January 20, 2026
Poet Ajay Kandar delivering a lecture on reading culture at Barrister Nath Pai Library golden jubilee in Oni, Kankavli
Home » वाचन संस्कृतीच्या अभावामुळे समाजातील विवेक हरपला – कवी अजय कांडर
काय चाललयं अवतीभवती

वाचन संस्कृतीच्या अभावामुळे समाजातील विवेक हरपला – कवी अजय कांडर

वाचन संस्कृती व्याख्यानात कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन

ओणी बॅ. नाथ पै वाचनालयाचा सुवर्ण महोत्सव सोहळा साजरा

कणकवली – वाचन संस्कृतीमुळे समाज सुसंस्कृत होत असतो. आता मात्र वाचन संस्कृतीच्या अभावामुळे समाजातील विवेक हरपला असून बॅरिस्टर नाथ पै, यशवंतराव चव्हाण असे राष्ट्रीय पातळीवरील मराठी नेते वाचन संस्कृतीमुळेच घडले. त्यांच्या रोजच्या जगण्यात त्याचे प्रतिबिंब दिसत होते. मात्र आताचे राजकारणी स्वतःच्या असलेल्या ताब्यातील ग्रंथालयही नीट चालवत नाहीत. त्यांनी उत्तम ग्रंथ वाचणे ही तर दूरचीच गोष्ट राहिली. याचा एकत्रित परिणाम समाजावर झाला असून वाचन संस्कृती लोपपावत चालली असल्याची खंत नामवंत कवी आणि व्याख्याते अजय कांडर यांनी ओणी येथे केले.

ओणी नूतन विद्यालयाच्या बॅरिस्टर नाथ पै वाचनालयाचा सुवर्ण महोत्सवी सोहळा कवी अजय कांडर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला. यावेळी वाचन संस्कृती या व्याख्यानात बोलताना कांडर यांनी सोशल मीडियामुळे ग्रंथ वाचनावर झालेला परिणाम आणि त्याचे दीर्घकालीन तोटे याविषयी सविस्तर विवेचन केले. वाचनालयाचे अध्यक्ष ॲड. गुरुदत्त खानविलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला वाचनालयाचे उपाध्यक्ष एम. आर. पाटील, नूतन विद्यामंदिर शाळा समिती सदस्य नाथ गांधी, मुख्याध्यापक विनोद मिरगुले, ग्रंथालय कार्यवाह पुंडलिक वाजंत्री, चंद्रकांत जानस्कर, इंग्लिश मिडीयम स्कूल प्राचार्य साक्षी शिंदे आदी उपस्थित होते.

कांडर म्हणाले, आजची वाचन संस्कृती डिजिटल माध्यमांच्या प्रभावामुळे बदलली आहे, जिथे कमी वेळेत माहिती मिळवण्यावर भर आहे, पण सखोल वाचनाला वेळ मिळत नाहीये; अडचणींमध्ये तंत्रज्ञानामुळे लक्ष विचलित होणे, वेळेचा अभाव, मनोरंजनाचे पर्याय आणि योग्य पुस्तकांची निवड करण्यात येणारी अडचण यांचा समावेश आहे, यामुळे पारंपरिक वाचन कमी होत आहे. तरीही, ई-बुक्स, ऑडिओबुक्स आणि सोशल मीडियाद्वारे वाचनाची आवड टिकवून ठेवण्याचे प्रयत्न सुरू असले तरी त्यातून मूलभूत वाचन संस्कृती विकसित होणार नाही हे आपण लक्षात घ्यायला हवे.

आजवर जे महापुरुष घडले ते केवळ शिक्षणामुळे आणि वाचनामुळे. महात्मा फुले यांना शिक्षण घेण्यासाठी प्रचंड विरोध झालाच पण ते मोठ्या जिद्दीने शिक्षित झाले. शिक्षित असल्यामुळे ते पुण्यात ज्या ठिकाणी राहत होते त्या मुस्लिम मोहल्ल्यात कबीर बीजक नावाचा ग्रंथ वाचण्यासाठी , केवळ वाचता येतं म्हणून महात्मा फुले यांना बोलावले जायचे. कबीरांच्या समतावादी विचारांचा प्रभाव फुले यांच्यावर पडला व ते सामाजिक क्रांतीच्या चळवळीचे अग्रणी बनले. त्याचप्रमाणे डॉ . बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे ग्रंथप्रेम सर्व जगाला ज्ञात आहे. बाबासाहेबांचे वडिल सुबेदार रामजी आंबेडकर यांनी बाबासाहेबांच्या वाचनाकडे विशेष लक्ष दिले होते. बालवयातच बाबासाहेबांना वाचनाची विलक्षण आवड रामजींमुळे निर्माण झाली. आर्थिक चणचणीच्या काळात बाबासाहेबांच्या वडिलांनी आपल्या मुलीला लग्नात घातलेले दागिने गहाण ठेवून त्यांच्या वाचनासाठी पुस्तके आणून दिली.

बाबासाहेबांच्या वाचनवेडामुळेच शिवचरित्राचे पहिले लेखक गुरुवर्य कृष्णाजी केळुसकर प्रभावित झाले आणि त्यांनी बाबासाहेबांना वाचनासाठी पुस्तके उपलब्ध करून दिली, पुढे हेच बाबासाहेब साऱ्या विश्वातील एक प्रज्ञावंत विद्वान म्हणून ओळखले गेले. वाचनाच्या प्रभावातून असे बहुजनांचे उद्धारक घडले आहेत. आपण मात्र त्यांचे अनुकरण न करता फक्त महामानवांची घोषणा देत राहीलो.त्यांचे विचार आत्मसात करण्यासाठी त्यांनी लिहिलेले ग्रंथ वाचणे आणि त्याचे अनुकरण करणे हे फार महत्त्वाचे आहे.ही गोष्ट सुद्धा वाचन संस्कृतीमुळेच आपल्या लक्षात येते.वाचन संस्कृतीतून व्यक्ती आणि समाजाचा सर्वांगीण विकास होतो, कारण वाचनामुळे ज्ञान वाढते, विचार करण्याची शक्ती विकसित होते, कल्पनाशक्तीला पंख फुटतात, आणि व्यक्तिमत्त्वाला नवी दिशा मिळते, ज्यामुळे सुसंस्कृत, प्रगल्भ आणि जागरूक समाजाची निर्मिती होते; वाचन संस्कृती ही एक अशी प्रक्रिया आहे जी व्यक्तीला ज्ञानी, चिकित्सक आणि सर्जनशील बनवते.

या प्रसंगी ॲड. खानविलकर यांनी बॅरिस्टर नाथ पै वाचनालयाचा इतिहास कथन केला. प्रास्ताविक ज्ञानेश्वर वाघाटे यांनी तर आभार सुचिता जाधव यांनी मानले. सूत्रसंचालन सचिन जाधव यांनी केले.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

डॉ. नितीन बाबर यांच्या अर्थप्रवाह पुस्तकाला पुरस्कार

प्रेमाच्या पेटीनेच गाठता येतो मोक्षाचा तीर  

दुखभरे दिन बीते रे भैय्या…

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading