प्रस्तुत ग्रंथात अनेक मान्यवरांनी गझलविषयक केलेली चर्चा, लिहिलेले लेख, विविध समीक्षकांचे तत्कालीन भाष्य हे सर्व मराठी गझल अधिक प्रगल्भ होण्यास कसे पूरक ठरले आहे, याचेही ग्रंथकाराने विश्लेषण केले आहे. शिवाय सोबत परिशिष्ट तीनमधील गझलेस आवश्यक पारिभाषिक शब्दांचे मराठी पर्यायी शब्दउपयोजन गझलेस पूर्णत: उर्दू संस्कारातून मुक्त करण्यास उपयुक्त ठरणारे आहे.
सुनील ओवाळ ( कवी, गझलकार )
‘मराठी गझल : १९२० ते १९८५’ या डॉ. अविनाश सांगोलेकर यांच्या संशोधननिष्ठ समीक्षाग्रंथाची तिसरी आवृत्ती पुणे येथील मिहाना पब्लिकेशन्सने अलीकडेच १५ एप्रिल २०२५ रोजी प्रकाशित केली. प्रस्तुत ग्रंथाची पहिली आवृत्ती १२ जून १९९५ रोजी नीहारा प्रकाशन,पुणे यांनी, तर दुसरी आवृत्ती २१ सप्टेंबर २०१५ रोजी कीर्ती प्रकाशन, औरंगाबाद यांनी प्रकाशित केली होती. सदर ग्रंथविषय हा ग्रंथकार अविनाश सांगोलेकर यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागातून एम.फिल. ( १९८४ ) व पीएच. डी. ( १९९१ ) साठी जे ‘मराठी गझले’वर संशोधन केले, त्यावर आधारित आहे. या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांना ‘आद्य मराठी गझलसंशोधक’ अशी ओळख प्राप्त झालेली आहे. ग्रंथकार डॉ. सांगोलेकर हे स्वतः गझलकार असून १९७९ पासून ते गझल लिहीत आहेत. तसेच त्यांनी साधारणत: आठ – दहा वर्षांमध्ये गझलेवर केलेला संशोधनकाळातील चिकित्सक अभ्यास विचारात घेता प्रस्तुत ग्रंथाचे गुणात्मक मूल्यांकन करणे सहज साध्य होईल. शिवाय संशोधनाचे प्रयोजन आणि ग्रंथाची उद्दिष्टे समजून घेणे सोयीस्कर होईल.
या अनुषंगाने प्रस्तुत ग्रंथाची एकूण सात प्रकरणे, सोबत चार परिशिष्टे व संदर्भसूची हे सर्व ग्रंथाचे खास वैशिष्ट्य आहे. येथे नमूद करणे आवश्यक आहे की, मराठी गझलेची १९२० ते १९८५ अशी दीर्घ वाटचाल अभिप्रेत असल्यामुळे संशोधनास तात्त्विक व ऐतिहासिक पद्धती अवलंबून ग्रंथकाराने मीमांसा केलेली आहे. पहिल्या प्रकरणात गझलेची सर्वांगीण चर्चा करताना ‘गझल’ हा शब्द मराठीत रूढ होताना त्याच्या शब्दरूपात झालेला एकूण बदल, विविध कोशांमधील अर्थ, गझलेचा उगम व विकास, गझलेचे भारतातील आगमन, गझलवृत्ते, गझलगायन, तसेच आशयवैशिष्ट्ये व रचनावैशिष्ट्ये सांगणाऱ्या विविध व्याख्या आदींचा समावेश करण्यात आल्यामुळे गझलेची संकल्पना व तिची वाटचाल याचा अभ्यासपूर्ण आवाका लक्षात येतो.
गझलेचा अरबीतून फार्सीत व फार्सीतून उर्दूत प्रवास, स्थैर्य, उर्दूतील विविध काव्यप्रकार (नज्म,नात, खम्रीयात, कता, कसीदा, रुबाई, मर्सीया आदी ) तिच्यावर पडलेली लौकिक व अध्यात्मविषयांची छाप या बाबींचे तपशीलवार केलेले वर्णन ग्रंथकाराची सखोल अभ्यासू वृत्ती – दृष्टी अधोरेखित करते. प्रस्तुत प्रकरण हे ‘गझल’ या शब्द – संज्ञेची एकूणच अंतर्बाह्य ओळख करून देते. ग्रंथकाराने गझलेची केलेली व्याख्या ‘गझल’ या काव्य – प्रकाराचे व्यापक व सर्वसमावेशक आकलन करून देते.
