हवामान बदलाचा तीव्र धोका अन् त्याचे लोकजीवनावर परिणाम यावर इफ्फीमध्ये चित्रपट
५५ व्या इफ्फी मधील ‘बेतानिया’ आणि ‘सतू- इयर ऑफ द रॅबिट’ हे दोन उल्लेखनीय चित्रपट हवामान बदलाचा तीव्र धोका आणि त्याचा लोकांच्या जीवनावर होणारा परिणाम अधोरेखित करतात
IFFIWood गोवा – ‘बेतानिया’चे दिग्दर्शक मार्सेलो बोटा आणि ‘सतू – इयर ऑफ द रॅबिट’चे दिग्दर्शक जोशुआ ट्रिग यांनी आज 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पत्रकार परिषदेत आपापल्या चित्रपटांद्वारे हवामान बदलाच्या संदेशाकडे लक्ष वेधले. दोन्ही चित्रपट तातडीच्या पर्यावरणीय संकटाचा सामना करण्यासही निगडित असून, वैयक्तिक जीवन आणि समुदायांवर होणाऱ्या हवामान बदलाचा प्रभावाचा शोध घेणारी कथा आकर्षक पद्धतीने मांडतात.
यावेळी बोलताना मार्सेलो बोटा यांनी बेतानियामागील त्यांची प्रेरणा सामायिक केली, जी 2018 मध्ये त्यांनी बनवलेल्या माहितीपटातून विकसित झाली. त्यांनी कथेच्या भावनिक आणि परिवर्तनीय सामर्थ्याबद्दल सांगितले, यात केवळ हवामान बदलाचे विनाशकारी परिणामच नाही तर लवचिकता देखील दाखवली असून प्रतिकूल परिस्थितीत उदयाला आलेली आशा देखील आहे.
बेतानियाची कथा एका कुटुंबातील 65 वर्षीय कर्त्या स्त्रीभोवती फिरते जिला तिच्या पतीच्या अकाली मृत्यूनंतर ईशान्य ब्राझीलमधील तिचे ग्रामीण घर सोडण्यास भाग पाडले जाते. त्यानंतर तिच्या बालपणीच्या गावात परत आल्यावर तिला पिढ्यानपिढ्या संघर्ष, परंपरा आणि आधुनिकता यांच्यातील कोंडी आणि अति-पर्यटन आणि अस्थिर विकासामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास यांचा सामना करावा लागतो. झपाट्याने बदलणाऱ्या जगात आपली सांस्कृतिक ओळख आणि जीवनशैली टिकवून ठेवण्यासाठी तिच्या कुटुंबाला करावा लागलेला संघर्ष या चित्रपटात चित्रित केला आहे.
“बेतानिया ही आशा आणि परिवर्तनाची कथा आहे. हवामान बदलासारख्या भीषण आव्हानांना सामोरे जाताना व्यक्ती आणि समुदाय त्याच्याशी जुळवून घेऊन कशी भरभराट करू शकतात याचा शोध हा चित्रपट घेतो,” असे मार्सेलो म्हणाले.
तर दुसरीकडे, जोशुआ ट्रिगने ‘सतू – इयर ऑफ द रॅबिट’ या चित्रपटामागील प्रेरणांबद्दल सांगितले. बो हा लाओशियन किशोरवयीन तरुण आणि दीर्घकाळ हरवलेल्या आईचा शोध घेत असलेला छोटा अनाथ सतू यांच्यावरील चित्रपट आहे. या चित्रपटात सतूचा स्वत्वाचा शोध आणि अपमानकारक कौटुंबिक परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आणि पत्रकार बनण्याच्या स्वप्नांचा पाठपुरावा करणाऱ्या बो चा प्रवास एकत्र गुंफला आहे. ही कथा त्यांना स्फोट न झालेल्या बॉम्बच्या पर्यावरणीय परिणामातून सावरणाऱ्या गावात घेऊन जाते, जिथे त्यांना युद्धाचा वारसा आणि हवामान-बदलामुळे उदभवलेल्या आपत्तींच्या व्यापक परिणामांचा सामना करावा लागतो.
जोशुआने लोकांना जोडण्यासाठी आणि हवामानाच्या संकटाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या सिनेमाच्या सामर्थ्यावर भर दिला. “एक खरी आणि प्रामाणिक कथा नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. सतू आणि बेतानिया सारख्या कथांद्वारे या ग्रहासमोरील तातडीची आव्हाने आणि आपल्याला परिभाषित करणारी लवचिकता याबद्दल विस्तृत समज मिळेल अशी आशा आहे”, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
हे दोन्ही चित्रपट प्रेक्षकांना हवामान बदलामुळे निर्माण होत असलेल्या समस्यांचा सामना करणे ही आपली तातडीच्या गरज असल्याचे स्मरण करून देतात, आणि त्याचवेळी मानवाचे निसर्गासोबतचे नाते आणि परिवर्तनाच्या माध्यमातून अजुनही असलेली आशा आणि बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या संधीची जाणीवही प्रेक्षकांना करून देतात.
