June 25, 2025
Cover of the Marathi edition of “The Power of Your Subconscious Mind” translated by Manjusha Mule
Home » सुप्त मनाचा वेध : द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शियस माईंड….
मुक्त संवाद

सुप्त मनाचा वेध : द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शियस माईंड….

‘ शक्तिमान ‘ नावाची एक मालिका काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर होऊन गेली. ती किशोरवयीन मुलांमध्ये खूप आवडीची होती. कारण शक्तिमान हा कोणत्याही संकटाचा सामना करु शकत होता व दुष्ट प्रवृतींचा नाश करत होता. आपणही असेच शक्तिमान व्हावे असे प्रत्येक मुलाला वाटे. आपल्यालाही नाही का वाटत आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ असावे  ?  पण एखादी दैवी शक्ती कशी प्राप्त करायची  ? दैवी शक्ती खूप वेगळा विषय आहे. पण आपण आपल्यातील शक्तीला तरी ओळखतो का  ? अशी एक शक्ती प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे की जी दुर्लक्षिली गेली आहे. ही शक्ती म्हणजे मनाची शक्ती, मन: सामर्थ्य. पण ही शक्ती असते कुठे, त्याचा शोध कसा घ्यायचा आणि ही शक्ती वापरायची कशी ? या सर्व प्रश्नांची उत्तरे देणारे, खूप वेगळ्या विषयावरील पुस्तक म्हणजे डॉ. जोसेफ मर्फी यांचे ‘ द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शियस माईंड ‘. या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद केला आहे मंजुषा मुळे यांनी….

सुहास रघुनाथ पंडित, सांगली.
९४२१२२५४९१

‘ मन मनास उमगत नाही ‘, मन वढाय वढाय, तोरा मन दर्पण कहलाये.’ अशा अनेक काव्य पंक्ती आपल्या कानावर पडलेल्या आहेत. एवढेच नव्हे तर आपण अनेक वेळेला म्हणतो ‘ मी माझ्या मनाला विचारुन बघतो ‘  किंवा ‘ माझं एक मन असं सांगतंय पण दुसरं मन तयार होत नाहीय ‘…. कोणतं हे दुसरं मन ? मनं आहेत तरी किती ? खरंच दुसरं मन असतं का ? या सर्व प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात मिळतात. एकदा का या दुसऱ्या मनाचा शोध लागला की त्याच्या मदतीने आयुष्यात कशी वाटचाल करायची आणि यशस्वी कसे व्हायचे याचा मूलमंत्र देणारे हे पुस्तक. अद्भूत वाटणारी पण शास्त्रीय आधार  असणारी माहिती आपल्यासमोर येते.या शक्तीचा वापर ज्यांना आधी माहीत नव्हता पण माहित झाल्यावर ज्यांनी तिचा उपयोग करुन घेतला अशा अनेक व्यक्तींची नावासह उदाहरणे या पुस्तकात वाचायला मिळतात. मग आपणही नकळतपणे आपल्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगांची आठवण झाल्यामुळे तुलना करु लागतो व त्यातील बरेचसे मुद्दे आपल्याला पटू लागतात.

लेखकाने बायबलातील अनेक वचनांचा उल्लेख वारंवार केला आहे. तसेच मनोभावे केलेल्या प्रार्थनेचे महत्त्व व सामर्थ्य काय असते ते ही दाखवून दिले आहे. त्यामुळे अध्यात्म, चिंतन, भक्ती यासारखी मनोबल वाढवणारी तत्वे सर्वत्र सारखीच आहेत याची जाणीव होते. बाहेरचे मन आणि आतले मन यांना जोडणारा एक अदृश्य धागा आपणच शोधून काढला तर सुप्त मनाच्या सामर्थ्यामुळे आपण आयुष्यात यशस्वी होऊ शकतो हे सोदाहरण पटवून देणारे हे पुस्तक आहे. किंबहुना आपल्या आयुष्यातील यशापयश हे बहुतांशी आपल्या विचार पद्धतीवरच अवलंबून असते हे लक्षात आणून देण्याचे काम या पुस्तकाने केले आहे.

या पुस्तकाची अनुक्रमणिका जरी पाहिली तरी पुस्तकाचे अंतरंग लक्षात येते. सुप्त मन ( सबकॉन्शियस माईंड ) म्हणजे काय, त्याचे सामर्थ्य काय आहे, मन कसे काम करते, सुप्त आणि जागृत मन यात काय फरक आहे, आपल्याला हवे असणारे परिणाम कसे साधायचे, शक्तीचा वापर कसा करावा या सर्व प्रश्नांची उकल या ठिकाणी केली आहे. शिवाय, सुसंवादी नातेसंबंध, मानसिक आरोग्य, निर्भय मन यासाठी सुद्धा सुप्त मनाची शक्ती कशी उपयोगी पडते, कशी वापरावी हे लेखकाने सांगितले आहे. मनाचे तारुण्य टिकवून ठेवले तर नैसर्गिक वार्धक्याची भीती बाळगायचे कारण नाही असा अत्यंत महत्त्वाचा संदेशही आपल्याला वाचायला मिळतो. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. त्यामुळे त्याची उजळणी केली तरी मनाची तयारी होऊ शकेल. यातील काही मुद्दे सांगायचे म्हटले तर अपुरेपण वाटेल. त्यामुळे प्रत्यक्ष वाचन करणेच योग्य ठरेल.

हे पुस्तक वाचत असताना एक गोष्ट जाणवते ती म्हणजे जरी हे पुस्तक पाश्चात्य लेखकाने लिहिले असले तरी काही तत्वे, विचार हे सर्वत्र सारखीच, त्रिकालाबाधित सत्यच असतात.’ पेराल तसे उगवेल ‘ याची जाणीव लेखकाने अनेक वेळेला करून दिली आहे. आपल्या वागण्यावर इतरांचे वागणे अवलंबून असते. इच्छा असेल तर मार्ग सापडतो. धार्मिक व अध्यात्मिक वचने वाचताना आपल्या ‘दासबोध किंवा ‘मनाच्या श्लोकां’ ची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. ‘ आयुष्य स्वतःला नेहमी नव्या दमाने नवे कपडे घालत असते ‘ हे वाक्य वाचताना गीतेतील ‘ वासांसी जीर्णानी….’ या श्लोकाचे स्मरण होणे अपरिहार्य आहे. पुस्तकातील अनेक वाक्ये ही सुविचारांप्रमाणे कायम लक्षात ठेवावीत अशी आहेत.

‘ यश म्हणजे यशस्वी जीवन पद्धती.’  ‘ मन कधीही निवृत्त होत नाही’ , ‘ विचार बदला, मग तुमचे विधिलिखित तुम्हीच बदलाला ‘ अशी अनेक उदाहरणे देता येतील. हा परिचय थांबवण्यापूर्वी एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. लेखकाने हे पुस्तक स्वानुभवाने लिहिले आहे. लेखक डॉ. मर्फी हे असाध्य रोगाने आजारी होते. या आजारपणाच्या काळात त्यांनी सुप्त मनाच्या शक्तीला जागृत करुन गंभीर आजारावर विजय मिळवला आहे. त्यामुळे हे लेखन ‘ आधी केले, मग सांगितले ‘ या पद्धतीचे आहे.

थोडक्यात, आपण कसे आहोत, कसे असायला पाहिजे आणि आपण तसे होऊ शकतो हा आत्मविश्वास जागृत करणारे हे पुस्तक स्वतः चे आयुष्य यशस्वी करण्यासाठी उत्तम मार्गदर्शक आहे. काही तत्वे आणि काही तंत्रे माणसाचे आयुष्य बदलू शकतात आणि आयुष्य घडवू  शकतात. सुप्त मनाला जागे करुन जागृत मनाला योग्य मार्ग दाखवणारे हे पुस्तक मराठीत अनुवादित केल्याबद्दल मंजुषा मुळे यांना धन्यवाद  !

पुस्तकाचे नाव      : द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शियस माईंड
लेखक                 : डॉ.जोसेफ मर्फी
अनुवादक            : मंजुषा मुळे ( ९८२२८४६७६२ )
प्रकाशक              : रिया पब्लिकेशन्स, शाहूपुरी, कोल्हापूर
मूल्य.                    : रु.३५०/-


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading