जीवनाचे मौलिक स्थान, मौलिक प्रवास, मौलिक वेळ, मौलिक संदेश, मौलिक समाधान, मौलिक आनंद अगदी सहजतेने कवी मनातून भाषेचे बंधने न येता जशा भावना, स्वानुभव आहेत, तशाच कविता ठळकपणे सादर करण्यात मूळ कवी आणि अनुवाद करणारे कवी दोघांचे यश दिसून येते.
प्रज्ञा हंसराज बागुल
दिग्रस, जि. यवतमाळ.
कविता साभार नोएडा यांच्यातर्फे प्रकाशित कवी के मन से या कवि माधव कौशिक यांच्या पुस्तकातील निवडक कवितांचा मराठी अनुवाद प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे यांनी केला आहे. अनुवाद करतांना प्रगट झालेल्या बोलक्या संवेदना मनोगतातून कवीने व्यक्त केल्या आहेत. जगण्यातील विसंगती, भावनिक स्पंदनं आणि जीवनविषयक स्वप्नांच्या संघर्षशीलतेचा आशय मी तितक्याच संवेदनशीलतेने, सर्जनशीलतेने आणि सामाजिक जाणिवेने मराठीत आणला. त्यामुळे हा अनुवाद केवळ भाषेचा अनुवाद न राहता एका काळाचा, भावनांचा आणि विचारसरणीचा साहित्यिक संवाद ठरतो. असे मला मनापासून वाटते.
कवी कौशिक माधव यांचे देखील दोन शब्द यात व्यक्त करण्यात आले आहेत.
माझा विश्वास आहे की ही कविता जीवनातील तात्कालिकता आणि पृथ्वीवरील विसंगतींना पार करत धावणाऱ्या स्वप्नवत लोकांच्या मनालाही निश्चितपणे हलवून टाकतील.
एकूण चोपन्न कवितांचा अनुवाद या पुस्तकात आहे. माणूसकेंद्री कविता आहेत. यातील भावभावनांचे प्रतिनिधित्व मूळ कवितेच्या स्वरूपातून अनुवादित करतांना कवीने स्वानुभवातून, स्वयंप्रेरणेतुन जाणिवा समजून घेत जसे आहे तसे पारदर्शक आशयासह प्रस्तूत केले आहे. मूळ कवीचा विविधांगी दृष्टिकोन जसा आहे तसाच अनुवादित कवितेमध्ये उमटलेला आहे.
“वसुंधरेला कुटुंबाची
जोड आहे का ?
नराला नारायण म्हणणारे लोक
असत्याच्या आंधळ्या गुहेमध्ये
आंधळ्या तोंडावर
घृणेला शरणागत होऊन
बसले आहेत….”
या ओळीतून आजच्या वर्तमानाची अवस्था कवीने व्यक्त केली आहे. सृजक किती कठीण झाले आहे. याविषयी कवी मनातील खंत अनुवादात देखील जशीच्या तशी उमटलेली आहे.
पौराणिक, अध्यात्मिक कथांचा संदर्भ आजच्या वर्तमानासोबत कवीने जोडलेला आहे. तत्वज्ञान आणि विसंगत वर्तन यावर कवीने प्रकाशझोत टाकलेला आहे.
आशा कवितेतून आशावादी बनण्याचा संदेश कवी देतो.
मनाच्या अंगणातून या कवितेतील मर्मबंध वाचकांच्या मनात स्थान निर्माण करतात.
“मनाच्या अंगणात
एक सुंदर तुळशी वृंदावन
देत राहते ऑक्सिजन जेव्हा
तेव्हा वाहत असते स्वच्छ हवा..
मनाच्या अंगणात
प्रेमाचे दोन दिवे
असेच जळत राहोत…
अनंत काळासाठी
मनाच्या अंगणात
आशेचा एक पक्षी
उजेडाचे गाणे
गात राहील सर्वांसाठी…”
कवितेतील प्रत्येक ओळीतील आशय मनातील बीजांकुराची अवस्था सांगत जातो. क्षणार्धात मनाचे असंख्य रूपे विविध उपमा, अलंकारातून कवीने साकारले आहे. आणि तो आशय हिन्दी भाषेतून जाणिवांसह मराठीत जसा आहे तसा प्रगट झाला आहे. ही गुणविशेष बलस्थाने या अनुवाद केलेल्या कवितेतून दिसून येतात.
‘शकुंतलेसाठी’, ‘तळहातावरच्या रेषा’, ‘आई’, ‘चला स्वप्ने बघुया’, ‘कॅन्डल मार्च’ या कविता देखील आशयसंपन्न, उल्लेखनीय आहेत.
“मी तुला पाहतो रोज
आकाशातील चंद्र तारकांमध्ये
तलावांमध्ये, झऱ्यामध्ये,
झाडाझुडुपांमध्ये,
रूणझूणणाऱ्या वाऱ्यामध्ये’
आईविषयी उत्कट भावना, एकांतात रडणारा कवी यात दिसून येतो. आईविना वाढलेला काळ एका मुलाचे बालपण ते तरूणपणाचा प्रवास यात दिसून येतो.
