December 17, 2025
Sharad Pawar and Ajit Pawar political reunion speculation in Maharashtra politics
Home » दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येतील का ?
सत्ता संघर्ष

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येतील का ?

स्टेटलाइन –

राजकारणात गेली साडेसहा दशकाहूनअधिक काळ सक्रीय असलेल्या शरद पवारांची ओळख साहेब अशी आहे. अनेक अडचणी, संकटे व आजारांवर त्यांनी मात केली आहे. त्यांचा पुणे, मुंबई, दिल्ली असा त्यांचा प्रवास अखंड चालू असतो, पण राज्यात चांद्यापासून ते बांद्यापर्यत सर्वत्र सर्वाधिक फिरणारा नेता अशी त्यांची प्रतिमा आहे.

डॉ. सुकृत खांडेकर

माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीयमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचा ८५ वाढदिवस बारा डिसेंबरला साजरा झाला. दोन दिवस अगोदर राजधानी नवी दिल्लीत त्यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या स्नेहभोजनाला विविध पक्षांचे दिग्गज नेते उपस्थित राहिले. सत्तेवर असो किंवा नसो सर्व पक्षीय राष्ट्रीय नेत्यांना एकत्र आणण्याची किमया केवळ शरद पवारांकडे आहे हे पुन्हा दिसून आले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी वड्रा, मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी, रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू, कमलनाथ, मनीष तिवारी, तृणमूल काँग्रसचे खासदार सौगत रॉय, माजी केंद्रीयमंत्री डी. पुरंदेश्वरी, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल पटेल, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांची उपस्थिती होतीच पण देशातील मोठ्या उद्योग समुहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी हेसुध्दा शरद पवारांच्या शेजारीच बसून होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमधे आम जनतेसोबत त्यांचा वाढदिवस साजरा झाला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, रोहिणी खडसे. विद्या चव्हाण अशी टीम त्यांच्या बाजुला होती पण सर्व थरातील आणि सर्व वयोगटातील सामान्य लोकांच्या झुंडीच्या झुंडी सकाळपासून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येत होत्या. त्यात महिलांची संख्या लक्षणीय होती. केंद्रात व राज्यात सत्तेच्या परिघात नसताना हजारोंची गर्दी तिथे लोटली होती. अडिच वर्षापूर्वी अजित पवार हे चाळीस आमदारांसह पक्ष घेऊन भाजपसोबत गेले, सत्तेत सहभागी झाले. त्यांना भाजपने उपमुख्यमंत्रीपद दिले, त्यांचे आवडते अर्थमंत्रीपद त्यांना मिळाले. त्यांच्याबरोबर बंडात सामील झालेल्या दहा आमदारांना मंत्रीपदे मिळाली. सोनिया गांधींच्या विदेशी जन्माच्या मुद्द्यावरून शरद पवारांनी बंड करून १९९९ मधे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली.

राज्यातून डझनभर खासदार व पन्नास साठ आमदार निवडून आणण्याची आपली ताकद आहे व आपल्याला बरोबर घेतल्याशिवाय सरकार स्थापन करता येणार नाही हे त्यांनी दाखवून दिले. शरद पवारांनी मोठे केलेले नेते, मंत्री अजितदादांबरोबर भाजपासोबत गेले आहेत. पण पक्षाचे कार्यकर्ते आणि शरद पवारांना मानणारी सर्वसामान्य जनता त्यांच्यावर आजही प्रेम करते हेच त्यांच्या वाढदिवसाला दिसून आले. अजित पवार आणि त्यांनी बरोबर नेलेल्या पक्ष संघटनेला अजून तरी भाजपाचे संरक्षक कवच आहे. भाजपाच्या कवचामुळेच त्यांच्या पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक व राजकारणात वर्षानुवर्षे किंगमेकर ओळखले जाणारे शरद पवार यांचे सत्तास्थापनेतील महत्व कमी करण्यात भाजपा यशस्वी झाली असेल पण त्यांचे वलय कमी झालेले नाही.

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकवला व चाळीस आमदारांसह ते भाजपासोबत गेले. उध्दव ठाकरेंप्रमाणे शरद पवारांनी अजितदादा व बंडखोर कंपनीला गद्दार ठरवले नाही. गेल्या अडिच वर्षात शरद पवारांनी आपल्या पुतण्याविषयी कटु शब्द उच्चारले नाहीत आणि पुतण्यानेही त्यांचा अनादर केला नाही. वसंतदादा पाटील शुगर इंस्टिट्यूट, रयत शिक्षण संस्था अशा दिड दोन डझन सार्वजनिक संस्थांवर काका पुतण्या पदाधिकारी आहेत. पण एकमेकांना कोणी पाण्यात बघितले नाही.

शरद पवारांना बंड हे काही नवीन नाही. १९७८ मधे वसंतदादांचे सरकार पाडून पुलोद सरकार स्थापन केले, तेव्हा त्यांच्यावर दादांच्या पाठित खंजीर खुपल्याची टीका झाली होती. वयाच्या ३८ वर्षी राज्याचे सर्वात तरूण मुख्यमंत्री होण्याचा विक्रम त्यांनी केला होता. पण नंतरच्या काळात वसंतदादांचा अवमान होईल असे त्यांनी कुठे वक्तव्य केले नाही. पी. व्ही. नरसिंह राव यांच्या विरोधात काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवून त्यांनी पक्षात स्वत:चा दरारा निर्माण केला होता. रावांच्या विषयी मनात कधी अढी बाळगली नाही. सोनिया गांधीच्या विदेशी जन्माच्या मुद्दयावरून शरद पवारांनी काँग्रेसमधे बंडाचा झेंडा फडकवला पण नंतर डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारमधे ते दहा वर्षे केंद्रात कृषीमंत्री होते. यामुळेच अजित पवारांनी केलेल्या बंडामुळे ते विचलीत झाले नाहीत.

राजकारणात गेली साडेसहा दशकाहूनअधिक काळ सक्रीय असलेल्या शरद पवारांची ओळख साहेब अशी आहे. अनेक अडचणी, संकटे व आजारांवर त्यांनी मात केली आहे. त्यांचा पुणे, मुंबई, दिल्ली असा त्यांचा प्रवास अखंड चालू असतो, पण राज्यात चांद्यापासून ते बांद्यापर्यत सर्वत्र सर्वाधिक फिरणारा नेता अशी त्यांची प्रतिमा आहे. तब्येत कशी आहे , असा प्रश्न पवारांना कधीच आवडत नाही. ते कधी थकलेले दिसत नाहीत. आजही वाचन भरपूर आहे. शेतीपासून ते कृत्रिम बुध्दीमत्ता अशा सर्व विषयात त्यांना रस आहे. लोकांची गर्दी हेच त्यांचे टॉनिक आहे.

राज्यात भाजपने २०२९ ची निवडणूक स्वबळावर लढविण्याची तयारी सुरू केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही त्याची सुरूवात आहे. २०२९ च्या निवडणुकीत कुबड्या फेकून द्यायच्या आहेत असे स्पष्ट आदेश अमित शहा यांनी मुंबईत पक्षाच्या बैठकीत दिले आहेत. राज्यात सत्तेवर येण्यासाठी एकनाथ शिंदे व अजित पवार यांना बरोबर घेऊन ठाकरेंची शिवसेना व पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस भाजपचे खच्ची केलीच. पण आता शतप्रतिशत सत्ता प्राप्त करण्यासाठी एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या कुबड्या दूर करायला सुरूवात केली आहे. एकनाथ शिंदे हे सारखे दिल्लीला धावतात व अमितभाईंना भेटतात. एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांचे राजकारणातील हायकमांड हे अमित शहा आहेत.

अमित शहा हे भाजपची ताकद कशी वाढेल याचा सदैव विचार करतात. शिंदे किंवा अजितदादांचा पक्ष मोठा करणे हे त्यांचे काम नाही. जे अमितभाईंच्या मनात आहे तेच राज्यात देवाभाऊ व रवींद्र चव्हाण करीत असतात. एकनाथ शिंदे हे माघारी फिरू शकत नाहीत. त्यांना भाजपसोबत राहूनच राजकारण करावे लागणार आहे, पण अजितदादांना त्यांच्या काकांचा पर्याय आहे. काका – पुतण्यांनी तसे संबंधही ठेवले आहेत. भाजपा आपला विस्तार करीत असताना आपल्या पक्षाचा संकोच होणार हे अजितदादांना पूर्ण ठाऊक आहे. आपले अस्तित्व, आपला पक्ष आणि आपले सहकारी यांच्या भवितव्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊ शकतील का, अशा चर्चेला शरद पवारांच्या वाढदिवासाच्या निमित्ताने उधाण आले आहे.

ठाकरे ब्रँड जवळ येणार असेल तर काका -पुतण्या का नाही, असा प्रश्न विचारला जातो आहे. यावर काहीही होऊ शकते असे एक उत्तर आहे, सध्या तरी होकार किंवा नकार काहीच व्यक्त होताना दिसत नाही. मुंबई- ठाण्यात भाजपा व शिवसेना ( शिंदे ) यांची युती होणार असे दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी जाहीर केले आहे. अन्य महापालिकांमधे व जिल्हा परिषदांमधेही असे होऊ शकते. मग अजितदादांचा पक्ष कुठे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव महायुतीत कोणी घेत नाही.

भाजपने ठाणे व कोकणात शिंदेंच्या शिवसेनेला धक्का देण्याचे काम केले. उद्या अजितदादांच्या पक्षाला पुणे व पिंपरी – चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजप हाच प्रयोग करू शकतो. भाजपच्या आक्रमक विस्तारवादापुढे एकनाथ शिंदे किंवा अजितदादा काहीच करू शकणार नाहीत. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व नबाब मलिक करणार असतील तर ते भाजपाला मान्य नाही असे उघड बोलले जात आहे. उद्या ही मालिका वाढत जाऊ शकते. पक्षाच्या भविष्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र यावे अशी मानसिकता दोन्ही पक्षात वाढते आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading