ज्येष्ठ पत्रकार आणि आमचे सन्मित्र विश्वास पाटील यांच्या ‘फेरा जन्म मृत्यूचा’ या पुस्तकाचे ३० जानेवारी २०२६ रोजी कोल्हापूरच्या राजर्षी शाहू स्मारक भवनात प्रकाशन होत आहे. त्या निमित्ताने या पुस्तकाचा थोडक्यात परिचय…
अलोक जत्राटकर
ज्येष्ठ पत्रकार विश्वास पाटील यांचे ‘फेरा जन्म मृत्यूचा’ हे पुस्तक म्हणजे मराठी समाजजीवनातील अंधश्रद्धा, कर्मकांड आणि रूढीपरंपरांचा चिकित्सक मागोवा घेणारा एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. दैनिक लोकमतमध्ये वर्षभर चाललेल्या याच नावाच्या साप्ताहिक मालिकेचे हे संकलित रूप असून, त्यामध्ये पाटील यांनी समाजातील अनेक खोलवर रुजलेल्या समजुतींचा विवेकबुद्धीच्या आधारे एकूण ५३ प्रकरणांतून वेध घेतला आहे.
या पुस्तकाचा मध्यवर्ती विचार म्हणजे माणूस अनेकदा एखाद्या प्रथेच्या मागील वैज्ञानिक कारणे, सामाजिक गरज किंवा मूळ प्रयोजन समजून न घेता केवळ परंपरेच्या नावाखाली त्याचे अंधानुकरण करत राहतो. जन्मापासून मृत्यूपर्यंतचे विविध विधी, समारंभ, व्रते, संकेत, शकुन-अपशकुन, ग्रह-तारे, नवस-सायास अशा असंख्य गोष्टी आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग झालेल्या आहेत. यातील अनेक प्रथा काळाच्या ओघात निरर्थक, कधी कधी घातकही ठरतात; मात्र तरीही त्या तशाच चालू राहतात. ‘फेरा जन्म मृत्यूचा’ या शीर्षकातूनच हा जन्म-मृत्यूच्या चक्रात अडकलेला, विवेक हरवलेला माणूस सूचित होतो.
महाराष्ट्रातील गावखेड्यांमधील रूढी-परंपरांचे चित्रण करताना लेखक केवळ दोषारोप करत नाहीत, तर त्या प्रथांचा उगम, त्यामागील तत्कालीन परिस्थिती आणि आजच्या काळातील विसंगती स्पष्ट करतात. उदाहरणार्थ, काही धार्मिक किंवा सामाजिक प्रथा पूर्वीच्या समाजरचनेत उपयुक्त असतीलही; पण आज त्या तशाच स्वीकारणे म्हणजे विचारशून्यतेचे द्योतक आहे, हे ते ठामपणे मांडतात. विशेष म्हणजे हे करताना त्यांची भाषा संयत, स्पष्ट आणि मुद्देसूद आहे. उपहास किंवा आक्रमकता न वापरता ते वाचकाला विचार करायला प्रवृत्त करतात.
विश्वास पाटील यांची दृष्टी पूर्णपणे विवेकी, बुद्धीप्रामाण्यवादी आणि वैज्ञानिक आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या भूमिकेतून ते प्रश्न उपस्थित करतात, पण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरकही स्पष्टपणे अधोरेखित करतात. श्रद्धेचा आदर राखत, तिच्या नावाखाली होणाऱ्या शोषणाला, भीतीला आणि अविवेकाला ते ठामपणे नाकारतात. समाजाने तार्किक वर्तन स्वीकारावे, प्रश्न विचारण्याची सवय लावावी आणि परिवर्तनास खुले राहावे, ही त्यांची अपेक्षा या लेखनातून सतत जाणवते.
एकूणच ‘फेरा जन्म मृत्यूचा’ हे पुस्तक म्हणजे केवळ टीका नाही, तर समाजाला आत्मपरीक्षणासाठी प्रवृत्त करणारे चिंतनशील लेखन आहे. सामान्य वाचकाला समजेल अशा भाषेत, दैनंदिन जीवनातील उदाहरणांच्या साहाय्याने विवेकाचा मार्ग दाखवणारे हे पुस्तक वाचनीय तर आहेच, पण विचारप्रवर्तकही आहे. आजच्या काळात अधिकाधिक आवश्यक असलेल्या तार्किक दृष्टिकोनाची जाणीव करून देणारे हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे असे निश्चितच म्हणता येईल.
राजन गवस यांची तर्कनिष्ठ प्रस्तावना आणि ज्येष्ठ संपादक डॉ. वसंत भोसले यांचा अभिप्राय या दोन बाबींनी पुस्तकाचे मोल आणखी वाढविले आहे. विश्वास हे समकाळात फुले, शाहू, आंबेडकरांच्या मूल्यांवर वाटचाल करणारे महत्त्वाचे पत्रकार आहेत. डॉ. एन. डी. पाटील, गोविंद पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे व्यक्तिमत्त्व घडले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रतिपादनाला त्यांच्या विचारांचा ठोस पाया लाभलेला आहे. म्हणूनच ते आग्रही आणि निग्रही झाले आहे.
समाजाकडून उदात्त चांगुलपणाची, सद्सदविवेकाची अपेक्षा बाळगणारे आहे. त्याला एक सहृदयी समाज म्हणून आपण काय आणि कसा प्रतिसाद देणार, यावर त्यांच्या अपेक्षांची फलश्रुती अवलंबून असणार आहे. मात्र विश्वास समाजाच्या सद्भावाला साद घालणे थांबवणार नाहीत, याची खात्रीही वाटते. त्यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा!
पुस्तकाचे नाव – फेरा जन्म मृत्यूचा
लेखक – विश्वास शामराव पाटील
प्रकाशक – भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर
पृष्ठे १८४
किंमत- रु. २२५ /-
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.

ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे मध्ये मुख्यत्वे समाजचिंतनशील स्वरूपाचे लेखन