्ञानाच्या वेगवेगळ्या पैलूंबाबत बोलतो, तेव्हा उदाहरण म्हणून मी आपले लक्ष सेमी कंडक्टरकडे वेधू इच्छितो. मी इथे लाल किल्यावरुन कोणावरही, कोणत्याही सरकारवर टीका करण्यासाठी इथे उभा नाही आणि मी ते करूही इच्छित नाही. मात्र देशाच्या युवा पिढीला याबाबत माहिती असणे आवश्यक आहे. आपल्या देशात पन्नास – साठ वर्षांपूर्वी सेमी कंडक्टर संदर्भात फाईली सुरु झाल्या, पन्नास – साठ वर्षांपूर्वी कारखान्याचा विचार सुरु झाला. माझ्या युवकांनो आपणाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की आज सेमी कंडक्टर जो अवघ्या जगाचे सामर्थ्य बनला आहे, पन्नास – साठ वर्षांपूर्वी ते विचार, त्या फायली अडकून पडल्या, खोळंबून पडल्या. सेमी कंडक्टरच्या विचाराचीच भ्रूणहत्या झाली. पन्नास – साठ वर्षे घालवली. आपल्यानंतर अनेक देशांनी सेमी कंडक्टरच्या बाबतीत आज जगामध्ये आपले सामर्थ्य प्रस्थापित केले.
मित्रहो,
या ओझ्यातून मुक्त होत आज आपण मिशन मोड वर सेमी कंडक्टरच्या संदर्भातले काम पुढे नेत आहोत. सेमी कंडक्टरची सहा वेगवेगळी युनिट्स साकारण्यात येत आहेत. चार नव्या युनिट्सना आम्ही आधीच हिरवा झेंडा दाखवला आहे. देशवासियांनो, आणि विशेषकरून माझ्या युवकानो, आणि जगभरात भारताच्या तंत्रज्ञानाचे सामर्थ्य जाणणाऱ्या लोकांना मी सांगू इच्छितो, या वर्षीच्या अखेरीला मेड इन इंडिया, भारताने तयार केलेली, भारतात तयार झालेली, भारतातल्या लोकांनी बनवलेली मेड इन इंडिया चीप बाजारात येईल. मी दुसरे उदाहरण देऊ इच्छितो. उर्जा क्षेत्रात आपण सर्वजण जाणताच की उर्जेसाठी आपण अनेक देशांवर अवलंबून आहोत. पेट्रोल असो, डीझेल असो, गॅस असो, लाखो-करोडो रुपये खर्च करून आपल्याला ते आणावे लागते. आपल्याला या संकटापासून देशाला आत्मनिर्भर करायचे आहे. उर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता अतिशय आवश्यक आहे. आम्ही प्रण केला आहे आणि आज अकरा वर्षात सौर उर्जा तीस पट वाढली आहे. आपण नव-नवी धरणे बांधत आहोत जेणेकरून जलविद्युत उर्जेचा विस्तार व्हावा आणि आपल्याला स्वच्छ उर्जा प्राप्त व्हावी. भारत मिशन हरित हायड्रोजन वर आज हजारो- कोटी रुपये खर्च करत आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
रिफॉर्म (सुधारणा) ही सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. काळानुरूप परिस्थितीनुसार सुधारणा करत राहाव्या लागतात. अणू उर्जा क्षेत्रात आम्ही फार मोठ्या सुधारणा घेऊन आलो आहोत. आता आम्ही खाजगी क्षेत्रासाठीही अणू उर्जेची द्वारे खुली केली आहेत. आम्ही शक्ती वृद्धिंगत करू इच्छितो.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
जग आज हवामान बदलाबाबत चिंता करत आहे, तेव्हा मी जगाला सांगू इच्छितो, की भारताने निश्चय केला होता की आम्ही 2030 पर्यंत भारतात स्वच्छ उर्जा पन्नास टक्यापर्यंत नेऊ, आमचे उद्दिष्ट 2030 पर्यंत होते, माझ्या देशवासियांचे सामर्थ्य पहा, माझ्या देशवासियांची संकल्पशक्ती पहा, विकसित भारत घडविण्याचा संकल्प साकारण्यासाठीचे माझ्या देशवासियांचे प्रयत्न पहा, आम्ही जे लक्ष्य 2030 साठी निश्चित केले होते, ते 50 टक्यापर्यंत स्वच्छ उर्जेचे लक्ष्य 2025 मध्ये आम्ही साध्य केले. पाच वर्षे आधीच आम्ही ते साध्य केले. कारण जगाप्रतीही आम्ही तितकेच संवेदनशील आहोत. निसर्गाप्रतीही तितकेच दायित्व निभावणारे आहोत.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
अर्थसंकल्पाचा मोठा भाग पेट्रोल, डीझेल, गॅस हे सर्व आणण्यासाठी खर्च होतो. लाखो-कोटी रुपये खर्च होत असत, आपण जर उर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर असतो तर तो पैसा माझ्या देशाच्या युवकांच्या भविष्यासाठी उपयोगी पडला असता, तो पैसा माझ्या देशाच्या गरिबांसाठी, गरिबीविरोधात लढण्यासाठी उपयोगी पडला असता, तो पैसा माझ्या देशाच्या शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी उपयोगी पडला असता, तो पैसा माझ्या देशाच्या गावांमधली परिस्थिती बदलण्यासाठी कामी आला असता. मात्र आपल्याला तो पैसा परदेशामध्ये द्यावा लागे. आता आपण आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने काम करत आहोत. देशाला विकसित करण्यासाठी आता आम्ही समुद्र मंथनाच्या दिशेनेही जात आहोत. आमच्या समुद्राच्या मंथनाला पुढे नेत आम्ही समुद्रात असलेले तेल भांडार – गॅस भांडार शोधण्याच्या दिशेने मिशन मोड वर काम करू इच्छितो आणि म्हणूनच भारत ‘नॅशनल डीप वॉटर एक्सप्लोरेशन मिशन’ सुरु करणार आहे. उर्जेच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्यासाठी आमची ही महत्वाची घोषणा आहे. आणि आपण महत्वपूर्ण खनिजांमध्ये देखील आत्मनिर्भर बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
अंतराळ क्षेत्राची कमाल तर माझे प्रत्येक देशवासीय पाहत आहेत. त्यांचा ऊर अभिमानाने भरून गेला आहे.आपले ग्रुप कॅप्टन सुधांशु शुक्ल अंतराळस्थानकावरून परत आले आहेत. येत्या काही दिवसात ते भारतात देखील परत येत आहेत. आपण अंतराळ क्षेत्रात देखील आपल्या जोरावर आत्मनिर्भर भारत गगनयानची तयारी करत आहोत. आपण आपल्या सामर्थ्याने आपले अंतराळस्थानक बनवण्याच्या दिशेने काम करत आहोत. गेल्या काही दिवसांमध्ये अंतराळ क्षेत्रात ज्या सुधारणा केल्या आहेत , मला खूप अभिमान वाटतो माझ्या देशातील ३०० हून अधिक स्टार्टअप्स केवळ अन केवळ अंतराळ क्षेत्रात काम करत आहेत. आणि त्या ३०० स्टार्टअप्समध्ये हजारो युवक पूर्ण सामर्थ्यानिशी जोडले आहेत. ही आहे माझ्या देशवासीयांची ताकद आणि हा आहे माझ्या देशाचा युवकांप्रती विश्वास.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
१४० कोटी भारतवासी २०४७ मध्ये जेव्हा स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होतील , विकसित भारताच्या संकल्पाच्या परिपूर्तीसाठी पूर्ण ताकदीने सहभागी झाले आहेत. या संकल्पाच्या पूर्ततेसाठी आज भारत प्रत्येक क्षेत्रात आधुनिक परिसंस्था निर्माण करत आहे. आणि आधुनिक परिसंस्था आपल्याला प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भर बनवेल. आज लाल किल्ल्याच्या तटबंदीवरुन मी देशातील युवा वैज्ञानिक, माझे प्रतिभावान युवक, अभियंते, आणि व्यावसायिक तसेच सरकारच्या प्रत्येक विभागाला आवाहन करतो की आज आपले स्वतःचे मेड इन इंडिया लढाऊ विमानासाठी जेट इंजिन असायला हवे. आपण औषधनिर्माण क्षेत्रात मोठे मानले जात आहोत, लसींच्या निर्मितीत नवनवे विक्रम स्थापित करत आहोत. आपण संशोधन आणि विकासावर आणखी भर द्यायला हवा, आपली पेटंट असावीत , आपली स्वतःची, मानवजातीसाठी तयार केलेली, स्वस्तातील स्वस्त आणि सर्वात प्रभावी. नवीन औषधांचा शोध लावला जावा, प्रत्येक संकटात कुठल्याही प्रतिकूल परिणामाशिवाय मानवजातीच्या कल्याणासाठी उपयोगी पडावे असे धोरण सरकारने बनवले आहे. मी देशातील युवकांना आवाहन करतो , या, धोरणाचा अवलम्ब करत पावले उचला, देशाचे भाग्य बदलायचे आहे. तुमचे सहकार्य हवे
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
आज माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे, डेटाची ताकद आहे , काळाची गरज नाही का, सायबर सुरक्षा पर्यंतच्या सर्व गोष्टी , टिक टॅक पासून आर्टिफिशिअल इंटेलिजन्स पर्यंत सर्व गोष्टी आपल्या हव्यात. त्यात आपल्या लोकांचे सामर्थ्य हवे. त्यांच्या सामर्थ्यशक्तीचा जगाला परिचय करून द्यायला हवा.
