वय सत्तरीच्या आसपास, गेल्या वर्षभरापासून शारीरीक अस्वस्थ्याचा धीराने सुरु असणारा मुकाबला.. तरीही चेहर्यावरचा उत्साह तितकाच तरुण, सतेज. लेखणीतली ताकदही तितकीच टोकदार. वर्षभरापासून घरातच असूनही प्रत्येक महत्वाच्या घटनेची आवर्जून असणारी संशोधक माहिती, दहा बाय बाराच्या खोलीत दोन्ही बाजूला असणारी पुस्तकाची रेलचेल, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा डोळस प्रभाव असणारे, गेल्या 50-60 वर्षात घडलेल्या घटना जशाच्या तशा सांगणारे कोल्हापूरातील दैनिक केसरीचे ज्येष्ठ शोधक वृत्तीचे पत्रकार, समाजभान जागृत ठेवून विधायकपणे चळवळीत सक्रिय असणारे कृतीशील कार्यकर्ते, कोल्हापूरच्या कलेपासून ते पर्यावरणीय घडामोडींच्या प्रवासातील प्रत्येक वळणावरचे सक्रिय साक्षीदार असणार्या उदय कुलकर्णी यांचे भिरभिरं हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्वाचा घेतलेला वेध….
अश्विनी टेंबे
चेहर्यावर नेहमीसारखच हास्य. अंगात व्हाईट रंगाचा शर्ट, काळया रंगाची पॅन्ट, तब्येत थोडीशी खालावलेली असूनही चष्म्याच्या आतूनही मला अजून बरच काही करायच आहे… असं सांगणारी डोळ्यातली ती चमक.. बरच काही सांगून गेली. तब्बल 50 वर्ष असंख्य माणसात वावरणारा, फिरणारा हा अवलिया, गेल्या वर्षभरापासून उपचारार्थ घरात आहे. पण नैराश्याचं सावटदेखील त्यांच्या आसपास फिरकलेलं नाही. त्यांच्या बोलण्यात नकारात्मक सूर नाही. त्यांची लेखणी आजही तितकीच तळपती आहे. पुस्तकांच्या सहवासात रमणार्या उदय कुलकर्णी यांचा पिंडच संयमी आणि विचारशील आहे.
उदयकाकांचा जन्म कोल्हापूरचा असला तरी गडहिंग्लज तालुक्यातील महाराष्ट्र कर्नाटक सीमवरील कवळीकट्टी हे त्यांचं मूळ गाव. त्यांचे वडिल विद्यापीठ हायस्कूलमध्ये महिना 15 रुपये पगारावर शिक्षक म्हणून नोकरी करत होते. आई फार शिकलेली नसली तरी हिंदी राष्ट्रभाषेत तिने प्राविण्य मिळवलं होतं. मोठ्या दोन बहिणी. घरच वातावरण पूर्णत: शैक्षणिक. यामुळे शिक्षणाचं बाळकडू त्यांच्या घरातूनच मिळत गेलं. विद्यापीठ हायस्कूल… मोठा ऐतिहासिक वारसा घेवून आलेली ही शाळा. गं. ना. दिक्षित आणि तोफखाने या शिक्षणतज्ञांनी विद्यापीठ हायस्कूलची स्थापना केली. या दोघांचीही शैक्षणिक तळमळ आणि विद्वत्ता पाहून या हायस्कूलसाठी लागणारी जागा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी दिली. या सार्या गोष्टी वडिलांकडून त्यांच्या कानावर पडायच्या, काही वाचनातून समजायच्या. यातून राजर्षी शाहू महाराज समजून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांचे विचार, त्यांचा दृष्टीकोन किती व्यापक होता याची जाण, ते जसे मोठे होत होते तशी त्यांना होत होती.
आपल्या राजाची मतं, त्यांचे विचार याची पायाभरणी विद्यापीठ हायस्कूलमधून त्यांच्या मनात होत होती. यामुळे त्यांचेही विचार स्थिर होण्यात मोठी मदत होत होती. प्रत्येक गोष्ट स्वत: तपासून घेण्याचा त्यांना छंदच लागला. आणि ही सवय अनेकदा महागात पडायची. शिक्षक जे शिकवतील त्यावरही विश्वास बसायचा नाही. अर्थात त्यांना तसंही मार्कांशी काहीच देणं घेणं नव्हतं. शिकायचे ते केवळ समजून घेण्यासाठी, ही खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली होती.
याच शिकण्यातून, समजून घेण्यातून, वाचनातून ज्येष्ठ संशोधक स्व. जयंत नारळीकर यांच्याविषयी त्यांच्या मनात कुतुहल निर्माण झालं. त्यांची संशोधकीय वृत्ती अधिक जोर धरु लागली. शिक्षणानंतर शिवाजी विद्यापीठात मुक्त संचार आणि त्याचबरोबर तिथल्या विविध विभागांशी ते आपल्या लेखणीच्या बळावर जोडले गेले. त्यांचे विचार आणि लेखणी काहीतरी वेगळं घडवू पाहात होते. अशा वळणावरच 1979 मध्ये त्यांची दैनिक केसरीशी नाळ जुळली. तत्कालिन पत्रकार वासुदेव कुलकर्णी, दिलीप कुलकर्णी, छायाचित्रकार अनिल वेल्हाळ, तत्कालीन संपादक चंद्रकांत घोरपडे.. यांच्या सहकार्याने उदय काकांनी इथले कित्येक विषय तडीस लावले.
गुटखाबंदी, लोकविज्ञान यात्रा, देवदासी प्रथा, कुणाच्याही भावना न दुखावता चमत्कारामागचं विज्ञान लोकांना समजावून देवून अंधश्रद्धां खर्या अथांने संपवण्याचा प्रयत्न, बळीराजा धरण, चेतना संस्थेची सुरुवात, कोल्हापूरात पहिल्यांदाच झालेला एरो मॉडेलिंगचा शो, अभिनेत्री निशिगंधा वाड यांना त्यांच्या अपघातावेळी उदयकाकंनी केलेली मदत, आरती प्रधान या जलतरण पटूला केलेलं अविस्मरणीय सहकार्य, हॉकी स्टेडियम उभे राहण्यामागे स्वत:ची तीन मजली इमारत विकून मोलाचं योगदान देणारे कुमार आळगावकर, नमंदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांचा वाचवलेला जिव, पश्चिम घाट बचाव मोहिम, रंकाळा जलपर्णी… याबाबत कायम घेतलेली भूमिका, बाबा आमटे, लता मंगेशकर, राज कपूर, देव आनंद, दिलीप कुमार, भालजी पेंढारकर, माई पेंढारकर, स्मिता पाटील अशा कलाकारांसह असंख्य साहित्यिक, मोठ्या राजकीय लोकांशी असणारा घरगुती जिव्हाळा… अशा कित्येक महत्वाच्या घडामोडींशी असंख्य रुपात उदयकाका जोडले गेले आहेत. ज्यांनी केवळ या घटनांना बातम्यांपुरतच मर्यादित न ठेवता त्या त्या गोष्टींशी निगडित चळवळीतही सक्रिय सहभागही नोंदवला.
कोल्हापूरातल्या कित्येक वास्तू, त्यांचा इतिहास आणि सध्याचं त्या वास्तूंचं वर्तमान.. असे दोन्ही काळ उदय कुलकर्णी यांनी याची देही याची डोळा अनुभवले आहेत. नुसते अनुभवले नाहीत, तर या वास्तूंच्या जतनाबाबत, संवर्धनाबाबत योग्य वेळी योग्य त्या सुचनाही संबंधितांना केलेल्या आहेत. हा सगळा इतिहास, हे सगळं वैभव त्यांच्या नजरेतून पाहणं, त्यांच्या शद्बातून अनुभवणं खरच खूप धन्य करणारं आहे. हे सगळं करुनही कुठल्याही पुरस्कारापासून, शासनाचे कोणतेही सहकार्य घेण्यापासून, कोणत्याही कौतुकाची कसलीही अपेक्षा न ठेवता एका दिपस्तंभाप्रमाणे अखंडपणे पत्रकारितेचे व्रत स्विकारणं हे खरच सोपं नाही. सत्तरीतही मी समाजाला आणखी काय देवू शकतो…? या जाणिवेतून झपाटून जावून काम करणार्या उदय काकांच्या शद्बांचं हे भिरभिरलेपण आपल्या काळजाचा ठाव घेणारं आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
