ओळख: वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..! ..२ – सोनाली बडे
स्वतःचा झालेला बालविवाह मोडून शिक्षणाची कास धरून नर्सिंगचा कोर्स स्वतःच्या हिंमतीवर पूर्ण करून एका मोठ्या हॅास्पिटलमधे नोकरी करून समाजातील अनेक मुलींचा आदर्श बनणाऱ्या या आधुनिक दुर्गेला मानाचा मुजरा..!!
ॲड. शैलजा मोळक
लेखक, कवी, संपादक, प्रकाशक
अध्यक्ष, शिवस्फूर्ती प्रतिष्ठान पुणे
मो. 9823627244
बीड तालुक्यातील शिरूर कासार या गावातील सोनालीचा वयाच्या १३ व्या वर्षी बालविवाह केला गेला. तिला शिकायचे होते. लग्न म्हणजे काय ? हे न कळत्या वयात तिच्या पालकांनी तिचे लग्न केले होते. आई वडिल ऊस तोड कामगार. घरात तीन बहिणी आणि त्यांच्या पाठी चौथा जन्मलेला भाऊ. आई वडील लहान मुलांना सोडून ऊस तोडणी करण्यासाठी जायचे.
मुलांना कोण सांभाळणार आणि त्यातही मुलीची जबाबदारी कोण घेणार यामधून कमी वयातच सोनालीच्या लग्नाची चर्चा सुरू झाली. बीडमध्ये त्यावेळी सर्रास बालविवाह होत असत. त्याला अनेक प्रतिष्ठित माणसं अगदी सरपंच वगैरे उपस्थित रहात असत. त्यामुळं त्याकडे तो गुन्हा किंवा चूक आहे असं कोणाला वाटत नव्हतं. ‘लग्नासाठी मुलगी पाहण्यासाठी यायचे तेव्हाही आपल्याला शाळेतून ओढत घरी आणलं जायचं आणि मग मुलगी पाहण्याचा कार्यक्रम पार पडायचा,’ असं सोनाली सांगते. पण प्रत्येक वेळी ती घरी एकच विनंती करायची. ती म्हणजे तिचं शिक्षण पूर्ण होऊ देण्याचं.
सोनाली सांगते, दहावी पूर्ण करण्याआधी मुलींची लग्न होणं हे तिच्या भागात नेहमीचं. त्यामुळे ती लग्नाला तयार का होत नाही ? असा प्रश्न तिच्या पालकांना पडत होता. त्यातच मोठ्या बहिणीचाही बालविवाह झाला होता. सोनाली मात्र शिक्षण पूर्ण करण्याचं स्वप्न पाहत होती. पण ९ वी मध्ये असताना मात्र तिला फारसा विचार करायलाही वेळ मिळाला नाही इतकं वेगाने तिचं लग्न ठरवलं गेलं आणि लागलंही. तिच्या समाजात शिकली तर ती जास्त शहाणी होईल, आपलं नाव खराब करेल, वाईट मार्गाला जाईल असा घरातील इतर माणसांचा दबाव होता. त्यामुळे एके दिवशी तिचे काहीही न ऐकता नाशिकचा तिशीतील मुलगा आला त्याने पाहिले, तिला पसंत केले. दुसऱ्याच दिवशी बैठक होऊन चुलत्यांनी लग्न ठरवून अडीच लाख घेतले व तिसऱ्या दिवशी तिचे लग्न करून दिले. लग्न नको म्हटलं की घरी तिला आई मारहाण करायची. तिने लग्न करावं म्हणून तिच्या वडीलांनी थेट आत्महत्या करण्याचीच धमकी दिल्याचं ती सांगते. त्याच दरम्यान मुलीच्या कारणावरूनच शेजारच्या एका काकांनी फास लावून घेतला होता. त्यामुळे तिला सगळे म्हणायला लागले की ‘’आई-वडील मेल्यानंतर तू कोणाकडे बघणार आहेस?”
आलेला मुलगा शिकवेल तुला असं खोटं सांगून तिला लग्नाला तयार केलं. अगदी बापाने आईला व तिला हळदीच्या दिवशीही मारले. आईला होणारी मारहाण, लग्नासाठीचा दबाव या सगळ्या परिस्थितीत सोनाली अडकली होती. मात्र आपल्या सोबत जे घडतंय ते योग्य नाही याची जाणीव तिला होती. या दोन दिवसांच्या गडबडीतही १३ वर्षांच्या या चिमुरडीने दाद मागण्यासाठी पोलीस स्टेशन गाठलं. पण तेथे बालविवाह नित्याचेच असल्यानेही तिला तिथेही दाद मिळाली नाही.
मारून मारून तिला आईबापाने तयार केले. लग्न झालं. पोलीस आणि सरपंचांचीही लग्नाला हजेरी असल्याचं ती सांगत होती. सोनालीच्या लग्नाचे विधी सुरू झाले ते शाळेच्या परिसरातील मंदिरातच. समोर दिसणारी शाळा पाहून सोनालीला रडू आवरत नव्हते. वऱ्हाड नाशिकला जात असताना तिने श्रीरामपूरमधे गाडीतून उडी मारली. तिला भरपूर दुखापत झाली. तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट केले. ती पळून तिच्या काकांकडे पोहोचली होती. काकांनी तिच्या वडीलांना फोन केला तेव्हा ते म्हणाले, ‘लग्न करून दिलेय तेव्हा ती आता मेल्यानंतर सांगा. आम्ही कोणी येणार नाही.’ थोड्या दिवसात ती बरी होऊन पुन्हा माहेरी आली. नवऱ्याने माहेरी येऊन तिला खूप मारहाण केली. त्याने परत न्यायचा खूप प्रयत्न केला पण ती गेली नाही.
वय वर्ष १३ असले तरीही ती खूप जिद्दी व हट्टी होती. माहेरी परत आल्याने आई वडीलांनी तिला प्रचंड त्रास द्यायला सुरुवात केली. तिला ऊसतोडीला घेऊन जाणे, घरातील सारी कामे करायला लावणे, मारहाण करणे हे सुरुच होते पण तिची शाळा तिने सुरु ठेवली.
तिचा नवरा तिला वारंवार घ्यायला यायचा पण तो घरी असेपर्यंत ती डोंगरात फिरायची. घरी येताना कधी चाकू तर कधी ब्लेड घेऊन यायची. अशा परिस्थितीत सोनालीने शिक्षण मात्र सुरू ठेवलं. पुस्तकांना पैसे नाहीत म्हणून लोकांच्या शेतात काम करायला जाऊन ७०/-रुपये रोजाने पैसे कमवायची. सगळा त्रास सहन करत ती कशीबशी १२ वी झाली. लग्नाच्या प्रसंगानंतर तिने २/३ वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला. विहिरीत उडी मारली. औषध पिले पण मी मेले नाही असे ती म्हणाली. आता मी मरत नाही तेव्हा काहीतरी केलं पाहिजे असं तिने ठरवलं. अशातच दोन वर्षं गेली.
याच दरम्यान तिची गाठ गावातील एका आशा सेविकेशी पडली आणि तिच्या मदतीने सोनालीने पुढच्या शिक्षणासाठी घराबाहेर पडण्याचा निर्धार घेतला. सातारच्या अॅड. वर्षा देशपांडे यांनी घेतलेल्या महिला मेळाव्याला ती काही मुलींसोबत गेली. सुमारे साडेचार हजार महिलांचा मेळावा होता तो. त्या बालविवाह थांबवण्यासाठी प्रयत्न करतात याची माहिती मिळाली. तेथे तिने धाडसाने स्टेजवर जाऊन स्वतःची कहाणी मांडली. ते ऐकून वर्षा देशपांडे यांनी अनेक मुलींना सातारा येथे शिक्षणासाठी आणले. त्यात तिनेही साताऱ्याला जाण्याचा निश्चय केला. पण हाताशी पैसे मात्र नव्हते. त्यावेळी लग्नातलं मंगळसूत्र तिच्या उपयोगी पडलं. आईकडे असलेलं ते मंगळसूत्र चोरून तिने ते विकलं. त्याच्या किंमतीची जाण नसणाऱ्या सोनालीने तेव्हा गरज असलेले ५ हजार रुपयेच त्या मंगळसूत्राच्या बदल्यात घेतले आणि सातारा गाठलं.
साताऱ्यात आली तेव्हा वर्षा देशपांडेंनी सुरू केलेल्या वेगवेगळ्या प्रशिक्षणाची माहिती तिला मिळाली. त्यात मग नर्सिंगचा कोर्स पूर्ण करण्याचा निश्चय तिने केला. प्राथमिक पातळीवरचा नर्सिंगचा कोर्स तेव्हा साताऱ्यात शिकवला जात होता. तो पूर्ण करून नोकरी करण्यासाठी सोनालीने पुणे गाठलं. दरम्यान ॲड. वर्षा देशपांडे यांच्या संपर्कात आल्याने ती धीट बनली. पंख फुटलेली मुलगी, लेक लाडकी अभियान या संस्थेच्या माध्यमातून विविध पथनाट्यात तिने काम केले. प्रबोधनाचे विविध कार्यक्रम करताना प्रचंड आनंद मिळू लागला असे ती सांगते.
विविध रुग्णालयातून नर्स म्हणून काम करत असताना तिला पुढच्या शिक्षणाबद्दल माहिती मिळाली. पण पुन्हा पैश्यांचा प्रश्न उभा होताच. मग काम करून पैसे साठवत दर वर्षाची एक लाखाची फी भरत तिने जेएनएमचा नर्सिंगचा अभ्यासक्रम तिने पूर्ण केला. सध्या ती पुण्यात एका मोठ्या रुग्णालयात काम करते. २६ वर्षांची सोनाली आता स्वत:च्या पायावर उभी आहे. तिच्या या प्रयत्नांमुळे तिच्या पाठच्या बहिणींना १२ वी पर्यंत का होईना शिकण्याची संधी मिळाली आहे. आता तिच्या घरचे सारे तिच्याशी गोडीने बोलतात. आईबापाच्या गरजेला ती पैसेही पाठवते. तिच्या ३ बहिणी व एक भाऊ सर्वांची लग्ने आईबापाने केली. पण तिच्या लग्नाचे मात्र ते पहात नाहीत. याची खंत ती व्यक्त करते.
आज तिच्या धाडसाने, तिने केलेल्या संघर्षाने अनेक मुली नाही म्हणायला शिकल्या आहेत. तिने एक दोन मुलींची लग्ने थांबवली आहेत. जे आपल्याला भोगायला लागले ते इतरांनी सोसू नये यासाठी ती प्रयत्नशील आहे. ‘आज जे काही ती आहे ते ॲड. वर्षा यांचेमुळे. त्या माझ्या आयुष्यात आल्या नसत्या तर आज मी कुठे असते ? आई सोबत कधीच नव्हती पण वर्षा मॅडम कायम सोबत आहेत. त्यांचे उपकार मी कधीच फेडू शकणार नाही’ अशा भावनिक शब्दांत सोनाली कृतज्ञता व्यक्त करते.
स्वतःचा झालेला बालविवाह मोडून शिक्षणाची कास धरून नर्सिंगचा कोर्स स्वतःच्या हिंमतीवर पूर्ण करून एका मोठ्या हॅास्पिटलमधे नोकरी करून समाजातील अनेक मुलींचा आदर्श बनणाऱ्या या आधुनिक दुर्गेला मानाचा मुजरा..!!
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
