इंटरनेट आणि संगणक क्षेत्रामध्ये “कृत्रिम बुद्धिमत्ते”चा वापर हा गेल्या काही वर्षांमध्ये अत्यंत वेगाने वाढत चाललेला आहे. मात्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जागृतीबाबत केलेल्या जागतिक पाहणीत उत्सुकतेपेक्षा जास्त लोक चिंतेत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे. या पाहणीचा घेतलेला हा वेध…
प्रा. नंदकुमार काकिर्डे
अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथील अग्रगण्य पीईडब्ल्यू रिसर्च सेंटरने मार्च महिन्याच्या अखेरीस जागतिक पातळीवर एक आगळीवेगळी पाहणी केली. जगभरातील लोक “कृत्रिम बुद्धिमत्तेकडे ” कसे पाहतात हे समजण्यासाठी ही पहाणी करण्यात आली होती. भारतासह जगभरातील 25 प्रमुख प्रगत देशांमध्ये ही पाहणी करण्यात आली. त्यात अमेरिका, इटली, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, ग्रीस,कॅनडा, इंग्लंड, अर्जेंटिना, पोलंड, मेक्सिको, फ्रान्स, नेदरलँड, हंगेरी, इंडोनेशिया, केनिया, स्वीडन, दक्षिणआफ्रिका, जर्मनी, जपान, तुर्की, नायजेरिया, इस्रायल, दक्षिण कोरिया व भारत अशा 25 देशांमध्ये ही पाहणी करण्यात आली. त्यामध्ये 4045 व्यक्तींपैकी 3605 व्यक्तींनी याबाबतचा प्रतिसाद दिला. या व्यक्तींना प्रत्यक्ष भेटून, दूरध्वनीद्वारे किंवा त्यांची ऑनलाइन मुलाखत घेण्यात आली. विविध देशांमधील सर्व जाती जमातीच्या तसेच ज्यू, मुस्लिम, नॉन हिस्पॅनिक प्रौढ आशियाईं जाती-जमातींचाही समावेश या पाहणीत करण्यात आला होता.
जागतिक पातळीवरील या पंचवीस देशांच्या तुलनेत भारतीयांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत खूप कमी माहिती किंवा कमी जागरूकता असल्याचे मध्ये आढळले आहे. भारतात सर्वेक्षण केलेल्या व्यक्तींपैकी केवळ 14 टक्के भारतीयांनी या तंत्रज्ञानाबाबत काही ऐकल्याचे किंवा वाचल्याचे सांगितले आहे. तसेच जवळजवळ 32 टक्के भारतीयांनी याबाबत फार अल्प वाचल्याचे सांगितले आहे. ही दोन्ही आकडेवारी लक्षात घेता केवळ 46 टक्के लोकांमध्ये या तंत्रज्ञानाची माहिती असल्याचे आढळले असून जागतिक पातळीवर आपली क्रमवारी खूप खालचा आहे.
जरी कृत्रिम बुद्धिमत्ता हे एक नवीन तंत्रज्ञान असले तरी त्याबद्दल तरुण वर्गामध्ये अधिक माहिती असणे अपेक्षित आहे. 18 ते 34 वयोगटातील फक्त 19 टक्के भारतीयांनी सांगितले की त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल खूप ऐकले आहे किंवा वाचलेले आहे. सर्वेक्षण केलेल्या 25 देशांमधील या वयोगटातील हा दुसरा सर्वात कमी वाटा आहे. परिणामतः दैनंदिन जीवनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या वापराबद्दल भारतीयांमध्ये सर्वात कमी चिंता आढळली आहे. मात्र सर्वेक्षण केलेल्या 90 टक्के भारतीयांनी आपला देश या कृत्रिम बुद्धिमत्तेचे अत्यंत प्रभावीपणे नियंत्रित करेल असा विश्वासही व्यक्त केलेला आहे.सर्वेक्षण केलेल्या सर्व देशांमध्ये हा वाटा सर्वाधिक आहे यातील सकारात्मक गोष्ट आहे.
