March 11, 2025
Tuma Tree Discovered in Shahuwadi First Record for Kolhapur District
Home » ‘Tuma’ Tree Discovered in Shahuwadi | First Record for Kolhapur District
संशोधन आणि तंत्रज्ञान

शाहुवाडीमध्ये आढळला ‘तुमा’ वृक्ष’: कोल्हापूर जिल्ह्यासाठी प्रथमच नोंद

संख्येने अत्यंत कमी आणि दुर्मिळ असलेल्या तुमा आणि यासारख्या इतर वृक्षांची नोंद हेरीटेज वृक्ष म्हणून केली पाहिजे. जेणेकरून अशा वृक्षांचे जतन आणि संवर्धन करणे सोपे होईल. तसेच या सुंदर आणि आकर्षक वृक्षाची मर्यादित लागवड करण्यास हरकत नाही.

डॉ. मकरंद ऐतवडे

कोल्हापूर जिल्हा हा जैविविधतेने समृद्ध आहे. मलकापूर येथील प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. मकरंद ऐतवडे यांना शाहुवाडी येथे आकर्षक सुंदर असा ‘तुमा वृक्ष’ एका डोंगरावर फुललेला आढळला. डॉ. मकरंद ऐतवडे यांना शाहुवाडीकडे जाताना ओकोली मार्गावरील एका डोंगरावर गुलाबी फुललेले झाड दिसले. हे झाड कोणते आहे हे पाहण्यासाठी डॉ. ऐतवडे आणि त्यांचे सहकारी डॉ. पांडुरंग बागम हे त्याठिकाणी गेले असता त्यांना ते झाड तुमा वृक्ष असल्याचे स्पष्ट झाले.

या वृक्षाची दोन झाडे कोल्हापूर शहरातील ताराबाई पार्क येथील क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके उद्यानात डॉ. ऐतवडे यांना सर्वप्रथम आढळली आहेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या वनस्पतीकोशात या वृक्षाची नोंद नाहीं आहे. त्यामुळे तुमा वृक्षाची कोल्हापूर जिल्ह्यासाठी प्रथमच नोंद होत आहे. हा विदेशी वृक्ष असून त्याचे मुळस्थान आहे म्यानमार, थायलंड, कंम्बोडिया आणि व्हिनेतनाम, अनेक देशात सुंदर फुलांसाठी या वृक्षाची लागवड बागांमध्ये करण्यात आली आहे.

तुमा या पर्णझडी वृक्षाचे शास्त्रीय नाव “मिलेशिया पेगूएन्सिस” (Milettia Peguensis) असे असून हा वृक्ष “फॅबेसी” (Fabaceae) म्हणजेच करंज यांच्या कुळातील आहे. बंगाली भाषेत या वृक्षास “तुमा” असे म्हणतात आणि हेच नांव भारतात प्रचलित आहे. तुमा या शब्दाचा अर्थ आहे. मोत्यांसारखी-रत्नांसारखी फुले असणारा या वृक्षास इंग्रजीत “ज्युवेल्स ऑन स्टिंग” आणि “मोलुमेन रोझवुड” अशी नावे आहेत. सर्वत्र असणाऱ्या “करंज” या वृक्षाची बरेचसे साम्य आहे, पण या वृक्षाची फुले गुलाबी-लालसर रंगाची असतात. त्यामुळे या वृक्षाला लाल करंज असेही म्हटले जाते.

हा वृक्ष लहान ते मध्यम आकारातचा, काहीसा डेरेदार असून, फांद्या खाली लोंबणाऱ्या असतात. हा वृक्ष ४ ते ६ मीटर, तर काहीवेळा ८ मीटर उंची पर्यंत वाढतो. खोडाचा व्यास १० ते २० से. मी इतका असून साल गुळगुळीत व करड्या रंगाची असते. पाने एका आड एक, संयुक्त, पिच्छाकृती, हुबेहुब करंजीच्या पानांसारखी दिसतात. पर्णिका सात, हिरव्यागार चकचकीत, अंडाकृती-लंबगोलाकार असतात. फुले द्विलिंगी, अनियमित, पाच ते ६-८ मि. मि. आकाराची, गुलाबी लाल रंगाची, काहीवेळा फिकट जांभळ्या रंगाची असतात तर, फुले पानांच्या बगलेतून लोंबणाऱ्या तुऱ्यांमध्ये येतात. फळे शेंगवर्गीय असून शेंगा पाच ते सात सें. मी. लांब, चपट्या असून फिकट तपकिरी रंगाच्या असतात. प्रत्येक शेंगेत दोन ते तीन बिया असतात.

या वृक्षाला फुलांचा बहार जानेवारी ते एप्रिल या कालावधीत येतो. फुलोऱ्यांनी पूर्ण बहरलेले झाड, अगदी अप्रतिम व सुंदर दिसते. या वृक्षाच्या बियांपासून रोपे तयार करता येतात. या वृक्षाचे लाकूड टणक व टिकाऊ असल्याने फर्निचर तयार करण्यासाठी याच्या लाकडाचा वापर करतात. याच्या पानांमध्ये सूक्ष्मजंतू विरोधी गुणधर्म आहेत.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading