स्टेटलाइन
मुख्यमंत्री नितीश कुमार हे आपले सरकार किती शिस्तप्रिय, पारदर्शक व सुशासन आहे हे सांगताना प्र्त्येक कार्यक्रमात लालूप्रसाद –राबडीदेवी सरकार असताना बिहार म्हणजे कसे जंगलराज होते याची आवर्जून आठवण करून देत. पण गेल्या वर्षभरात त्यांनी जंगलराजची आठवण करून देणे थांबवले आहे. आज बिहारची अवस्था जंगलराज सारखीच आहे, याची त्यांनाही जाणीव झाली असावी.
डॉ. सुकृत खांडेकर
बिहारमध्ये कायदा व सुव्यवस्था ढासळलेलीआहे , असा आरोप नेहमीच राजकीय पक्षांकडून होत असतो. राजदचे सुप्रीमो लालूप्रसाद यादव व त्यांच्या पत्नी राबडी देवी यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात खून, अपहरण, चोऱ्या – दरोडे, महिलांवर अत्याचार, लूटमार अशा घटनांनी बिहार पोखरून निघाला होता. रस्त्यावरून एकट्या महिलेला त्या काळात सुरक्षितपणे जाणे कठीण होते. सायंकाळनंतर लोकांना घराबाहेर पडणे मुष्कील होते. लालू – राबडी देवी यांनी व त्यांच्या पक्षाने बिहारमध्ये प्रदीर्घ काळ सत्ता उपभोगली. त्यांच्या कारकिर्रीदीला भाजपने जंगलराज असे संबोधायला सुरूवात केली.
लालू यादव मुख्यमंत्री असतानाचा काळ हा जंगलराज होता, असे सांगूनच नितीश कुमार यांनी लालूप्रसाद यादवांकडून भाजपच्या मदतीने सत्ता हिसकावून घेतली. भाजपच्या आशीर्वादाने त्यांनी मुख्यमंत्रीपदही मिळवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बिहारमध्ये ठिकठिकाणी जाहीर सभा होत आहेत, त्यातही ते लालू यादव यांची आठवण करून देत, जनतेला ते प्रश्न विचारतात – येत्या विधानसभा निवडणुकीनंतर बिहारमध्ये पुन्हा जंगलराज आणायचे आहे काय ?.
बिहारला जंगलराज म्हणणे हे जणू गेली दोन दशके राजकीय शस्त्र बनले आहे. नितीश कुमार गेली पंधरा वर्षे मुख्यमंत्री आहेत. गेल्या काही काळात राज्यात कायदा सुव्यवस्था कमालीची ढासळली आहे. जंगलराज हे शस्त्र वापरून भाजपने बिहारमध्ये सत्ताबदल घडवला. आता तोच शब्द नितीश कुमार यांच्यावर बुमरँग तर होणार नाही ना ? अशी भिती जनता दल यु व भाजपला वाटू लागली आहे. नितीश कुमार यांचे येत्या निवडणुकीतील प्रमुख राजकीय विरोधक, लालूप्रसाद यांचे पुत्र व राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्या काळात बिहारमध्ये जंगलराज निर्माण झाल्याचा आरोप केला आहे व प्रत्येक सभेत जंगलराज म्हणून ते नितीश कुमार यांच्या सरकारला हिणवत आहेत.
लालूप्रसाद व राबडी देवी यांच्या सरकारच्या काळाला जंगलराज असे संबोधून, आपण स्वत: स्वच्छ राजकारणी असल्याची प्रतिमा नितीशबाबूंनी निर्माण केली होती. एवढेच नव्हे तर नितीश कुमार यांचा उल्लेख मिडियामधून सुशासनबाबू असा केला जात होता. पण गेल्या काही वर्षात बिहारमध्ये हत्या, अपहरण, दरोडे, अत्याचार, लूटमारीच्या घटना दिवसाढवळ्या होत आहेत, म्हणून जंगलराज नावाचे शस्त्र सुशासनबाबूंचा येत्या निवडणूक वेध घेणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
बिहारची राजधानी पाटणा शहर हेच आज सुरक्षित राहिलेले नाही. भर दिवसा गोपाल खेमकांवर झालेल्या गोळीबाराने सारे शहर हादरले. पोलीस ठाण्यापासून जवळच अंतरावर एका व्यापाऱ्याची हत्या झाली तरी पोलीस काही करू शकले नाहीत. पाटण्याच्या इस्पितळात पाच बदमाश हातात बंदुका घेऊन घुसतात व तेथे उपचार चालू असलेल्या कुविख्यात गुन्हेगाराला गोळ्या घालून सर्वासमोर पसार होतात तरीही सुरक्षा व्यवस्था ढिम्म हालली नाही. नंतर काहींना पोलिसांनी अटक केली व त्याचा गाजावाजाही केला. पण जेव्हा दिवसा ढवळ्या हत्या होत आहेत तेव्हा पोलीस व सुरक्षा यंत्रणा कुठे असते ? राज्याचे सुशासन काय करते ?