मित्रानो, आज जगात सोशल मीडिया आणि इतर प्लॅटफॉर्मवर आपण काम करत आहोत. जगाला आपण दाखवला आहे आपला युपीआय प्लॅटफॉर्म , जगाला आश्चर्य वाटत आहे, आपल्यात सामर्थ्य आहे, वास्तविक वेळेत व्यवहार यामध्ये ५० % व्यवहार एकटा भारत युपीआयद्वारे करत आहे. याचा अर्थ आपल्यात ताकद आहे, सोशल मीडिया असेल, जितके प्लॅटफॉर्म आहेत, मी देशातील युवकांना आव्हान देतो कि आपला स्वतःचा प्लॅटफॉर्म का असू नये ? आपण इतरांवर का अवलंबुन राहायचे. भारताचे धन बाहेर जाता कामा नये , माझा तुमच्या सामर्थ्यावर विश्वास आहे.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
जसे ऊर्जा क्षेत्रात आपण परावलंबी आहोत. हे देशाचे दुर्भाग्य आहे , खतांच्या बाबतीतही आपल्याला इतरांवर अवलंबुन राहावे लागते. माझे देशातले शेतकरी देखील खतांचा योग्य वापर करून धरतीमातेची सेवा करू शकतात. गैरवापरामुळे धरतीमातेचे देखील मोठे नुकसान होते . मात्र त्याचबरोबर देशातल्या युवकांना , उद्योग जगताला , खासगी क्षेत्राला सांगू इच्छितो की, या, आपण खताची भांडारे भरुया. आपण नवनवीन पद्धती शोधू आणि भारताच्या आवश्यकतेनुसार आपले खत तयार करूया. इतरांवर अवलंबुन राहायचे नाही.
मित्रानो आगामी युग ईव्हीचे आहे. ईव्ही बॅटरी आपण बनवू शकत नाही का? का? अवलंबून राहायचे, सोलर पॅनल असेल, इलेक्ट्रिक वाहनांसाठी ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या आपल्या असायला हव्यात. मी हे यासाठी म्हणायची हिंमत करतो, कारण मला देशातील युवकांच्या सामर्थ्यावर विश्वास आहे. ते माझ्या देशातले युवक आहेत म्हणून नाही तर कोविड काळात अनेक बाबतीत आपण इतरांवर निर्भर होतो. तेव्हा देशातील युवकांना आवाहन करण्यात आले कि आपली लस असायला हवी. देशाने करून दाखवले. कोविड प्लॅटफॉर्म आपला स्वतःचा असायला हवा. देशाने करून दाखवले. कोट्यवधी लोकांचे जीवन वाचवण्याचे काम आपण केले आहे. तीच जिद्द, तीच भावना, आपल्याला जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्यासाठी आपले सर्वस्व द्यायचे आहे, आपले सर्वोत्तम जे आहे ते द्यायचे आहे.
मित्रहो, मागील ११ वर्षांमध्ये उद्यमशीलता मोठी ताकद बनली आहे. आज लाखो स्टार्टअप्स दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीच्या शहरांमध्ये देशाच्या अर्थगाड्याला , देशाच्या नवोन्मेषाला बळ देत आहेत. त्याचप्रमाणे मुद्रा योजनेद्वारे देशातील कोट्यवधी युवक, त्यातही आपल्या मुली-महिला कोट्यवधी लोक मुद्रा योजने मधून कर्ज घेऊन स्वतःचा उद्योग करत आहेत. स्वतःच्या पायावर उभे राहिले आहेत आणि इतरांनाही स्वतःच्या पायावर उभे राहायची ताकद देत आहेत. ते देखील एक प्रकारे प्रत्येक व्यक्तीला आत्मनिर्भर बनण्याची ताकद देत आहेत.
माझ्या सहकार्यानो,
महिला बचत गटाकडे कुणाचेही लक्ष नव्हते. गेल्या १० वर्षांमध्ये महिला बचत गटांनी कमाल करून दाखवली आहे. आज त्यांची उत्पादने जगभरातील बाजारात उपलब्ध आहेत. लाखो कोटींचा कारभार आपले महिला बचत गट करत आहेत. मी असेच ‘मन की बात’ मध्ये एकदा खेळण्यांचा विषय काढला होता. आपण कोट्यवधींची खेळणी परदेशातून आणत होतो. मी असेच ‘मन की बात’ मध्ये म्हटले माझ्या युवकांनो, असे करू शकत नाही का , खेळणी बाहेर जातील, आणि आज मी अभिमानाने सांगतो कि माझा देश खेळणी निर्यात करू लागला आहे. म्हणजे देशाच्या सामर्थ्याला हरप्रकारे संधी मिळावी. अडचणींपासून मुक्ती मिळावी, त्याला सर्वोत्तम करण्यासाठी प्रेरित करणे, हे देश करू शकतो. मी युवकांना आवाहन करतो , तुम्ही अभिनव कल्पना घेऊन या. तुमच्या कल्पना मारून टाकू नका. तुमच्या कल्पना नव्या पिढीचे भविष्य घडवू शकतात. मी तुमच्याबरोबर आहे, मी तुमच्याबरोबर काम करायला तयार आहे. तुमचा मित्र बनून काम करायला तयार आहे, तुम्ही या , हिंमतीने पुढे या . जेव्हा आपण निर्मितीबद्दल विचार करतो, या पुढे या. सरकारच्या नियमांमध्ये बदल करायचे असतील तर मला सांगा , आता देशाला थांबायचे नाही, २०४७ दूर नाही.
मित्रानो, ही पुढे जाण्याची संधी आहे. मोठी स्वप्ने पाहण्याची संधी आहे, संकल्पासाठी समर्पित होण्याची वेळ आहे. सरकार तुमच्यासोबत आहे. मी तुमच्यासोबत आहे. आता आपण नवीन इतिहास घडवू शकतो. मित्रानो, आज राष्ट्रीय उत्पादन मिशनवर वेगाने काम होत आहे, आपले एमएसएमई, ज्यांचा दबदबा जगाने अनुभवला आहे, जगात ज्या मोठमोठ्या गोष्टी बनतात, त्यासाठी सुटे भाग, आपल्या एमएसएमई कडून जातात. अभिमानाची बाब आहे, कारण आपल्याला व्यापक एकात्मिक मार्गावर जायचे आहे. त्यामुळे त्यांची ताकद वाढायला हवी. मी याआधीही लाल किल्ल्यावरून म्हटले होते शून्य दोष शून्य परिणाम. आज मी सांगू इच्छितो आपल्याला आपले सामर्थ्य दाखवून द्यायचे असेल तर गुणवत्तेत निरंतर नवी उंची गाठावी लागेल, जगाला गुणवत्ता हवी आहे. आपली गुणवत्ता अधिक असायला हवी, आणि सरकारचेही प्रयत्न हवेत, कच्चा माल उपलब्ध व्हावा,आपला उत्पादन खर्च कमी असावा, याकडे लक्ष द्यायचे आहे. आपण सर्व जे उत्पादन क्षेत्राशी संबंधित आहोत, त्यांच्यासाठी मंत्र असायला हवा. दाम कमी दम अधिक. आपल्या प्रत्येक उत्पादनात दम अधिक असेल मात्र किंमत कमी असेल. ही भावना घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे.
माझ्या देशबांधवांनो,
स्वातंत्र्यासाठी अगणित लोकांनी बलिदान दिले. मी आधीही सांगितले, आपले तारुण्य झोकून दिले, फाशीवर लटकले. का? स्वतंत्र भारतासाठी . ७५-१०० वर्षांपूर्वीचा तो काळ आठवून पहा, संपूर्ण देश स्वतंत्र भारताचा मंत्र घेऊन जगत होता. आज काळाची गरज आहे, स्वतंत्र भारताचा मंत्र घेऊन जगणाऱ्या भारतीयांनी आपल्याला स्वतंत्र भारत दिला. आज १४० कोटी देशवासियांचा एकच मंत्र असायला हवा, समृद्ध भारत. जर कोटी-कोटी लोकांच्या बलिदानातून स्वतंत्र भारत होऊ शकतो तर कोटीकोटी लोकांच्या संकल्पातून, पुरुषार्थातून आत्मनिर्भर बनण्यातून , व्होकल फॉर लोकल बनण्यातून , स्वदेशीचा मंत्र जपण्याने, समृद्ध भारत देखील बनू शकतो, ती पिढी स्वतंत्र भारतासाठी झटली, या पिढीने समृद्ध भारतासाठी नवीन पावले उचलावीत, हीच काळाची गरज आहे. म्हणूनच आज मी पुन्हा पुन्हा आवाहन करतो, मी देशातील सर्व इन्फ्लुएन्सरना सांगतो कि हा मंत्र पुढे नेण्यासाठी , माझी मदत करा, मी सर्व राजकीय पक्षांना राजकीय नेत्यांना आवाहन करतो , हा कुठल्याही राजकीय पक्षाचा अजेंडा नाही, भारत आपल्या सर्वांचा आहे, आपण सर्व मिळून व्होकल फॉर लोकल हा मंत्र, प्रत्येक नागरिकच्या जीवनाचा मंत्र बनवूया, भारतात
मी सगळ्या राजकीय पक्षांना, सगळ्यांना सांगू इच्छितो की या, ही एखाद्या राजकीय पक्षाची कार्यक्रमपत्रिका नव्हे, तर हा आपल्या सर्वांचा कार्यक्रम आहे की, आपण एकत्र येऊन, ‘व्होकल फॉर लोकल’च्या गुरुमंत्राला, प्रत्येक नागरिकाच्या जीवनाचा मंत्र बनवूया. भारतात निर्मित, भारतातील नागरिकांनी घाम गळून तयार केलेली ती उत्पादने, ज्यांच्यात भारताच्या मातीचा सुगंध असेल आणि ज्या, भारताच्या आत्मनिर्भरतेच्या निर्धाराला बळ देतील अशाच वस्तू आपण खरेदी करुया. अशाच वस्तूंचा वापर करण्यासाठी आपण पुढाकार घेऊया, असा सामुहिक निर्धार असला पाहिजे. बघता बघता आपण जगात परिवर्तन घडवून आणू.
मित्रांनो.
मी आज प्रत्येक लहानमोठ्या व्यापाऱ्याला, दुकानदाराला आग्रह करतो, की तुमची पण ही जबाबदारी आहे. आपण जेव्हा लहान होतो, तेव्हा आपण कधी बाजारात ‘शुद्ध तुपाचे दुकान’ अशा नावाची पाटी बघितली होती का? त्यावेळी एवढेच लिहिलेले असायचे की ‘तुपाचे दुकान.’ मात्र कालपरत्वे लोक लिहू लागले.. ‘शुद्ध तुपाचे दुकान’ माझी अशी इच्छा आहे की देशात असे दुकानदार निर्माण व्हावेत, असे व्यापारी पुढे यावेत जे त्यांच्या दुकानांवर ‘येथे स्वदेशी उत्पादने मिळतात’ अशी पाटी लावतील. आपण स्वदेशीचा अभिमान बाळगू लागलो आहोत. आपण स्वदेशीचा नाईलाजाने नव्हे तर ठामपणे वापर करु, देशाचे बळकटीकरण करण्यासाठी स्वदेशीचा वापर करू. आणि गरज भासली तर इतरांवर सक्ती करण्यासाठी देखील याचा वापर करू. असे आपले सामर्थ्य असायला हवे, हाच आपला गुरुमंत्र असला पाहिजे.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
मला दीर्घकाळापासून सरकारमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. मी अनेक चढ-उतार पाहिले आहेत. सरकारांसमोर असलेल्या अडचणी देखील मला माहित आहेत. शासन प्रणालींच्या मर्यादा देखील मला ठाऊक आहेत. मात्र, असे असले तरीही, आपली ही जबाबदारी आहे की, आपण इतर कोणाचीही रेघ लहान करण्याचा प्रयत्न करण्यात आपली शक्ती वाया घालवणार नाही आहोत. मी हे प्रदीर्घ अनुभवातून सांगतो आहे की, दुसऱ्या कोणाची रेघ लहान करण्यासाठी आपल्याला आपली उर्जा फुकट घालवायची नाही. आपल्याला, संपूर्ण ताकदीसह आपली स्वतःची रेघ अधिक लांब करायची आहे. आपण जर आपली स्वतःची रेघ अधिक मोठी करू शकत असलो, तर जगही आपले मोठेपण मान्य करेल. आज, जेव्हा जागतिक वातावरणात, आर्थिक स्वार्थ दिवसेंदिवस वाढत चालला आहे, तेव्हा काळाची ही गरज आहे की, आपण त्या संकटांना घाबरून रडत बसण्याची गरज नाही. अत्यंत हिम्मतीने आपण आपली रेघ अधिक लांब करूया. आणि मी सरकारमधील माझ्या 25 वर्षांच्या अनुभवांतून असे सांगतो की, जर आपण हा मार्ग स्वीकारला, आपल्यापैकी प्रत्येकाने हा रस्ता चोखाळला तर, कोणताही स्वार्थ आपल्याला कचाट्यात पकडू शकणार नाही.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
गत दशक हे सुधारणा, कामगिरी आणि परिवर्तनाचे होते. मात्र आता आपल्याला आणखी मोठे सामर्थ्य अंगीकारायचे आहे. गेल्या काही काळात आपण अनेक सुधारणा केल्या.थेट परदेशी गुंतवणूक असो, विमा कंपन्यांचा विषय असो, जागतिक विद्यापीठांना भारतात स्थान देणे असो, अशा अनेक सुधारणा आपण केल्या. चाळीस हजारांहून अधिक अनावश्यक नियम आम्ही रद्द केले आहेत. इतकेच नव्हे तर पूर्वीपासूनचे पंधराशेपेक्षा जास्त कायदे, जे अगदी बऱ्याच काळापासून लागू होत आले होते, ते सगळे आम्ही रद्द केले. आम्ही डझनावारी कायद्यांमध्ये सरलता आणण्यासाठी, त्यांचा विषय संसदेत उपस्थित करून त्यांच्यामध्ये, जनतेच्या हिताला सर्वाधिक प्राधान्य देऊन, बदल घडवून आणले आहेत. यावेळी देखील गडबड गोंधळात लोकांपर्यंत हा मुद्दा पोहोचला नसेल कदाचित, पण यावेळी आयकर कायद्यात एक अत्यंत महत्त्वाची सुधारणा करण्यात आली आहे. सुमारे 280 हून कलमे रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आणि मित्रांनो, केवळ आर्थिक आघाडीवर या सुधारणा होतायत असे नव्हे. आम्ही नागरिकांचे जीवन सुलभ करण्याच्या दृष्टीने सुधारणा केल्या आहेत. आयकर परतावा असो की सुधारणांचा परिणाम झाला आहे, संरचनात्मक बाबी असोत, तेथेही सुधारण
आणि माझ्या प्रिय देशवासियांनो,
भविष्यकालीन पिढीसाठीच्या सुधारणांसाठी, आम्ही एक कृतिदल स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. हे कृतिदल निर्धारित कालमर्यादेत हे काम पूर्ण करेल . सद्यकालीन कायदे, नियम, धोरणे, पद्धती 21 व्या शतकाला अनुकूल, जागतिक वातावरणाला अनुकूल ठरतील अशा पद्धतीने बदलून भारताला 2047 मध्ये विकसित राष्ट्र बनवण्याच्या संदर्भात नव्या रीतीने सज्ज करण्याचे काम विहित काळात पूर्ण करण्यासाठी या कृतिदलाची रचना करण्यात आली आहे.
मित्रांनो,
जे नवे नागरिक स्वतःचे भविष्य घडवू इच्छितात त्यांना देखील या सुधारणांमुळे अधिक पाठबळ मिळेल. आपले स्टार्ट अप्स असो, आपले लघुउद्योग असो, आपले कुटिरोद्योग असो, हे चालवणाऱ्या उद्योजकांचा नियमांच्या पूर्ततेसाठी होणारा खर्च कमी होईल. आणि त्यामुळे त्यांना एक नवी ताकद मिळेल. वाहतुकीच्या क्षेत्रात त्यांना लॉजिस्टिक्स विषयक पाठबळ मिळाल्यामुळे, यंत्रणांमधील बदलांमुळे, त्यांना एक फार मोठे सामर्थ्य प्राप्त होईल. आपल्या देशात कशा- कशा प्रकारचे कायदे आहेत, अगदी लहानसहान बाबींसाठी तुरुंगात डांबून ठेवणारे कायदे आहेत. हे समजल्यावर तुम्ही हैराण व्हाल, अजून कोणाचे तिकडे लक्ष गेलेले नाही. माझ्या देशाच्या नागरिकांना तुरुंगात डांबणारे जे लहानमोठे अनावश्यक कायदे आहेत ते रद्द व्हावेत या दृष्टीने मी प्रयत्न करत आहे. आम्ही यापूर्वी देखील संसदेत यासाठीचे विधेयक मांडले होते आणि यावेळी देखील ते मांडत आहोत.
मित्रांनो,
या दिवाळीत, तुमच्या दिवाळीचा आनंद द्विगुणीत होईल असे काहीतरी मी करणार आहे. या दिवाळीत तुम्हांला, सर्व देशवासियांना एक फार मोठा उपहार मिळणार आहे. गेल्या आठ वर्षांपासून आपण जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा कराच्या रुपात फार मोठी सुधारणा घडवून आणली. संपूर्ण देशातील करविषयक ओझे कमी केले. कररचनाविषयक प्रणालींचे सुलभीकरण केले. आणि आता आठ वर्षानंतर, काळाची मागणी लक्षात घेऊन आता आम्ही या सगळ्याचा पुन्हा एकदा आढावा घेणार आहोत. आम्ही एका उच्चाधिकार समितीची नेमणूक करून आढावा सुरु केला, राज्य सरकारांशी देखील विचारविनिमय केला. आणि माझ्या प्रिय देशवासियांनो, येत्या दिवाळीला आम्ही भविष्यकालीन पिढीतील जीएसटी सुधारणा घेऊन येत आहोत. या दिवाळीला तुमच्यासाठी ही एक भेट असेल. सामान्य माणसांच्या गरजांवरील करांमध्ये मोठ्या प्रमाणात कपात करण्यात येणार आहे . यामुळे फार मोठी सोय होईल. आपले एमएसएमईज, आपले लघु उद्योग, यांना याचा फार मोठा फायदा होणार आहे.दैनंदिन वापराच्या वस्तू बऱ्याच स्वस्त होतील. आणि त्यातून अर्थव्यवस्थेला देखील एक नवे बळ मिळणार आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
आज आपला देश जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे, वेगाने त्या दिशेने प्रगती करत आहे. आम्ही ती कवाडे उघडू पाहत आहोत. आणि लवकरच आम्ही हे साध्य देखील करून दाखवू. आणि एक दिवस मी तुमच्या समोर येऊन, लाल किल्ल्याच्या बुरुजावरुन ही बातमी देखील तुम्हाला ऐकवेन.
आज, भारताची अर्थव्यवस्था तसेच आर्थिक स्थितीच्या बाबतीत संपूर्ण जग खात्री बाळगून आहे. एवढ्या अस्थिरतेच्या वातावरणात, भारत सर्वांसाठी आशेचा किरण बनला आहे. आर्थिक शिस्तबद्धता, भारताचे वित्तीय सामर्थ्य, संकटाच्या या काळात, जेव्हा सगळ्या अर्थव्यवस्था गटांगळ्या खात आहेत तेव्हा भारत यातून बाहेर काढेल हा विश्वास जगात वाढीला लागला आहे. आज, महागाई नियंत्रणात आहे, आपली परदेशी चलनाची गंगाजळी उत्तम स्थितीत आहे, आपले मॅक्रोइकॉनॉमिक निर्देशांक अत्यंत सशक्त आहेत. जागतिक मानांकन संस्था देखील सतत, भारताची प्रशंसा करत आहेत. या संस्था भारताच्या अर्थव्यवस्थेवर अधिकाधिक विश्वास व्यक्त करत आहेत. या विकसित होत जाणाऱ्या अर्थव्यवस्थेचा लाभ माझ्या देशातील गरिबांना, शेतकऱ्यांना, माझ्या देशातील स्त्री-शक्तीला, देशातील मध्यमवर्गाला मिळायला हवा आणि माझ्या देशाच्या विकासप्रवाहाला त्यातून सामर्थ्य प्राप्त व्हावे, या दिशेने आम्ही नवनवे प्रयत्न करत आहोत. याचसाठी आम्ही युवा वर्गासाठी, नवनव्या क्षेत्रात कार्यरत तरुणांसाठी संधी निर्माण करत आहोत. कौशल्यविकास, स्वयंरोजगार, मोठमोठ्या कंपन्यांमध्ये अंतर्वासिता, या संदर्भात मोठ्या पातळीवर एक अभियान राबवत आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आज भारतात महिलाशक्तीचे सामर्थ्य प्रत्येकजण मान्य करू लागला आहे. वाढत्या अर्थव्यवस्थेच्या लाभार्थी आपल्या महिला आहेत, पण वाढत्या अर्थव्यवस्थेला गती देण्यामध्येही आपल्या महिलांचे योगदानही आहे, आपल्या मातृशक्तीचे योगदान आहे, आपल्या स्त्रीशक्तीचे योगदान आहे.
स्टार्टअप्स पासून स्पेस सेक्टर पर्यंत आपल्या मुलींनी छाप सोडली आहे. खेळाच्या मैदानात छाप सोडली आहे. सैन्यात छाप सोडत आहेत. आज अभिमानाने महिला खांद्याला खांदा लावून देशाच्या विकासयात्रेत भागीदार होत आहेत. देशाचा उर अभिमानाने भरून आला, जेव्हा एनडीएची महिला तुकडी, त्यांची पहिली तुकडी पास आउट (यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण केले होते) झाली होती. संपूर्ण देश अभिमानाने भारून गेला होता. सर्व दूरचित्रवाहिन्या त्याच गोष्टींच्या मागे लागले होते. किती मोठे गौरवाचे क्षण होते.
स्वयंसहायता गट, 10 कोटी स्वयंसहायता गटाच्या भगिनी. किती कमाल करत आहेत. नमो ड्रोन दीदी, महिला शक्तीची एक नवीन ओळख बनली. गावात, मला एक बहीण भेटली, ती म्हणाली की आता गावकरी मला पायलट म्हणून आवाज देतात. खूप अभिमानाने बोलत होती. जास्त शिकलेली नव्हती, पण तिचा रुबाब निर्माण झाला आहे.
मित्रहो, आम्ही 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचा संकल्प केला होता. 3 कोटी. आणि आज मला समाधान आहे की, आम्ही वेगाने काम करत आहोत. वेळेआधीच 3 कोटींचे लक्ष्य पार करू आणि आज मी आनंदाने देशाला सांगू इच्छितो की, माझ्या महिला शक्तीचे सामर्थ्य पाहा. पाहता पाहता 2 कोटी महिला लखपती दीदी बनल्या आहेत. आज काही लखपती दीदी आपल्यासमोर बसल्या आहेत. हे आहे माझे सामर्थ्य आणि माझा विश्वास आहे मित्रांनो, भारताच्या विकासयात्रेत त्यांची भागिदारी वाढणार आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, माझ्या देशातील शेतकऱ्यांचे भारताच्या अर्थव्यवस्थेत खूप मोठे योगदान आहे. भारतातील शेतकऱ्यांची मेहनत फळ देऊ लागली आहे. मागच्या वर्षी धान्य उत्पादनात माझ्या देशातील शेतकऱ्यांनी जुने सगळे विक्रम मोडले. हे सामर्थ्य आहे माझ्या देशाचे. तेवढीच जमीन, पण व्यवस्था बदलल्या, पाणी पोहोचायला लागले, चांगली बीयाणे मिळू लागली, शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळायला लागल्या, तर ते आपले सामर्थ्य देशासाठी वाढवू लागले आहेत.
आज भारत, दूध, डाळी, तूर यांसारख्या उत्पादनांमध्ये नंबर 1 आहे, जगामध्ये. आज जगातील दुसरा सर्वात मोठा मत्स्य उत्पादक, माझ्या मच्छिमार बांधवांची ताकद बघा! मत्स्य उत्पादनात जगात आपण दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलो आहोत. आज भारत तांदूळ, गहू, डाळी आणि भाजीपाल्याच्या उत्पादनातही जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
मित्रहो, तुम्हाला आनंद होईल, माझ्या देशातील शेतकरी जे पिकवतात, आज ती उत्पादने जगाच्या बाजारपेठेत पोहोचत आहे. 4 लाख कोटी रुपयांच्या कृषी उत्पादनांची निर्यात झाली आहे. ही माझ्या देशातील शेतकऱ्यांनी दाखवलेली ताकद आहे. आम्ही छोटे शेतकरी असोत, पशुपालक असोत, मच्छिमार असोत, देशाच्या विकासाच्या अनेक योजनांचा लाभ आज आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहोत. पीएम किसान सन्मान निधी असो, पावसाच्या पाण्याचे संवर्धन असो, सिंचनाच्या योजना असोत, गुणवत्तापूर्ण बियाणे असोत, खतांची गरज असो, प्रत्येक क्षेत्रात, आज, आणि शेतकऱ्यांना आता विश्वास वाटू लागला आहे, पीक विम्याचा, ते धाडसी होऊ लागले आहेत, त्याचा परिणामही देशाला दिसू लागला आहे. जी पूर्वी कल्पनेची गोष्ट होती ती आज प्रत्यक्षात आली आहे.
देशवासियांनो, आपल्या देशातील पशुधनाला वाचवण्यासाठी, आपल्याला कोविडची लस मोफत मिळाली होती, ती तर आठवते. पण आम्ही पशुधनासाठीही आतापर्यंत 125 कोटी मात्रा, मोफत, पशूंना दिले आहेत. लाळ्या खुरकत रोगापासून मुक्ती मिळवण्यासाठी, ज्याला आपल्या इथे उत्तर भारतात ज्याला खुरकतीचा, तोंडाचा आजार म्हटले जाते, त्यापासून वाचवण्यासाठी 125 कोटी मात्रा, आम्ही देऊन झालो आहोत, आणि मोफत दिले आहेत.
आम्ही शेतीच्या बाबतीत देशातील ते जिल्हे, जिथले शेतकरी इतरांपेक्षा मागे राहिले, कोणत्या न कोणत्या कारणामुळे, 100 जिल्हे असे आहेत. जिथे अपेक्षेच्या तुलनेत कमी शेती आहे, आणि त्यासाठीच आम्ही 100 जिल्हे निश्चित केले आहेत, पूर्ण देशातून. आणि तिथल्या शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी, शेतकऱ्यांना ताकद देण्यासाठी, शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी एक अभियान सुरू केले आहे. आणि यासाठी पीएम धन धान्य कृषी योजना सुरू केली आहे. पीएम धन धान्य कृषी योजना, ही देशातील 100 जिल्हे, जिथे थोडी जरी मदत पुरवली, तर तिथला शेतकरी देखील देशातील इतर शेतकऱ्यांच्या बरोबरीने उभा राहील.
माझ्या प्रिय देशवासियांनो, भारतातील शेतकरी, भारतातील पशुपालक, भारतातील मच्छिमार हेच आमच्या सर्वात मोठ्या प्राधान्यक्रमावर आहेत. भारतातील शेतकरी, भारतातील मच्छिमार, भारतातील पशुपालक यांच्याशी संबंधित कोणत्याही अहितकार धोरणासमोर मोदी भिंत बनून उभा आहे. भारत आपल्या शेतकऱ्यांच्या, आपल्या पशुपालकांच्या आणि आपल्या मच्छिमारांच्या संबंधात कधीही कोणतीही तडजोड मान्य नाही करणार.
प्रिय देशवासियांनो, गरिबी काय असते, हे मला पुस्तकातून वाचावे लागले नाही. मला ती माहित आहे. सरकारमध्येही राहिलो आहे, आणि म्हणूनच माझा प्रयत्न राहिला आहे की सरकार ‘फायलीं’मध्ये नसले पाहीजे, सरकार देशातील नागरिकांच्या लाइफ मध्ये असायला पाहिजे. दलित असोत, पिडीत असोत, शोषित असोत, वंचित असोत त्यांच्यासाठी सकारात्मक रूपात सरकारे प्रोअॅक्टिव असावीत. सरकार प्रो पीपल असावीत. त्या दिशेने आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. समाजातील प्रत्येक गरजू व्यक्तीसाठी. काही लोकांना वाटते की सरकारच्या योजना आधीही येत होत्या, नाही, आम्ही सरकारच्या योजना प्रत्यक्ष जमिनीवर राबवत आहोत, सॅचुरेशनवर (सगळ्यांना लाभा मिळावा) भर देत आहोत, आणि सामाजिक न्यायाचे, जर काही खरे खुरे शिक्षण असेल, तर ते सॅचुरेशन मध्ये आहे, ज्याअंतर्गत कोणताही हक्कदार निसटू नये, प्रत्येक हक्कदाराच्या घरापर्यंत सरकार जावे आणि त्याला त्याच्या हक्काची गोष्टी मिळावी, यासाठी आम्ही काम करत आहोत. जन धन अकाउंट जेव्हा उघडली गेली ना, ते केवेळ बँकेचे खाते होते, असे नव्हते. त्याला एक स्वाभिमान मिळाला होता की, बँकेचे दरवाजे माझ्यासाठीही उघडतात, मी सुद्धा बँकेच्या दरवाजात जाऊन, टUPI ने पैसे घेतो, UPI ने पैसे देतो. हा बदल शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचला आहे. लोकांच्या लाइफ मध्ये सरकार असायला पाहिजे, त्याच कारणामुळे जमिनीशी जोडलेल्या योजना तयार होतात आणि जमिनीशी जोडलेल्या योजना जमिनीवर उतरतात आणि जमिनीवर उतरलेल्या योजना आयुष्यात बदल घडवण्याचे एक सशक्त माध्यम बनतात.
एक काळ होता, गरीब असो, पीडित असो, आदिवासी असो, वंचित असो, दिव्यांग असो, आपल्या विधवा माता – बहिणी असोत, आपल्या हक्कांसाठी दारोदार फिरायचे. तेव्हा सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या मारता मारता आयुष्य संपून जायचे. आज सरकार तुमच्या दरवाज्यापर्यंत आले आहे. सॅच्यूरेशनचा दृष्टीकोन समोर ठेऊन येते. कोटी लाभार्थ्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळत आहे. थेट लाभ हस्तांतरण, एक खूप मोठे क्रांतिकारी काम झाले आहे.
मित्रहो, ‘गरिबी हटाओ’ च्या घोषणा देशाने खूप ऐकल्या आहेत. लाल किल्ल्यावरूनही ऐकल्या आहेत, आणि देश ऐकून ऐकून थकून गेला होता. आणि देशाने मानले होते की, गरिबी हटू शकत नाही. पण जेव्हा आम्ही योजनांना गरिबाच्या घरापर्यंत घेऊन जातो, विश्वास आम्ही गरिबांच्या मनात निर्माण करतो. माझ्या देशातील 25 कोटी गरीब, गरिबीला हरवून, गरिबीतून बाहेर काढून, एक नवा इतिहास घडवत आहेत. आज 10 कोटी गरीब, आणि 10 वर्षांत 25 कोटींपेक्षा जास्त गरीब, गरिबीला हरवून, गरिबीतून बाहेर आले आहेत. आणि एक नव मध्यमवर्ग तयार झाला आहे. माझ्या मित्रांनो, हा नव मध्यमवर्ग आणि मध्यमवर्ग एक अशी जुगलबंदी आहे, ज्यात आकांक्षा पण आहे, प्रयत्नही पण आहे. ती देशाला पुढे नेण्यासाठी खूप मोठे सामर्थ्य बनणार आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, अगदी येत्या काळातच, माझ्या प्रिय देशवासियांनो, अगदी येत्या काळातच महान समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची 200 वी जयंती येत आहे. आम्ही त्या जयंतीचे सोहळे सुरू करणार आहोत. आणि महात्मा ज्योतिबा फुले यांची तत्वे, त्यांनी जे मंत्र दिले आहेत, त्यात आपल्यासाठी प्रेरणा आहे, मागासलेल्यांना प्राधान्य, मागासलेल्यांना प्राधान्य देऊन आम्ही परिवर्तनाची उंची गाठू इच्छितो. आम्ही यासाठी कठोर परिश्रम करू इच्छितो. आम्ही पारदर्शक धोरणांद्वारे मागासलेल्यांना प्राधान्य, हे आम्ही जमिनीवर उतरवून दाखवू इच्छितो, प्रत्येक मागासलेल्यांच्या आयुष्यात उतरवून दाखवू इच्छितो.
मित्रहो, हातगाडीवाल्यांसाठी स्वनिधी योजना असो, अथवा आपल्या कुशल हातांनी काम करणाऱ्यांसाठीच्या विश्वकर्मा योजनेची गोष्ट असो. आदिवासींमध्येही जे मागे राहिले आहेत, त्यांच्यासाठी प्रधानमंत्री जनमन योजनेची गोष्ट असो. आपल्या पूर्व भारताला विकासात पूर्ण देशाच्या बरोबरीने आणणे आणि त्यांना नेतृत्व देण्याच्या दिशेने काम असो, आम्ही फक्त समाज मागासलेला आहे, त्यांची काळजी करण्यापुरतेच थांबणारे नाही आहोत. जी क्षेत्र मागासलेली राहिली आहेत, त्यांनाही आम्ही प्राधान्य देऊ इच्छितो. जे जिल्हे मागासलेले राहिले आहेत, त्यांना आम्ही प्राधान्य देऊ इच्छितो. जे ब्लॉक मागासलेले राहिले आहेत, त्यांना आम्ही प्राधान्य देऊ इच्छितो. आम्ही 100 आकांक्षित जिल्हे आणि 500 आकांक्षित ब्लॉक, त्याच मिशनवर काम केले आहे. आम्ही पूर्व भारताच्या विकासासाठी हजारो कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधाप्रकल्पांना बळ दिले आहे. आम्ही पूर्व भारतातील लोकांचे जीवन बदलून, देशाच्या विकासयात्रेत भागीदार बनवण्याचा…
माझ्या प्रिय देशवासियांनो, जीवन, प्रत्येक क्षेत्रात विकास व्हायला पाहिजे, विकासासाठी खेळही महत्त्वाचे असतात. आणि आम्ही, आणि मला आनंद आहे, एक असा काळ होता की, मुले खेळात वेळ घालवत असतील, तर आई – वडिलांना ते जास्त आवडत नव्हते. आज एकदम उलट झाले आहे, जर मुले खेळांमध्ये पुढे जात असतील, त्यात त्यांना रस असेल, तर आई – वडील अभिमानाने भारून जातात. मी याला एक शुभ संकेत मानतो. माझ्या देशातील कुटुंबांमध्ये खेळाला प्रोत्साहन देण्याचे वातावरण मी पाहतो, माझे मन गर्वाने भरून येते. मी याला देशाच्या भविष्यासाठी एक मोठा शुभ संकेत मानतो.
आणि मित्रहो,
या खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही देशात प्रथमच राष्ट्रीय क्रीडा धोरण, अनेक दशकांनंतर देशात खेलो भारत धोरण घेऊन आलो आहोत, ज्यामुळे देशात क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाचा प्रयत्न व्हावा, शाळांपासून ऑलिंपिकपर्यंत आमचा पूर्ण क्रीडा परिसंस्था विकसित करण्याचा मानस आहे, मग ते प्रशिक्षण (कोचिंग) असो ,फिटनेस असो, खेळांची मैदाने असोत, त्यांची व्यवस्था असो,खेळांची साधने असोत, लघुउद्योगांनाही खेळांचं माध्यम बनवणं असो, अनेक प्रकारे पूर्ण इकोसिस्टम आम्हाला दुर्गम भागातील मुलांपर्यंत पोहोचवायची आहे.
मित्रांनो, जेव्हा मी फिटनेस, तंदुरुस्तीच्या विषयाची चर्चा करतो आहे, तेव्हाच मी एक चिंतेची बाबसुद्धा तुमच्यापुढे मांडू इच्छितो. आपल्या देशातील प्रत्येक कुटुंबानेच त्यावर गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे–लठ्ठपणा आपल्या देशापुढील मोठी समस्या बनत चालली आहे. तज्ज्ञ, जाणकार लोक सांगतात की येत्या काही वर्षात दर तीन व्यक्तींमधील एक जण लठ्ठपणाच्या समस्येने ग्रस्त असेल. आपल्याला लठ्ठपणाच्या समस्येपासून दूर राहायचं आहे, ओबेसिटीची समस्या टाळायची आहे. आणि यासाठी मी बाकी जे काही करावं लागेल ते त्याशिवाय एक सूचना केली होती की कुटुंबांनी हे ठरवायचं आहे की जेव्हा स्वयंपाकासाठी घरामध्ये खाद्यतेल आणलं जाईल, तेव्हाच ते दहा टक्के कमी असेल आणि त्याचा वापरही दहा टक्क्यांनी कमी केला जाईल आणि लठ्ठपणाविरुद्धची लढाई जिंकण्यात आपण आपलं योगदान देऊ.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
आपला देश भाग्यवान आहे. हजारो वर्षांच्या परंपरेचे आपण धनी आहोत.आणि आपल्याला त्याग आणि तपश्चर्येच्या वाटेने निरंतर ऊर्जा मिळत असते. यंदा गुरू तेगबहाद्दूर यांच्या बलिदानाचं 350 वं वर्ष आहे. देशाच्या संस्कृतीचं, देशाच्या मूल्यांचं रक्षण करण्यासाठी त्यांनी आपलं सर्वस्व अर्पण केलं. आज मी त्यांना वंदन करतो.
मित्रांनो, आपल्या संस्कृतीची ताकद म्हणजे आपली विविधता ही आहे,. ही विविधता आम्ही अभिमानाने साजरी करू इच्छितो. आपली विविधता साजरी करणं ही आपली सवय बनावी अशी आमची इच्छा आहे. कारण, आम्हाला अभिमान आहे, की आपल्या भारतमातेचा हा बगीचा इतक्या विविध प्रकारच्या फुलांनी नटलेला आहे. ही विविधता, एवढी ही विविधता हा आपला वारसा आहे, हा आपला अभिमान आहे. प्रयागराजच्या महाकुंभमध्ये आपण पाहिलं की ही विविधता कशी जगली जाते. एकाच ठिकाणी कोट्यवधी लोक एकाच भावनेनं, एकाच निश्चयानं, एकाच प्रयासानं जमले होते…ही जगासाठी मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. महाकुंभचे यश भारताच्या एकतेची, भारताच्या सामर्थ्याची साक्ष आहे.
मित्रांनो, आपला देश भाषांच्या वैविध्यानं भरलेला आहे, पुलकित आहे. आणि, म्हणूनच आम्ही मराठी, आसामी, बंगाली, पाली आणि प्राकृतला अभिजात भाषांचा दर्जा दिला आहे. आणि माझं असं मत आहे की आपल्या भाषा जितक्या विकसित होतील, आपल्या सर्व भाषा जितक्या समृद्ध होतील, तेवढंच आपल्या ज्ञान व्यवस्थेला बळ मिळणार आहे. आणि आपली जी ताकद आहे ना.. आज डेटाचे युग असताना ही ताकद जगाचीही ताकद होईल, एवढं सामर्थ्य आपल्या भाषांमध्ये आहे. आपल्याला आपल्या सर्व भाषांबद्दल अभिमान असला पाहिजे. आपल्या सगळ्याच भाषांच्या विकासासाठी मनापासून प्रयत्न केले पाहिजेत.
मित्रांनो, जुन्या हस्तलिखितांमध्ये आपलं ज्ञानाचं खूप मोठं भांडार आहे. पण त्याबद्दल उदासीनता राहिली आहे. यावेळी आम्ही ज्ञान भारतम अंतर्गत आम्ही जिथे हस्तलिखित ग्रंथ आहेत, जिथे हस्तलिखित पोथ्या आहेत, शेकडो वर्षांपासूनचे जे दस्तऐवज आहेत, त्यांचा प्रयत्नपूर्वक शोध घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून हे समृद्ध ज्ञान भावी पिढ्यांसाठी कामी यावं यादिशेनं प्रयत्न करत आहोत.
माझ्या प्रिय देशवासीयांनो,
आमचं स्पष्ट मत आहे की, हा देश केवळ सरकारं घडवत नाहीत, हा देश सत्तेवर विराजमान असलेले लोक घडवत नाहीत, हा देश शासनाची धुरा सांभाळणारे निर्माण करत नाहीत, या देशाची उभारणी होते ती देशातल्या कोटी, कोटी जनांच्या कर्तृत्वामुळे, ऋषी-मुनींच्या, शास्त्रज्ञांच्या, दिग्गज्जांच्या, शिक्षकांच्या, शेतकऱ्यांच्या, सैनिकांच्या, सैन्याच्या, कामगारांच्या… प्रत्येकाच्या प्रयत्नामुळे… देशाची उभारणी होते. प्रत्येकाचं त्यामध्ये योगदान असतं, त्यामध्ये व्यक्तींचा, संस्थांचाही वाटा असतो. आज, मी अत्यंत अभिमानानं या गोष्टीचा उल्लेख करू इच्छितो, आजपासून शंभर वर्षांपूर्वी एका संघटनेचा जन्म झाला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. संपूर्ण शंभर वर्षांची देश सेवा, अत्यंत गौरवास्पद सोनेरी पान आहे. व्यक्तीनिर्माणातून राष्ट्रनिर्मितीचा संकल्प घेऊन शंभर वर्षे भारतमातेच्या कल्याणाचं ध्येय ठेवून लाखो स्वयंसेवकांनी मातृभूमीच्या कल्याणासाठी आपलं आयुष्य समर्पित केलं आहे. सेवा, समर्पण, संघटन आणि अत्यंत उत्कृष्ट शिस्तबद्धता ही ज्याची ओळख राहिली आहे, अशी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संपूर्ण जगातील एकप्रकारे सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था (एनजीओ) आहे. तिचा शंभर वर्
माझ्या प्रिय देशवासीयांनो,
आपण समृद्धीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहोत. पण, समृद्धीचा मार्ग सुरक्षेच्या वाटेने जातो. गेल्या अकरा वर्षात देशाची सुरक्षा, देशाचं रक्षण, देशातील नागरिकांचं संरक्षण या सर्व आघाड्यांवर आम्ही पूर्णपणे समर्पणाच्या भावनेनं काम केलं आहे. बदल घडवून आणण्यात आम्हाला यश आलं आहे. संपूर्ण देशाला ठाऊक आहे की,आपल्या देशातला बराच मोठा आदिवासी भाग नक्षलवाद्यांच्या विळख्यात आहे, माओवाद्यांच्या वर्चस्वाखाली अनेक दशकांपासून रक्तरंजित झाला होता. सर्वात जास्त नुकसान माझ्या आदिवासी बांधवांच्या कुटुंबांना भोगावं लागलं. आमच्या आदिवासी माता-भगिनींनी आपली स्वप्न पूर्ण करू इच्छिणारी होतकरू मुलं गमावली, तरुण मुलांना चुकीच्या मार्गाकडे ओढलं गेलं, त्यांची दिशा भरकटवली गेली, त्यांची आयुष्यं उद्ध्वस्त केली गेली, आम्ही अत्यंत कठोरपणे त्याविरुद्ध पावलं उचलली, एक काळ होता, सव्वाशेपेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये नक्षलवादानं आपली पाळंमुळं रुजवली होती. आपले आदिवासी भाग, आपले आदिवासी तरुण माओवाद्यांच्या कचाट्यात अडकलेले होते. आणि आज या सव्वाशे जिल्ह्यातील नक्षलवादाचा प्रभाव कमी करत ही संख्या आम्ही वीसवर आणली आहे. त्या आदिवासींची आम्ही सर्वात मोठी सेना काम करत आहे.
मित्रांनो, आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, भारताच्या नकाशावरचे जे भाग हिंसाचारामुळे रक्तरंजित झाले होते, ज्यांना लाल रंगांने माखून टाकलं गेलं होतं, तिथे आम्ही राज्यघटना, कायदा आणि विकासाचा तिरंगा फडकवला आहे.
माझ्या प्रिय देशवासीयांनो,
यंदा भगवान बिरसा मुंडा यांची एकशे पन्नासावी जयंती आहे, त्या निमित्ताने आम्ही या आदिवासी भागांना नक्षलवादाच्या विळख्यातून मुक्त करून, माझ्या आदिवासी कुटुंबातील युवकांची आयुष्ये वाचवून आम्ही भगवान बिरसा मुंडा यांना खरी आदरांजली वाहिली आहे.
माझ्या प्रिय देशवासीयांनो,
मी आज देशासमोर एक चिंता, एका आव्हानासंदर्भात देशाला सावधान करू इच्छितो. एका षड्यंत्राचा, जाणीवपूर्वक आखलेल्या कटाचा भाग म्हणून देशाच्या लोकसंख्येत बदल केला जात आहे, एका नव्या संकटाची बीजे पेरली जात आहेत. आणि हे घुसखोर माझ्या देशातील तरुणांची उपजीविकेची साधने हिरावून घेत आहेत, माझ्या देशातील बहिणींना- आमच्या लेकींना लक्ष्य करत आहेत, हे सहन केलं जाणार नाही. हे घुसखोर भोळ्या-भाबड्या आदिवासींना भुलवून त्यांच्या जमिनी बळकावत आहेत, ही गोष्ट देश खपवून घेणार नाही. म्हणूनच माझ्या प्रिय देशवासीयांनो जेव्हा लोकसंख्येत बदल होतो, सीमवर्ती भागात परिवर्तन होतं, तेव्हा राष्ट्रीय सुरक्षेपुढे मोठं संकट निर्माण होतं. देशाची एकता, अखंडता आणि प्रगतीसाठी हे संकट ठरतं. सामाजिक तणावाची बीजं रोवली जातात. आणि कुठलाही देश, आपला देश घुसखोरांच्या हवाली करू शकत नाही. जगातील कुठलाच देश असं होऊ देणार नाही, मग भारतही हे कसं होऊ देईल. आपल्या पूर्वजांनी त्याग करून. बलिदान देऊन स्वातंत्र्य मिळवलं, आपल्याला स्वतंत्र भारत सोपवला आहे, म्हणून त्या महापुरुषांप्रती आपलं कर्तव्य आहे की आपण आपल्या देशात असले प्रकार खपवून घेता कामा नयेत, ती त्यांना खर
माझ्या प्रिय देशवासीयांनो,
उद्या जन्माष्टमीचा मंगलमय दिवस आहे. या दिवशी भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव देशात साजरा केला जातो. मित्रांनो, जेव्हा मला भगवान श्रीकृष्णांचं स्मरण होतं… तेव्हा आपण पाहतो आहोत की संपूर्ण जगभरात युद्धतंत्र, त्याची पद्धत बदलत आहे. आपण पाहत आहोच की भारत युद्धाच्या सर्व नवीन पद्धतींचा सामना करण्यास समर्थ आहे. आपण तंत्रज्ञानातील जे काही कौशल्य आहे ते ऑपरेशन सिंदूरमध्येही दाखवून दिलं आहे. पाकिस्तानने आपल्या लष्करी ठाण्यांवर, आपल्या हवाई तळांवर, आपल्या संवेदनशील ठिकाणांवर, आपल्या श्र्द्धास्थानांवर, आपल्या नागरिकांवर अमाप संख्येने क्षेपणास्त्रे, ड्रोन्सचा मारा केला. देशानं हे पाहिलं आहे, मात्र देशाला सुरक्षित ठेवण्याचे जे प्रयत्न गेल्या दहा वर्षात झाले, त्यामुळे निर्माण झालेल्या ताकदीचा परिणाम होता. त्यांच्या प्रत्येक हल्ल्याला आणि तंत्रज्ञानाला आमच्या शूरवीरांनी काडीसारखं उडवून लावलं. जराही नुकसान करू शकले नाहीत आणि म्हणूनच युद्धाच्या मैदानात जेव्हा तंत्रज्ञानाचा विस्तार होत आहे, तंत्रज्ञान वरचढ ठरत आहे तेव्हा राष्ट्राच्या संरक्षणासाठी, देशाच्या संरक्षणासाठी आपणही आज जे प्रभुत्व प्राप्त केले आहे ते आणखी विस्तारण्याच
म्हणूनच आज लाल किल्याच्या या बुरुजावरून मी जाहीर करत आहे की येत्या 10 वर्षात, 2035 पर्यंत देशाची सर्व महत्वाची स्थळे ज्यामध्ये सामरिक स्थळांसह नागरी क्षेत्रांचाही समावेश आहे, रुग्णालये असोत, रेल्वे असो, श्रद्धास्थाने असोत अशा स्थळांना तंत्रज्ञानाच्या नव्या मंचाद्वारे पूर्णपणे सुरक्षा कवच दिले जाईल. या सुरक्षा कवचाचा सातत्याने विस्तार व्हावा, देशाच्या प्रत्येक नागरिकाला सुरक्षित वाटावे, कोणतेही तंत्रज्ञान आपल्यावर वार करण्यासाठी आले तर आपले तंत्रज्ञान त्यापेक्षा वरचढ सिद्ध व्हावे यासाठी येत्या 10 वर्षात, 2035 पर्यंत मी या राष्ट्रीय सुरक्षा कवचाचा विस्तार करू इच्छितो, त्याला मजबूत करू इच्छितो, आधुनिक करू इच्छितो आणि म्हणूनच भगवान श्रीकृष्णांपासून प्रेरणा घेत आम्हीही श्रीकृष्णांचे जे सुदर्शन चक्र होते त्या सुदर्शन चक्राचा मार्ग निवडला आहे. आपल्यापैकी बहुतांश लोकांना स्मरत असेलच की महाभारतात लढाई सुरु होती तेव्हा श्रीकृष्णांनी आपल्या सुदर्शन चक्राने सूर्य प्रकाश रोखत दिवसा अंधार केला होता. सुदर्शन चक्राने सूर्य प्रकाश रोखला होता आणि तेव्हाच जयद्रथ वधाची अर्जुनाने केलेली प्रतिज्ञा पूर्ण झाली.
