January 21, 2026
आ. संपतराव (नाना) माने यांच्या ३५ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या सहकार, शिक्षण, शेती व समाजकार्यातील सर्वस्पर्शी कार्याचा गौरवपूर्ण मागोवा.
Home » सर्वस्पर्शी विकासाचे शिल्पकार – आ. संपतराव माने
सत्ता संघर्ष

सर्वस्पर्शी विकासाचे शिल्पकार – आ. संपतराव माने

नानांनी त्यांच्या कार्याने, कर्तृबगारीने, धडाडीने, कष्टाने आणि चिकाटीने फक्त खानापूरच नव्हे तर संपुर्ण जिल्हयाचा सर्वस्पर्शी विकास घडवून आणला आहे. अशा या सर्वगुण संपन्न नानांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !

प्राचार्य डॉ जहॉगिर मुलाणी
श्री संपतराव माने महाविद्यालय खानापुर

खानापूर आटपाडी तालुक्याचे भाग्यविधाते, सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आमदार स्वर्गीय संपतराव (नाना) माने यांची १ ऑक्टोबर रोजी ३५ वी पुण्यतिथी. त्यांनी शेती उद्योग सहकार आणि शिक्षण अशा क्षेत्रात दीर्घकालीन विकासाच्या योजनासाठी सातत्याने आग्रही भूमिका घेत सर्वसामान्यांचा विकास घडवून आणण्यात महत्वाची भूमिका पार पाडली आहे. संपतराव माने तथा नानांचा जन्म ५ एप्रिल १९२५ रोजी कराड मधील उब्रज येथे झाला. तर देहावसान १ ऑक्टोबर १९९० रोजी सांगली येथे झाले. नानांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हान स्व वसंतदादांना राजकीय गुरू मानून चुलते स्व जी. के माने यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय कार्यकिर्दीला सुरुवात करून संपुर्ण जिल्हयाचा सर्वस्पर्शी विकास घडवून आणण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे.

नाना चालते – बोलते लोकविद्यापीठ –

समाजकार्याची आवड असलेल्या नानांनी सुरवातीस खानापुर ते विटा सायकलप्रवास करून गोरगरिबांची शासकीय कामे मार्गी लावली. खानापूर तालुका काँग्रेस समितीचे सचिव म्हणून राजकीय कार्यकिर्दीला सुरुवात करून सलग ८ वर्षे विटा मार्केट कमिटीचे चेअरमन म्हणून अनेकविध लोकापयोगी निर्णय घेतले. खानापूरसारख्या सातत्याने दुष्काळी भागाच्या केंद्रस्थांनी पाणीप्रश्न आहे. या भागाला पाणी मिळाले पाहिजे, सन १९७० च्या दरम्यान भरलेल्या राज्यव्यापी पाणी परिषदेत शेतीसाठी पाण्याचा प्रश्न हिरीरीने मांडला. सन १९६९ ते १९७८ भारत सहकारी सुतगिरणीचे चेअरमन म्हणुन तोट्यात चाललेली सुतगिरणी नफ्यात आणण्याची किमया नानांनी केली. सन १९७५ मध्ये मजूर सहकारी सोसायट्यांचे स्टेट फेडरेशन काढून ७५-८० पर्यंत संस्थापक चेअरमन म्हणुनही त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. सन १९७३ पासुन अखेरपर्यंत जिल्हा कॉगेस कमिटीचे अध्यक्षपद त्यांनी सांभाळत असताना संपुर्ण जिल्हाभर कार्यकर्त्याचे जाळे निर्मान केले.

सर्वसामान्यांना उचित न्याय मिळवुन देण्यासाठी सातत्याने ते अग्रेसर राहिले. सन १९८० ते १९८५ सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदी असताना जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन त्यांनी केलेल्या कार्याची दखल केंद्र सरकारला घ्यावी लागली. देशातील दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस सांगली जिल्हयास मिळाले. सन १९६२ मध्ये प्रथम खानापूर विधानसभा मतदार संघातून ते विधानसभेवर गेले. त्यानंतर १९६७, १९७२ आणि १९८५ च्या विधानसभा निवडणुका त्यांनी प्रचंड मतांनी जिंकल्या. एकही निवडनुक न हारणारे आणि सर्व सामान्य जनतेचा आशिर्वाद पाठिशी बाळगणारे नाना हे सांगली जिल्ह्यातील चालते – बोलते लोकविद्यापीठच म्हटले तर वावगे ठरणार नाही.

बहुजनांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा :

समाजातील गोरगरीब, कष्टकरी, सामान्य लोकांना शिक्षणाची सोय व्हावी या उदात्त हेतुने लोकांना ‘ शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. खानापुरसारख्या दूर्गम भागात शिक्षण प्रसारक संस्थेच्या निर्मितीतून सर्वांकरिता शिक्षणाचे दालन खुले करून दिले. ग्रामीण आणि डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय केली. खानापूरमध्ये उच्च शिक्षण सुलभ करण्यासाठी त्यांनी १९८३ मध्ये श्री. संपतराव माने महाविद्यालयाची स्थापना केली. नानांनी १९७१ पासून शेवटपर्यंत शिक्षण प्रसारक संस्था खानापूरचे अध्यक्ष म्हणून उल्लेखनीय काम केले. शिक्षण प्रसारक संस्थेने गेल्या पाच दशकात अनेकांना घडविले आहे. या संस्थेने अनेकांच्या जीवनाला आकार देत,. अनेकांची स्वप्ने साकार केलीत, अनेकांच्या मृत आशा – आकांक्षांना संजीवनी देऊन पल्लवित केल्यात, अनेकांचे अश्रू पुसलेत आणि अनेकांच्या ओठावर हसू निर्माण केलेय,.या शिक्षण संस्थेचे एक सिनियर , एक कृषी तंत्र आणि एक ज्युनियर कॉलेज , तीन हायस्कूल आणि एक प्रायमरी इग्लिश मेडियम स्कूलमधून सुमारे दीड ते दोन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.त्यामध्ये प्राथमिक ते पदवी आणि मुक्त विद्यापीठाचे पदवीत्तर शिक्षण तसेच कृषी तंत्र पदविका आणि पोस्ट गॅज्युएट डिप्लोमा इन कॉप्युटर अॅप्लीकेशन यासारखे बहुपर्यायी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

विद्वान सर्वत्र पूज्यते –

नानांनी घालुन दिलेला विद्यार्थीकेंदित शिक्षणाचा वस्तुपाठ संस्थेकडून पदोपदी जपला जात असुन संस्थेचे अध्यक्ष मा. राजकुमार दादा माने अॅड विराज माने श्री संग्राम माने यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची वाटचाल सुरळित सुरू आहे. नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनूषंगाने महाविद्यालयातुन २०२२-२३ पासून इव्हेंट मॅनेजमेंट, बालवाडी शिक्षक प्रशिक्षण , ग्रामीण पत्रकारिता, अॅग्रो टूरिझम, रिटेल बँकिग अशा व इतर विविध अभ्यासक्रमातुन कौशल्यप्रेरित शिक्षणास प्राधान्य दिले जात आहे. संस्थेकडून दिल्या जात असलेल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणातुन हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षक ,प्राध्यापक, पोलीस, डॉक्टर, वकील, प्रशासकीय सेवा, पत्रकारिता, खेळाडू आणि उद्योजक अशा व इतर वेगवेगळ्या क्षेत्रात दैदिप्यमान करियर करीत संस्थेचा नावलौकिक केला आहे. ज्यातुन ‘विव्दान सर्वत्र पूज्यते ‘ हे संस्थेचे ब्रीद सार्थ ठरत असल्याचा मला मनोमन आनंद आहे.

जिल्हयाचा सर्वस्पर्शी विकास :

कै संपतरावजी माने यांची राजकीय कारकीर्द अनेक बाबतीत अविस्मणीय राहीली आहे. नानांनी सांगली जिल्ह्यांत विविध राज्यस्तरीय स्वरुपाच्या संस्था आणून तसेच काही नव्या संस्था निर्मान करून त्यांना राज्य व राष्ट्रीय पातळीवर नावलौकिकासह त्यांना वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. समग्र जिल्हयाच्या सहकारी औद्योगिक क्षेत्रात मोलाची भर घातली आहे.नानांनी त्यांच्या कार्याने, कर्तृबगारीने, धडाडीने, कष्टाने आणि चिकाटीने फक्त खानापूरच नव्हे तर संपुर्ण जिल्हयाचा सर्वस्पर्शी विकास घडवून आणला आहे. अशा या सर्वगुण संपन्न नानांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

माजी आमदार संपतराव (नाना) माने यांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धा

स्वीट समतोल पुनर्कल्पित करणे: सुधारित साखर नियंत्रण आदेश, २०२५ अंतर्गत खांडसरी युनिट्सचा समावेश… परिणाम

परिवर्तनाच्या वाटेवर…

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading