स्टेटलाइन – डॉ. सुकृत खांडेकर
सरन्यायाधीश गवईंवर सर्वोच्च न्यायालयात बूट फेकून मारल्याची घटना दुपारी साडेबारा वाजता घडली, सर्व राजकीय पक्षांकडून या घटनेचा निषेध केला जात असताना भाजपचे सर्व राष्ट्रीय नेते व प्रवक्ते चूपचाप बसले होते. रात्री साडेआठ वाजता पंतप्रधानांनी ट्वीट करून या घटनेचा निषेध नोंदवला. तोपर्यंत सोशल मिडियावर गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाचे कौतुक चालू होते, वृत्तवाहिन्यांवर त्याच्या मुलाखती चालू होत्या.
डॉ. सुकृत खांडेकर
सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू असताना एका वकिलाने, सनातन का अपमान, नही सहेगा हिंदुस्थान अशा घोषणा देत सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकून मारला, या घटनेने सर्वसामान्य माणूसही हादरला. सर्वच राजकीय पक्षांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. देशात चोहोबाजूने संताप प्रकटला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरन्यायाधीश गवई यांना फोन करून या घटनेचा निषेध केला. पण संसदीय लोकशाहीत देशाच्या न्यायव्यवस्थेचे सर्वोच्च मंदिर असलेल्या सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांवर वकिलच बूट फेकून मारतो ही घटनाच मती गुंग करणारी आहे. न्यायव्यवस्थेत सरन्यायाधीश हे सर्वोच्च स्थान आहे. त्या वकिलाची त्यांच्यावर बूट फेकून मारण्याची हिम्मत झालीच कशी ? सनातन धर्माचा अपमान झाला म्हणून आपण सरन्यायाधीशांचा बदला घेण्याचा प्रयत्न केला हे त्या वकिलाला देशाला दाखवून द्यायचे होते की कोणाला खूश करण्यासाठी त्याने हे कृत्य केले ?
सरन्यायाधीशांवर बूट फेकून मारणारा वकिल ७२ वर्षाचा आहे. त्याला पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले पण त्याला अटक करून कोठडीत का रवानगी केली नाही ? म्हणे, त्याच्या विरोधात कोणी तक्रार दिली नाही. त्याची चौकशी करून त्याला पोलिसांनी घरी सोडले. सर्वसामान्य माणूस सर्वोच्च न्यायालयात सहज प्रवेश करू शकत नाही. सरन्यायाधीशांपर्यंत पोचू शकत नाही. न्यायव्यवस्थेला सुरक्षा व्यवस्थेने घेरलेले असते. पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री यांच्या दौऱ्यात रस्त्यावर कोणी काळे झेंडे दाखवले तरी पोलीस त्याची उचलबांगडी करतात, त्याला पोलिसी हिसका दाखवतात व त्याच्यावर गुन्हे नोंदवले जातात. मग सरन्यायाधीशांवर भर कोर्टात बूट फेकणारे ज्येष्ठ वकील राकेश किशोर याची सहज सुटका कशी होऊ शकते ? तो म्हणतो- या कृत्याचा आपणास मुळीच पश्चात्ताप होत नाही, आपण तुरूंगात जाण्यास तयार आहोत. मी माफी मागणार नाही. दैवी शक्तिने हे काम माझ्याकडून करवून घेतले. हा वकिल दिल्लीतील मयुर विहारमधे राहतो.
मध्य प्रदेशमधील खजुराहोच्या जावरी मंदिरात भगवान विष्णुची मूर्ती आहे. तिच्या जीर्णोव्दाराच्या केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू होती. हा विषय न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात नसून पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत आहे असे सरन्यायाधीश व न्या. विनोद चंद्रन यांनी वकिलाना वारंवार सांगून पाहिले, पण भगवान विष्णुचे नाव घेत तो वकिल आपले म्हणणे सतत मांडत राहीला. जर तो भगवान विष्णुचा भक्त असेल तर त्याने त्यांना प्रार्थना करावी, असे भाष्य सरन्यायाधीशांनी केले. पण विश्व हिंदु परिषदेने त्यांच्या वक्तव्याला आक्षेप घेतला व न्यायधीशांनी बोलण्यावर नियंत्रण ठेवावे असे म्हटले. सरन्यायाधीश गवई यांनीही तत्काळ आपण सर्व धर्मांचा विश्वास करतो व सर्व धर्मांचा आदर करतो असे म्हटले. खरं तर हा विषय इथेच संपायला हवा होता. पण सरन्यायाधीशांच्या वक्तव्याने हिंदु धर्माच्या श्रध्देची थट्टा केली, अशा प्रतिक्रियांचा सोशल मिडियावर पाऊस पडला.
या घटनेनंतर स्वत: गवई यांनी म्हटले की, अशा प्रकारामुळे विचलीत होऊ नका, आम्ही विचलीत झालेलो नाही. अशा गोष्टींनी मला काही फरक पडत नाही. या घटनेनंतर पंतप्रधान मोदींनी गवई यांना लगेचच फोन केला, मोदींनी म्हटले – आपल्या समाजात अशा कृत्यांना समाजात स्थान नाही. हे निषेधार्ह आहे. सरन्यायाधीशांनी दाखवलेला संयम कौतुकास्पद आहे.
भूषण गवई हे देशाचे दुसरे दलित सरन्यायाधीश आहेत. त्यांच्याअगोदर बालकृष्णन हे दलित सरन्यायाधीश होते. न्यायसंस्थेच्या सर्वोच्च पदावरअसलेले गवई हे दलित आहेत म्हणून काही घटकांना रूचलेले नाही का ? देशात किंवा राज्यात सत्तेच्या परिघात असलेल्या प्रमुख नेत्यावर असा हल्ला झाला असता तर भाजपाने देशभर रान पेटवले असते. पण सरन्यायाधीश गवईंवर सर्वोच्च न्यायालयात बूट फेकून मारल्याची घटना दुपारी साडेबारा वाजता घडली, सर्व राजकीय पक्षांकडून या घटनेचा निषेध केला जात असताना भाजपचे सर्व राष्ट्रीय नेते व प्रवक्ते चूपचाप बसले होते. रात्री साडेआठ वाजता पंतप्रधानांनी ट्वीट करून या घटनेचा निषेध नोंदवला. तोपर्यंत सोशल मिडियावर गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाचे कौतुक चालू होते, वृत्तवाहिन्यांवर त्याच्या मुलाखती चालू होत्या. त्याने सरन्यायाधीशांवर बूट फेकून मोठी मर्दुमकी गाजवली आहे असे त्याचे कौतुक चालू होते. तो जणू नायक आहे असे त्याचे समर्थन केले जात होते. सरन्यायाधीशांनी सनातन धर्माची बदनामी केली असा सोशल मिडियावर धुव्वाधार प्रचार केला गेला, त्यावर सरकार काही कारवाई करीत नाही, याचेच मोठे आश्चर्य वाटते.
आपल्यावर झालेल्या हल्ल्ल्याचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी मुळीच भांडवल केले नाही. उलट त्यांनी त्या वकिलाचा बूट पोलिसांच्या स्वाधीन केला. पोलिसांनीही त्या वकिलाला चार तास ताब्यात ठेऊन त्याच्यावर गुन्हाही नोंदवला नाही. उलट त्याला चहा – नाष्टा दिला, त्याला जेवण दिले व त्याचा बूट परत करून त्याला घरी सोडून दिले. हे सर्व पोलिसांनी कुणाच्या सुचनेवरून केले. म्हणे त्या वकिलाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाने तक्रार नोंदवली नाही म्हणून कारवाई नाही. दिल्लीचे पोलीस हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतात, म्हणूनच त्या वकिलाला राजकीय संरक्षण मिळाले का ? सरन्यायाधीशांनी त्यांच्या पदाला व प्रतिष्ठेला साजेशी सामंजस्याची व शांतीची भूमिका घेतली तर त्यांच्यावर बूट फेकणाऱ्या वकिलाला पोलिसांनी व्हिआयपी वागणूक दिली.
