स्टेटलाइन –
सर्वात महत्वाचे म्हणजे सर्वांना जे अपेक्षित होते तो रशिया- युक्रेन युध्दविरामाचा निर्णयही झाला नाही. म्हणूनच या भेटींनंतर सरस कोण ठरले की ट्रम्प की पुतिन या प्रश्नाने सर्व जगात काहूर माजले आहे.डॉ. सुकृत खांडेकर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांच्या भेटीत अलास्का येथे तीन तास चर्चा झाली पण त्यातून काय निष्पन्न झाले, या प्रश्नाचे गूढ कायम आहे. दोन्ही शक्तिशाली नेत्यांच्या भेटीकडे सर्व जगाचे लक्ष लागून राहिले होते, या भेटीत ते दोघे जो निर्णय घेतील किंवा ते जे ठरवतील त्याचा संपूर्ण जगावर परिणाम होणार हे निश्चित होते. पण गेले महिनाभर गाजावाजा करून झालेल्या या भेटीत या दोन्ही नेत्यांत कोणताही समझौता झाला नाही किंवा करार झाला नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे सर्वांना जे अपेक्षित होते तो रशिया- युक्रेन युध्दविरामाचा निर्णयही झाला नाही. म्हणूनच या भेटींनंतर सरस कोण ठरले की ट्रम्प की पुतिन या प्रश्नाने सर्व जगात काहूर माजले आहे.
दोन शक्तिशाली देशांच्या प्रमुखांची ही ठऱवून झालेली भेट होती. अशा उच्चस्तरीय भेटीसाठी दोन्ही देशांचे मंत्री व सचिव पातळीवरील वरिष्ठ अधिकारी हे अगोदरपासून चांगली तयारी करतात, उत्तम गृहपाठ व उत्तम उजळणी करतात ही तर पध्दतच आहे. दोन राष्ट्रप्रमुखांनी कोणत्या मुद्यांवर चर्चा करायची व कोणत्या मुद्यांना प्राधान्य द्यायचे याचाही अगोदर खल झालेला असतो मग महत्वाच्या मुद्यांवर दोन्ही नेत्यात तीन तासाच्या चर्चेनंतर एकमत का होऊ शकले नाही ? कोणाच्या कठोर व हटवादी भूमिकेमुळे दोन्ही नेत्यात समझौता होऊ शकला नाही ? हजारो सैनिकांचे व लक्षावधी निरापराध नागरीकांचे बळी गेल्यानंतरही रशिया- युक्रेन युध्दविरामाची घोषणा का होऊ शकली नाही ?
तीन तासाच्या चर्चेनंतर ट्रम्प आणि पुतिन यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली पण अवघ्या बारा मिनिटात ती संपली. जगभरातून आलेल्या पत्रकारांच्या कोणत्याही प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले नाही. बैठक सकारात्मक झाली, काही मुद्यांवर सहमती झाली पण कोणताही करार झालेला नाही, असे दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केले. सन २०१५ नंतर म्हणजेच दहा वर्षांनी पुतिन अमेरिकेत आले होते. ते रेड कार्पेटवर येताच ट्रम्प यांनी स्वत: त्यांचे स्वागत केले. पुतिन व ट्रम्प एकाच मोटारीतून बैठकीसाठी रवाना झाले. अलास्का २५ असे शब्द लिहिलेल्या मंचावर दोन्ही नेत्यांनी उभे राहून फोटो काढून घेतले. पण बैठकीतून फलनिष्पत्ती काहीच नाही असे म्हणावे लागेल. बैठक सकारात्मक झाली पण कोणताही सौदा झाला नाही, जो पर्यंत सौदा होत नाही तो पर्यंत समझौता होणार नाही हेच संकेत या बैठकीतून दिले गेले.
