October 25, 2025
डॉ. एस. डी. राजपूत, तेलबिया संशोधन केंद्र, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली सुधारित हरभरा लागवड तंत्रज्ञान जाणून घ्या आणि अधिक उत्पादन मिळवा.
Home » उत्पादन वाढीसाठी हरभरा पिकास तुषार सिंचन गरजेचे
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

उत्पादन वाढीसाठी हरभरा पिकास तुषार सिंचन गरजेचे

सुधारित हरभरा लागवड तंत्रज्ञान

हरभरा पिकास तुषार सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास आणि सुधारित वाणांची लागवड केल्यास उत्पादनात मोठी वाढ होते. हे पीक पाण्यास अतिशय संवेदनशील असल्याने गरजेपेक्षा अधिक पाणी दिल्यास पीक उभळते आणि त्यामुळे उत्पादनात मोठी घट येते. यासाठी या पिकास तुषार सिंचन ही अतिशय उत्कृष्ट पद्धत आहे.

डॉ. एस. डी. राजपूत ( कडधान्य पैदासकार)
तेलबिया संशोधन केंद्र, म. फु. कृ. वि., जळगाव-४२५ ००१
संपर्क क्रमांक: ९४०५१३८२६९

कोरडवाहू क्षेत्रामध्ये हरभरा हे रब्बी हंगामातील महाराष्ट्रातील महत्वाचे पिक आहे . सन २०१९-२० मध्ये महाराष्ट्रा त ह्या पिकाखाली २३.२२ लाख हे क्षेत्र होते व उत्पन्न २५.९९ लाख टन इतके होते व सरासरी उत्पादकता ११.८९ क्विंटल / हेक्टर इतकी होती . ह्या पिकाचे उगमस्थान तुर्कस्थान आहे असे मानतात. भारत, तुर्कस्थान व पाकिस्तान ह्या देशामध्ये ह्या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर केळी जाते . हरभरा या पिकाला सर्वात कमी पाण्याची गरज आणि कमीत कमी उत्पादन खर्च तसेच हरभरा हे पीक द्विदल वर्गीय असल्यामुळे नत्राचे स्थिरीकरण होऊन जमिनीची सुपीकता वाढते. हरभरा पिक जमिनीला वातावरणातील ३०किलो प्रति हेक्टरी नत्र उपलब्ध करुन देतो. तसेच हरभरा भरघोस उत्पादन वाढीसाठी शिफारशीत जातीची निवड करणे,योग्य कालावधी मध्ये पेरणी, रासायनिक आणि फवारणीतून विद्राव्य ग्रेड खतांचा संतुलित वापर, पाणी व्यवस्थापन तसेच एकात्मिक कीड व्यवस्थापन याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

हरभऱ्याचे आहारातील महत्व :

हरभरा एक महत्वाचे कडधान्ये असून रोजच्या आहारात प्रथिनांचा पुरवठा करते. हरभर्याच्या उपयोग दैनंदिन जीवनात डाळीचे पीठ ,बेसन ,फुटणे आणि पुलाव मध्ये होतो . हरभरा या पिका च्या दोन जाती आहेत. देशी हरभरा (माय्क्रोस्पेर्मा) आणि काबुली हरभरा (माक्रोस्पर्मा) असलेल्या पानांची भाजी पण तयार करतात. हिरव्या पानातून मिसळणारे म्यालिक असिड रक्त वाढण्यास उपयुक्त असते.

हरभरा पीक उत्पादन वाढीसाठी ठळक मुद्दे:

हरभरा पिकाचे भरघोस उत्पादन घ्यायचे असेल तर प्रामुख्याने खालील बाबींचे अवलंबन करणे गरजेचे आहे.

  • अधिक उत्पादन देणाऱ्या आणि रोग प्रतिकारक्षम वाणांचा वापर
  • योग्य जमिनीची निवड आणि पूर्वमशागत
  • वेळेवर पेरणी आणि पेरणीचे योग्य अंतर
  • बिजप्रक्रिया आणि जिवाणू संवर्धनाचा वापर
  • तणनियंत्रण
  • पाण्याचे योग्य नियोजन
  • रोग आणि किडींपासून पिकाचे संरक्षण

जमीन व हवामान

हरभरा पिकास मध्यम ते भारी (४५ ते ६० सें.मी. खोल) पाण्याचा उत्तम निचरा होणारी, कसदार, भुसभुशीत जमीन आवश्यक असते. वार्षिक ७०० ते १००० मि.मी. पर्जन्यमान असणा-या भागात मध्यम ते भारी जमिनीत रब्बी हंगामात भरपूर ओलावा टिकून राहतो. अशा जमिनीत जिरायत हरभऱ्याचे पीक चांगले येते. उथळ, मध्यम जमिनीत देखील हरभरा घेता येतो. परंतु त्यासाठी सिंचन व्यवस्था आवश्यक असते. हलकी चोपण अथवा पाणथळ, क्षारयुक्त जमीन हरभरा लागवडीसाठी वापरू नये. हरभऱ्यास थंड व कोरडे हवामान, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि पुरेसा ओलावा आवश्यक असतो व असे वातावरण पिकास चांगले मानवते. विशेषत: पीक २o दिवसांचे झाल्यानंतर किमान तापमान सर्वसाधारणत: १0 अंश ते १५ अंश सें.ग्रे. आणि कमाल तापमान २५ अंश ते 30 अंश सें.ग्रे. असेल असे तापमान महाराष्ट्रात नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यात असते. साधारणत: ५.५ ते ८.६ सामू असणा-या जमिनीत हरभरा पीक चांगले येते.

पूर्वमशागत

हरभऱ्याची मुळे खोल जात असल्याने जमीन भुसभुशीत असणे आवश्यक असते. खरीप पीक निघाल्याबरोबर जमिनीची खोल (२५ सें.मी.) नांगरट करावी आणि त्यानंतर कुळवाच्या दोन पाळया द्याव्यात. कुळवाच्या पाळ्या दिल्यानंतर काडीकचरा वेचून जमीन स्वच्छ करावी व सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस हरभरा पेरणीसाठी शेत तयार ठेवावे. पेरणी पूर्वी ८ दिवस स्प्रिंकलरणे जमीन ओलावून घ्यावी. चार दिवसांनी ४५ से मी वर खात पेरून घ्यावा. खरिपात शेणखत किंवा कंपोस्ट दिले नसल्यास हेक्टरी ५ टन कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट नांगरणीपूर्वी जमिनीवर पसरावे.

पेरणीची वेळ

जिरायत हरभऱ्याची पेरणी जमिनीत पुरेसा ओलावा असताना म्हणजेच सप्टेंबर अखेर अथवा १o ऑक्टोबरपर्यंत करावी. हरभरा पेरणीनंतर सप्टेबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीस पडणाऱ्या पावसाचा जिरायत हरभऱ्याच्या उगवण आणि वाढीसाठी चांगला उपयोग होतो. जिरायत क्षेत्रात बियाणे खोलवर (१0 सें.मी.) पेरणी करावी. बागायत क्षेत्रात मात्र पाणी देण्याची सोय असल्यामुळे हरभऱ्याची पेरणी २० ऑक्टोबर ते १0 नोव्हेंबरच्या दरम्यान करावी. तसेच बागायत क्षेत्रात कमी खोलीवर (५ सें.मी.) हरभरा पेरणी केली तरी चालते. पेरणीस जास्त उशीर झाल्यास किमान तापमान खूपच कमी होऊन उगवण उशिरा आणि कमी होते. पिकाची वाढ कमी होऊन फांद्या, फुले व घाटे कमी लागतात. यासाठी जिरायत तसेच बागायत हरभऱ्याची पेरणी वेळेवर करणे आवश्यक आहे. पेरणी करताना जिरायत / मध्यम हरभ-याची पेरणी दोन ओळीतील अंतर ३o सें.मी. आणि दोन रोपातील अंतर १0 सें.मी. राहील अशा पद्धतीने पेरणी करावी म्हणजे प्रतिहेक्टरी अपेक्षित रोपाची संख्या मिळते. बागायती हरभऱ्या ची पेरणी दोन ओळीतील अंतर ४५ सें.मी. आणि दोन रोपातील अंतर १५ सें.मी. ठेवावे.

बीजप्रक्रिया आणि जीवाणूसंवर्धन

बियाण्याची उगवण चांगली होण्यासाठी आणि रोपावस्थेत बुरशीजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा चोळावे अथवा २ ग्रॅम थायरम २ ग्रॅम कार्बन्डॅझीम एकत्र करून प्रति किलो बियाण्यास चोळावे. यानंतर १o किलो बियाण्यास रायझोबियम जिवाणू संवर्धनाचे २५० ग्रॅम वजनाच्या एका पाकिटातील संवर्धन गुळाच्या थंड द्रावणातून चोळावे. गुळाचे द्रावण तयार करण्यासाठी एक लिटर पाण्यात १२५ ग्रॅम गूळ घेऊन तो विरघळेपर्यंत पाणी कोमट करावे. बियाणे एक तासभर सावलीत सुकवून लगेच पेरणी करावी. यामुळे हरभ-याच्या मुळावरील ग्रंथीचे प्रमाण वाढून हवेतील नत्र अधिक प्रमाणात शोषून घेऊन पिकास उपलब्ध केला जातो आणि पिकाचे ३ ते ५ टक्के उत्पादन वाढते.