न्यायालयात अजून आरक्षण सुरू झालेले नाही. सरन्यायाधीश गवई हे आपल्या गुणत्तेवर सरन्यायाधीश पदावर पोचलेले आहेत. त्याचे वडिल रा. सु. गवई हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष होते. महाराष्ट्र विधान परिषदेत अनेक वर्षे सभापती होते. संसदेत खासदार होते. बिहार व केरळचे राज्यपाल होते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर त्यांनी बौध्द धर्माचा स्वीकार केला. स्वत: भूषण गवई सर्व धर्माच्या मंदिरात व धार्मिक स्थळांमधे जातात, सर्व धर्माचा आदर करतात, असे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनीच म्हटले आहे. मग त्यांच्याकडून सनातन धर्माचा अपमान झाला अशी आवई उठवून त्याचे भांडवल का करण्यात आले ?
सोशल मिडियावर तर सरन्याधीशांवर टीका करण्याचा अतिरेक झाला. त्यांची इम्पिचमेंट करा, राजीनामा द्या असे संदेश व्हायरल झाले. गवई हे हिंदु विरोधी आहेत असा प्रचार झाला. मग पोलीस – प्रशासन बघ्याची भूमिका का घेत आहे ? ज्येष्ठ विधिज्ञ कबिल सिबल यांनी गवईंवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करणारे पहिले ट्वीट केले त्यानंतर इतरांना जाग आली. गवईंनी मॉरिशसमधे बोलताना भारतात कायद्याचे राज्य आहे, बुलडोझरचे नाही असे म्हटले होते. त्यावरूनही सोशल मिडियावर गवई हे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात आहेत, असा प्रचार केला गेला. सरन्यायाधीश म्हणून गवईंनी शपथ घेतल्यावर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या वकिलांचे गवईंनी जय भीम म्हणन स्वागत केले होते, याची आठवण आज करून दिली जात आहे. जय भीम म्हणणे हे काहींना रूचले नाही का ? कर्नाटकचे भाजपचे नेते व बंगळुरूचे माजी पोलीस आयु्क्त भास्कर राव यांनी तर बूट फेकणाऱ्या वकिलाचे कौतूक केले आहे. त्याने जी भूमिका घेतली तसे ते वागले. त्यांच्या धाडसाचे कौतूक करतो, असे म्हटले आहे.
राहुल गांधी, सोनिया गांधी, शरद पवार, अरविंद केजरीवाल, मायावती, केरळचे मुख्यमंत्री विजयन अशा विविध पक्षांच्या नेत्यांनी सरन्यायाधीशांवर झालेल्या हल्ल्याचा कडक शब्दात निषेध केला. गवईंच्या दिशेने वकिलाने बूट फेकून मारावा असे त्यांचे वक्तव्य होते का ? गवईंच्या बोलण्यातून सनातन धर्माचा अपमान झाला अशी जी आवई उठवली गेली, त्यामागे योजनाबध्द कारस्थान होते का ? यापुर्वी डॉ. मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, लालकृष्ण अडवाणी, राहुल गांधी, शरद पवार, अरविंद केजरीवाल, ओमर अब्दुल्ला, नितीन गडकरी यांच्यावरही बूट फेकल्याच्या घटना घडल्या होत्या. सरन्यायाधीशांवरील हल्ल्याची इंग्रजी व भाषिक वृत्तपत्रांनी दखल घेतली पण वृत्तवाहिन्यांनी या घटनेला फारसे महत्व दिले नाही.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
