सरंक्षणासाठी अग्नीचा वापर !
मानवाने अग्नीचा वापर आपल्या संरक्षणासाठी आणि सुखासाठी करायला सुरुवात केली त्या कालखंडात भाषा, लेखन आणि त्यासाठी लिपीच अस्तित्वात आलेल्या नव्हत्या. हा काळ साधारण २० लाख वर्षांपूर्वीचा होता. तर लेखन प्रक्रियेमध्ये सर्वात जूना ग्रंथ ऋग्वेद मानला जातो, तो लिहिला गेला आहे साधारण साडेतीन, चार हजार वर्षांपूर्वी.
डॉ. व्ही. एन. शिंदे,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
संशोधकांच्या मते मानव पृथ्वीवरील सर्वात दुबळा जीव म्हणून निर्माण झाला. तो अन्य प्राण्यांपासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वाधिक लक्ष देत असे. मानवाच्या शरीराची रचना शाकाहारासाठी अनुकुल अशी होती आणि आहे. दातांची रचना आणि आतड्याची रचनाही शाकाहारी प्राण्यांप्रमाणे आहे. अगदी सुरुवातीपासून माणसाला स्वसंरक्षणाची भिती होती. त्यामध्येही मानव समुहाने राहणारा प्राणी. समाजप्रिय. मात्र त्यामध्येही अन्य प्राण्यांप्रमाणे वर्चस्ववाद होताच. १०० ते १५० लोकांचे समुह एकत्र रहात. खूपच मोठा समुह झाला की तो फुटत असे. एकाच्या दोन टोळ्या होत. मात्र त्यातून सुरक्षेचे नवे प्रश्न निर्माण होत.
त्यामुळे अगदी सुरुवातीपासून माणसासाठी चिंतनाचा विषय राहिला तो स्वसंरक्षण. या विषयाचा विचार अन्य प्राणीही करत. आजही ते करतात. एवढेच कशाला धोक्याचा संकटाचा इशारा देणाऱ्या यंत्रणा वनस्पतींमध्येही विकसित झालेल्या असतात, असा निष्कर्ष पीटर वोहलेबेन या जर्मन वनपाल आणि संशोधकांने त्यांच्या ‘दि हिडन लाईफ ऑफ ट्रीज’ या पुस्तकामध्ये केला आहे.
माकडेही वाघ, सिंह आल्याचा, घार आल्याचा इशारा अन्य साथीदारांना विशिष्ट पण वेगवेगळे आवाज काढून देतात. मधमाशांचे संवादशास्त्र हा एक मोठ्या अभ्यासाचा विषय राहिला आहे. या सर्व जीवांमधील सर्वात कमजोर कडी म्हणून निर्माण झालेल्या मानवाला अन्नाची चिंता नव्हती. त्यावेळी शाकाहार हाच आहार असल्याने अन्न मुबलक प्रमाणात उपलब्ध होते. संरक्षणासाठी त्यांने गुहांचा झाडांचा आसरा घ्यायला सुरुवात केली, तरी तो खऱ्या अर्थाने सुरक्षित झाला नाही.
संशोधकांच्या मते, मानवाने मांसाहारास सुरुवात केली असावी, ती एखाद्या दुष्काळामध्ये. पुरातत्त्व संशोधनातून मानवाच्या रचनेबद्दल पुरावे मिळत असले तरी त्याच्या आहाराच्या सवयीबद्दल पुरावे उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे तर्कांच्याआधारे याबद्दलचे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. मानवाने स्वसंरक्षणासाठी प्रथम अन्य प्राण्यांच्या वर्तनाचे निरीक्षण सुरू केले. मानवालाही सुरुवातीला नैसर्गिक आपत्तीना अन्य प्राण्याप्रमाणेच सामोरे जावे लागत होते. आज विज्ञान आणि तंत्रज्ञानात एवढी प्रगती झाली असली तरी जंगलातील आगीमध्ये आजही अनेक मनुष्यप्राण्यांचे जीव जातात. त्याकाळात तर मानवाचा वावरही अन्य प्राण्यांप्रमाणेच असल्याने अन्य प्राण्यांप्रमाणे मानवी जीवांची हानीही अनेकदा झाली असावी. मात्र अशा घटनांचे कोणतेही पुरावे आज उपलब्ध नाहीत.
माणसाचे सुरुवातीचे ज्ञान म्हणजे निसर्गात घडणाऱ्या घटना कशा घडतात, हे जाणून घेऊन त्यांचा आपल्या फायद्यासाठी उपयोग करून घेणे, एवढ्यापुरते मर्यादित होते. अशाच वणव्यावेळी मानवाला सर्वात प्रथम स्वसंरक्षणासाठी आगीचा वापर होऊ शकतो, हे लक्षात आले. आग दिसली की वाघ, सिंहांसारख्या प्राण्यांचीही मांजर होते आणि ते आगीपासून दूर पळून जातात, हे त्यांने वारंवार पाहिले. तसेच पाण्याला आग लागत नाही आणि पाणी ओतून आग विझवता येते, हे ही माणसाच्या लक्षात आले. तसेच आगीच्या भक्ष्यस्थानी माती आणि खडक, दगड, धोंडे पडत नाहीत, तर गवत, वेली आणि वृक्षच जळतात. म्हणजे आग कोणत्या पदार्थांमुळे टिकून राहते, हेसुद्धा मानवाच्या लक्षात आले. यातून आपण आगीवर नियंत्रण मिळवू शकतो, हे त्याला उमगले. आग काही विशिष्ट झाडांच्या लाकडाला घासून तयार करता येते, हे त्याला निसर्गघटनांचे निरीक्षण करतानाच लक्षात आले. म्हणजे आग कशी निर्माण करायची, टिकवून ठेवायची आणि विझवायची, हे माणसाच्या लक्षात आले. मात्र आगीला संरक्षणासाठी वापरायचे तर एका ठिकाणी राहणे गरजेचे बनले.
मानवाने त्यासाठी एखाद्या ठिकाणी वस्ती करून राहण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अशी वस्ती करायची तर पिण्यासाठी आणि आग विझवण्यासाठी पाणी ही आवश्यक गरज होती. एरवी फिरताना मिळेल तेथील पाणी प्यायची सवय होती. आता गरज लागेल तेव्हा पाणी सहज उपलब्ध होणे गरजेचे होते. म्हणून माणसाने भरपूर पाणी असलेल्या नदीच्या किनाऱ्यांना वस्तीसाठी पसंत केले. माणसाने तेथे निसर्गात आढळणाऱ्या गवत आणि झाडांच्या फांद्यांचा वापर करून आडोसे तयार करून निवारा तयार केला. त्यासाठी जाड आणि पसरट पानांच्या सहाय्याने छत तयार करायला सुरुवात केली. रात्री वाघ, सिंह, लांडगे आणि तरस इत्यादी प्राण्यांपासून संरक्षण मिळवण्यासाठी, वस्तीच्या ठिकाणी अग्नीकुंड पेटते ठेवले जाऊ लागले. प्राण्यांच्या हल्ल्यापासून मानवी वस्त्या सुरक्षित झाल्या.
संरक्षणासाठी मानवाने अग्नीचा वापर करता येतो, हे जसे समजून घेतले, तसेच वणव्यांमध्ये भाजले गेलेले प्राणी खातांना अग्नीमध्ये भाजून खालेले अन्न वेगळाच आनंद देते, हेही मानवाच्या लक्षात आले होते. त्यामुळे अग्नी केवळ आपल्या संरक्षणासाठीच नाही तर जिभेचे चोचले पुरवण्यासाठीही उपयोगाचा आहे, याचे ज्ञान मानवाला झाले. ज्या धान्यांचा, कंदमुळांचा खाण्यासाठी वापर करायचा, तीही वणव्यांमध्ये अर्धवट भाजलेल्या अवस्थेत खावे लागले, ते मजबुरीमुळे. त्याला ती चव आवडली. त्यातून अन्नपदार्थ भाजून किंवा शिजवून खाण्यासाठी वापरू लागला. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये केवळ माहिती मिळाल्यानंतर तो आगीचा वापर करू लागला. पुढच्या काळात अग्नी प्रज्वलीत ठेवण्यासाठी कोणकोणते पदार्थ इंधन म्हणून वापरता येऊ शकतात, वाळलेली लाकडे सहज जळतात, मात्र ओली लाकडे सहज जळत नाहीत. जळली तरी धूर खूप करतात. धुरामुळे डोळ्यांना त्रास होतो. अशा आज आपणास सहज माहीत असलेल्या गोष्टी हळूहळू निरीक्षणांतून मानवाच्या लक्षात आल्या. त्यानुसार तो नियोजन करू लागला. वाळलेल्या लाकडाचा साठा करून ठेवणे. तो भिजणार नाही, याची दक्षता घेणे, नको असेल त्याठिकाणचा अग्नी विझवणे, हे सर्व अनुभवातून शिकत गेला.
अनुभवांचे सर्वसमावेशक विश्लेषण करून संपूर्ण ज्ञाननिर्मितीची प्रक्रिया एकाचंवेळी घडली नाही. त्या-त्या टप्प्यावर मानवाला जे उमगले, ते त्यांने इतरांना सांगितले. आपल्या टोळीतील लोकांना त्यांनी ते सांगितले. टोळीतील सर्वांपर्यंत ते ज्ञान पोहोचून पुढच्या पिढीकडे पाहून हस्तांतरीत होत गेले. मात्र या सर्व माहितीचे लिखित दस्ताऐवज तयार झाले नाहीत कारण अगदी सुरुवातीच्या काळात, म्हणजे मानवाने अग्नीचा वापर आपल्या संरक्षणासाठी आणि सुखासाठी करायला सुरुवात केली त्या कालखंडात भाषा, लेखन आणि त्यासाठी लिपीच अस्तित्वात आलेल्या नव्हत्या. हा काळ साधारण २० लाख वर्षांपूर्वीचा होता. तर लेखन प्रक्रियेमध्ये सर्वात जूना ग्रंथ ऋग्वेद मानला जातो, तो लिहिला गेला आहे साधारण साडेतीन, चार हजार वर्षांपूर्वी. त्यामुळे जगभरातील सर्व मानवाच्या पूर्वंजामध्ये ज्ञानदान हे प्रामुख्याने मौखिक पद्धतीने होत होते. पूर्वीच्या लोकांनी दिलेल्या ज्ञानामुळे पुढचे चिंतन सोपे होत असे. त्यातूनच हळूहळू विज्ञान विकसित झाले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.

‘लोकसंस्कृतीच्या पाऊलखुणा ‘ हा बदलाच्या पाऊलखुणा दर्शवण्याचा प्रयत्न