या जागतिक पाहणीचा प्रमुख निष्कर्ष असा आहे की बहुतेक सर्व देशातील लोकांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नव्या तंत्रज्ञानाबद्दल थोडेफार वाचलेले किंवा ऐकलेले आहे. मात्र अनेक व्यक्तींनी या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या कुतूहलापेक्षा दैनंदिन जीवनामध्ये त्याच्या वाढत्या प्रभावाबद्दल चिंता व्यक्त केलेली आहे. अगदी टक्केवारी मध्ये सांगावयाचे झाले तर 34 टक्के प्रौढ व्यक्तींनी याबद्दल या तंत्रज्ञानाबद्दल काहीसे ऐकल्याचे किंवा काही वाचल्याचे सांगितले आहे. तर 47 टक्के प्रौढांनी याबाबत अत्यंत अल्प वाचल्याचे सांगितले. मात्र 14 टक्के प्रौढ व्यक्तींनी याबाबत काहीही वाचले नसल्याचे किंवा ऐकले नसल्याचे सांगितले आहे. आजच्या दैनंदिन जीवनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या होणाऱ्या वापराबद्दल 34 टक्के प्रौढांनी चिंता व्यक्त केलेली आहे. मात्र 42 रक्के प्रौढांना त्याबाबत उत्सुकताही आहे आणि त्याबाबतची चिंताही वाटत आहे. एवढेच नाही तर 16 टक्के व्यक्ती याबाबत चिंता व्यक्त करण्यापेक्षा ऐवजी त्याच्या भविष्यातील वापराकडे उत्सुकतेने पाहत आहेत.
अमेरिका, इटली, ऑस्ट्रेलिया, ब्राझील आणि ग्रीस या देशांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत साधारणपणे समान सारख्या प्रकारची चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे. दक्षिण कोरियातील 16 टक्के व्यक्तींनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा त्यांच्या आयुष्यावर होणाऱ्या वापराबद्दल चिंता व्यक्त केलेली आहे. सर्वसाधारणपणे दहा प्रौढांपैकी तीन प्रौढांमध्ये केवळ याबाबत खूप उत्सुकता आहे तर अन्य 7 प्रौढांमध्ये त्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे.
प्रत्येक देशामध्ये दरडोई उत्पन्न हे मोजले जाते. ज्या देशांमध्ये दरडोई उत्पन्नाचे प्रमाण जास्त आहे त्या देशातील लोकांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत जास्त माहिती असल्याचे आढळून आले आहे. ज्या देशांमध्ये कमी दरडोई उत्पन्न आहे अशा देशांमध्ये या नवीन तंत्रज्ञानाबद्दल अत्यंत कमी किंवा अल्प माहिती आहे. जपान,जर्मनी,फ्रान्स अमेरिका या श्रीमंत देशामधील साधारणपणे पन्नास टक्के व्यक्तींनी कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल खूप काही ऐकल्याचे व वाचल्याचे सांगितले आहे. भारताच्या बाबतीत फक्त 14 टक्के प्रौढांनी याबाबत वाचल्याचे किंवा माहिती असल्याचे सांगितले तर केनिया मध्ये हे प्रमाण फक्त 12 टक्के आहे.
या पाहणीमध्ये या कृत्रिम बुद्धिमत्तेचे नियमन करण्यामध्ये त्यांच्या देशावर विश्वास आहे किंवा कसे? असा प्रश्न विचारला असता त्यांनी त्यांच्या देशाच्या नियमावर जास्त विश्वास असल्याचे सांगितले. इंडोनेशियात ही टक्केवारी 74 टक्के तर इस्रायल मध्ये 72 टक्के इतके आहे. ज्या देशांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत खूप उत्साही वातावरण आहे त्यांना त्यांच्या देशाने त्याचे नियमन करावे असे वाटत आहे. खुद्द अमेरिकेत केवळ 44 टक्के नागरिकांना वाटते की त्यांच्या देशाने त्याचे नियमन करावे मात्र 47 टक्के अमेरिकन नागरिकांना त्यांच्या व्यवस्थेवर विश्वास नाही व त्यांनी नियमन करू नये असे वाटते. अर्थात अमेरिकेत रिपब्लिकन पक्षांचा त्यांच्यावर जास्त विश्वास आहे तर तेथील डेमोक्रॅट्स मंडळींचा तेवढा विश्वास नाही असे स्पष्ट झाले आहे.
जागतिक पातळीवरच्या पाहणी मध्ये अमेरिका आणि चीन यांच्यापेक्षा युरोपियन देशांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचे नियमन करण्यावर जास्त लोकांचा विश्वास आहे. आकडेवारीच्या भाषेत सांगायचे तर 53 टक्के प्रौढांना युरोपियन देशांनी नियमन करावे असे वाटते तर केवळ 37 टक्के टक्के प्रौढांना अमेरिकेने त्याचे नियंत्रण करावे असे वाटते व फक्त 27 टक्के प्रौढांना चीनने त्याचे नियंत्रण नियमन करावे असे वाटते. यामध्येही जर्मनी व नेदरलँड मधील प्रौढांना युरोपामध्ये हे नियंत्रण व्हावेसे वाटते तर फ्रान्स, इटली, ग्रीस व पोलंड या देशातील प्रौढांना त्यांच्यावर तेवढा विश्वास नाही.
इंडोनेशिया व दक्षिण आफ्रिका या देशातील प्रौढांना मात्र अमेरिकेपेक्षा चीनवर जास्त विश्वास असल्याचे आढळून आले आहे. मात्र तत्त्वतः किंवा उजव्या विचारसरणीकडे झुकणाऱ्या प्रौढांमध्ये अमेरिकेवर सर्वाधिक विश्वास असल्याचे आढळले आहे. तर 19 देशातील तरुण वर्गाला आजच्या घडीला चीनवर कृत्रिम बुद्धिमत्तेचे नियमन सोपवावे असा विश्वास वाटत आहे. अमेरिका व चीन यांच्यापेक्षा युरोपियन देशांकडे या कृत्रिम बुद्धिमत्तेचे नियमन सोपावे असे वाटणारा प्रौढ वर्ग 19 देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळलेला आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाबद्दलची जास्त माहिती माहिती किंवा जाणीव प्रौढ व्यक्तींपेक्षा तरुण वर्गामध्ये जास्त असल्याचे या पाहणीत आढळलेले आहे. उदाहरणार्थ ग्रीक मधील 35 वर्षांपेक्षा लहान असलेल्या 68 टक्के व्यक्तींना या तंत्रज्ञानाची माहिती असल्याचे स्पष्ट झाले आहे. इजरायल मध्ये हे प्रमाण 46 टकके आहे भारतात 18 ते 34 वयोगटातील 14 टक्के तरुणांना त्याबाबत खूप माहिती आहे मात्र 35 ते 49 वयोगटातील दहा टक्के व्यक्तींना त्याची माहिती आहे मात्र 50 किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील फक्त सात टक्के व्यक्तींना कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाची माहिती आहे असे आढळले आहे.
जागतिक पातळीवरही महिलांच्या तुलनेत पुरुषांना कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाची जास्त माहिती चांगली असल्याचे आढळून आलेले आहे. मात्र या तंत्रज्ञानाच्या वापराबाबतची चिंता महिलावर्गांमध्ये सर्वत्र जास्त असल्याचे आढळलेले आहे. कमी शिक्षित असलेल्या लोकांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल जास्त चिंता आढळली असून एकूण या तंत्रज्ञानाची माहिती किंवा जाणीवही त्यांच्यात कमी आहे. सुशिक्षित व्यक्तींमध्ये मात्र याबाबत जास्त माहिती असून त्यांच्या त्याबाबतची उत्सुकता ही तेवढीच आहे. जी मंडळी जगभर इंटरनेटचा वापर करतात त्यांना या कृत्रिम बुद्धिमत्तेबाबतची माहिती निश्चितच जास्त असून त्याबाबत त्यांना जास्तीत जास्त उत्सुकता असल्याचे लक्षात आले आहे. एकंदरीत इंटरनेट,मोबाईल व संगणकाचा वापर वाढत जाईल तसे कृत्रिम बुद्धिमत्तेचे गारुड जगभर वाढत जाईल असे दिसते.
( प्रस्तुत लेखक पुणे स्थित अर्थविषयक जेष्ठ पत्रकार असून माजी बँक संचालक आहेत )
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
