‘स्त्री-भृणहत्ये’च्या परिणामाचं प्रातिनिधिक चित्रण करणारी माझी ‘घरंगळण’ ही नवी (नववी) कादंबरी ‘संस्कृती प्रकाशन, पुणे’ यांच्या वतीने प्रकाशित झाली आहे. या कादंबरीला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ‘ग. ल. ठोकळ’ पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच शिवाबाबा वाघ साहित्य पुरस्कारही जाहीर झाला आहे. या कादंबरीबद्दल थोडक्यात…
भीमराव वाघचौरे
खेड्यापाड्यातल्या मुलींना लग्नासाठी आता, त्यांच्यासगट त्यांच्या आईबापांनाही नोकरीवालेच मुलं लागत होते. मग ती नोकरी शहरातल्या एखाद्या कारखाना-कामगाराची, एखाद्या दुकानावर काम करणाऱ्याची किंवा एखाद्या बिगाऱ्याची असली तरी चालेल, पण नोकरीच पाहिजे होती; कारण शेवटी ती नोकरी होती. महिना भरल्यावरच्या पगाराच्या खात्रीची होती, शिवाय, त्याच्यानं मुलीला, ‘हाताला मळ ना पायाला माती’ असल्या सुखात राहता येणार होतं. करता येईल तितकी हौस मौज करता येणार होती.
पण इथल्या शेतीतल्या मातीत मात्र, तसलं काहीच नव्हतं. इथं दिवस- रात्र, उन्हा-वाऱ्यात, थंडी-गारठ्यात अन् पाण्या-पावसात राब राब रावूनही, कोणत्याच गोष्टीची, कसलीच खात्री देता येत नव्हती. इथल्या निसर्गाच्या दग्या-फटक्याचा, तिन्ही त्रिकाळातल्या कोणत्याच घात- आघाताचा, भरवसा देता येत नव्हता. इथलं जगणंच सगळं जनावरा – ढोरागत उन्हा-वाऱ्याशी, चिखल-मातीशी अन् दोरखंडा-फासाशी जखडलं गेलं होतं… अन् त्याच्यानंच शेती करणाऱ्या पोरांना, मग ते लाखोची उलाढाल करीत असले तरी, त्यांना लग्नासाठी म्हणून अजिबात कोणी मुली द्यायला धजत नव्हतं. हे आजच्या शेतकरी वर्गाचं कटू-वास्तव होतं…
स्त्रीशिवाय कुटुंब, घरदार आणि संसार, ही कल्पनाच किती विचित्र वाटते ? पण आज मितीला ते कित्येक कुटुंबाचं जित्त-जागतं वास्तव आहे आणि नजीकच्या काळात हेच वास्तव, विराटरूप धारण करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पुस्तकाचे नाव – घरंगळण
लेखक – भीमराव वाघचौरे
प्रकाशक – संस्कृती प्रकाशन
पृष्ठे – २७९ । मूल्य – ४२५/-
घरपोच – 400/-
संपर्क
संवाद ग्रंथ वितरण
8879039143
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