खऱ्याखुऱ्या मराठी गझलेच्या सम्यक शोधाच्या प्रक्रियेत १९२० ते १९८५ या कालखंडातील एकूण ६५ वर्षांमधील कालखंडनिहाय वैविध्यपूर्ण टप्पे करून ग्रंथकाराने गझललेखन करणाऱ्या कवींची ‘गझल’ या काव्यप्रकारात लिहिलेली कविता, त्यातील गझललक्षणे गुणदोषांसकट चिकित्सकपणे अभ्यासली असल्याचे दिसून येते. या दृष्टीने मराठी गझलेचा महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून दुसर्या प्रकणात ग्रंथकाराने माधव जूलियनांची गझल अभ्यासण्याची अपरिहार्यता नमूद करून गझलेचा प्रारंभ ते १९२० या कालावधीतील गझलेचाही थोडक्यात आढावा घेतला आहे.
‘जगव्यापका हरीला नाही कसे म्हणावे’ ही पदस्वरूपातील अमृतराय यांची मराठीतील पहिली गझल (फार्सी – उर्दू काव्यप्रकार) मराठीत अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात अवतरली असल्याचे ग्रंथकाराने अधोरेखित केले आहे. डॉ. माधवराव पटवर्धन उर्फ कवी माधव जूलियन हे फार्सी – उर्दू भाषेचे अभ्यासक होते. त्यांनी ‘फार्सी – मराठी कोश’ एकट्याने तयार केला. फार्सी, उर्दू, संस्कृत या भाषांमधील छंद:शास्त्रांवर त्यांचे प्रभुत्व असल्यामुळे इतर कवी हे त्यांचा गझलविचार प्रमाण मानून गझल लिहीत होते. त्यांनी उमर खय्यामांच्या रुबायांचा मराठीत अनुवाद केलेला होता.
मराठी काव्यक्षेत्रात ते स्वतःच्या कवितेच्या वेगळेपणामुळे,विशेषत: प्रेमकवितांमुळे परिचित होते.त्यांची गझल, गझलविचार, गझलपुरस्कार व कार्य यावरून असे दिसून येते की,१९३३ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘गज्जलांजलि’ या त्यांच्या काव्यसंग्रहातील कवितांचे लेखन हे त्यांनी मुळात गझललेखनाच्या उद्देशाने केलेले नव्हते; तर अरबी – फार्सीतील वृत्ते मराठीत आणून मराठी कवितेतील वृत्तशैथिल्य दूर करण्याच्या हेतूने केलेले होते.यातून मराठीला एकूण ६७ गझलवृत्ते त्यांच्या प्रयोगशील व नवीनतेच्या ध्यासाची उपलब्धी म्हणून लाभली आहेत,असे ग्रंथातून स्पष्ट होते.माधव जूलियन यांनी तंत्रशुद्ध गझलरचना मराठीत लिहिताना त्यांच्या विशिष्ट गझलविचारामुळे त्यांनी खऱ्याखुऱ्या,अस्सल गझलेस आवश्यक सर्वंकष गझललक्षणांचा अवलंब करून गझलेस न्याय दिला नाही, ही बाब लक्षवेधी म्हणून तिचा संपूर्ण गझल असा उल्लेख करता येत नसल्याचा निष्कर्ष नोंदवून गझलेची लक्षणे अभ्यासण्यास वाचकांना विचारप्रवृत्त केले आहे.
