नवी दिल्ली – भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणारे ‘कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा), गल्फूड 2026 मध्ये एका मजबूत, विस्तारित आणि प्रभावी उपस्थितीसह सहभागी होत आहे. यामुळे जागतिक कृषी-अन्न व्यापारात भारताचे वाढते स्थान अधोरेखित होत आहे. भारत यावेळी गल्फूड 2026 मध्ये भागीदार देश असणार आहे. एक विश्वसनीय पुरवठादार देश आणि जागतिक अन्न सुरक्षा आणि लवचिक पुरवठा साखळ्यांमध्ये प्रमुख योगदानकर्ता म्हणून त्याचे धोरणात्मक महत्त्व यातून दिसून येते.
गल्फूड 2026 मधील भारताच्या सहभागात मागील प्रदर्शनाच्या तुलनेत महत्त्वपूर्ण सुधारणा दिसून येते आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत भारतीय दालनाचा आकार दुप्पट झाला आहे. यामुळे भारतीय कृषी-खाद्य उत्पादनांच्या निर्यातीचा वाढता विस्तार, भारतीय उत्पादनांना वाढती जागतिक मागणी आणि निर्यातदार, संस्था आणि स्टार्टअप्सचा वाढलेला सहभाग प्रतिबिंबित होतो आहे.
या प्रदर्शनात भारताचा मंडप 1,434 चौरस मीटर जागेत विस्तारलेला आहे. यात प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, ताजी आणि गोठवलेली उत्पादने, कडधान्ये, धान्ये, पेये, मूल्यवर्धित अन्न उत्पादने आणि कृषी-निर्यात स्टार्टअप्स यांसारख्या विविध श्रेणींमधील 161 प्रदर्शकांचा समावेश आहे. भारताच्या या दालनात निर्यातदार, शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ), सहकारी संस्था, स्टार्टअप्स, राज्य सरकारी संस्था आणि राष्ट्रीय संस्था या सर्व घटकांचा सहभाग आहे. यामुळे भारताच्या कृषी-अन्न परिसंस्थेचे आणि निर्यात सज्जतेचे एक सर्वसमावेशक चित्र सादर होत आहे.
भारताच्या विशाल कृषी आणि प्रादेशिक विविधतेचे दर्शन या प्रदर्शनातून घडणार आहे. या प्रदर्शनात 25 राज्ये आणि प्रदेशांमधील प्रदर्शक सहभागी झाले आहेत. या प्रदर्शनातले भारती (BHARATI) दालन हे या प्रदर्शनातल्या भारताच्या सहभागाचे मुख्य आकर्षण ठरले आहे. निर्यातक्षम कृषी-अन्न आणि कृषी-तंत्रज्ञान स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने (APEDA) सुरू केलेला हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटरमधील स्टार्टअप झोन मधल्या या भारती दालनात भारतातील आठ उच्च कार्यक्षमतेच्या स्टार्टअप्सचा समावेश आहे. या प्रदर्शनासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रक्रिया राबवली गेली होती, त्यात 100 पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले, आणि त्यातून सहभागींची निवड करण्यात आली. या स्टार्टअप्सनी प्रदर्शनात कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाच्या फार्म टू फॉरेन (शेत ते परदेश) या संकल्पनेला अनुसरून, नवोन्मेषी उत्पादने, तंत्रज्ञानाधारित उपाययोजना आणि निर्यातीला चालना देणाऱ्या सेवा मांडल्या आहेत.
गल्फूड 2026 चे आयोजन दोन मुख्य ठिकाणांवर करण्यात आले आहे. या दोन्ही ठिकाणचा भारताचा सहभाग लक्षवेधक आहे. दुबई एक्स्पो सिटी मध्ये वर्ल्ड फूड हॉल, भरडधान्ये, धान्य आणि तृणधान्ये हॉल, तसेच गल्फूड ग्रीन अशी विविध दालने आहेत. या सर्व मांडणीतून शाश्वतता, नवोन्मेष आणि भविष्यातील अन्न व्यवस्थेवर भर दिला गेला आहे. तर दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटर इथे पेय सभागृह आणि भारती दालन यासह स्टार्टअप दालन अशा दालनांचा अंतर्भाव आहे.
गल्फूड 2026 मधील भारताचा सहभाग हा भारत आणि संयुक्त अरब अमिरातीतील सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारामुळे निर्माण होणाऱ्या संधींना असनुसरून आहे. या करारामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापारी संबंध अधिक दृढ झाले आहेत तसेच भारतीय कृषी तसेच अन्न उत्पादनांसाठी आखाती प्रदेशातील बाजारपेठा खुल्या झाल्या आहेत.
या सर्वसमावेशक आणि व्यापक सहभागाच्या माध्यमातून खरेदीदार आणि विक्रेत्यांमधील परस्पर संपर्काला बळकटी देणे, भारतीय ब्रँड्सना जागतिक स्तरावर प्रोत्साहन देणे, स्टार्टअप्स आणि निर्यातदारांना पाठबळ देणे तसेच भारताच्या कृषी अन्न वैविध्यतेचे दर्शन घडवणे हे कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाचे उद्दिष्ट आहे. हा सहभाग म्हणजे जागतिक कृषी अन्न मूल्य साखळीत एक विश्वसार्ह, नवोन्मेषी आणि शाश्वत देश म्हणून भारताची भूमिका अधिक बळकट करण्याचा प्रयत्न आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