खरे तर दोन्ही नेत्यांत थेट भेट होणार असे ठरल होते, पण चर्चेच्या वेळी दोन्ही देशांचे वरिष्ठ अधिकारी व मंत्री उपस्थित होते. या बैठकीनंतर यु्ध्दविरामाची घोषणा होणार का, याकडे सर्व जगाचे लक्ष लागले होते. तसेच ऱशिया व अमेरिका यांच्यातील संबंधाविषयी नवीन पावले काय उचलली जाणार आहेत. याचीही जगात सर्वांना उत्सुकता होती. पण या दोन्ही मुद्यांवर दोन्ही नेत्यांनी कोणतेही भाष्य केले नाही. ट्रम्प व पुतिन यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली अशाच प्रतिक्रिया जगातून उमटत आहेत. बैठकीत सन्मानजनक चर्चा झाली असा सूर पुतिन यांनी लावला आहे. तर पुतिन यांच्याशी थेट चर्चा करण्यासाठी अमेरिका एका टेबलावर पोचली हे ट्रम्प यांनी दाखवून दिले, एवढेच म्हणता येईल. चर्चा होईल पण निर्णय आपल्या शर्तीनुसार घेतले जातील यावर पुतिन बैठकीत ठाम राहिले असा एक अर्थ काढला जातो आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, बैठक चांगली झाली, उपयोगी ठरली, काही मु्द्यांवर सहमती झाली पण काही मुद्यांवर बाकी आहे… म्हणजेच ट्र्म्प व पुतिन यांच्या तीन तासाच्या चर्चेत कोणत्याही प्रमुख मुद्यावर एकमत होऊ शकलेले नाही हाच त्याचा अर्थ आहे. बारा मिनिटांच्या पत्रकार परिषदेला सुरूवात पुतिन यांनी केली व तेच अधिक वेळ बोलले. ही पत्रकार परिषद पुतिन यांची होती व ट्रम्प त्याला उपस्थित राहिले असे चित्र त्यावेळी दिसले. हे दोन्ही नेत्यांनी असे ठरवून केले का याचा मात्र उलगडा झालेला नाही. रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांना जास्त कर लावले जातील अशी धमकी काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी भारतासह अनेक देशांना दिली होती. मात्र तेल खरेदी करणाऱ्या चीनवर तत्काळ टेरिफ लावण्याचा विचार नाही असे सांगून त्यांनी घुमजाव केले होते. चीन व भारत हे रशियाकडून तेल खरेदी करणारे मोठे देश आहेत. भारतावर अमेरिकेने २५ टक्के टेरिफ लावले आहेच.
सन २०२० मधे अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत टपाल मतदानात घोटाळा झाल्याचे पुतिन यांनीच ट्र्रम्प यांना संगितले. त्या निवडणुकीत ट्रम्प यांना पराभव पत्करावा लागला होता. स्वत: ट्रम्प यांनी बैठकीनंतर फॉक्स वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली. सन २०२२ मधे ट्र्म्प राष्ट्राध्यक्ष असते तर युक्रेन- रशिया युध्द झालेच नसते, अशीही पुष्टी पुतिन यांनी जोडल्याचे आता पुढे येत आहे.
अलास्का बैठकीत युक्रेनबरोबर युध्दविरामाचा निर्णय झाला नाही हा पुतिन यांचा विजय असल्याचे अनेकांना वाटते. पुढील बैठक मॉस्कोमधे घ्यावी असे पुतिन यांनी ट्रम्प यांना निमंत्रण दिले आहे. पण ट्र्म्प, पुतिन व युक्रेनचे प्रमुख झेलंस्की अशा त्रिपक्षीय बैठकीनंतरच युध्दविराम होऊ शकतो असे अनेकांना वाटते. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत- पाकिस्तान युध्द आपण थांबवले असे किमान २८ वेळा सांगितले आहे. आपल्याला जगात शांतता निर्माण करायची आहे म्हणून युध्दविरामासाठी ते दबाव टाकून प्रयत्न करीत आहेत. पण पुतिन यांनी आपला हेका सोडलेला नाही. युक्रेनमधील भू भाग घेतल्याशिवाय युध्द थांबणार नाही ही पुतिन यांनी त्यांची भूमिका कायम ठेवली आहे. अलास्कामधील बैठकीचा परिणाम म्हणून रशिया व युक्रेन या दोन्ही देशातील युध्दकैद्यांची नजिकच्या काळात देवाण- घेवाण होईल , एवढा एकच आशेचा किरण दिसतो आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
