लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण
पुणे : टिळकांच्या काळात राजकारण हेच राष्ट्रकारण होते. राजकारण, समाजकारण आणि राष्ट्रकारण हे लोकमान्यांची नीती होती. स्वातंत्र्याच्या लढ्यात भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ज्यांचा उल्लेख होतो. ते लोकमान्य टिळक सर्वांचे आदर्श आहेत. आमचे प्रेरणास्त्रोत व दैवत आहेत. त्यांच्या नावाने मिळालेल्या पुरस्काराचा आनंद आणि अभिमान आहे. लोकमान्यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी हा पुरस्कार मला दिला गेला. त्यामुळे लोकमान्यांच्या स्वप्नातील भारतासाठी येत्या काळात मी निश्चितपणाणे प्रयत्न करीन. जे जे करता येईल, त्यासाठी आग्रही राहील. अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी दिली.
लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने (हिंद स्वराज्य संघ) भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे थोर सेनानी लोकमान्य टिळक यांच्या 105 व्या पुण्यतिथीनिमित्त झालेल्या सोहळ्यात नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. एक लाख रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराला उत्तर देताना गडकरी बोलत होते. टिळक स्मारक मंदिरात हा सोहळा झाला. या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विश्वस्त सुशीलकुमार शिंदे, डॉ. प्रणति रोहित टिळक, डॉ. गीताली टिळक उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, लोकमान्यांचे नेतृत्व, कर्तृत्व, दातृत्व मोठे होते. स्वराज्याचे रूपांतर सुराज्यात करण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यांच्या स्वप्नातील सामर्थ्यशाली आणि समृद्ध भारताच्या निर्मितीचा संकल्प आपण करून त्यांच्या स्वप्नातील भारत साकारला पाहिजे. मी जात, धर्म, प्रात आणि पक्षाच्या पलीकडे जावून काम करतो. असेच काम लोकमान्यांना अभिप्रेरित होते. त्यांनीही या सर्व गोष्टीच्या पलीकडे जावून देश स्वातंत्र्याची चळवळ व्यापक केली. म्हणूनच ते राष्ट्रीय नेते झाले. लोकमान्यांसह राष्ट्रपुरूषांच्या बलिदानामुळेच आज आपण स्वतंत्र भारतात
मोकळा श्वास घेत आहोत. लोकमान्यांच्या नावाचा पुरस्कार मिळाल्यामुळे माझी जबाबदारी अधिक वाढली असल्याचेही गडकरी यांनी नमूद केले.
या पुरस्कारामुळे जसा आनंद झाला आहे, तसेच सामान्य कार्यकर्त्याला एवढा मोठा पुरस्कार दिल्याचा संकोचही आहे. सामाजिक जीवनात आपण ज्यांना मोठे समजतो. प्रत्यक्षात मात्र ते छोटे असतात. आणि आपण ज्यांना छोटे समजतो ते खूप मोठे असतात. राजकारणात खरे बोलून चालत नाही. तरीही आपल्या कार्याच्या जोरावर नेत्यांनी कायम सत्य बोलले पाहिजे. तुमच्याकडे निर्णय क्षमता असेल, तर कामे होतात. विचारी लोकांपेक्षा अविचारी लोकच धाडसी निर्णय घेतात. माझ्या विभागाकडे खूप पैसा आहे. मात्र कामे होत नाहीत ही अडचण आहे. इमानदारीने कामे करणार्यांची संख्या त्याहून कमी असल्याची खंतही गडकरी यांनी यावेळी व्यक्त केली.
अॅटोमोबाइल इंडस्ट्रीत आज आपण तिसर्या स्थानावर आहोत. मात्र येत्या पाच वर्षात आपण अमेरिका आणि चीनला मागे टाकून पहिल्या क्रमाकांवर असू. लढणे हा महाराष्ट्राचा धर्म आहे. क्रांतिकारकांचे बलिदान हा इतिहास आहे. सामाजिक, आर्थिक आणि समता महाराष्ट्राने देशाला दिली आहे. देश ताकदवान आहे. देशाला मोठी संस्कृती, वारसा आहे. जगाला देशाचे आकर्षण आहे. आत्मविश्वास आणि अहंकार या दोन शब्दांत फरक आहे. तो फरक समजून घेतला पाहिजे. टिळक पुरस्काराने माझ्यावरील जबाबदारी वाढली आहे. ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी मी कार्यरत असणार असल्याचेही नितीन गडकरी यांनी सांगितले.
प्रारंभी लोकमान्यांच्या पुतळ्याला हार घालून ‘केसरी’चे विश्वस्त-संपादक डॉ. दीपक टिळक यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. डॉ. रोहित टिळक यांनी प्रास्ताविक केले. लोकमान्य टिळक राष्ट्रीय सन्मान देऊन गौरविलेल्या आजवरच्या पुरस्कारार्थींच्या जीवन कार्याचा आढावा घेणार्या इंग्रजी ग्रंथाचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. डॉ. प्रणति रोहित टिळक यांनी मानपत्राचे वाचन केले. ऋषीकेश बडवे यांनी लोकमान्य स्वतन सादर केले. वसुधंरा काशीकर यांनी सूत्रसंचालन केले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