या चित्रपटांविषयी
- बेतानिया (BETÂNIA)
ब्राझील | 2024 | पोर्तुगीज, फ्रेंच | 115′ | रंगीत
चित्रपटाचा सारांश
बेतानिया ही पासष्ट वर्षांची एक कणखर कुटुंबप्रमुख आहे, काळाच्या ओघात वाळू निसटून जात असल्याप्रमाणे सातत्याने बदलत्या परिस्थितीचा सामना करत ती करत असलेल्या वाटचालीची ही कथा आहे. तिच्या पतीचा मृत्यू झाल्यानंतर बेतानियाला पुन्हा एकदा तिच्या जन्माच्या मूळ गावी जाणे भाग पडते. यासाठी तिला अॅमेझॉनपासून काही अंतरावर वसलेल्या ब्राझिलच्या काही अंतरावरच असलेल्या नव्या कोऱ्या वाळवंटी प्रदेशाच्या काठावर जपलेल्या आयुष्यभराच्या आठवणी, आधुनिकतेपासून दूर विजेच्या सोयीशिवायचे साधे आयुष्य आणि शेतीप्रधान जीवनशैली मागे सोडून द्याव्या लागतात. आपलेले हे बदललेले आयुष्य जगताना बेतानिया आणि तिचे कुटुंब मारान्हाओमधील आपल्या पूर्वजांच्या अस्तित्वाने प्रेरित होऊन परंपरा आणि आधुनिकतेच्या संघर्षात संतुलन साधत आपली ओळख कायम राखण्यासाठी करत असलेला संघर्ष दिग्दर्शक आपल्याला दाखवतो. भल्या मोठ्या वाळूच्या टेकड्या, प्रदूषित झालेले पाणी, समोरच्या आर्थिक अडचणी आणि पिढ्यान पिढ्या चालत आलेले वाद अशा सर्व अडचणी तिच्यासमोर आहेत. मात्र अशा विपरित परिस्थितीतही ज्याप्रमाणे जीवन कायम आपला मार्ग शोधते, त्याचप्रमाणे ती देखील आपल्या जगण्याचा मार्ग शोधते. ज्याप्रमाणे वाळवंटासारख्या ओसाड प्रदेशात कधीकधी चमत्कार झाला असावा अशा तऱ्हेनेच रानफुले उगवलेली दिसतात, अगदी त्याचप्रमाणे एकीकडे जगाचा अंत होत असल्यासारखी परिस्थिती असतानाही बेतानिया आणि तिच्या कुटुंबाचे जगणेही नव्या चैतन्याने बहरलेले असल्याचे चित्र दिग्दर्शक या चित्रपटातून आपल्यासमोर उभे करतो.
कलाकार आणि चित्रपटाचा चमू
दिग्दर्शक: मार्सेलो बोटा
निर्माते: गॅब्रियल डि जियाकोमो, मार्सेलो बोटा
छायाचित्रणकार: ब्रुनो ग्राझियानो
संपादक: मार्सियो हाशिमोटो
पटकथा : मार्सेलो बोटा
कलाकार: डायना मॅटोस, तियाओ कार्वाल्हो, कासुला रोड्रिगेस, नाडिया डी’कॅस्सिया, उलिस्सेस अझेव्हेडो, मिशेल कब्राल, विटाओ सांतियागो, एनमे पैशाओ
सातू – इअर ऑफ दि रॅबीट
लाओस | 2024 | लाओ | 93’ | रंग
चित्रपटाचा सारांश
बो, ही एका लाओशियन किशोरवयीन मुलीची कथा. ती वडील हे कायमच तिला अपमानास्पद – अत्याचारी वागणूक देणारे. व्हिएतनामच्या हनोई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेण्याची तिची इच्छा आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळावा म्हणू जो अर्ज तिला करायचा आहे, त्या अर्जासोबतच तिला छायाचित्र पत्रकारितेचा स्वतःचा नमुना देखील जोडायचा आहे. याच प्रयत्नाचा भाग म्हणून ती या प्रकल्पाच्या निमित्ताने स्वतःची घालमेल आणि दु:खापासून सुटका करून घेण्याच्या दिशेने नवा प्रेरणादायी प्रवास सुरू करते. या प्रवासातचती फा तांग या मंदिरात पोहोचते. तिथेच तिला लहानग्या अनाथ असलेल्या सातूची भेट होते.
खरे तर या सातूला तिथल्या मुख्य पुजाऱ्यानेच लहानपणी दत्तक घेतलेले असते. या गावात पूर येतो आणि या पुरामुळे एखादा बॉम्ब फुटावा त्याप्रमाणे निर्माण झालेल्या अनेकानेक समस्यांपासून सुटका करून घेण्यासाठी साऱ्या गावाची धडपड चालू असते. अशावेळी बो मात्र सातूची इच्छा मान्य करून त्याच्या आईचा शोध घेण्यासाठी उत्तरेच्या दिशेने प्रवास सरू करतात. या प्रवासात सातू त्याच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरे शोधत असतो तर, त्याच प्रवासात बो ही एक नवी कथा चितारत असते.
कलाकार आणि चित्रपटाचा चमू
दिग्दर्शक: जोशुआ ट्रिग
निर्माता: ली फोंगसवन्ह
छायाचित्रणकार: जेम्स चेगविन
संपादक: निक साँडर्स
पटकथा: जोशुआ ट्रिग
कलाकार: इत्तिफोन सोनेफो, व्हांथिवा सायसना
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.