ओळख: वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..! ..वर्षा माळी
संघर्ष पाचवीला पुजलेला असताना, माहेरचा आधार नसताना, स्वतःचे लग्न, त्यानंतरचे कष्ट, सुमारे २० वर्ष नोकरीनिमित्ताने वेगळे राहून केलेला संसार, दोन मुलांचे शिक्षण, पतीच्या सततच्या आजारपणामुळे त्याच्याशी केलेला संघर्ष, पतीनिधनानंतर सुरु केलेली सेकंड इनिंग, त्यातून उभे राहणाऱ्या या आधुनिक नवदुर्गा वर्षाला मानाचा मुजरा..!!
ॲड. शैलजा मोळक
लेखक, कवी, संपादक, प्रकाशक
अध्यक्ष, शिवस्फूर्ती प्रतिष्ठान पुणे
मो. 9823627244
वर्षा सुनिल माळी पूर्वाश्रमीची वर्षा दत्तात्रय जाधव यांचे एम. ए. पर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले. त्यांचे वडील लष्करात होते. वर्षा दीड वर्षांची असताना वडिलांचा जम्मू काश्मिर सीमेवर शहीद झाले. त्यामुळे आईला खडकी मिल्ट्री हॅास्पिटलमध्ये क्लार्क पदाची नोकरी मिळाली.
परंतु नोकरी लागल्यावर वर्षाच्या आईने दुसरे लग्न केले व जॅाब सोडला. परंतु तिची ती सख्खी आई असून तिच्यावर आईचे विशेष असे प्रेम नव्हते. ती वर्षाला तिच्या बालपणापासून सावत्रपणाची वागणूक देत असे. तिच्या आईला स्वत:चे असे स्वतंत्र आणि छान जीवन जगायचे होते. नको त्या लोकांवर विश्वास ठेऊन आयुष्यभर स्वत:च फसतं राहिली व आत्ता थोडी फार नीट वागण्याचा प्रयत्न करतीय. तिलाही एक मुलगी झाली.
वर्षाने ११ वी ते एम. ए. पर्यंतचे शिक्षण मोठ्या अडचणीतून जिद्दीने पूर्ण केले. तिने स्वत:चे शिक्षण पूर्ण करण्यासाठी व स्वत:चा खर्च भागविण्यासाठी अनेक छोटे-छोटे जॅाब केले. वर्षा जन्माने मराठा परंतु तिच्या आईने त्याकाळी दुसरा विवाह केल्यामुळे वर्षाचे लग्न ठरण्यात अनंत अडचणी येत होत्या. ती एका ठिकाणी नोकरी करत असताना तिची ओळख सुनील माळी यांच्याशी झाली. ते मूळचे जळगावचे रहाणारे. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. तिने तिच्या घरच्या संपूर्ण परिस्थितीची कल्पना त्यांना दिली. त्यांनी ती सर्व स्वीकारली.
वर्षाचे वडील, आजोबा हे मिलिटरीत शहीद झाले होते. हा कौटुंबिक वारसा असल्यामुळे तिचेही पोलीस खात्यात जायचे स्वप्न होते, परंतु त्यातही अनंत अडचणींना तिला तोंड द्यावे लागले. तिचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले. त्यानंतर वयाच्या मर्यादेमुळे तिला PSI होण्यासाठी पुन्हा प्रयत्न करता आला नाही.
सन १९९७ मध्ये तिने सुनीलबद्दल तिच्या मामांना सांगितले. वर्षा आणि सुनील त्यांच्या संमतीने विवाहबध्द झाले. तिने सुखी संसाराची आणि समाधानी आयुष्याची खूप सारी स्वप्न उराशी बाळगून नवीन आयुष्याची सुरुवात केली. दोघांनी आपल्या तुटपुंज्या पगारात आनंदाने संसार सुरु केला. तिला एक मुलगी व एक मुलगा झाला. सर्व काही सुरळीत चालू होते. सासरचीही मंडळी आता त्यांच्या आंतरजातीय प्रेमविवाहाला स्वीकारू लागली होती. त्यांना आवडेल ते करायचे, आवडेल तसं रहायचं असे ठरवल्यामुळे तिला त्यांच्याकडून काही त्रास झाला नाही. ती हुशार असल्यामुळे पतीनेही आणखी काही शिकायचे असेल तर शिक अशी परवानगी तिला दिली व ती शिकू लागली.
पतीपत्नी दोघेही काम करत असल्यामुळे हळूहळू प्रगती होत गेली. वर्षाने शिक्षण घेतल्यामुळे तिला चांगल्या संधी मिळत गेल्या. सुनीलनेही नोकरी बदलल्याने तो जास्त दिवस बाहेर गावी असायचा. त्याने पुण्याबाहेर २० वर्षं काढली. पण वर्षाचा नवऱ्याच्या आजारपणाशी संघर्ष सुरु झाला. ती सांगू लागली. ‘वयाच्या ३३ व्या वर्षी मेडिकल चेकअपमधे सुनिलला शुगर निघाली. त्याचवेळी प्रमोशन मिळाल्याने व कामाचा व्याप खूप वाढल्याने पूर्ण महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक राज्य ही फिरती त्यामुळे स्ट्रेस वाढणे, वेळीअवेळी खाणे, भरपूर प्रवास यामुळे त्यांची शुगर वाढत गेली. त्यातच तिच्या सासूचे निधन झाल्याने मनाने तो फार खचला. कोविडनंतर त्याने जॉब सोडला व स्वतःचा मेडिकल लॅब मटेरियल सप्लाय व्यवसाय सुरू केला. प्रचंड ओळखी व गाडा अनुभव पाठीशी असल्याने व्यवसाय उत्तम चालत होता. पण काही महिन्यातच त्याला पायात टाचेखाली छोटीशी ज़खम झाली. इन्सुलिन चालू होते. प्रत्येक २/३ महिन्यांनी कोणत्यातरी कारणाने अॅडमिट व्हावे लागू लागले.
त्या दरम्यान त्यांची डोळ्यांची पण विविध ऑपरेशन झाली. मुलगा फुटबॉल खेळताना दगडावर पडला व हाताची दोन हाडे मोडली. त्याचे ऑपरेशन व वडीलांचे डोळ्याचे ऑपरेशन एकाच दिवशी २ वेगळ्या हॉस्पिटलमध्ये झाले. पतीच्या पायाचे ड्रेसिंग ६ महिने योग्य ती काळजी घेऊन मी स्वतः करत होती. टाचेचे हाड कमकुवत होऊन पुन्हा फ्रॅक्चर झाल्याने स्क्रू बसवले. दर वेळेस विविध चाचण्या, महिनोंमहिने हॉस्पिटल, ICU व प्रचंड खर्च यात धावपळ करणारी एकटी मी. ICU च्या बाहेर किती दिवस व महिने काढले ह्याची बेरीज नाही. अशात २०२२ मध्ये मुलीचे लग्न केले. २०२३ मधे सुनिलला डायलिसिस सुरु झाले. पाय सुजलेला व काळा निळा पडल्याने पाय गुडघ्याखालून काढण्याशिवाय पर्याय नव्हता. तेही केले.
थोड्या दिवसांनी कावीळ झाल्याचे निदान झाले. शरीर पिवळे पडले. कावीळ जास्त होती त्यामुळे हळूहळू त्याचे मेंदूवरील संतुलन कमी झाले. ते काय बोलायचे ते कळत नव्हते. एका रात्री जेव्हा मी त्यांना पेज पिण्यास दिली तेव्हा ते म्हणाले, ‘बास आता. हे तू मला आज शेवटचे पाणी पाजत आहे, मी उद्या मरणार आहे.’ मला वाटले ते नेहमीप्रमाणे काहीतरी बोलत आहेत. मी मायेने त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला व त्यांना असे काही बोलू नका असे समजावले पण खरंच ते माझे शेवटचे बोलणे ठरले. ते कोमात गेले. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले. मला सारे जगच बंद पडल्याचे भासले. मेंदू मध्ये रक्त साकळल्याने मेंदूचे ऑपरेशन करावे लागले.
