स्टेटलाइन –
गणेशोत्सवात साऱ्या महाराष्ट्रात भक्तिमय वातावरण असते. मग रस्त्यावर साजरा होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवात आणि मिरवणुकांमधे धांगडधिंगा का घातला जातो ? कानठळ्या बसविणाऱ्या आवाजात गाणी का लावली जातात ? गणपतीपुढे हिडिस फिडिस नृत्य का केले जाते ? भक्तिगीतांपेक्षा हिंदी चित्रपटातील नाच गाण्यांना वर्षाव का केला जातो ? भलेमोठे मंडप घालून रस्ते का अडवले जातात ? आणि गणेशोत्सवाच्या दहा दिवसात वारेमाप खर्चाची उधळपट्टी का केली जाते ?डॉ. सुकृत खांडेकर
उत्सव म्हणजे नाच, गाणी, डीजे नव्हे…
गणेशोत्सव हे महाराष्ट्राचे वैभव आहे. गणपती ही बुध्दीची देवता आहे. महाराष्ट्रात घरोघरी गणेशाची स्थापन करून पूजन केले जाते. दिड दिवसांपासून दहा दिवसांपर्यंत घरोघरी गणेश मूर्तीची पूजा केली जाते. गणेशोत्सवाच्या काळात कुटुंबातील सारे जण एकत्र असतात, रोज सकाळी व सायंकाळच्या आरतीला आवर्जून उपस्थित राहतात. घरोघरी गणपतीपुढे आरास – सजावट केली जाते. रोज फुले व प्रसाद ठेवला जातो. गणेशोत्सवात साऱ्या महाराष्ट्रात भक्तिमय वातावरण असते. मग रस्त्यावर साजरा होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवात आणि मिरवणुकांमधे धांगडधिंगा का घातला जातो ? कानठळ्या बसविणाऱ्या आवाजात गाणी का लावली जातात ? गणपतीपुढे हिडिस फिडिस नृत्य का केले जाते ? भक्तिगीतांपेक्षा हिंदी चित्रपटातील नाच गाण्यांना वर्षाव का केला जातो ? भलेमोठे मंडप घालून रस्ते का अडवले जातात ? आणि गणेशोत्सवाच्या दहा दिवसात वारेमाप खर्चाची उधळपट्टी का केली जाते ?
श्रावण महिना सुरू झाला की सण आणि उत्सवांची मालिका सुरू होते. दहिहंडीच्या दिवशी दुपारी बारा नंतर मुंबईचे अनेक रस्ते बंद होतात. गोविंदांची शेकडो पथके बसेस व ट्रक- टेम्पोमधून दहिहंडी फोडण्यासाठी मुंबई- ठाण्यात फिरत असतात. पन्नास हजारापासून पंचवीस लाखापर्यंत हंडी फोडणाऱ्या पथकांवर बक्षिसांचा वर्षाव केला जातो. अशी मोठ मोठी बक्षिसे लावणाऱ्यांमधे राजकीय पक्षाचे नेते आणि लोकप्रतिनिधी असतात. राज्याचे अनेक आजी- माजी मंत्रीही त्यात आघाडीवर दिसतात. पुढाऱ्यांच्या छब्या असलेले टी शर्टस घालून गोविंदांची पथके मोठ्या उत्साहात फिरत असतात. आता तर नऊ आणि दहा थरांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात. अनेक दहिहंडी कार्यक्रमांचे वृत्तवाहिन्यांवर दिवसभर थेट प्रक्षेपण केले जाते.
अनेक ठिकाणी चंदेरी दुनियेतील अभिनेते व अभिनेत्री तिथे हजेरी लावतात. मंचावर सादर होणऱ्या नाच गाण्यांच्या कार्यक्रमात अनेक नामवंत कलाकार हजेरी लावतात. हे कलावंत तिथे येण्यासाठी किती बिदागी घेतात याच्या आकेडवारीची नेहमीच उघड चर्चा ऐकायला मिळते. दोन पाच लाखापासून ते पंधरा वीस लाखापर्यंत हेआकडे ऐकायला मिळतात. यावर्षी दहिहंडी उत्सवात चारशे गोविंदा तरी जखमी झाले आणि चार जणांचा मृत्यु झाला. दरवर्षी तीनशे गोविंद तरी जखमी होत असतात. काहींचे मृत्यु होतात. या गोविंदाच्या घरची परिस्थिती काय असते ? जखमी गोविंदांचे पुढे काय होते, ? त्यांना विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळते काय ? त्याचे पुढे भविष्य काय ? यावर कधी चर्चा होत नाही. दहिहंडी झाली की गणेशोत्सव. पुन्हा नाच , गाणी, डीजे च्या मोठ्या आवाजात सारे दंग झालेले दिसतात.
महापुरूषांच्या जयंती किंवा पुण्यतिथीला लहान मोठ्या शहरात गेल्या काही वर्षापासून मोठ्या मिरवणुका निघत आहेत. महापुरूषांचे फोटो लावलेले फ्लोट पुढे ठेवायचे व मागे डीजेच्या तालावर नाचायचे. हेच दृश्य सर्वत्र दिसते. एवढेच नव्हे तर हातात मद्याचे ग्लास आणि हातात सिगारेटी घेऊन बेभान झालेल्या तरूणांचे जथेही दिसू लागले आहेत. त्यांना आवरण्याचा कोणी प्रयत्न केला तर तुम्ही कोण सांगणार, आज आमचा दिवस आहे, आम्ही कसेही वागू .. अशी उत्तरे दिेली जातात. आपल्या नाचगाण्यामुळे व धिंगाण्यामुळे रस्त्यावरची वाहतूक दोनदोन चारचार तास ठप्प होते आहे याचे कुणालाच भान नसते. वाहतूक ठप्प झाल्याचे व्हिडिओ सोशल मिडियाव व्हायरल होतात पण कारवाई कुणावरच होत नाही.
