ओळख: वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..! ..१... प्रा. डॉ. मृणालिनी आहेर
स्त्रीवादी विचारांचा समाजात आणि व्यक्तिगत जीवनात डोळसपणे पाठपुरावा केला. नोकरीच्या ठिकाणी होत असलेल्या लैंगिक भेदभावाला सातत्याने विरोध केला. लिंगभावसमानता याविषयी त्या कायम कार्यरत राहिल्या. आपला विद्यार्थी – विद्यार्थिनी हे सजग, समानता मानणारे व्हावेत या हेतूने विद्यार्थिनींच्या सक्षमीकरणासाठी तेजस्विनी हे भित्तीपत्रक, काव्यवाचन स्पर्धा, पथनाट्ये, स्त्री अभ्यास केंद्र, जोडीदाराची विवेकी निवड सारखे सुरु केलेले उपक्रम विद्यार्थीप्रिय झाले.
ॲड. शैलजा मोळक
लेखक, कवी, संपादक, प्रकाशक
अध्यक्ष, शिवस्फूर्ती प्रतिष्ठान पुणे
मो. 9823627244
कॉ. गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता ? या पुस्तकाच्या आज करोडो प्रती सामान्यांपर्यंत पोहोचत असताना असे काय आहे या पुस्तकात की ज्यामुळे त्यांना मारले गेले ? हा सर्वसाधारण पडणारा प्रश्न. आजही हिंदुत्ववादी त्या पुस्तकाला किंवा त्या पुस्तकाचे समर्थन करणाऱ्याला विरोधच नव्हे तर दहशतवाद पसरवून झुंडशाही पध्दतीने त्रास देत आहेत. अशी घटना मागील वर्षी सातारा येथील रयत शिक्षण संस्थेत घडली. पुरोगामी महाराष्ट्रातच नव्हे तर कर्मवीर भाऊरावांच्या संस्थेत हा प्रकार घडला. इंग्रजी विषयाच्या शिक्षिका डॅा. मृणालिनी आहेर यांनी या पुस्तकाचा संदर्भ विद्यार्थ्यांशी बोलताना दिल्याने त्यांना माफी मागायला लावली पण त्यांनी माफी मागितली नाही. मात्र कॉलेजमधील प्राचार्या मॅडम व इतर सहकारी प्राध्यापकांनी माफी मागितली. इतकेच नव्हे तर पोलिस प्रशासनाने सुध्दा माफी मागा व प्रकरण मिटवा अशी दहशत निर्माण केली. पण आमची ही रणरागिणी माफी मागत नाही यामुळे तिची बदली शिक्षा म्हणून विटा येथे करण्यात येते, तिला मानसिक त्रास दिला जातो. पण ती व्यवस्थेविरुध्द लढा देते. हायकोर्टमधे जाते. तिचे पती व मुलगी तिच्यासोबत ठामपणे उभे राहातात. ती जिंकते. ज्या कर्मवीरांनी बहुजनांसाठी आयुष्य वेचले. “माझ्या बापाच नाव बदलीन पण शिवाजी कॉलेजला दिलेले शिवाजी राजांचे नाव बदलणार नाही ” असे म्हटले त्या संस्थेतील पदाधिकारी एवढे भित्रे कसे ? यांना कर्मवीरच समजले नाहीत तर शिवाजी महाराज कुठून समजणार ? पण हे समजणारे काही शिक्षक आजही आहेत याचा आनंद आहे. त्यांपैकी एक आहे . प्रा. डॅा.मृणालिनी आहेर.
एम. ए., एम.फिल., पीएच. डी. ( इंग्रजी ) प्राप्त करूनही, स्वतः ला फक्त एका विषयापुरते मर्यादित न ठेवता मृणालिनी ताई सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी ग्रामीण भागात सुलभ इंग्रजीची चळवळ सुरू केली आणि विद्यार्थीनींमध्ये आत्मभान जागृत होण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केलेले आहे.
मोठेपणीच्या विचारांचे बीज हे बालपणातच दडलेलं असतं. ताईंच्या आजोबांनी डॉ. बाबासाहेबांचे भाषण ऐकले , त्यांचे “पोटाला चिमटा घ्या पण मुलांना शिकवा ” हे वाक्यं त्यांच्या मनावर बिंबले. त्यानुसार त्यांनी आपला मुलगा व ताईंचे वडील भानुदास याला शिकवले. ते पुढे मुख्याध्यापक म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या अनेक शाखांत काम करून निवृत्त झाले. त्यांच्या आई विजयालक्ष्मी यांनाही आंबेडकरवादी चळवळीचा वारसा होता. हा वारसा ताईंना माहेर – सासर दोन्ही कुटुंबातून मिळाला. घरातूनच समतावादी मुल्यांची प्रेरणा मिळाली. लहानपणीच ताई घोडा, बैलगाडी चालवायला शिकल्या. आज त्या कोणतीही चारचाकी सराईतपणे चालवतात. चार भावंडे व आई वडील अशा मोठ्या कुटुंबात ताई मोठ्या.
वडीलांच्या सततच्या बदल्यांमुळे विविध ठिकाणी शालेय व शिक्षण महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करावे लागले. लहानपणापासून साहित्याची आवड त्यामुळे प्रचंड वाचनाने स्पष्टवक्तेपणा, परखड विचार व ठाम सामाजिक भूमिका ताई विद्यार्थी दशेपासूनच घेत राहिल्या. एम. ए. इंग्रजी होताच रयत शिक्षण संस्थेत त्या नोकरीस लागल्या. सन १९९४ पासून आजतागायत ताई वरिष्ठ महाविद्यालयात कार्यरत आहेत. सातारा, पाचवड, पिंपरी-चिंचवड, पनवेल, वाशी, राजापूर, कराड, कर्जत, रामानंदनगर अशा अनेक ठिकाणी विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून नावलौकिक मिळवला. नोकरी सांभाळून एम. फिल, पीएच. डी. केले.
स्त्रीवादी विचारांचा समाजात आणि व्यक्तिगत जीवनात डोळसपणे पाठपुरावा केला. नोकरीच्या ठिकाणी होत असलेल्या लैंगिक भेदभावाला सातत्याने विरोध केला. लिंगभावसमानता याविषयी त्या कायम कार्यरत राहिल्या. आपला विद्यार्थी – विद्यार्थिनी हे सजग, समानता मानणारे व्हावेत या हेतूने विद्यार्थिनींच्या सक्षमीकरणासाठी तेजस्विनी हे भित्तीपत्रक, काव्यवाचन स्पर्धा, पथनाट्ये, स्त्री अभ्यास केंद्र, जोडीदाराची विवेकी निवड सारखे सुरु केलेले उपक्रम विद्यार्थीप्रिय झाले.
रयत शिक्षण संस्थेतील ज्येष्ठ सहकारी प्रा. अजित गाढवे यांच्यासमवेत परिचयोत्तर आंतरजातीय विवाह नातेवाईकांचा विरोध पत्करून केला. जातीनिर्मूलनाचे उद्दिष्ट प्रत्यक्ष कृतीत आणण्याचे काम ताईंनी निर्भीडपणे केले. ‘सृजना ‘ या आपल्या मुलीच्या सर्व कागदपत्रांवर जात-धर्म आणि आडनाव न लावता तिला तिची ओळख समाजात निर्माण करायची संधी दिली , ती सध्या सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात नाट्यशास्त्राचा अभ्यासक्रम शिकत आहे.
चांगले विचार, आचार व कृती करणाराच्या पाचवीलाच संघर्ष पुजलेला असतो असे ताई म्हणतात. बुवाबाजी व अंधश्रद्धा, अनेक अनिष्ट प्रथा परंपरांना विरोध केल्याने समाज व नातेवाईकांशी संघर्ष करावा लागला. शनीशिंगणापूर येथे शनी चौथऱ्यावर महिलांना असलेली प्रवेशबंदी ताईंनी ३० वर्षांपूर्वी स्वतः प्रवेश करून मोडून काढली. नोकरीच्या ठिकाणी चालणाऱ्या गैरप्रकारांना, भ्रष्टाचाराला सातत्याने विरोध केल्याने, प्रशासनाशी संघर्ष केल्याने त्यांच्या २० ठिकाणी बदल्या झाल्या. प्रा. गाढवे यांना त्यांच्या पुर्वायुष्यातील वैफल्यातून बाहेर काढून त्यांच्याशी विवाह केल्याने लोकापवाद, बदनामी यालाही ताईंनी समर्थपणे तोंड दिले. नातेवाईकांचा छुपा विरोध व नाराजी सहन करावी लागली.
पाचवड येथे शिवाजी महाराजांच्या एकेरी उल्लेखावरून झालेल्या हुल्लडबाजीला रोखण्यासाठी धर्मांधांच्या झुंडीला अंगावर घेतले. पोलिस, प्रशासन, संस्थेचे पदाधिकारी सर्वांनी दबाव आणायचा प्रयत्न करूनही माफी न मागितल्याने ताईंची एका महिन्यात दोनदा अन्यायकारक पद्धतीने बदली केली. परंतु उच्च न्यायालयात त्यांनी सांस्कृतिक व शैक्षणिक दहशतवादाविरोधात लढा लढला व तेथे त्यांना न्याय मिळाला.
ताईंनी तस्लीमा नसरीन या बांगला देशी स्त्रीवादी लेखिकेच्या “निर्वाचित कलाम” या पुस्तकावर प्रबंध लिहून एम. फील केले. भारतीय स्त्री लेखिकांच्या आत्मकथनांमधील बंडखोरी व संघर्षाच्या प्रेरणा या विषयावर प्रबंध लिहून पी. एचडी. पूर्ण केले. हा प्रबंध पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाला आहे. तसेच “प्रकृती पुरूष संवाद”हा स्त्री पुरुष नातेसंबंधांवरील काव्यसंग्रह प्रा. गाढवे यांच्या समवेत प्रकाशित केला आहे. ‘महारी बोलीचा समाजशास्त्रीय अभ्यास’ या विषयावर लघुशोध प्रकल्प पूर्ण केला.
प्रामाणिकपणे, परखडपणे, बंडखोरपणे काम करणारी माणसं पुरस्काराची अपेक्षा कधीच करत नाहीत पण समाज त्यांची दखल घेत असतो. महात्मा फुले इतिहास संशोधन अकादमी पुणे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार, स्वयंपूर्ण प्रतिष्ठान कराड व महात्मा फुले जनअभियान सातारा यांचा लोकशाही रक्षक पुरस्कार, सांस्कृतिक दहशतवादाविरोधात ठाम पुरोगामी भूमिका घेतल्याबद्दल सलोखा ग्रुप पुणे, क्रांतीसिंह नाना पाटील लोकविद्यापीठ विटा, सकल भारतीय समाज, अहिल्यानगर, अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोल्हापूर, सेम मुव्हमेंट, मुंबई यांच्याकडून सन्मान करण्यात आला.
आयुष्यात कितीही संघर्ष आला तरीही ही आमची रणरागिणी सर्वांना पुरून उरली, फक्त विचार न मांडता प्रत्येक विचार कृतीतून अंमलात आणला अशा या आधुनिक नवदुर्गेला मानाचा मुजरा ..!!
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