प्रस्तुत ग्रंथातील प्रकरण तीनमध्ये ‘१९२० ते १९४० मधील इतर कवींची गझल’ यात रविकिरण मंडळातील कवींमध्ये माधव जूलियन यांचाही सदस्यकवी म्हणून समावेश होता व रविकिरण मंडळाव्यतरिक्त असलेल्या कवींच्या गझलेचेही विवेचन करण्यात आले आहे. प्रकरण चारमध्ये ‘१९४० ते १९८५ मधील माधव जूलियनपद्धतीची गझल’ लिहिणारे कवी यांच्या गझलेचा गुणदोषांसकट सविस्तर आणि अभ्यासपूर्ण विचार केल्याचे दिसते.यातून असे लक्षात येते की, ‘गझल’ हा काव्यप्रकार आत्मनिष्ठ असून त्याकडे वस्तुनिष्ठ काव्यप्रकार म्हणून कवींकडून पाहण्यात आले होते.गझलेची लक्षणे व तंत्र अवगत असतानाही त्यांचा परिपूर्ण अवलंब न करता भावगीतरूपात (उदाहरणादाखल स्वतः माधव जूलियन व मंगेश पाडगावकर यांच्याकडून) गझल लिहिण्यात आली आहे.तथापि ग्रंथकाराने प्रकरण पाचमध्ये ‘सुरेश भटांची गझल’ (१९६५ नंतर ) व सहामध्ये ‘१९७५ ते १९८५ मधील सुरेश भटपद्धतीची गझल’ यांचा अभ्यासपूर्ण परिचय करून दिला आहे. त्यामुळे खऱ्याखुऱ्या गझलेची लक्षणे ही निष्कर्षरूपात मांडली आहेत.
गझल ही द्विपदीयुक्त असून तिच्यात किमान पाच व कमाल सतरा द्विपदी असतात. प्रत्येक द्विपदी ही स्वतंत्र कविता असते. गझल एकाच वृत्तात व एकाच यमकरचनेत गुंफलेली काव्यमाला असून त्यात रदीफ व काफिया यांची योजना केलेली असते. प्रत्येक द्विपदीतील पहिली ओळ ही विषयाची प्रस्तावना व दुसरी ओळ ही प्रभावी,परिणामकारक व उत्कट समारोप करणारी असते. गझल ही आत्मनिष्ठ असते, वस्तुनिष्ठ नसते. भावकविता – भावगीत आणि गझल यांतील फरक अधोरेखित करून अस्सल व परिपूर्ण गझलेची संकल्पना मांडणारे विवेचन ग्रंथात केलेले असल्यामुळे ते गझलेची परिभाषा समजून घेण्यास महत्त्वपूर्ण वाटते. गझलसम्राट सुरेश भट यांचे परखड गझलविचार, गझलेसाठीचे समर्पण, निष्ठापूर्वक गझलकार्य यांचा अभ्यासपूर्ण आढावा ग्रंथकाराने घेतला असून तो पथदर्शक आहे. प्रस्तुत ग्रंथात अनेक मान्यवरांनी गझलविषयक केलेली चर्चा, लिहिलेले लेख, विविध समीक्षकांचे तत्कालीन भाष्य हे सर्व मराठी गझल अधिक प्रगल्भ होण्यास कसे पूरक ठरले आहे, याचेही ग्रंथकाराने विश्लेषण केले आहे. शिवाय सोबत परिशिष्ट तीनमधील गझलेस आवश्यक पारिभाषिक शब्दांचे मराठी पर्यायी शब्दउपयोजन गझलेस पूर्णत: उर्दू संस्कारातून मुक्त करण्यास उपयुक्त ठरणारे आहे.
प्रस्तुत ग्रंथाच्या मुखपृष्ठावरील माधव जूलियन आणि सुरेश भट यांचे छायाचित्र मराठी गझलेसाठी त्यांच्या निष्ठापूर्वक कार्यकर्तृत्वाचे प्रतीकात्मक व सूचक आहे. अलीकडे गझलरसिकांमध्ये व गझललेखन करणाऱ्या कवींमध्ये होत असलेली लक्षणीय वाढ विचारात घेता प्रस्तुत ग्रंथाची उपयोगिता अधिक मोठ्या प्रमाणात वाटत आहे. आंतरजालीय माध्यमातून व्हॉटस् ॲप, फेसबुक, इत्यादींवर दिसणारे बहुतांश गझललेखन पाहता प्रत्येकानेच गझल तपासून घ्यावी, लिहावी, याची अनिवार्यता लक्षात येते. अद्यापही खऱ्याखुऱ्या गझलेसाठी गुणदोषांसह चिकित्सक अभ्यासातून सम्यक गझलेचा शोध घेऊन मराठीत अस्सल मराठी गझल रुजविण्यात रसिक, गझलकार व समीक्षक या सर्वांना डॉ. सांगोलेकरांचा हा ग्रंथ उपयुक्त ठरेल, ही आशा आहे.
पुस्तकाचे नाव – मराठी गझलः १९२० ते १८८५
लेखक – डॉ. अविनाश सांगोलेकर
प्रकाशक – मिहाना पब्लिकेशन्स
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