तक्रार आली तर कारवाई करू असा पोलिसांचा खाक्या असतो. कोणी तक्रार केली तर त्याचेच नाव धिंगाणा घालणाऱ्या लोकांना समजते, यामागे कोण असते हे वेगळे सांगायला नको. रस्त्यावर वारंवार निघणाऱ्या मिरवणुकांना परवानगी का दिली जाते, कोण देतो, असे प्रश्न विचारचे नसतात. मिरवणुका नसतानाही मुंबई, पुणे अशा सर्वच शहरात रोज वाहतूक कोंडी असतेच मग आगमन असो वा विसर्जन, जयंती असो पुण्यतिथी या निमित्ताने निघणाऱ्या मिरवणुकांवर निदान वेळेचे तरी बंधन नको का ?
दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्रात गरबा, राजकीय पक्ष व त्याच्या बड्या नेत्यांच्या सभा अशा सर्वच ठिकाणी हजारो तरूण मुले उत्साहाने सहभागी झालेली दिसतात. सर्वच उत्सव, कार्य्क्रम, सभा, मिरवणुकांमधे सहभागी व्हायला, नाचायला, घोषणा द्यायला या तरूणांना वेळ कसा मिळतो ? त्यांचे शिक्षण काय ? ही तरूणाई काय काम करते ? कमाई काय ? उत्पन्न काय ? शिक्षण, रोजगार आणि सर्वात महत्वाचे संस्कार या तरूणांवर आहेत का ? गेल्या काही वर्षापासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या आगमनाच्या मिरवणुका सुरू झाल्या आहे. त्यामुळे मुंबईतील रस्ते पुन्हा वाहतूक कोंडीत सापडू लागले आहेत.
आगमन व विसर्जन मिरवणुका, भव्य आरास, भव्य सजावट, मोठे मांडव, रोज कार्यकर्त्यांची चहा पानाची व्यवस्था , विद्युत रोषणाई, कलावंताची बिदागी, पाहुण्यांची सरबराई, रोजचा प्रसाद, आरती किती प्रचंड खर्च होत असतो. त्यातून समाजाला विशेषत: तरूणाईला काय मिळते ? लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला तो ब्रिटीशांच्या विरोधात जनजागृतीसाठी. लोकशिक्षण हा मुख्य हेतू होता. पण आज डीजे, नाच, गाणी, लाऊड स्पिकर्सवरील मोठाले आवाजाने गणेशो्त्सव व्यापला आहे. गणेशोत्सवात सर्व रस्त्यावर राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांचे होर्डिंग आणि ब’नर्स सर्वत्र झळकत आहेत. गणेश भक्तांचे स्वागत अमराठी धनवंतांकडून व परप्रांतीय लोकांकडूनच मोठया प्रमाणावर फलकांवरून होत आहे.
गणशोत्सवाच्या काळात आरास , सजावट , फळे, फुले यांची विक्री प्रचंड होते, विक्रेते कोण आहेत, ते सर्वाधिक अमराठी आहेत असे लक्षात येते. वडापाव, बुर्जी पाव, आम्लेटपाव, चाईनिज, डोसा. पिझ्झा, सँडविच आदी खाद्य पदार्थांच्या गाड्या रात्रभर पदपथावर व रस्त्यांवर गर्दीने वेढलेल्या असतात. हे विक्रेते सर्वाधिक अमराठी आहेत. उत्सवाच्या काळात हजारो मराठी तरूण मुलांचे जथे रस्त्यावर नाचत असतात आणि पाण्याच्या बाटल्या व वडा पाव विकून अमराठी पैसे कमावत असतात. अशा उत्सवातून आपण काही शिकणार आहोत की नाही ?
डीजे चे फ’ड इतके वाढले आहे की ध्वनिप्रदुषणाने सारी मुंबई व्यापली आहे. आजही शांतता प्रिय मुंबईकरांची संख्या लक्षावधी आहे. काहीही झाले तरी दुसऱ्या दिवशी सकाळी कामावर गेलेच पाहिजे, अशी संख्याही लक्षावधी आहे.घरात आजारी माणसे असतात. वयोवृध्द आई वडिल असतात. अभ्यास करून स्पर्धा परीक्षेला बसणारी हजारो मुले असतात. त्यांचा कोणी विचारच करणार नाही का ? डीजे, नाच , गाणी, धांगड धिंगा यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणीही राजकीय नेता किंवा पक्ष प्रयत्न करणार नाही. कारण नाचणारे, गाणी लावणारे हे बेभान लोक ही त्यांची व्होट बँक आहे. आता तर चार महिन्यांवर महापालिका, नगर परिषदांच्या निवडणुका आहे आहेत. कानठळया बसविणारा डीजे नको असे सांगायला कोणी पुढे येणार नाही. राज्यकर्त्यांना ध्वनिप्रदुषण आणि वाहतूक कोंडी रोखण्यात किती रस आहे हे दरवेळी अनुभवायला मिळतेच. मग प्रामाणिक, शांतताप्रिय समाजाने व करदात्या मुंबईकरांनी उत्सवाच्या काळात अपेक्षा तरी कोणाकडे करायची ?
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.