एक मात्र खरे तुमची कल्पनाशक्ती जेवढी दांडगी तितक्याच दर्जाचा उच्चतम शोध जगात कितीतरी म्हणीय शास्त्रज्ञांनी लावल्याची खूप उदाहरणे बघायला मिळतात. यदा कदाचित निर्मात्याने माणसाच्या डोक्यातून कल्पनाशक्तीच काढून जर घेतली तर त्याच क्षणी जग बंद पडेल इतकं प्राणवायूसारखं महत्त्व कल्पनेला आहे.
निवृत्ती मथुराबाई सयाजी जोरी,
मंडळ कृषी अधिकारी, लासूर स्टेशन ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर.
9423180393, 8668779597.
मी तर म्हणतो विश्वाच्या निर्मात्याने विश्व निर्माण केलं. त्यातील मानवाने विश्वाला जे रूप दिलं ते फक्त आणि फक्त त्याने स्वतः केलेल्या कल्पनेच्या जोरावर…! थोडक्यात सांगायचं म्हटलं तर अगदी अनादीकालापासून ते आतापर्यंत घ्या. जगात आगीचा शोध आदिमानवाने लावला आणि मग खऱ्या अर्थाने जगाची प्रगती सुरू झाली. तो शोध नुसता माणसाच्या लक्षात येऊन काय फायदा पण त्याने बरोबर त्याचा वापर प्रगतीसाठी केला….. तोपर्यंत तो कच्चे अन्न खात असावा. या शोधा नंतर तो अन्न शिजवून खायला लागला म्हणजेच प्रगतीचे दार पहिल्यांदा त्यानेच स्वतः उघडले असं म्हणावं लागेल.
तिथपासून पुढे माणूस वेगवेगळ्या शोधाच्या शोधात आपलं एक एक पाऊल पुढे टाकू लागला आणि त्याच्या हातून नवनवीन शोध लागू लागले. याचा बारीक विचार केला तर शोध लागण्याच्या अगोदर त्याबाबतीत मानवाच्या डोक्यात त्याविषयी स्वतःने कल्पिलेली गुढ कल्पना ही खूप महत्त्वाची. मी तर म्हणेल प्रत्येक शोधाचं मूळ याच कल्पनेत दडलेलं आहे. कोणत्याही क्षेत्रातला शोध घ्या…त्यामागे त्या शोधकर्त्याने प्रथम स्वतःच्या डोक्यात कल्पना जन्माला घातली आणि मग पुढे ती सिद्ध करण्याच्या दिशेने तो पावले उचलू लागला. या प्रवासात त्याला अनेक अडचणींना सामना करावा लागल्याची अनेक उदाहरणे आपल्या ऐकिवात आणि वाचनात आलेत. परंतु एवढं असूनही तो शोधकर्ता त्याच्या ध्येयापासून यत्किंचितही जेव्हा ढळत नाही तेव्हाच तो सिद्ध होत असतो. म्हणूनच आजवर जे जे लघुत्तम पासून महत्तम श्रेणीचे आणि गोष्टींचे जे शोध लागले त्यामागे कल्पना सावलीसारखी उभी असते.
जगात चाकाचा शोध लागला हा पण खूप महत्त्वपूर्ण शोध…!तो लागल्यानंतर माणसाच्या विकासाची गती कितीतरी पटींनी वाढली. त्याच पटीत माणूस दुसऱ्याही विषयांच्या शोधामध्ये लक्ष देऊ लागला आणि पृथ्वीवर चौफेर शोध लागू लागले. जगातल्या अनेक आश्चर्यकारक नोंद झालेल्या वास्तू सुद्धा कल्पनेचेच अविष्कार…! एक मात्र खरे तुमची कल्पनाशक्ती जेवढी दांडगी तितक्याच दर्जाचा उच्चतम शोध जगात कितीतरी म्हणीय शास्त्रज्ञांनी लावल्याची खूप उदाहरणे बघायला मिळतात. यदा कदाचित निर्मात्याने माणसाच्या डोक्यातून कल्पनाशक्तीच काढून जर घेतली तर त्याच क्षणी जग बंद पडेल इतकं प्राणवायूसारखं महत्त्व कल्पनेला आहे.
मनावर घेतलं की सगळं बरोबर होतं. मग ते काम लहान असो की मोठे . सांगायचं तात्पर्य एवढंच की यदाकदाचित तुम्हाला जर तुमचं वेगळेपण सिद्ध करायचं असेल तर तुमच्यात कल्पनाशक्तीला रुजवा. मग तो शोध साध्यातली साधी गोष्ट जरी असली तरी चालेल परंतु तशी गोष्ट निर्माण करणारे जगात तुम्ही एकमेव हवेत. म्हणून तुमच्या डोक्यातल्या कल्पनाशक्तीला खतपाणी घाला. वाढवा. चांगलं बहरू द्या. एक दिवस तुम्ही पण तुमच्या क्षेत्रात यशस्वी शोधकर्ते का होणार नाही…? नक्कीच व्हाल…..
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