“मेणबत्ती हातात घेऊन
चालला आहे
निरागस मुलांचा जथा
आज परत एकदा
कुठल्यातरी कोल्ह्यांनी
आमच्या प्रदेशाची लुटली इज्जत”
“बलात्कारीत स्त्रीच्या वेदनेची कथा” आणि “कॅन्डल मार्च” या कवितेतून प्रभावीपणे मांडली आहे.
‘प्रजातंत्र’, ‘आमंत्रण’, ‘अनंताचे’ ‘प्रवासयात्रीक’ या कविता देखील वाचकांना अंतर्मुख करतात.
“खेळण्याची किंमत
बिछान्यापेक्षा दुप्पट आहे
तेव्हाच मी समजून गेलो होतो
प्रजातंत्राच्या मुळांना
वाळवीने खाऊन टाकले आहे’
‘प्रजातंत्र’ या कवितेतून जागतिकीकरणात स्वार्थी लोकशाहीचा चेहरा कवीने कवितेतून दाखवला आहे.
“प्रश्नांच्या पृष्ठभूमीवर
दबलेले लपलेले प्रश्न
आणि त्या प्रश्नांना
एक गर्भार उत्तर
आपल्याला मजबूर करतात
विचार करायला’
‘आमंत्रण’ या कवितेतून व्यक्त केलेली काळानूरूप मागणी, अनिवार्य अट यातून जीवन जगण्याचे आव्हान आणि वेदनांचा प्रवास पारदर्शी दृष्टिकोनातून कवी व्यक्त करतो. तोच आशय या अनुवादातून लक्षात येतो. जमीनीखालील लपलेले आभाळ यातून मनातील बीजांकुराच्या सृजनशीलतेसाठी कवी सातत्याने क्रियाशील राहून सूक्ष्म निरीक्षण नोंदवत असतो. असा संदेश आशयातून मिळतो.
“दगडाच्या मुर्त्या कशा झाल्या ?
कळलेच नाही
अनंताचा प्रवास करणारे यात्रिक
आजीवन प्रवास करत आहेत
अनंताच्या टोकाला स्पर्श करत आहेत
असीमाची खोली मोजत आहेत”
‘अनंताचे प्रवासयात्रीक’ या कवितेतून कवी सामूहिक दु:ख, प्रचलित कथा, मैलाचा दगड, रस्त्यावरील दगड यामधील तफावतीचा इतिहास उलगडून दाखवतो.
माणसाची आंतरीक ऊर्जा भूतकाळ आणि भविष्यकाळाचा वेध घेत असते. त्यासोबत वर्तमानाचा संवाद सेतू जोडत जोडत कवी मनातील सूक्ष्म परीक्षण, स्वानुभवातून निष्कर्ष यांचा शब्दालेख कविता जोडत जाते.
‘आत्मसाक्षात्कार’, ‘लोकशाही’, ‘बदल’, ‘विद्रोही’या कविता देखील वाचकांना अंतर्मुख करतात.
“आज मी अस्वस्थ आहे
स्वतःला भेटून
माझे खरे रूप किती क्रुर
किती भयानक आहे
दुसरा कोणीतरी त्याला पाहिलं
त्याआधी मी स्वतःपासून पळून
त्याला लपवत आहे
सभ्यतेच्या आवरणामध्ये “
कवी स्वतःच्या मनाची पारदर्शकता देखील वाचकांसमोर व्यक्त करतो. यातून वैश्विक जाणिवांचे स्वतः च्या नश्वर अस्तित्वाचा स्वीकार व्यक्तीने केला पाहिजे. हा संदेश मिळतो.
लोकशाही कविता देखील आजच्या काळाचे चित्रण रंगविण्यात यशस्वी ठरते.
“लोकशाहीच्या तोंडावर
किती वेळा फासली गेली शाई
कितीतरी वेळा
तिच्या स्वच्छ चारित्र्यावर
उडवले गेले चिखलाचे डाग”
लोकराज्यातील युध्दात लोकांनी लोकांना स्वर्गात पाठवले. हा मौलिक संदेश भ्रष्टाचाराच्या, अनैतिक वर्तनाच्या वर्मावर बोट ठेवणारा ठरतो.
जगण्याचे जगण्याशी असलेले नाते
हळूहळू आपल्या जून्या पुराण्या
जगापासून आपण तुटत चाललो आहोत
राहतो महालात
मात्र आपल्या मनापासून उखडत
चाललो आहोत
माणसाच्या एकाकीपणाचा अचूक वेध कवी मनाने घेतला आहे. माणूस स्वतःच्या मनापासून दूर जात आहे. ही वैश्विक पातळीवर बदल दाखवणारी प्रक्रिया आहे.
परंतू जग हे अशाच बंडखोर आणि
विद्रोही लोकांच्या जीवावर जिवंत आहे
जीवन बदलण्याची क्षमता विद्रोही लोकांमध्ये आहे. त्यामुळे विश्व चालत आहे. ही कविता खूप आवडली. कारण या कवितेतून मिळणारा विद्रोही संदेश वैश्विक सत्य अनुभवातून आलेला आहे.
“अफरातफरी”, “कवी”, “काहीच अवघड नाही”, “राग आणि राग”, “उजेड”, “कविता आईसारखी”, अ”वघड तर या अगोदर सुध्दा होतं”, “विघटन”, “वंदन”, “दवंडी” या कविता देखील उत्तम, जाणिवांचा वेध घेणाऱ्या, पारदर्शक कविता आहेत.
बदलत्या काळानुसार अंतरंगातून प्रगट झालेला अचूक वेध हे गुणविशेष कवितेत दिसून येतात. जगाशी लढणारा शस्त्रहीन योध्दा कवीच्या कवितेतून वाचकांना भेटतो.
उजेड ही कविता देखील अप्रतिम आहे.
अंधारावरच त्यांचे प्रेम आहे
आणि उजेड बाहेर उभा आहे अंगणात
वरील दोन ओळीतील आशय उजेडाकडे अर्थात ज्ञानाकडे नेणारा सूचक असा गर्भितार्थ कवी मनाने व्यक्त केला आहे. तोच आशय जसा आहे तसा अनुवाद स्वरूपात वाचकांसमोर व्यक्त केला आहे.
गतिशील पाय असणार्या माणसाला कवी शतशत नमन करतो. कवी मन सक्रिय माणसांविषयी आदर निर्माण करणारे आहे. इतरांविषयी कौतुकास्पद शब्द, स्वतःचे पारदर्शक रूप हे उच्च पातळीवरील गुणविशेष कवितेत दिसून येतात.
‘म्हातारा भूतकाळ विचारत आहे’, ‘कवितेचे मर्म’, ‘लॉकडाऊन’, ‘नदी’, ‘गझल’, ‘मदर डे’, ‘कविता’, ‘पदरामध्ये विस्तव’, ‘बासरीवादन’, “स्वप्नाळू डोळे’, “माणूस”, “प्रतीक्षा”, “मोजमाप”, “सगळ्यात अवघड वळणावर”, “पाणी”, “मेणबत्ती”या कवितेतून व्यक्त केलेला आशय देखील सुरेख आहे.
“मोठी कविता समजण्यासाठी
शुद्र मानवीय मनस्थिती पुरेशी
असते.”
कवितेच्या वरील दोन ओळी वाचकांना कवितेचे मर्म देऊन जातात.
नदीचे विक्राळ रूप पाहून आशेवर जगणारा माणूस नदी या कवितेतून व्यक्त केला आहे.
गझल कविता खूप छान, पारदर्शक आहे.
जगण्याची कला शिकवणारी गझल वाचकांना देखील भावते.
कळत नाही
कोण त्याच्यात परकाया प्रवेश करते
आणि लिहू लागते कविता
प्रत्येक व्यक्तीत
होणारा हा परकाया प्रवेश
सगळ्या जगाला स्वीकारणारी कविता कुठून निर्माण होते. याविषयी कवी सहजतेने कवितेचे मर्म, उगमस्थान, “बीजांकुर वाचकांना दाखवतो.
अशा लोकांना वंदन माझे
प्रवाहाच्या विरुद्ध जे पोहतात
सत्तेच्या जवळ असून सुद्धा
दगडासारखे स्तब्ध असतात”
वरील कवितेच्या ओळी वाचकांच्या मनात स्थान निर्माण करतात. कारण आजचे वास्तव चित्रण कविता सहजतेने रेखाटते.
बुध्द हसला आहे, ‘जमिनीची वेदना’, ‘काय सुंदर दिवस होते ते’, ‘महासागर’, ‘तानसेन’, ‘एकाकीपण’, ‘विद्रोह’, ‘क्षण’, ‘संघर्ष’, ‘गर्दीचे शास्त्र’, ‘सगळे क्षण हळूहळू’ या कविता खूप सुरेख आहेत.
“सगळे क्षण हळूहळू
बदलून गेलेत एकाच क्षणात
प्रत्येक क्षणाची एक कहाणी
प्रत्येक क्षणाची आपली जादू
प्रत्येक क्षणाचे आपले उपद्रवी मूल्य
प्रत्येक क्षणाचा आपला सुवास
सगळं जीवन म्हणजे
एक क्षणात गुंडाळलेले आहे”
जीवनाचे मौलिक स्थान, मौलिक प्रवास, मौलिक वेळ, मौलिक संदेश, मौलिक समाधान, मौलिक आनंद अगदी सहजतेने कवी मनातून भाषेचे बंधने न येता जशा भावना, स्वानुभव आहेत, तशाच कविता ठळकपणे सादर करण्यात मूळ कवी आणि अनुवाद करणारे कवी दोघांचे यश दिसून येते.
पुस्तकाचे नाव – माधव कौशिक यांची निवडक कविता
मुळ हिंदी कवी – माधव कौशिक
मराठी अनुवाद – प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे
प्रकाशक – सर्वभाषा प्रकाशन
किंमत – २१० रुपये
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.