सन २०१५ ते २०२४ या काळात बिहारमधील गुन्हेगारीत ८० टक्के वाढ झाली आहे. नॅशनल क्राइम रिसर्च ब्युरो व स्टेट क्राइम रेकॉर्ड ब्युरो यांच्या अहवालातूनच ही आकडेवारी बाहेर आली आहे. सन २०१५ नंतर नितीश कुमाराच्या सुशासन काळात राज्यातील गुन्हेगारी सतत वाढत आहे. गेल्या तीन वर्षात दरवर्षी साडेतीन लाखापेक्षा जास्त गुन्ह्याची नोंद पोलिसांकडे आहे. देशात सर्वाधिक गुन्हे घडत असलेल्या १० राज्यात बिहारचे नाव कायम आहे. दिल्ली व केरळमध्ये गुन्ह्यांची संख्या जास्त असली तरी ती राज्ये शिक्षण व आर्थिक क्षेत्रात बरीच आघाडीवर आहे. बिहारची लोकसंख्या तुलनेने जास्त पण शिक्षण व आर्थिक क्षेत्रात मागास राज्य अशी ओळख आहे. बिहारने गुन्हेगारीतही अव्वल स्थान कायम ठेवले आहे. नितीश कुमार यांच्या सरकारला हे मुळीच भूषणावह नाही.
मुख्यमंत्री नितीश कुमार हे आपले सरकार किती शिस्तप्रिय, पारदर्शक व सुशासन आहे हे सांगताना प्र्त्येक कार्यक्रमात लालूप्रसाद –राबडीदेवी सरकार असताना बिहार म्हणजे कसे जंगलराज होते याची आवर्जून आठवण करून देत. पण गेल्या वर्षभरात त्यांनी जंगलराजची आठवण करून देणे थांबवले आहे. आज बिहारची अवस्था जंगलराज सारखीच आहे, याची त्यांनाही जाणीव झाली असावी.
१८ जुलै रोजी मोतीहारी येथे जनता दल यु व भाजपची विराट सभा झाली. निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यासाठीच ती सभा होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री नितीश कुमार हे दोघेही व्यासपीठावर हजर होते. लालूप्रसाद यादव यांच्यावर प्रत्येक कार्यक्रमात जंगलराज म्हणून संबोधणारे दोन्ही नेते यावेळी या मुद्यावर शांत राहिले. नरेंद्र मोदी किंवा नितीश कुमार दोघांनीही त्या सभेत जंगलराज हा शब्दही उच्चारला नाही. बिहारमध्ये मोठ- मोठ्या विकास योजना कशा येत आहेत व केंद्र सरकार बिहारच्या विकासासाठी हजारो कोटी रूपये कसे देत आहे हे पंतप्रधानांनी सविस्तर आपल्या भाषणातून सांगितले. पण बिहारमधील रस्त्यांवर दहशत आहे, याचा कुठे एका शब्दानेही उल्लेख केला नाही. कायदा व सुव्यवस्था चांगली राखण्यासाठी नितीश कुमार याचे सरकार काही ठोस पावले उचलते असेही काही दिसत नाही.
सिवानमध्ये एका रात्रीत तीन हत्या झाल्या, नालंदामध्ये दुहेरी हत्याकांड घडले, पाटण्यात तर गँगवॉर चालू आहे. बिहारमध्ये तरूण बेरोजगारांची संख्या कित्येक लाखात आहे. रोजगारासाठी दरवर्षी लक्षावधी तरूणांचे लोंढे मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरू, हैदराबादवर आदळत असले तरी रा्ज्यात बेरोजगारी ही भीषण समस्या आहे. लाल प्रसाद यादवांपासून नितीश कुमारांपर्यंत गेल्या चार दशकात रोजगार निर्माण करण्यात सरकारला अपयश आले. त्याचा परिणाम म्हणून गुन्हेगारी वाढत आहे.
निवडणूक प्रचारात जंगलराज शब्दाचा वापर केला तर गेली पंधरा वर्षे तुम्हीच सत्तेवर आहात मग राज्यात कायदा सुव्यवस्था का ढासळली आहे आहे असे मतदार प्रश्न विचारतील याची जाणीवही भाजपला झाली आहे. म्हणूनच केंद्र सरकारने दिलेल्या निधीतून बिहारचा विकास कसा होतो आहे, या मुद्द्यावर भाजप प्रचारात भर देईल असे वाटते. उत्तर प्रदेशात माफियांवर बुलढोझर चालवले जातात मग बिहारमध्ये का नाही असा प्रश्न लोक विचारत आहेत. बिहारचे पोलीस व गुन्हेगार यांची हातमिळवणी आहे, असा आरोप एनडीएचे घटक पक्ष असलेल्या एलजेपी चे नेते चिराग पासवान यांनी जाहीरपणे केला आहे. राज्याचे नेतृत्व सजग नसून ग्लानीत आहे म्हणून वास्तव चित्र काय आहे हे सरकारला समजतच नाही, अशी टीका राजदचे तेजस्वी यादव यांनी केली आहे. बिहारची जनता जातीच्या मुद्यावर, विकासा्च्या अजेंड्यावर की जंगलराजवर मतदान करणार हा कळीचा मुद्दा आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.