आम्ही भारताच्या या मिशन सुदर्शन चक्रासाठी काही प्राथमिक बाबीही निश्चित केल्या आहेत. येत्या 10 वर्षात आम्ही वेगाने हे मिशन पुढे नेऊ इच्छितो. पहिली बाब म्हणजे ही संपूर्ण आधुनिक प्रणाली, यासाठी संशोधन, विकास, त्याची निर्मिती आपल्या देशातच व्हावी, आपल्या देशातल्या युवकांच्या प्रतिभेने व्हावी, आपल्या देशातल्या लोकांच्या द्वारे निर्माण झालेली असावी. दुसरी बाब म्हणजे ही एक अशी व्यवस्था असेल जी युद्धाच्या दृष्टीने भविष्यात कोणत्या शक्यता असतील, हे लक्षात घेऊन त्यापुढे एक पाउल जात आपले धोरण निश्चित करेल आणि तिसरी बाब म्हणजे सुदर्शन चक्राचे एक सामर्थ्य होते ते अगदी अचूक होते, जिथे लक्ष्य असेल तिथेच जात असे आणि परत श्रीकृष्णांकडे येत असे. आम्ही या सुदर्शन चक्राद्वारेही लक्ष्यीत अचूक कारवाईसाठीही व्यवस्था विकसित करण्याच्या दिशेने आगेकूच करू आणि म्हणूनच युद्धाचे बदलते स्वरूप, लक्षात घेता राष्ट्र सुरक्षा, नागरिकांची सुरक्षा यासाठी अतिशय कटिबद्धतेने हे कार्य पुढे नेण्याचे मी वचन देतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
आपण जेव्हा लोकशाहीबाबत बोलत असतो, स्वतंत्र भारताबाबत बोलत असतो तेव्हा आपले संविधान आपल्यासाठी सर्वोत्तम दीपस्तंभ असतो, आपल्या प्रेरणेचे केंद्र असते, मात्र 50 वर्षांपूर्वी भारताच्या संविधानाचा गळा घोटण्यात आला होता. भारताच्या संविधानाचा विश्वासघात करण्यात आला होता, देशाला तुरुंग बनविण्यात आले होते,आणीबाणी लागू करण्यात आली होती, आणीबाणी लादण्यात आली होती. आणीबाणीला 50 वर्षे होत आहेत, संविधानाच्या हत्येचे हे पाप देशाच्या कोणत्याही पिढीने विसरता कामा नये, संविधानाची हत्या करणाऱ्या पापी लोकांना विसरता कामा नये आणि भारताच्या संविधानाप्रती आपले समर्पण अधिक दृढ करत आपल्याला पुढे गेले पाहिजे, संविधान आपली प्रेरणा आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
याच लाल किल्यावरुन मी पंच प्रण केले होते.आज लाल किल्यावरुन मी पुन्हा एकदा माझ्या देशवासियांना त्याचे स्मरण करून देऊ इच्छितो. विकसित भारत घडविण्यासाठी ना आम्ही थांबणार, ना झुकणार,आम्ही परिश्रमांची पराकाष्ठा करत राहणार आणि आमच्या डोळ्यादेखत 2047 मध्ये विकसित भारत घडविणारच.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
आमचा दुसरा प्रण आहे, आम्ही आमच्या जीवनात, आमच्या व्यवस्थेमध्ये, आमचे नियम, कायदे,परंपरा यामध्ये गुलामीचा एक अंशही राहू देणार नाही.कोणत्याही प्रकारच्या गुलामीपासून आम्ही मुक्तता मिळवूच.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
आपल्या वारशाचा आम्ही अभिमान बाळगू.आपली ही ओळख आहे त्याचा सर्वात मोठा दागिना, सर्वांचा मुकुटमणी म्हणजे आपला वारसा आहे, आपल्या वारशाचा आम्ही अभिमान बाळगू.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
या सर्वासाठी एकता हा मंत्र सर्वात मोठा सामर्थ्यवान मंत्र आहे आणि म्हणूनच एकतेचा हा बंध कोणी नष्ट करू शकणार नाही हा आपला सामुहिक संकल्प राहील.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
भारतमातेप्रती आपल्या कर्तव्यांचे पालन करणे म्हणजे एखाद्या पूजेप्रमाणेच आहे, तपस्येप्रमाणेच आहे, ही आराधनाच आहे आणि हाच भाव बाळगत आपण सर्वजण आपल्या मातृभूमीच्या कल्याणासाठी, प्रयत्नांची पराकाष्ठा करत, 2047 पर्यंत विकसित भारताचे लक्ष्य साध्य करण्यासाठी आपले जीवन वेचू,स्वतःला सर्व सामर्थ्यानिशी यासाठी झोकून देऊ, कोणतीही संधी वाया घालवणार नाही इतकेच नव्हे तर नव्या संधी निर्माण करू आणि त्या निर्माण झाल्यानंतर आम्ही 140 कोटी देशवासीयांच्या सामर्थ्यासह आगेकूच करत राहू, आगेकूच करत राहू, आगेकूच करत राहू.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
आपल्याला लक्षात ठेवायचे आहे, 140 कोटी देशवासीयांनी लक्षात ठेवायचे आहे,जो परिश्रमांची पराकाष्ठा करतो, जो परिश्रमांची पराकाष्ठा करतो, त्यांनीच इतिहास घडविला आहे. ज्याने कठीण खडक फोडले आहेत, ज्याने कठीण खडक फोडले आहेत त्यानेच काळ वाकविला आहे आणि काळ वाकविण्याचा हाच योग्य काळ आहे, योग्य वेळ आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
स्वातंत्र्याच्या या महान पर्वाच्या पुन्हा एकदा खूप-खूप शुभेच्छा देतो.खूप-खूप अभिनंदन करतो. माझ्यासमवेत जयघोष करा
जय हिंद! जय हिंद! जय हिंद!
भारत माता की जय! भारत माता की जय! भारत माता की जय!
वंदे मातरम! वंदे मातरम! वंदे मातरम!
खूप-खूप धन्यवाद !
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.