नाट्यछटा हा साहित्यप्रकार काहीसा दुर्मिळ होत असतानाच ‘प्रकाश पेरण्यासाठी – खजिना नाट्यछटांचा’ या डॉ लता पाडेकर यांनी अत्यंत साध्या, सोप्या आणि रंजक भाषेतून मूल्ये रूजविण्यासाठी नव्या पिढीच्या डोळ्यात अंजन घालणाऱ्या नाट्यछटा लिहिल्या आहेत,” असे गौरवोद्गार प्रवीण दवणे यांनी काढले.
बालदिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ साहित्यिक आणि गीतकार प्रवीण दवणे, लोकसाहित्याचे अभ्यासक मा रा लामखडे, विश्वकर्मा पब्लिकेशन्स पुणे यांचे संपादक संदीप तापकीर, माजी पर्यवेक्षिका राधिका बडगुजर, स्तंभलेखक संजय नलावडे यांच्या हस्ते प्रकाश पेरण्यासाठी – खजिना नाट्यछटांचा’ या पुस्तकाचे प्रकाशन राजुरी येथील विद्या विकास मंदिर येथे झाले.
नाट्यछटा म्हणजे काय तर आपले वय विसरून अत्यंत कमी वेळेत एकजणासच अनेक भूमिकांचा कसा अभिनय करावा लागतो आणि जाता जाता अंतर्मुख करायला लावतो, हे समजण्यासाठी नील भंडारी, चैत्राली कांबळे आणि कल्याणी माने यांनी प्रातिनिधिक स्वरूपात प्रत्येकी एक नाट्यछटा सादर करून दाखविली. त्याला प्रेक्षकांची उत्तम दादा मिळाली.
याप्रसंगी प्राचार्य जी के औटी यांनी प्रास्ताविक केले. आपल्या शाळेची माजी विद्यार्थिनी एक लेखिका म्हणून शाळेमध्ये पुस्तक प्रकाशन करण्यासाठी येत आहे म्हणून सर्व स्टाफसहित त्यांनी कार्यक्रमाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. विद्यार्थिनींनी सुरेल आवाजात ईशस्तवन आणि स्वागतगीत सादर केले. संदीप तापकीर यांनी या पुस्तकाची वैशिष्ट्ये सांगितली. प्रथमतःच चित्रांसह असे रंगीत पुस्तक त्यांनी बाजारात उपलब्ध करून देण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. सर्व चित्रं आरती हटृंगडी यांनी काढलेली आहेत.
लेखिकेने मनोगतातून बालपणापासून आतापर्यंतच्या प्रवासाची वाट समजावून सांगितली. अनवाणी पायाने शिक्षणासाठी पुण्याला येणारी मुलगी शिक्षिका बनून लेखिका म्हणून वावरतानाचा प्रवास डॉ लता पाडेकर यांनी सांगताना अनेकांचे डोळे भरून आले.
यावेळी प्रवीण दवणे यांनी या पुस्तकातील ३१ नाट्यछटांपैकी अनेक नाट्यछटांचा परामर्श घेतला. “विशेषतः बालकांचा वयोगट लक्षात घेऊन या नाट्यछटा लिहिल्या गेल्यामुळे स्नेहसंमेलनातही सादर करण्यास त्याची मोलाची मदत होईल. विश्वकर्मा ह्या नामवंत प्रकाशनाने उत्कृष्ट निर्मितीमूल्य जपत हे पुस्तक वेधक केले आहे. कला, विज्ञान मनोरंजन, बालपणीच्या आठवणी जपणाऱ्या, भाषेतील लालित्य पेरीत येणारा हा ज्ञानप्रकाश नव्या पिढीला सकस वाचनाकडे नेईल, याची मला खात्री वाटते,” असेही ते म्हणाले.
राधिका बडगुजर यांनी धिटुकली पणतीसुद्धा कसा प्रकाश पेरते हे विशद केले. वाचन करताना नाट्यछटा कशा आटोपशीर आहेत हे आवर्जून सांगितले. स्तंभलेखक संजय नलावडे यांनी या साहित्यप्रकाराचे कौतुक करून या नाट्यछटा सर्वदूर पोहचण्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले मा. रा. लामखडे यांनी शालेय जीवनापासून साहित्यिक कसा घडतो, त्यासाठी खूप वाचन केले पाहिजे हे स्वानुभवावरून सांगितले.
या प्रसंगी राजुरी गावचे माजी सभापती दीपक आवटे, सरपंच प्रियाताई हाडवळे, अजय कणसे, आंतरराष्ट्रीय चित्रकार दत्ता पाडेकर, संशोधक डॉ भरत पाडेकर, ज्ञानेश्वर गटकळ, संगीता सरोदे, अंजनी डुंबरे, वारुळे मॅडम, भाऊसाहेब हांडे, गंगाराम बाबा डुंबरे, लेखिकेचे आई-वडील आदी उपस्थित होते.
संदीप वाघोले यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन करून कार्यक्रम एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवला. क्रीडाशिक्षक संतोष गोपाळे आणि सर्व शिक्षकवृंद यांनी बैठकव्यवस्था, सजावट, रांगोळी, ध्वनीयंत्रणा, फोटो, भोजन यांची सुंदर सोय करण्यासाठी अपार मेहनत घेतली.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
