कोकणातील रंगकर्मींच्या दीपतारांगण संस्थेतर्फे मुंबईत आयोजन
मुंबई – तळकोकणातील काही रंगकर्मी एकत्र येत मुंबईत नाटक चित्रपट, साहित्य आणि सांस्कृतिक, सामाजिक चळवळ याविषयी कामाला प्रारंभ केला आहे. दीपतारांगण क्रिएशनच्या माध्यमातून हे सांस्कृतिक काम केले जात असून यातील पहिला पुरस्कार सोहळा हा उपक्रम रविवार 14 डिसेंबर रोजी सायं.५.३० वा. मुंबई – गोरेगाव केशवराव गोरे स्मारकांमध्ये आयोजित केला आहे. कवी अजय कांडर यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्र प्रशासनात उपआयुक्त म्हणून कार्यरत असणाऱ्या कवयित्री अंजली ढमाळ यांच्या प्रमुख उपस्थित होणाऱ्या या कार्यक्रमात ज्येष्ठ नाटककार शफाअत खान यांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांना गौरीण्यात येणार आहे.
प्रत्येकी अकरा हजार रुपये, स्मृतिचिन्ह, शाल आणि ग्रंथ अशा स्वरूपाच्या चित्रपट नाटक पुरस्कारांमध्ये अभिनेत्री शुभांगी भुजबळ (मुंबई) यांना पंडित सत्यदेव दुबे पुरस्काराने तर साहित्य विभागात लेखक भाऊ पाध्ये पुरस्काराने सायमन मार्टिन (वसई) यांना आणि सांस्कृतिक चळवळ विभागांमध्ये प्रा. गोपाळराव दुखंडे पुरस्काराने सांस्कृतिक कार्यकर्ते मधुकर मातोंडकर (सिंधुदुर्ग) यांना गौरविण्यात येणार आहे.
चित्रपट नाटक साहित्य आणि चळवळ या क्षेत्रामध्ये अतिशय गंभीरपणे अनेक लोक काम करतात.मात्र हौशीच्या पातळीवर काम करणाऱ्या किंवा मनोरंजनाला शरण गेलेल्या कलाकार लेखक आणि चळवळीतील कार्यकर्त्यांना गौरविण्यात येते. यामुळे गंभीरपणे काम करून आयुष्य खर्च करणाऱ्या कलावंत साहित्यिक कार्यकर्ते उपेक्षित राहतात. अशा दुर्लक्षित राहिलेल्या व्यक्तींना गौरविण्यासाठी या वर्षापासून ही पुरस्कार योजना कोकणातील रंगकर्मीनी एकत्र येत सुरू केली आहे. यावर्षीच्या चित्रपट नाटक साहित्य आणि चळवळ पुरस्कारासाठी ज्या व्यक्तींची निवड करण्यात आली त्याच्यासाठी स्वतंत्र समिती नेमण्यात आली होती.
या समितीमध्ये ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी, ज्येष्ठ लेखक राजन गवस, रंगकर्मी दीपक राज्याध्यक्ष, समीक्षक नितीन रिंढे, रणधीर शिंदे आणि कवी अजय कांडर आदींचा समावेश होता. पुरस्कार विजेत्यांमधील अभिनेत्री शुभांगी भुजबळ यांची आयदान, बया दार उघड,सावित्री आदी महत्त्वाची नाटके लक्षवेधी ठरली आहेत. तर कवी सायमन मार्टिन हे मराठीतील महत्त्वाचे कवी असून शोषित वंचितांबद्दल त्यांनी लेखन करताना त्याबद्दलची कृतीशीलताही दाखवली आहे आणि सांस्कृतिक कार्यकर्ते मधुकर मातोंडकर हे सुमारे ४० वर्ष निष्ठेने साहित्य सांस्कृतिक विषयक महत्त्वाचे काम करत आहेत.
सिंधुदुर्ग भूमिपुत्र ज्येष्ठ इतिहासकार कृष्णराव अर्जुन केळुसकर, नाटककार जयंत पवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ चालविल्या जाणाऱ्या समाज साहित्य प्रतिष्ठानचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत. तरी सर्व रसिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक उदय जाधव आणि दीपा सावंत खोत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – 98208 32619
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
