कोल्हापूर – आगामी ७ व ८ सप्टेंबर रविवारी मध्यरात्री कोल्हापूरवरून एक दुर्मिळ आणि भव्य खग्रास चंद्रग्रहण (Total Lunar Eclipse) निरीक्षणासाठी येणार आहे. संपूर्ण चंद्र पृथ्वीच्या गर्भच्छायेत बुडून ‘रक्तिम चंद्र’ (Blood Moon) मध्ये रूपांतरित होताना पाहण्याची ही एक स्वप्नवत घटना असेल, अशी माहिती शिवाजी विद्यापीठाच्या पन्हाळा येथे अवकाश संशोधन केंद्राचे समन्वयक डॉ. राजीव व्हटकर यांनी दिली आहे.
ग्रहण सुरू (उपच्छाया स्पर्श): ७ सप्टेंबर, रात्री २०:५८ वाजता (IST)
आंशिक ग्रहण सुरू (गर्भच्छाया स्पर्श): रात्री २१:५७ वाजता (IST)
खग्रास ग्रहण सुरू (पूर्ण ग्रहण): रात्री ११ वाजता (IST) सुरवात
ग्रहण कमाल (परमग्रास): रात्री ११:४१ वाजता (IST)
खग्रास ग्रहण समाप्ती: रात्री ००:२८ वाजता (IST)
आंशिक ग्रहण समाप्ती (गर्भच्छाया मुक्त): रात्री २:२५ वाजता (IST)
ग्रहणाची एकूण कालावधी (खग्रास): सुमारे १ तास २६ मिनिटे, तर एकूण ग्रहण कालवडी ५ तास २७ मिनिटाचा असेल. हे संपूर्ण ग्रहण कोल्हापूरसह भारतातून स्पष्टपणे दिसेलअसेही डॉ. राजीव व्हटकर यांनी सांगितले.
खग्रास चंद्रग्रहण ही एक अत्यंत मोहक खगोलीय घटना आहे. जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र पूर्णपणे एका रेषेत येतात, तेव्हा पृथ्वी थेट सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते. यामुळे पृथ्वीची गर्भच्छाया (Umbra) संपूर्ण चंद्रावर पडते आणि चंद्र अंधारमय होतो. तथापि, सूर्यप्रकाशातील निळा आणि जांभळा रंग पृथ्वीच्या वातावरणातून विखुरला जातो, तर लाल रंग वक्र होऊन चंद्रावर पोहोचतो. या वैज्ञानिक प्रक्रियेमुळेच ग्रहणादरम्यान चंद्र तांबूस, नारिंगी किंवा ‘लाल’ दिसतो. यालाच ‘रक्तिम चंद्र’ (Blood Moon) म्हणतात असे डॉ . व्हटकर यांनी स्पष्ट केले आहे.
कोणतेही हानिकारक किरणोत्सर्ग नाही:
चंद्रग्रहण ही केवळ प्रकाशाची घटना आहे. यादरम्यान कोणत्याही प्रकारची विशेष किंवा हानिकारक किरणे उत्सर्जित होत नाहीत. हे पृथ्वीपासून सुमारे ३,८४,४०० किमी अंतरावर घडते, त्यामुळे याचा पृथ्वीवरील जीवनावर कोणताही सिद्ध वैज्ञानिक परिणाम होत नाही असे त्यांनी म्हटले आहे.
ग्रहणामुळे अन्न, पाणी दूषित होते किंवा त्यात विषारी द्रव्ये निर्माण होतात हे कोणतेही वैज्ञानिक पुराव्याने सिद्ध झालेले नाही. अशा कोणत्याही अंधविश्वासाला बळी न जाता दैनंदिन कार्यक्रम सामान्यपणे चालू ठेवता येतात. ग्रहण पाहण्यासाठी कोणत्याही विशेष सुरक्षा उपकरणाची (जसे की सूर्यग्रहणासाठी लागते) गरज नाही. तुम्ही ते डोळ्यांवर कोणत्याही संरक्षणाशिवाय तासन्तास चंद्राचे निरीक्षण करू शकता. हवामान खुलं राहिल्यास हा एक उत्कृष्ट खगोलीय अनुभव ठरेल असे डॉ. राजीव व्हटकर यांनी सांगितले होते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.