कोकणात माकडांच्यामुळे घरावरील छप्पराचे, खापऱ्याचे नुकसान होते. तसेच फळबागांचेही नुकसान होते. वानरांनी कोठे जायचे हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहेच. पण होणारे नुकसान सध्या त्रासदायक ठरत आहे. त्यातच सरकारने केलेले कायदे शेतकऱ्यांना जाचक ठरत आहेत. यात शिथिलता हवी. तसेच काही पारंपारिक संवर्धनांच्या उपायांचा शोध घेऊन त्याची अंमलबजावनी करण्याची गरज आहे. सरकारने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा. यासाठीच हा खटाटोप…
विश्वनाथ मनोहर सावंत
आज माकडांचा खूप त्रास जे शेतकरी कोकणात काही करू इच्छितात त्यांना होतोय. आमचे नाटळ गाव २५०० हेक्टरचे. पंचक्रोशीतील सर्वात मोठे ३२ वाड्यांचे गाव. माझ्या लहानपणी माकडमारे/ वांडरमारे गावी यायचे आणि धनुष्य बाणाने माकडांना पळवून लावायचे. या माकडमाऱ्यांना बघितल्यावर गावात चुकून शिरलेली माकडेही परत जंगलात जायची. होय चुकूनच. हल्ली ती निरढावल्यासारखी गावात घुसतात. अन् नुकसान करतात.
आमची राजवाडी गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेली. गावातील स्थलांतर वाढले तरी वाडीत बऱ्यापैकी रहदारी आहे. पण यंदा वाडीत मुंबईकरांची रहदारी असूनही माकडे काही फरक पडत नसल्यासारखी घराघरावरून उड्या मारीत होती. काही वर्षांपूर्वी वातानुकुलीत कार्यालयात बसणाऱ्या एखाद्या अधिकाऱ्याने माकडमाऱ्यांवर बंदी घालण्याचा कायदा पुढे सरकवला आणि माकडमारे जमातीवर गुन्हे दाखल होऊ लागले. माकड मारणे, पकडणे, जखमी करणे हा गुन्हा ठरला. ३ ते ७ वर्षे तुरुंगवास, दंड वेगळा. अशा कायद्याने आता कोणी माकडांना रोखण्याचा प्रयत्न करत नाही. पण त्यामुळे माकडांचा वाढलेले उपद्रव मात्र शेतकरी अन् ग्रामस्थांना त्रासदायक ठरत आहे.
ब्रिटिश काळात काही भागात माकड मारण्याची परवानगी होती. 1972 नंतर ती पूर्णपणे बंद झाली आणि माकडांची संख्या काबूत ठेवणारा हा प्रकार बंद झाला. हल्ली काही पर्यावरणवाद्यांनी संशोधनासाठी लागणारी माकडेही पकडन्यास बंदी आणली. आता ही माकडे काय त्या अधिकाऱ्याचा किंवा या पर्यावरणवाद्यांचा सत्कार करणार नाहीत, पण काही उपजवू पाहणारा कोकणी शेतकरी हाती काहीच लागत नाही म्हणून शहरात स्थलांतरीत होऊ लागला हे नक्की. सरकारने एखादा कायदा काढतांना त्याचा भविष्यात कोणता परिणाम होणार याचाही विचार केला पाहिजे.
रत्नागिरी जिल्ह्यात माकडांचा उपद्रव अक्षरश: महामारीसारखा पसरला आहे. गेल्या वर्षी वनविभागाने केवळ ३६०० माकडे पकडली, पण खरे प्रमाण असंख्य आहे – टेंभ्ये, टिके, चाळकेवाडी, मुरुड परिसरात बागायती शेती नष्ट होतेय. आंबा, काजू, कोकम, भाजीपाला, फळबागा यांचे लाखोंचे नुकसान; शेतकरी अविनाश काळे म्हणतात, “रखवालदारांसाठी कोटीत खर्च होतो, तरी माकडे थांबत नाहीत !” नाटळसारख्या २५०० हेक्टर गावांतील रहदारी असलेल्या राजवाडीत गणपतीत मुंबईकरांच्या गर्दीतही माकडे घराघराच्या छापरावरून पळापळ करतात. असा या माकडांच्या त्रासामुळे अनेकांनी शेती सोडली!”
पर्यावरणवाद्यांच्या मते, वनक्षेत्र कमी झाल्याने माकडं गावांत घुसतात. संशोधनासाठी माकडे पकडणंही बंदी आहे., निर्बंधन/बेशुद्धीकरण असे पर्याय सुचवितात. हिमाचलसारखे राज्य माकड मारण्यास परवानगी देतात, पण महाराष्ट्रात ही परवानगी नाही. मानव – वन्यजीव संघर्ष वाढला: माकडं कुत्र्यांशीही भिडतात. शेतकऱ्यांसाठी हे ‘संतुलन’ म्हणजे उपासमार. याबाबत आता कोकणातील शेतकऱ्यांनी आवाज उठवायला हवा. यावर ठोस उपाय योजन्यासाठी सरकारला जागे करायलाच हवे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