पेरणीची पद्धत आणि बियाणे प्रमाण

हरभऱ्याच्या विविध दाण्यांच्या आकारमानानुसार बियाण्याचे प्रमाण वापरल्याने हेक्टरी रोपाची संख्या अपेक्षित मिळते. सामान्यतः देशी हरभरयाची पेरणी तिफणीने किवा पाभरीने करावी. दोन ओळीतील अंतर ३० से.मी व दोन रोपातील १० से मी अंतरावर टोकन होईल असे ट्रक्टर वर चालणारे पेरणी यंत्र महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांनी तयार केले आहे. त्याचा वापर करणे अधिक चांगले. विजय या मध्यम दाण्याच्या वाणाकरिता ६५ ते ७0 किलो, तर विशाल, दिग्विजय आणि विराट या टपोऱ्या दाण्यांच्या वाणाकरिता १oo किलो प्रति हेक्टर या प्रमाणात बियाणे पेरणीसाठी वापरावे. तसेच कृपा आणि पी. के. व्ही. ४ या जास्त टपोच्या काबुली वाणांकरिता १२५ ते १३० किलो प्रतिहेक्टर बियाणे वापरावे. हरभरा सरी- वरंब्यावरही चांगला येतो. ९0 सें.मी. रुंदीच्या स-या सोडाव्यात व वरब्यांच्या दोन्ही बाजूला १० सें.मी. अंतरावर बियाणे टोकण करावे. काबुली वाणासाठी जमीन ओली करून वापशावर पेरणी करावी.

खते:

सुधारित हरभऱ्याचे नवे वाण खत आणि पाणी यास चांगला प्रतिसाद देतात, त्यासाठी खताची मात्रा योग्य प्रमाणात देणे गरजेचे आहे. प्रती हेक्टरी चांगले कुजलेले ५ टन शेणखत किंवा कंपोस्ट खत शेवटच्या कुळवणीच्या वेळी शेतात पसरावे. पिकाची पेरणी करताना २५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ३० किलो पालाश प्रति हेक्टर म्हणजेच १२५ किलो डायअमोनियम फॉस्फेट (डी.ए.पी) अधिक ५० किलो म्युरेट ऑफ पोटेंश अथवा ५0 किलो युरिया आणि 300 किलो सिंगल सुपर फॉस्फेट अधिक ५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति हेक्टरला द्यावे. संतुलित खतांच्या वापरामुळे उत्पादनात १८.५५ टक्के इतकी वाढ झाल्याचे प्रयोगांती आढळून आले आहे. पीक फुलो-यात असताना २ टक्के युरियाची पहिली फवारणी आणि त्यानंतर १०-१५ दिवसांनी परत दुसरी एक फवारणी करावी, यामुळे पीक उत्पादनात वाढ होते. तसेच बागायती पद्धतीने घेतलेल्या हरभरा पिकावर फुलोरा आणि घाटे भरताना पोटशियम नायट्रेट (१३:०:४५) सोबत संजीवकाच्या फवारण्या दिल्या तर दाने वजनदार होऊन उत्पादन वाढल्याचे आढळून आले आहे.

आंतरमशागत:

पिकाच्या जोमदार वाढीसाठी शेत सुरवातीपासूनच तणविरहित ठेवणे हे उत्पादन वाढण्याचा दृष्टीने आवश्यक आहे. तण व्यवस्थापनामुळे एकूण उत्पादनात २०.७४ टक्के वाढ होते. पीक २o ते २५ दिवसाचे असताना पहिली कोळपणी आणि ३o ते ३५ दिवसाचे असताना दुसरी कोळपणी करावी. कोरडवाहू क्षेत्रामध्ये कोळपणी मुळे जमिनीत पडत असलेल्या भेगा बुजून जातात आणि ओल टिकून राहते. कोळपणी केल्याने जमिनीतील बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन ओल अधिक काळ टिकण्यास मदत होते. तसेच दोन ओळीतील तण काढले जाऊन रोपांना मातीची भर लागते. कोळपणीनंतर दोन रोपातील तण काढण्यासाठी लगेच खुरपणी करावी. मजुराअभावी खुरपणी करणे शक्य नसल्यास पेरणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा असताना (स्टोम्प) पेंडिमिथिलिन या तणनाशकाची २.५ ते ३ लिटर प्रती हेक्टर ५०० लिटर पाण्यातून फवारणी करावी.

पाणी व्यवस्थापन :

जिरायत हरभरा क्षेत्रात जमिनीतील ओलावा खूपच कमी असेल आणि एखाद्ये पाणी देणे शक्य असेल तर हरभरा पिकला फुले येऊ लागताच पाणी द्यावे . बागायत हरभरा शेताची रानबांधणी करताना दोन साऱ्यातील अंतर कमीतकमी ठेवण्याचा प्रयत्न करावा. तसेच लांबी सुधा जमिनीच्या उतारानुसार कमी ठेवावी, म्हणजे पिकला प्रमाणशीर पाणी देण्यास सोयीचे होते. मध्यम जमिनीत २० ते २५ दिवसांनी पहिले,४५ ते ५० दिवसांनी दुसरे आणि ६५ ते ७० दिवसांनी तिसरे पाणी द्यावे. हरभरा पिकाला सर्वसाधारणपणे २५ से.मी पाणी लागते. प्रत्येकवेळी पाणी प्रमाणशीर (७ ते ८ से.मी )देणे महत्वाचे असते. जास्त पाणी दिले तर पिक उभळन्याचा धोका असतो . स्थानिक परिस्थितीनुसार व जमिनीच्या खोलीनुसार पाण्याच्या दोन पाळ्यांमध्ये अंतर ठेवावे. जमिनीस फार मोठ्या भेगा पडू देऊ नयेत. हरभरा पिकास एक पाणी दिल्यास ३० टक्के, दोन पाणी दिल्यास ६o टक्के आणि तीन पाणी दिल्यास उत्पादनात दुप्पट वाढ होते. जास्त पाणी देऊ नये दिल्यास पाणी शेतात साचून राहते व मुळ कुजव्या रोगाने पिकाचे नुकसान होते.

तुषार सिंचन : हरभरा पिकास वरदान :

हरभरा पिकास तुषार सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास आणि सुधारित वाणांची लागवड केल्यास उत्पादनात मोठी वाढ होते. हे पीक पाण्यास अतिशय संवेदनशील असल्याने गरजेपेक्षा अधिक पाणी दिल्यास पीक उभळते आणि त्यामुळे उत्पादनात मोठी घट येते. यासाठी या पिकास तुषार सिंचन ही अतिशय उत्कृष्ट पद्धत आहे.

· पूर्वमशागत चांगली होते
· रान बांधणीची गरज नाही
· पिक लागवड टोकन पद्धतीने योग्य अंतरावर करता येते
· तणाचा प्रादुर्भाव होत नाही
· जमिनीची धूप होत नाही जमिनीत ओलावा टिकून राहतो
· जमिनीत सतत वाफसा राहते
· पिकांना संवेदनशील अवस्थेत पाणी दिल्याने मोजून पाणी देता येते
· पाणी व्यवस्थापनासाठी मजुरीचा खर्च कमी होतो
· पाण्यात पिका नुसार २० टक्के बचत होते
· उपलब्ध पाण्यात ओलिताखाली क्षेत्र वाढवता येते
· दिलेली खते झिरपून न गेल्याने कमी मात्रेत चांगले परिणाम मिळतात
· केसाळ आळी , मावा , फुलकिडे मावा या किडींचा प्रादुर्भाव कमी होतो

आंतरपिके

हरभरा पिकाचे मोहरी, करडई, ज्वारी, ऊस या पिकांबरोबर आंतरपीक घेता येते. हरभऱ्याच्या दोन ओळी आणि मोहरी अथवा करडईची एक ओळ याप्रमाणे आंतरपीक घ्यावे. हरभ-याच्या सहा ओळी आणि रब्बी ज्वारीच्या दोन ओळी याप्रमाणे आंतरपीक फायदेशीर आहे. उसामध्ये सरीच्या दोन्ही बाजूस किंवा वरंब्याच्या टोकावर १० सें.मी. अंतरावर हरभऱ्याची एक ओळ टोकण केल्यास हरभऱ्याचे अतिशय चांगले उत्पादन मिळते. त्याबरोबरच हरभऱ्याचा बेवड उसाला उपयुक्त ठरून उसाच्या उत्पादनात वाढ होते.

एकात्मिक किड व्यवस्थापन : (घाटे अळी नियंत्रण)

घाटे अळी ही हरभऱ्यावरील मुख्य कीड आहे. हरभरा पिकाचे घाटे अळी ३०-४० टक्के नुकसान होते .पिक ३ आठवड्याचे झाले असता त्यावर बारीक आ ळया दिसू लागतात. पानांवरती पांढरे डाग दिसतात आणि शेंडे खाल्लेले दिसतात. याकरिता पिकास फुल कळी लागण्याच्या वेळेस पहिली फवारणी करावी. यासाठी २५ किलो निंबोळी पावडर रात्रभर ५० लिटर पाण्यात भिजत ठेवावी. सकाळी कापडाच्या सहायाने आर्क काढून त्यामध्ये ४५० लिटर पाणी टाकावे . हे द्रावण १ हेक्टर क्षेत्रावर फवारावे. पुढे १० ते १५ दिवसांनी हेलीओकील ५०० फवारणी १८.५% एस सी क्लोरएट्रोनिलीप्रोल १०० मिली हेक्टर ५०० लिटर पाण्यातून फवारावे. या किडीचे नियंत्रण एकात्मिक पद्धतीने चांगले होते. त्यासाठी पेरणीच्या वेळी हेक्टरी २०० ग्राम ज्वारी शेतामध्ये पेरावी. पक्षांना बसण्यासाठी दर १५ ते २० मीटर अंतरावर काठ्या रोवाव्यात किंवा मचाण बांधावीत म्हणजे कोळसा पक्षी, चिमण्या, साळुंकी, बगळे इ. पक्षी पिकावरील अळ्या पकडून खातात. कोड नियंत्रण प्रभावी होण्याकरिता एकाच कीटकनाशकाचा सारखा वापर न करता फवारणीकरिता आलटून-पालटून औषधे वापरावीत.

रोग –
१) मर मान कुजव्या : १ ते १.५ ग्राम कार्बेन्डॅझिम अधिक २ ते २.५ ग्राम थायरम ची प्रती किलो बियाण्यास प्रकिया त्या नंतर ६ ग्रम ट्रायकोडर्मा प्रती किलो बियाण्यास प्रकिया करावी .
२) कोरडी मु ळ कुज : १)पिकास पाण्याचा फार ताण देऊ नये २) रोग प्रतिकारक वाण पेरणीसाठी वापरावे .
३) ओली मूळ कुज: १) पिकास जास्त पाणी देऊ नये. पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी २) रोग प्रतिकारक्षम वाणाची निवड करावी ३) रोगग्रस्त झाडे त्वरित उपटावी.

काढणी

हरभरा पिक ११०-१२० दिवसामध्ये तयार होते . पिक ओलसर असताना काढणी करू नये . घाटे कडक वाळल्यानंतर मगच हरभर्याची काढणी करून मळणी करावी . यानंतर धन्यास ६-७ दिवस कडक उन द्यावे . हरभरा कोठीमध्ये साठवून ठेवावा. त्यामध्ये कडू लिंबाचा पाला (५ टक्के) घालावा. त्यामुळे धान्याला कीड लागत नाही.

उत्पादन

सुधारित वाणांचा आणि तंत्रज्ञानाचा वापर करून हरभर्याची लागवड केल्यास सरासरी ३० -३१ क्विंटल प्रती हेक्टर मिळते.
सुधारित वाण
विजय: ८५ ते ९० दिवस,उत्पन्न: १४-१५ क्वि/ हे
विशाल: ११० ते ११५ दिवस, सरासरी उत्पन्न : २० क्वि/ हे
दिग्विजय: ९० ते ९५ दिवस,सरासरी उत्पन्न : २५ क्वि/ हे
फुले विक्रम: १०५ ते ११० दिवस, उत्पन्न : १६ -१८ क्वि/ हे
फुले विक्रांत: १०५ ते ११० दिवस, उत्पन्न :३५ -४२क्वि/ हे
फुले विश्वराज: ९५ ते १०५ दिवस, उत्पन्न: २५ ते २८ क्वि/ हे
जाकी ९२१८: १०५ ते ११० दिवस, उत्पन्न :१८-२०क्वि/ हे
साकी ९५९६: १०५ ते ११० दिवस, उत्पन्न १८-२० क्वि/ हे

काबुली वाण
विराट: ११० ते ११५ दिवस,बागायत : उत्पन्न : १९क्वि/ हे
कृपा: १०५ ते ११० दिवस, प्रायोगिक उत्पन्न :३०-३२क्वि/ हे
पी के वी -२: १०० ते १०५ दिवस,उत्पन्न १२-१५ क्वि/ हे
पी के वी -४: १०० ते ११० दिवस, उत्पन्न १२-१५ क्वि/ हे
पी डी के व्ही कांचन: १०५ ते ११० दिवस, उत्पन्न :३० -३२ क्वि/ हे


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading