विशेष आर्थिक लेख
सिक्युरिटीज एक्सचेंजेस बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबीने गेल्या सप्ताहात न्यूयॉर्कस्थित जेन स्ट्रीट या भांडवली बाजारात व्यवहार करणाऱ्या कंपनीविरुद्ध मोठी कारवाई केली. जगभरातील 45 देशांच्या शेअर बाजारांवर करोडो रुपयांचा नफा कमवणाऱ्या या “पांढरपेशा गुन्हेगारी” कंपनीवर भारतात सहा महिन्यांची अंतरिम बंदी घातली आहे. यामुळे भारतीय भांडवली बाजाराचा नियामक असलेल्या सेबीचा दरारा किंवा पत वाढलेली असली तरी भारतीय शेअर बाजारांचा उथळपणा वेशीवर टांगणाऱ्या या ‘ पांढरपेशा गुन्हेगारीची’ कथा…
प्रा. नंदकुमार काकिर्डे
सुमारे 25 वर्षांपूर्वी अमेरिकेत स्थापन झालेली जेन स्ट्रीट ही दलाल कंपनी. 2024 मध्ये त्यांचा जागतिक व्यापार महसूल 20.05 अब्ज डॉलर्स इतका प्रचंड होता. या कंपनीमध्ये 3000 पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात. अमेरिका, युरोप आणि आशिया खंडात त्यांची कार्यालये आहेत. एकूण 45 देशांच्या शेअर बाजारांवर खरेदी विक्रीचे व्यवहार करणे,तसेच एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणजे ईटीएफ यासाठी ‘ मार्केट मेकर’ ची भूमिका बजावणारी ही कंपनी आहे.
भारताबाबत बोलायचे झाले तर त्यांनी 2020 मध्ये भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला. येथील दोन स्थानिक उपकंपन्या व हाँगकाँग आणि सिंगापूर येथे नोंदवलेल्या दोन परदेशी संस्था यांच्या माध्यमातून त्यांनी भारतीय शेअर बाजारांमध्ये व्यवहार करण्यास प्रारंभ केला. 2024 या वर्षांमध्ये या कंपनीने भारतीय शेअर बाजारात बँकांच्या समभागांच्या डेरिव्हेटिव्हजमध्ये मोठ्या प्रमाणावर व्यवहार करून 2.3 अब्ज डॉलर्स चा महसूल मिळवला होता. कंपनीच्या जागतिक महसुलापैकी दहा टक्के महसूल केवळ भारतीय बाजारातील होता.
भारतीय शेअर बाजारांवर रोख बाजार(कॅश मार्केट) व फ्युचर्स अँड ऑप्शन्स (एफ अँड ओ)अशा दोन पद्धतीचे व्यवहार केले जातात. रोख बाजारात प्रत्यक्ष शेअरची खरेदी विक्री केली जाते व त्याचे लगेच पैसे देऊन किंवा शेअर देऊन पुरवठा केला जातो व व्यवहार पूर्ण होऊन संपतो. याउलट फ्युचर अँड ऑप्शन हे एक प्रकारचे सट्टा स्वरूपाचे व्यवहार असून ते तीन महिन्याच्या आत पूर्ण करावे लागतात व लगेच पूर्ण करण्याची गरज नसते.
या दरम्यानच्या काळात शेअरचे भाव सातत्याने खाली वर होत असतात व त्यानुसार गुंतवणूकदार किंवा दलाल मंडळी जास्तीत जास्त नफा कमवण्याच्या दृष्टिकोनातून व्यवहार पूर्ण करतात किंवा त्यांना थोडा प्रीमियम देऊन व्यवहार रद्द करण्याची मुभा असते. जेन स्ट्रीट कंपनीने अत्यंत हुशारीने दोन्ही बाजारांमधील खरेदी विक्री, व्यवहार पूर्ण करण्याची वेळ याचा अत्यंत सखोल, बारकाईने अभ्यास करून, अत्यंत उच्च दर्जाचे तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता याचा वापर करून डेरीवेटीव्हज बाजारामध्ये निफ्टी फिफ्टी व बँक निफ्टी या निर्देशांकांमध्ये फेरफार करून कोट्यावधी रुपयांचा नफा मिळवला.
भारतामध्ये 2022 ते 2024 या वर्षात ज्या गुंतवणूकदारांनी किंवा दलालांनी फ्युचर अँड ऑप्शन मध्ये व्यवहार केले त्यामध्ये दहा पैकी नऊ जणांना प्रचंड तोटा झाला किंवा पैसे गमावले असा अहवाल खुद्द सेबीनेच प्रसिद्ध केलेला होता. याचा अर्थ कोणातरी एका गुंतवणूकदाराला प्रचंड आर्थिक फायदा झाला. असा फायदा होणारी कंपनी जेन स्ट्रीट होती. या कंपनीने भारतात ज्या पद्धतीने व्यवहार केले, नफा कमवला त्याबाबत केवळ भारतातच नाही तर परदेशातील प्रसारमाध्यमांमध्ये बरीच चर्चा, शंका उपस्थित केल्या जात होत्या.
हे सर्व सेबीला लक्षात आले त्याची कथा वेगळीच आहे. जेन स्ट्रीट या कंपनीतील दोन कर्मचारी त्यांच्या प्रतिस्पर्धी मिलेनियम मॅनेजमेंट या फंडमध्ये नोकरीस गेले. या माजी कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीरपणे या व्यवहारांचे अल्गोरिदम विकसित करण्यास मदत केली होती. म्हणजे चोरीच्या मार्गाने पैसे कसे मिळवायचे यावरून दोन कंपन्यांमध्ये झालेला वाद न्यायालयाच्या चव्हाट्यावर आला.
या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर सेबी जागी झाली व त्यांनी कंपनीच्या जानेवारी 2023 ते मार्च 2025 या सव्वा दोन वर्षातील सर्व व्यवहारांची व व्यापार, पद्धतीची सखोल तपासणी ज्याला ‘ फॉरेन्सिक ऑडिट’ म्हणतात तशा प्रकारे केली. या कंपनीने भारतीय निर्देशांकांमध्ये फेरफार, व्यवहारांची उलटापालट करून तब्बल 36 हजार 500 कोटी रुपये निव्वळ नफा कमावल्याचे स्पष्ट झाले आहे. वास्तविक पाहता एखाद्या व्यक्तीने किंवा संस्थेने शेअर बाजारात उतरून उलट सुलट व्यवहार करून प्रचंड नफा कमवणे हे गैर नाही. मात्र ज्या दोन निर्देशांकांमध्ये या कंपनीने व्यवहार केले ते व्यवहार भारतातील त्या निर्देशांकांच्या व्यवहारापैकी 25 ते 38 टक्क्यांपर्यंत होते. यावरून त्यांनी ज्या पद्धतीने भारतीय निर्देशांकांची फ्युचर्स अँड ऑप्शनच्या माध्यमातून हालचाली गेल्या व सक्रियपणे हाताळले त्याचा मोठा फटका हजारो गुंतवणूकदारांना बसला आहे. अशा प्रकारचे व्यवहार करणे म्हणजे उच्च पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर करून अनुचित व्यापार पद्धतीच्या नियमांचे उल्लंघन या कंपनीने केल्याचे सेबीने स्पष्ट केले आहे.
सेबीने याबाबत 105 पानांचा प्रदीर्घ आदेश तयार केला आहे. एफ अँड ओ मध्ये जेन स्ट्रीटने दोन मुख्य रणनीती (स्ट्रॅटेजीज)वापरल्या. त्यातील पहिल्या पद्धतीनुसार ज्या दिवशी बँक निफ्टी या निर्देशांकांची ऑप्शन एक्सपायरी तारीख असेल त्या दिवशी सकाळी बँक निफ्टी च्या विविध घटक शेअरची किंवा त्यांच्या फ्युचरची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. परिणामतः बँक निफ्टी वर गेला. त्यांनी बँक निफ्टी ऑप्शन्स मध्ये मोठ्या प्रमाणावर ‘शॉर्ट पोझिशन्स’ निर्माण केली. ( म्हणजे हातात काहीही नसताना विक्री केली) त्याच दिवशी दुपारच्या सत्रात हेच व्यवहार त्यांनी उलटे फिरवले व मोठ्या प्रमाणावर ऑप्शन्स मध्ये नफा कमवला. त्याच वेळी दुसऱ्या धोरणानुसार त्यांनी व्यवहाराच्या शेवटच्या अर्धा तासात बँक निफ्टी मधील विविध घटक कंपन्यांच्या शेअरची आक्रमकपणे खरेदी किंवा विक्री केली. याचा परिणाम असा झाला की अखेरच्या थोड्या वेळेमध्ये निर्देशांकातील चढ-उतारांमुळे अनेक छोट्या भारतीय गुंतवणूकदारांना प्रचंड धक्का म्हणजे फटका बसला, त्यांना प्रचंड तोटा झाला पण त्याच वेळेला जेन स्ट्रीट कंपनीला मात्र ‘ऑप्शन एक्सपायरी’ व्यवहारात प्रचंड आर्थिक नफा मिळाला.
भारतातील फ्युचर अँड ऑप्शन (एफ अँड ओ) हे व्यवहार म्हणजे एक प्रकारचा सट्टा आहे. या पार्श्वभूमीवर सेबीने अलीकडेच छोट्या गुंतवणूकदारांनी सहभागी होऊ नये, त्यांना विनाकारण तोटा होऊ नये म्हणून काही कडक व जाचक नियम जारी केलेले होते. याबाबत गुंतवणूकदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरलेली होती. त्यामुळेच सेबीने दोन वर्षांपेक्षा जास्त काळ जेन स्ट्रीटच्या व्यवहारांचा अभ्यास केला. भारतीय निर्देशांकांच्या व्यवहारांची उलथापालथ करण्यामध्ये महत्त्वाचा सहभाग असल्याची दखल घेऊन त्यांना भारतीय बाजारात व्यवहार करण्यास बंदी घातली. ही वस्तुस्थिती असली तरी त्यामुळे भारतीय बाजारांचा उथळपणा यामध्ये स्पष्ट उघडकीस झाला आहे.
मुंबई शेअर बाजार किंवा राष्ट्रीय शेअर बाजार हे दोन्ही बाजार ‘फ्युचर अँड ऑप्शन’ या वाढत्या सट्टारूपी व्यवहाराच्या मागे लागलेले दिसतात. रोखीच्या व्यवहारात प्रचंड व्यवहार करून त्याची खोली वाढवण्याऐवजी एफ अँड ओ सारख्या सट्टा रुपी वाढत्या व्यवहाराची जबाबदारी त्यांचीच आहे. जेन स्ट्रीट सारखी परदेशी कंपनी उच्चतंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून अनैतिकरित्या व अनुचितपणे कोट्यावधी रुपयांचा नफा कमवते हे उघड्या डोळ्याने पाहणे योग्य ठरले नाही. त्यामुळेच सेबीने केलेल्या कडक कारवाई बद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. पण दुसरीकडे भारतीय शेअर बाजारांचा उथळपणा जागतिक चव्हाट्यावर आला आहे. त्यासाठी धोरणात्मक निश्चित पावले टाकण्याची गरज आहे हेच जेन स्ट्रीटच्या प्रकरणावरून स्पष्ट होते. केंद्र सरकार व भारतीय भांडवलांचे नियामक सेबी यातून काय शिकतात तेच पाहणे महत्त्वाचे आहे.
(लेखक पुणे स्थित अर्थविषयक जेष्ठ पत्रकार असून माजी शेअर बाजार व बँक संचालक आहेत)
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.