गेल्या ४ व ५ ऑक्टोबर २०२५ ला सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ, पनवेलने श्री क्षेत्र शेगाव येथील ५ व्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मला प्रथमच श्री गजानन महाराजांच्या दर्शनाचा लाभ मिळाला. या साहित्य संघाशी मी दोन वर्षापासून जोडलेली आहे ते माझ्या लिखाणIमुळेच. आतापर्यंत श्री क्षेत्र शेगावच्या श्री गजानन महाराजांची ख्याती व महती फक्त ऐकलेली होती. पण तिथे गेल्यावर खरेच त्याची प्रचीती आली.
अॅड. सौ. सरीता पाटील,
वेदांत कॉम्प्लेक्स, ठाणे
शेगाव हे बुलढाणा जिल्ह्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. जे गजानन महाराज मंदिरासाठी लोकप्रिय आहे. शेगावला ‘विदर्भाचे पंढरपूर’ म्हणूनही ओळखले जाते. १९ व्या शतकात येथे श्री गजानना महाराज प्रकट झाले असे मानले जाते. श्री गजानन महाराजांना गणेश, दत्तात्रय आणि समर्थ रामदास स्वामी या देवतांचा अवतार मानले जाते. त्यांनी दोन वर्षे आधीच सांगून ८ सप्टेंबर १९१० रोजी समाधी घेतली.
महाराजांच्या समाधीवर भव्य मंदिर असून त्याची व्यवस्था ‘गजानन महाराज संस्थान करते, जे विदर्भातील सर्वात मोठे किंबहुना महाराष्ट्रातील एक मोठे आणि प्रसिद्ध सेवासंस्थान आहे. हे संस्थान श्री गजानन महाराज यांच्या अध्यात्मिक कार्यासाठी ओळखले जाते आणि धार्मिक, सामाजिक व वैद्यकीय सेवांसाठी प्रसिद्ध आहे. श्री क्षेत्र शेगाव हे श्री गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाले आहे. हे संस्थान केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरातील प्रसिद्ध सेवाव्रती संस्थान आहे आणि या ठिकाणी येणाऱ्या भक्तांची संख्या खूप मोठी आहे.
गेल्या ४ व ५ ऑक्टोबर २०२५ ला सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ, पनवेलने श्री क्षेत्र शेगाव येथील ५ व्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मला प्रथमच श्री गजानन महाराजांच्या दर्शनाचा लाभ मिळाला. या साहित्य संघाशी मी दोन वर्षापासून जोडलेली आहे ते माझ्या लिखाणIमुळेच. आतापर्यंत श्री क्षेत्र शेगावच्या श्री गजानन महाराजांची ख्याती व महती फक्त ऐकलेली होती. पण तिथे गेल्यावर खरेच त्याची प्रचीती आली.
आम्ही विदर्भ एक्स्प्रेसने संध्याकाळी ७ वाजता सी.एस.टी वरून बसलो होतो व पहाटे ४ वाजता शेगावला पोहोचलो. शेगाव स्टेशन वरून रिक्षाने आनंद-विहार भक्त निवासला पोहचलो. तिकडे पाच आसनी रिक्षाची स्वस्त सेवा उपलब्ध आहे. प्रत्येकी २० रु. भाडे आहे. त्यामुळे मीटर जरी नसले तरी रिक्षावाले नवीन प्रवाश्यांची रात्रीअपरात्री सुद्धा लुटालूट करत नाहीत. आम्ही आनंदविहार भक्तनिवासला २० मिनिटांतच पोहचलो.
प्रवेशद्वारातून आत गेल्यावर लगेच लेकुरवाळ्या विठूची शांत, भोळी पण भव्य प्रतिमा पाहून आमचे झोपेतले मन अगदी प्रसन्न झाले व हात आपोआपच जोडले गेले. तिथे गेल्यानंतरच निवासाचे बुकिंग होते. बाहेरचा प्रशस्त आवार बघून भक्तानिवासच्या भव्यतेची प्रचीती येते. गर्दी अगदी कमी होती कदाचित सिझन नसल्यामुळे असेल. पण बाहेर सुद्धा ठिकठिकाणी भक्तांना बसण्यास बाकड्यांची, स्वच्छतागृहांची, वैद्यकीय सेवांची, पिण्याच्या पाण्याची, लॉकरची उत्तम व्यवस्था आहे. बाहेरचे प्रशस्त, शांत आवार, मनाला मोहवणारी चाफ्याची व इतर विविध प्रकारची हिरवीगार झाडी पाहून मन अगदी प्रसन्न होते. आम्हाला सहा बेडची खोली मिळाली फक्त ९५० रु. एक दिवसाचे भाडे. खोलीपर्यंत सामान घेवून जाण्यासाठी ट्रालीची सुद्धा उत्तम सोय आहे. शिवाय खाजगी गाड्या, बस पार्किंग साठी भरपूर जागा आहे. निवासी खोल्यापण खूप स्वच्छ, नीटनेटक्या, अंघोळीसाठी गरम पाणी आणि तेही हवे तेवढे शिवाय ओल्या कपड्यांसाठी स्टँड आदी सुविधा होत्या. इतक्या कमी पैशात एवढ्या सोयी मिळतात खरेच नवल वाटते.
आनंद विहार भक्त निवास एकूण ३६ एकरमध्ये आहे. तिथे एकूण ४५०० भक्तांची राहण्याची, जेवणाची सोय आहे. सात्विक, साधे जेवण फक्त ७० रु. मध्ये हवे तितके मिळते. सकाळी चहा, कॉफी २० रु. मध्ये मिळते. कुठेही गर्दी, तक्रार, आवाज काहीही नाही सगळे कसे शांत, स्वच्छ व आल्हाद दायक वातावरण आहे.खोली सोडली की चावी खाली बॉक्समध्ये टाकायची. कोणीही तुम्हाला विचारत नाही की खोली तपासात नाहीत. आपण किती दिवस राहिलो ते सांगून काउंटरला पैसे भरायचे. अर्थात शेगावच्या पावन नगरीत कोणीच कोणाला फसवत नाहीत याची अनुभूती व ईथे सर्व व्यवहार एकमेकांच्या विश्वासावर चालतात. हे सर्व गजानन महाराजांच्यावरील अपार श्रद्धेमुळे शक्य होते.
सर्व सेवेकरी तत्परतेने व स्वेच्छेने, प्रामाणिकपणे, भक्तिभावाने कामे करत असतात. सर्व सेवेकरी पांढरा कुर्ता व पांढरा पायजमा परिधान करुन एवढ्या मोठ्या आवारात सतत झाडू घेऊन साफसफाई करत असतात व आपली निस्वार्थी सेवा श्रींच्या चरणी अर्पण करतात. सेवा भावी स्त्रियांना पण वेगळा गणवेश आहे. सर्व सेवेकरी झाडाचे एक पानही खाली पडू देत नाहीत. लगेच झाडू घेवून हजर असतात. कोणाचीच कामाविषयी तक्रार नाही सर्वजन अगदी निस्वार्थीपणे व शांतपणे आपापली सेवा देत असतात. भक्तांच्या पादुका ठेवण्यासाठी सगळीकडे भरपूर रॅक आहेत. आनंद विहार मधून भक्तांना गजानन महाराजांच्या मंदिरात व स्टेशनला जाण्यासाठी बसची मोफत सेवा आहे. गजानन महाराजांची महाराष्टात एकूण ४२ सेवा संस्थाने आहेत यातील शेगावचे “श्री गजानन महाराज संस्थान” सर्वात मोठी अध्यात्मिक संस्था आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळी दर्शनासाठी मंदिरात बसने गेलो. तिथेही सर्व सोयींनी युक्त भक्त निवास आहेत. मंदिराच्या बाहेर सुद्धा पिण्याचे पाणी, हात-पाय धुण्यासाठी वेगळी सोय, स्तनदा मातांसाठी, बालकासाठी, वृद्धांसाठी वेगळी सोय, वैद्यकीय सेवा ई. सोयी मोफत आहेत. पादत्राणासाठी भरपूर रॅक आहेत आणि तेही प्रत्येक कुटुंबासाठी वेगळा नंबर देवून एकत्र ठेवले जातात. समाधी दर्शनासाठी सुद्धा शिस्तबद्ध रांग, प्रत्येक ठिकाणी थोड्या अंतरावर दिशादर्शक बाण व सेवेकरी मार्गदर्शनासाठी बसलेले आहेत. ठीक-ठिकाणी पंखे , कुलर व वातानुकुलीत यंत्रणे बसवलेली आहेत. इतके सगळे अचूक व्यवस्थापन जगातील कोणत्याही व्यवस्थापन महाविद्यालयात मिळणार नाही. हे सर्व गजानन महाराजांवरील भक्तीमुळे शक्य होते.
दर्शन अगदी अर्ध्या तासांत होते. गर्दीच्या वेळी पण सर्व काही शिस्तबद्ध असते. असेच एक प्रचंड मोठे “विसावा” भक्त संकुल पण आहे. तिथेपण अशीच व्यवस्था आहे. या संस्थानाला जो देणगीच्या रुपात निधी मिळतो तो खरोखर लोक-कल्याणासाठी वापरला जातो. तो निधी उगाच भपकेबाजपणा दाखवण्याकरता वापरत नाहीत हेच दिसून येते. गजानन महाराज संस्थानांची अनेक अभियांत्रिकी व वैद्यकीय महाविद्यालये आहेत. अनेक गरजू, गरीब, व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना नक्कीच लाभ होतो.
शेगावमधील व्यवस्थापनाचे, स्वच्छतेचे, प्रामाणिकतेचे व शांततेचे धडे महाराष्ट्रातील किंबहुना देशातील सर्व तीर्थक्षेत्रांतील संस्थानांनी जर घेतले तर कुठेही गर्दी, चेंगराचेंगरी व आगीच्या घटना घडणार नाहीत याची शाश्वती नक्की आहे. कारण बऱ्याच तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भरपूर निधी जमतो पण त्याचा विनियोग चांगल्या कामांसाठी होताना दिसत नाही. बऱ्याच मंदिर संस्थानात भरपूर निधी जमतो पण अलीकडे तिथेही भ्रष्टाचार होताना दिसत आहे. शेगावमध्ये लोकांचा पैसा लोकांसाठी वापरला जातोय हे तेथील व्यवस्थापन व भाविकांना देत असलेल्या सोयीसुविधावरून दिसून येते. खरंच ‘ जेथे दया, क्षमा, स्वच्छता व शांती तेथे साक्षात देवाची वस्ती.’ या शाळेतील सुविचाराची प्रचीती शेगावमध्ये आल्यावाचून राहत नाही.
शेगावमध्ये जवळजवळ ३५० एकरावर पसरलेले याच संस्थानाचे “आनंद सागर” अध्यात्मिक व मनोरंजन केंद्र पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. इथेही भक्तांसाठी व लहान मुलांसाठी अनेक मनोरंजनाच्या सोयी उपलब्ध आहेत. शेगाव स्टेशनवरून आनंद सागरला जाण्यास मोफत बसची सोय आहे. मुलासाठी मनोरंजन पार्क, भारतभरातील संताचे दर्शन, आरो वाटरचे पिण्याचे पाणी, स्वामी विवेकानंद ध्यान केंद्र, फिश एक़्वेरीयम’ स्वस्त जेवण अश्या अनेक उत्तम सोयी आहेत. २००१ साली आनंद सागरची निर्मिती झाली आणि शेगावचे नाव जगाच्या नकाशावर झळकले.
अलीकडे १ नोव्हेंबर २०२५ रोजी आंध्रप्रदेशातील श्रीकाकुलम येथे व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरीमध्ये ९ लोकांचा मृत्यू झाला. याशिवाय हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात पण गर्दीमुळे ८ जणांचा मृत्यू, ओरिसामध्ये पुरी येथील जगन्नाथ मंदिराच्या वार्षिक रथयात्रेत ३ लोकांचा मृत्यू, प्रयागराज येथील महाकुंभ मधील ३० भाविकांचा मृत्यू अश्या अनेक घटना सांगता येतील. म्हणूनच गर्दीचे जर व्यवस्थापन चांगले, शिस्तबद्ध असेल व आपत्कालीन समन्वय असेल तर नक्कीच अश्या दुर्देवी घटना टाळता येतील. त्यासाठी श्री क्षेत्र शेगाव व्यवस्थापन क्षेत्रातील एक उत्तम गुरुचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवावे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.

ज्ञानेश्वरी केवळ वाचायची नाही, तर जगायची…