मला आशा होती की सुनील निदान शुद्धीवर येईल पण ५ दिवस वाट पाहून काहीच प्रतिसाद नव्हता. हॉस्पिटलचा प्रचंड खर्च होत होता पण मला ते ठीक होण्याची आशा होती. ६ व्या दिवशी त्यांनी थोडी डोळ्यांची हालचाल केली. पण मला डॅाक्टरांनी समजावून सांगितले तुम्ही हट्ट सोडा व व्हेंटिलेटर काढायची लेखी परवानगी द्या. जवळपास २४ दिवस गेले पण पदरात काही पडलं नाही. त्यांच्याजवळ बसून त्यांना व्हेंटिलेटरमुळे त्रास झाल्याबद्दल क्षमा मागितली. मुलाचे सर्व नीट करेन असा शब्द दिला. बरंच काही मी बोलत राहिले. रडत राहिले. ते फक्त पहात होते. तेही खूप रडत होते. माझ्या डोळ्यांसमोर हे गेले.’ हे सांगत वर्षा मनावरची ढपली काढल्याने आजही रडत होती.
एका बाईला तिचा पती डोळ्यांसमोर जाणे काय असते? हे कोणत्याही शब्दात बांधता न येणारी गोष्ट आहे. ती त्यामुळे एकटी होती की एकाकी ? हा प्रश्न कायमचा निर्माण होतो. पण बाई आई झाली की तिने न खचता मुलांसाठी व स्वतःसाठी उभं रहायचं असतं. व ते ती रहातेही. आपली लढाई आपल्यालाच लढायची आहे हे ती सतत मनाला सांगते. पतीचे अनेक आर्थिक व्यवहार बायकोला माहीत नसतात हे जागतिक सत्य म्हणावे लागेल. तसंच वर्षाचही झालं. त्याच्या व्यवसायाविषयी पतीच्या फोनमध्ये बहुतेक माहिती मिळाल्याने तिला त्याचा खूप उपयोग झाला.
बर्याच गोष्टी तिने शिकून घेतल्या. काही महिन्यांनी दुकान उघडले बराच मेडिकल माल निकामी (expire) झाला होता. तिने नवीन ड्रग लायसन्स काढले. या क्षेत्रातील माहिती नसताना सुनिलच्या मित्रांच्या सहकार्याने तोच व्यवसाय पुढे करायचा तिने ठरवले. ती स्वतः आता विविध लॅबमध्ये जाऊन मार्केटिंग करते. सेकंड इनिंग म्हणून तिने याचा स्वीकार केला आहे. तिचा मुलगा आता १२ वीला आहे. पतीसाठी सुमारे ४० लाख खर्च झाला पण तिने त्याला जगवण्याची जिद्द सोडली नाही. पण तिचे हात रिते राहिले. पतीनिधनानंतर हिंमत न हारता ती आता मुलांसाठी ‘सर सलामत तो पगडी पचास’ म्हणत धडपडते आहे. मुलाचे शिक्षण व त्याचे स्वावलंबन सारे नीट होईपर्यंत अथक परिश्रम हेच आत्ता तिचे अंतिम ध्येय आहे.
संघर्ष पाचवीला पुजलेला असताना, माहेरचा आधार नसताना, स्वतःचे लग्न, त्यानंतरचे कष्ट, सुमारे २० वर्ष नोकरीनिमित्ताने वेगळे राहून केलेला संसार, दोन मुलांचे शिक्षण, पतीच्या सततच्या आजारपणामुळे त्याच्याशी केलेला संघर्ष, पतीनिधनानंतर सुरु केलेली सेकंड इनिंग, त्यातून उभे राहणाऱ्या या आधुनिक नवदुर्गा वर्षाला मानाचा मुजरा..!!
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
